scorecardresearch

Premium

न्यूयॉर्कमध्ये चीनच्या गुप्त पोलीस चौकीचा भांडाफोड; जगभरात चीनने १०० गुप्त पोलीस चौक्या का उभारल्या?

एफबीआयने चीनच्या दोन गुप्तहेरांना अटक करून अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरात चीनच्या एका गुप्त पोलीस स्थानकाचा भांडाफोड केला. शि जिनपिंग यांच्या हुकुमावरून आणि चीनच्या सार्वजनिक सुरक्षा मंत्रालयाच्या निर्देशानुसार अमेरिकेतील हालचालींवर हे पोलीस स्थानक लक्ष ठेवून होते. जगभरात चीनने अशी १०० पोलीस स्थानके स्थापन केली असल्याची माहिती समोर आली आहे.

chinese secret police station in new York
अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरात चीनने एक गुप्त पोलीस चौकी उभारली होती. ज्याचा भांडाफोड FBI ने केला.

युनायटेड स्टेट्स आणि चीनमधील संबंध नेहमीच कमी-अधिक प्रमाणात तणावाचे राहिलेले आहेत. अमेरिकेप्रमाणेच अनेक देशांना कम्युनिस्ट राजवट असलेल्या चीनवर विश्वास ठेवणे अवघड वाटते. चीन इतर देशांमध्ये हेरगिरी करीत असल्याचा आरोप वारंवार करण्यात येतो. या वर्षी फेब्रुवारी महिन्यात हेरगिरी करणाऱ्या बलूनमुळे अमेरिका आणि चीनमध्ये तणाव निर्माण झाला होता आणि आता न्यूयॉर्कसारख्या शहरात गुप्त पोलीस स्थानक आढळून आल्यामुळे तणावपूर्ण परिस्थिती उद्भवली आहे. अमेरिकेच्या फेडरल ब्यूरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनने (FBI) सोमवारी दोन चायनीज गुप्तहेरांना अटक केली. त्यांनी मॅनहॅटन परिसरात चिनी सरकारतर्फे अवैध पोलीस स्थानक उभारले असल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. एवढेच नाही तर चीनच्या राष्ट्रीय पोलीस दलातील ३४ अधिकारी अमेरिकन नागरिकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून त्रास देत होते, असाही आरोप एफबीआयने केला आहे.

गुप्त पोलीस चौकी का उघडली?

लू जिनवांग (६१) आणि चेन जिनपिंग (५९) हे दोन अमेरिकन नागरिक सदर पोलीस चौकी चालवीत होते. त्यांच्यावर चिनी गुप्तहेर असल्याचा ठपका ठेवून षडयंत्र रचणे तसेच न्याय देण्यात अडथळे निर्माण करण्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. यूएसच्या न्याय विभागाने दिलेल्या माहितीनुसार, लू आणि चेन यांनी २०२२ साली चीनच्या सार्वजनिक सुरक्षा विभागाच्या वतीने अमेरिकेत पहिले परदेशी पोलीस स्थानक स्थापन केले. एफबीआयला या पोलीस चौकीचा थांगपत्ता लागल्याचे कळताच सदर पोलीस स्थानक तातडीने बंद करण्यात आले. अटक करण्यात आलेल्या आरोपींनी मान्य केले की, चीनच्या मंत्रालयासोबत जो पत्रव्यवहार करण्यात आला होता, त्याचे सर्व पुरावे त्यांनी नष्ट केले आहेत. एफबीआयकडून आपली चौकशी होत असल्याचे समजताच त्यांनी ही लपवाछपवी केली.

Emmanuel Macron
“२०३० पर्यंत फ्रान्सच्या विद्यापीठांत ३० हजार भारतीय विद्यार्थ्यांचं उद्दिष्ट”, प्रजासत्ताक दिनी फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी सांगितली योजना
20 vacant air India buildings demolished by airport administration despite residents oppose
एअर इंडियाच्या रिकाम्या वीस इमारती पाडल्या; रहिवाशांचा विरोध असतानाही विमानतळ प्रशासनाकडून पाडकाम
mumbai fire breaks out at penthouse of goregaon high rise
गोरेगावमध्ये गगनचुंबी इमारतीत भीषण आग; अग्निरोधक यंत्रणा बंद, पण अग्निशमन दलाच्या जवानांच्या प्रयत्नांना यश
maharashtra maritime officers remove stores elephanta local vendors gharapuri uran
घारापुरी बेटावरील स्थानिकांचे व्यवसाय संकटात

न्यूयॉर्कच्या पूर्वेकडील जिल्ह्याचे वकील ब्रेऑन पिस (Breon Peace) यांनी अल् जझीरा या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, या पोलीस स्थानकातील लोक बीजिंगच्या इशाऱ्यावर आंतरराष्ट्रीय दडपशाहीच्या माध्यमातून न्यूयॉर्क आणि अमेरिकेतील चिनी नागरिकांना लक्ष्य करत होते. या गुप्त पोलीस स्थानकाच्या माध्यमातून चिनी नागरिकांना अतिशय छोटी छोटी सरकारी कामे करू दिली जात होती. जसे की, वाहनचालक परवान्याचे नूतनीकरण करून देणे. मात्र या मदतीमागे त्यांचा हेतू स्वच्छ नव्हता, अशीही माहिती समोर आलेली आहे.

