क्षी जिनपिंग २०१२ मध्ये राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून चीनमध्ये अनेक लष्करी अधिकार्यांवर शिस्तभंग, भ्रष्टाचार, कायद्याचे उल्लंघन इत्यादी कारणांवरून कारवाई करण्यात आली आहे. मात्र, यामुळे चीनच्या युद्धसज्जतेवर गंभीर परिणाम होऊ शकतात, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.
कोणत्या लष्करी अधिकार्यांवर कारवाई?
चीनच्या संरक्षण मंत्रालयाने शनिवारी, २४ जानेवारीला सर्वोच्च लष्करी अधिकारी जनरल झांग युक्सिया आणि अन्य लष्करी अधिकारी जनरल लू शेन्ली यांच्याविरोधात तपास सुरू केल्याचे जाहीर केले. त्याची कारणे तातडीने सांगितली गेली नाहीत. दुसर्या दिवशी, चिनी लष्कराच्या – ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’ (पीएलए) – नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या संपादकीयामध्येही याविषयी स्पष्ट माहिती दिली गेली नाही. मात्र, शिस्तभंग आणि कायद्याचे उल्लंघन या आरोपांवरून त्यांची चौकशी केली जात असल्याचे सांगण्यात आले. या घोषणेनंतर चीनच्या लष्करी अधिकार्यांना धक्का बसला आहे. चीनमध्ये लष्करी अधिकार्यांवर कारवाई ही नवी गोष्ट नाही. पण जनरल झांग युक्सिया यांचे नाव असल्यामुळे अनेक भुवया उंचावल्या गेल्या.
जनरल झांग युक्सिया कोण आहेत?
७५ वर्षीय जनरल झांग युक्सिया हे ‘सेंट्रल मिलिटरी कमिशन’चे (सीएमसी) उपाध्यक्ष होते. ‘सीएमसी’ हा ‘कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना’चा (सीपीसी) शक्तिशाली गट असून त्याचे नेतृत्व राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्याकडे आहे. चीनच्या सैन्य दलांचे व्यवस्थापन आणि नियंत्रण याची जबाबदारी ‘सीएमसी’कडे आहे. जनरल झांग हे ‘सीएमसी’चे उपाध्यक्ष होते, म्हणजेच ते क्षी जिनपिंग यांच्यानंतर दुसर्या क्रमांकाचे नेते होते. ‘पॅसिफिक फोरम’चे के. त्रिस्तन तांग यांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, ‘‘जनरल झांग युक्सिया यांना हटवण्याची कारणे कधीही उघड केली जाणार नाहीत. मात्र, लष्करात समस्या आहेत हे या कारवाईतून उघड होत आहे.’’
जनरल लू शेन्ली यांचे स्थान
जनरल लू शेन्ली हे ‘सीएमसी’च्या संयुक्त कर्मचारी विभागाचे प्रमुख होते. तेही जनरल झांग युक्सिया यांच्याप्रमाणे ‘सीएमसी’चे सदस्य होते. मात्र, त्यांचा दर्जा जनरल झांग युक्सिया यांच्यापेक्षा कमी होता. ‘सीएमसी’ची एकूण सदस्यसंख्या सात आहे. मात्र, त्यांच्या इतर सदस्यांवर वेळोवेळी कारवाई होऊन सध्या त्याचे क्षी जिनपिंग आणि जनरल झांग शेन्गमीन हे दोनच सदस्य उरले आहेत.
जिनपिंग यांची मोहीम
क्षी जिनपिंग २०१२ मध्ये चीनचे अध्यक्ष झाले, तेव्हापासून भ्रष्टाचारासह इतर कारणावरून चीनच्या दोन लाखांपेक्षा अधिक लष्करी अधिकार्यांवर कारवाई करण्यात आली. त्यामध्ये किमान १७ अधिकारी जनरल दर्जाचे होते. जिनपिंग यांनी हाती घेतलेल्या भ्रष्टाचारविरोधी मोहिमेचा भाग म्हणून या कारवाया करण्यात आल्याचे सांगितले जाते. मात्र, क्षी जिनपिंग यांचे स्थान अधिक बळकट करण्यासाठी आणि त्यांच्याशी एकनिष्ठ लष्करी अधिकार्यांना बळ देण्यासाठी ही कारवाई केली जात असल्याचे काही टीकाकारांचे म्हणणे आहे. याआधी ऑक्टोबरमध्ये हे विडाँग यांच्यावर याच कारणाने कारवाई करण्यात आली होती. तेही ‘सीएमसी’चे सदस्य होते. ‘सीपीसी’च्या सेंट्रल कमिटीमध्ये विचारविनिमय केल्यानंतर झांग आणि लू शेन्ली यांच्या चौकशीचा निर्णय घेण्यात आला, असे संरक्षण मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.