एफबीआयने अटक केलेल्या दोनपैकी एका व्यक्तीला चीनच्या राष्ट्रीय पोलीस दलाने एक मिशन दिले होते. लोकशाहीचे समर्थन करणारे जे चीनचे नागरिक आहेत, अशा लोकांना शोधण्याची जबाबदारी या व्यक्तीकडे देण्यात आली होती, असे वृत्त अल् जझीराने दिले आहे. वेगळ्या शब्दांत पण थेट सांगायचे झाल्यास चीनचे राष्ट्रीय पोलीस दल यूएसच्या भूमीवर यूएसच्या नागरिकांवरच पाळत ठेवण्याचे काम करीत होते, असे पीसने (Peace) म्हटले आहे. न्यूयॉर्कच्या एफबीआय फिल्ड ऑफिसचे प्रमुख मायकल ड्रिस्कॉल यांनी या कारवाईनंतर पत्रकार परिषदेत म्हटले की, हे अगदी उघडपणे अमेरिकेच्या सार्वभौमत्वाचे स्पष्टपणे उल्लंघन आहे.

आरोपींबाबत काय माहिती मिळाली?

बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार आरोपी लू हा चीनच्या कायदा अंमलबजावणी विभागाशी जोडलेला होता. बीजिंगच्या (चीनची राजधानी) मदतीसाठी अमेरिकेच्या भूमीवर २०१५ सालापासून तो चिनी नागरिकांवर दडपशाही करीत होता. अमेरिकेत राहणार्‍या चिनी नागरिकांना छळण्याचे काम त्याच्याकडून केले जात होते.
फिर्यादींनी दिलेल्या माहितीनुसार लू हा चीनमधून फरार झालेल्या गुन्हेगारांना पुन्हा मायदेशी धाडण्याचे काम करीत होता. यासाठी फरार व्यक्तींच्या अमेरिका किंवा चीनमधील कुटुंबाला प्रसंगी धमकावण्यातही येत असे. हे काम करताना तो फार मोठी देशभक्ती करीत आहे, असा आव आणायचा. दरम्यान, या दोन्ही आरोपींची चौकशी करीत असताना चेनने प्रसाधनगृहात जायचे असल्याचे सांगून वेळ मागितला. तेवढ्या वेळात त्याच्या मोबाइलवर चीनच्या सार्वजनिक सुरक्षा विभागाचे आलेले संदेश त्याने डिलीट केले. या दोन्ही आरोपींचे चीनच्या सार्वजनिक सुरक्षा मंत्रालयाशी गूप्त संबंध होते, हे एफबीआयने न्यायालयात सादर केलेल्या कागदपत्रांवरून सिद्ध होत आहे.

लू आणि चेन यांना सोमवारी न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने बाॅण्डवर त्यांची सुटका केली. चिनी दूतावासाच्या परिसरापासून अर्ध्या किलोमीटरपर्यंतच्या परिसरातच थांबण्याचे निर्बंध त्यांच्यावर लादण्यात आले आहेत. या परिसराबाहेर त्यांना जाता येणार नाही. तसेच पुढील सुनावणीपर्यंत कोणत्याही माध्यामातून त्यांना आपल्या सहकाऱ्यांशी संवाद साधता येणार नाही, असेही बंधन घालण्यात आल्याची बातमी सीएनएनने दिली आहे. जर दोन्ही आरोपींवरील गुन्हे सिद्ध झाले तर त्यांना २५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली जाऊ शकते.

चीन जगभरातील अनेक देशांमध्ये अशा प्रकारचे गूप्त पोलीस स्थानक चालवीत आहे, अशी माहिती यूएसच्या न्याय विभागाने दिली. तसेच न्यूयॉर्कमध्ये झालेली कारवाई ही जगातील पहिली अशी कारवाई असल्याचेही या विभागाने सांगितले.

कोणकोणत्या देशांत चीनचे गूप्त तळ आहेत?

चीनने कॅनडा, यूके आणि नेदरलॅण्ड्ससह जगभरातील ५३ देशांमध्ये जवळपास १०० गुप्त चौक्या किंवा तळ स्थापन केले असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. कॅनेडियन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मागच्याच महिन्यात कॅनडातील मॉनट्रेल आणि ब्रोसार्ड, क्यूबेक येथे दोन गुप्त पोलीस स्थानकांचा तपास घ्यायला सुरुवात केली आहे. याबाबत कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो म्हणाले की, गूप्तचर यंत्रणेकडून आमच्या रॉयल कॅनेडियन माऊंटेड पोलिसांना जी माहिती मिळाली, ती गांभीर्याने घेतली असून त्यावर काम सुरू आहे. मात्र कॅनडाचा हा दावा चिनी सरकारने फेटाळून लावला आहे. “आम्ही आंतरराष्ट्रीय कायदे आणि सर्वच देशांच्या न्यायिक सार्वभौमत्वाचा आदर राखतो,” अशी प्रतिक्रिया चीनच्या परराष्ट्रखात्याचे प्रवक्ते माओ निंग यांनी दिली.