जिनपिंग यांना चुकीचा सल्ला?
सिंगापूरच्या ‘एस राजरत्नम स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीज’चे ड्र्यू थॉम्पसन यांच्या मते, जनरल युक्सिया यांना हटवण्याबद्दल जिनपिंग यांना खुशमस्कर्यांकडून चुकीचा सल्ला देण्यात आला आहे. चीनच्या क्षमता आणि कच्चे दुवे तसेच युद्धाची मानवी किंमत या विषयांवर जनरल युक्सिया हे त्यांना वस्तुनिष्ठ सल्ला देऊ शकले असते. आता योग्य सल्ला हवा असेल तर जिनपिंग कोणाची मदत घेणार आहेत, असा प्रश्न थॉम्पसन यांनी विचारला.
तैवानसमोरील आव्हानात बदल होणार का?
अमेरिकी सरकारने काही दिवसांपूर्वी तैवानला मोठ्या प्रमाणात शस्त्रविक्री करण्याची घोषणा केली. त्यानंतर चीनने गेल्या महिन्यात आपला लष्करी दबाव वाढवताना, तैवानला दोन दिवस लष्करी वेढा घातला. यापूर्वीही चीनने तैवानवर दबाव वाढवण्यासाठी तैवानला समुद्रात आणि आकाशात वेढा घातला होता. ‘एशिया सोसायटी पॉलिसी इ्स्टिटट्यूट’चे अभ्यासक नील थॉमस यांनी ‘द असोसिएटेड प्रेस’ला सांगितले की, लष्करातील बदलांमुळे काही दिवसांसाठी चीनचा तैवानला असलेला धोका कमी होईल, पण दीर्घकालाचा विचार करता, तो अधिकच वाढणार आहे. जिनपिंग यांच्या पसंतीचे नवे लष्करी नेतृत्व अधिक सक्षम आणि एकनिष्ठ असेल, शिवाय तुलनेने कमी भ्रष्ट असेल. त्यामुळे तैवानसमोरील आव्हान वाढणार आहे.
लष्करी सज्जतेला फटका बसणार का?
या मोठ्या प्रमाणातील कारवाईचा चिनी लष्कराच्या युद्धसज्जतेवर परिणाम होऊ शकतो, अशी शंका व्यक्त केली जात आहे. मात्र, तांग यांच्या मते असे काही होणार नाही. ‘पीएलए’च्या तयारीत मोठे अडथळे आले आहेत असे आपल्याला वाटत नाही, असे त्यांनी वृत्तसंस्थांना सांगितले. याशिवाय ‘सीएमसी’च्या भवितव्याबद्दलही प्रश्न विचारले जात आहेत. ‘सीएमसी’ची एकूण सदस्यसंख्या सात असताना, सध्या त्याचे दोनच सदस्य आहेत. उर्वरित पाच सदस्यांची तातडीने नियुक्ती केली जाईल की पुढील वर्षी ‘सीपीसी’च्या नव्या सेंट्रल कमिटीची निवड होईल, तेव्हाच या पाच जागा भरल्या जातील ते अद्याप स्पष्ट नाही. सध्या तरी जिनपिंग यांच्यावर तसा काही दबाव दिसत नाही. झांग शेन्गमीन यांच्यासमोर प्रतिस्पर्धी उभा करायचा असेल तरच त्यासाठी घाई केली जाईल, असे के. त्रिस्तन तांग यांचे म्हणणे आहे.
nima.patil@expressindia.com