मागच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात, नेदरलॅण्ड्समध्ये चीनने बेकायदेशीर पोलीस चौकी उभारली असल्याची माहिती मिळाली असून डचच्या परराष्ट्र खात्याने त्याची चौकशी सुरू केली असल्याचे सांगतिले. बीजिंगने मात्र नेदरलॅण्ड्सचा हा दावा खोडून काढत असा रिपोर्ट संपूर्ण चुकीचा असल्याचे सांगितले.

एफबीआयचे संचालक क्रिस्टोफर व्रे (Christopher Wray) यांनी सांगितले की, मागच्या वर्षी नोव्हेंबर महिन्यापासून आम्ही चीनच्या गुप्त चौक्या शोधत होतो, अशी माहिती बीबीसीने दिली. क्रिस्टोफर म्हणाले की, मला तर हे आक्षेपार्ह वाटते. चीनचे पोलीस न्यूयॉर्कमध्ये कोणत्याही परवानगीशिवाय त्यांची शाखा उघडत आहेत.

एफबीआय आणि कॅनडाच्या दाव्यानंतर यूएस आणि कॅनडामधील चीनच्या दूतावासाने या पोलीस चौक्यांना परदेशी सेवा केंद्र असल्याचे म्हटले आहे. करोना काळात आपल्या देशातील नागरिकांसाठी परदेशी भूमीवर हे मदत केंद्र उघडण्यात आले होते. या केंद्राच्या माध्यमातून वाहन परवान्याचे नूतनीकरण वगैरे कामे केली जात होती.

चिनी पोलीस दलाविरोधात कोणते आरोप ठेवण्यात आले आहेत?

यूएसच्या न्याय विभागाने सोमवारी सांगितले की, चीनच्या राष्ट्रीय पोलीस दलातील ३४ अधिकाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जे बीजिंगवर टीका करीत होते, अशा यूएसमधील चिनी नागरिकांना त्रास दिल्याचा आरोप पोलीस अधिकाऱ्यांवर ठेवण्यात आला आहे. गुन्हे दाखल करण्यात आलेले अधिकारी चीन आणि आशियाच्या प्रांतात राहत असल्याची माहिती आहे. हे अधिकारी चिनी सरकारच्या ‘९१२ स्पेशल प्रोजेक्ट वर्किंग ग्रुप’शी संबंधित आहेत. चीनबाबत असलेल्या जागतिक दृष्टिकोनावर प्रभाव टाकण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. हे अधिकारी अमेरिका आणि जगभरातील चिनी नागरिकांना लक्ष्य करतात.

अमेरिकेने दिलेल्या माहितीनुसार, चीनचे हस्तक असलेले लोक सोशल मीडियाचा वापर करून आपले सावज शोधायचे. सोशल मीडियावर चीनची स्तुती करणाऱ्या पोस्ट अपलोड करायच्या. या पोस्टवर विरोधात कमेंट करणाऱ्या लोकांना लक्ष्य केले जात असे. विरोधात कमेंट करणारे हे, चीन आणि अमेरिकेच्या लोकशाहीवादी चळवळीतील लोक आहेत. सीएनएनने दिलेल्या माहितीनुसार चीनच्या हस्तकांकडून सोशल मीडियावर तयार केलेली खाती ही अमेरिकन नागरिकांची असल्याचा भास निर्माण केला जायचा. लोकशाहीचे समर्थन करणाऱ्या लोकांना व्हिडीओ किंवा लेखाच्या माध्यमातून उत्तर देण्यात यायचे. काही लोकांना तर जिवे मारण्याच्या धमक्या देण्यात यायच्या.

अमेरिकेचे परराष्ट्र धोरण, रशिया-युक्रेन युद्ध, हाँगकाँगमधील मानवाधिकार विषय, करोना महामारी आणि अमेरिकेत जॉर्ज फ्लोयडच्या हत्येनंतर सुरू झालेली निदर्शने या विषयांचा वापर करून चीनने आपला प्रचार करण्याची संधी साधली. तसेच एका दुसऱ्या प्रकरणात चीनच्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगची सेवा देणाऱ्या (झूम, सीएनएनने सांगितल्याप्रमाणे) सॉफ्टवेअरने तियनानमेन स्क्वेअर हत्याकांडाबद्दल आयोजित केलेल्या स्मृतिसभेच्या बैठकीत व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला होता, असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: China operated a secret police station in new york 100 police stations across the world kvg

First published on: 19-04-2023 at 13:02 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×