संयु्क्त अरब अमिरातीचे (यूएई) राजपुत्रांनी काही दिवसांपूर्वी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची बिजिंगमध्ये भेट घेतली. या भेटीनंतर चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी प्रथमच इराण युद्धावर थेट प्रतिक्रिया दिली. पश्चिम आशियातील युद्धाबाबत चीनची भूमिका अस्पष्ट होती. “जंगलांमध्ये असलेले नियम” लागू होऊ नयेत, असा इशारा जिनपिंग यांनी जगाला दिला. तसेच अमेरिकन नौदलाने इराणची नाकेबंदी केली आहे. त्याला एक ‘धोकादायक व बेजबाबदार कृत्य’ असल्याचे जिनपिंग म्हणाले. इतके दिवस चीनने युद्धावर थेट भाष्य करणे टाळले होते, परंतु, आता चीनच्या अर्थव्यवस्थेला झळ बसत असल्याने चीनने अमेरिकेविरोधात थेट भूमिका घेतली आहे. चीन हा संदिग्धता निर्माण करणारा देश आहे. तो स्पष्ट भूमिका घेत नाही. पडद्यामागून घडामोडी घडवून आणण्यात चीन पटाईत आहे. आपली भूमिका उघडपणे मांडणे चीन टाळतो, परंतु, यंदा तेलाचा पुरवठा विस्कळीत झाल्याने चीनची भूमिका देखील विस्कळीत झाली आहे.

चिनी झेंडे असलेल्या तेलवाहू जहाजांना अमेरिकन नौदलाने रोखले?

अमेरिकेने इराणवर नाकेबंदी केली आहे. इराणच्या दिशेने जाणाऱ्या किंवा इराणकडून येणाऱ्या तेलवाहू जहाजांना अमेरिकन नौदल अडवत आहे. चीनचे झेंडे असलेल्या काही तेलवाहू जहाजांना अमेरिकन नौदलाने रोखले. त्यामुळे चीनवर नामुष्की ओढवली आहे. पश्चिम आशियातील युद्धाचा आपल्यावर कोणताही परिणाम होत नाही, असे दाखवण्याचा चीनने प्रयत्न केला होता. पण, चीनदेखील इराणचे तेल खरेदी करणारा मोठा देश आहे, हे या निमित्ताने उघड झाले आहे. तेलाचा पुरवठा विस्कळीत झाल्याने चीनच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होत आहे, हे देखील चीनने थेट भूमिका मांडण्यामागील एक महत्वाचे कारण आहे.

चीनचे इराणला समर्थन?

पश्चिम आशियातील युद्धात आता चीन इराणची बाजू घेत असल्याचे देखील उघड झाले. त्याचे कारण म्हणजे चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी इराणबरोबर झालेली चर्चा सार्वजनिक केली आहे. कोणत्या देशाबरोबर काय चर्चा झाली, याचा तपशील चीनकडून कधीही सार्वजनिक केला जात नाही. वांग यी यांनी इराणला होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्यास तसेच नौकानयन स्वातंत्र्याची खात्री करण्यास सांगितले आहे. चीनच्या अर्थव्यवस्थेची घडी विस्कटत असताना चीनने पश्चिम आशियातील युद्धात डोके वर काढले आहे. होर्मुझ सामुद्रधुनीवरील अमेरिकेच्या नाकेबंदीची चीनने निंदा केली आहे.

चीनचा ऊर्जा स्त्रोत उघड?

चीन इराणकडून तेल आयात करतो हे उघड झाले आहे. चीन इराणचे तेल कोणत्या किंमतीत खरेदी करतो याबाबत गुप्तता आहे. चीनला इराणी तेल डिस्काउंटवर मिळते. जागतिक पातळीवर कच्च्या तेलाचे दर वाढत आहेत. त्यामुळे चीनला देखील चढ्या दराने तेल खरेदी करावे लागत आहे. तसेच चीनमधील औद्योगिक पट्ट्यांमध्ये तेल व नैसर्गिक वायूचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे चीनच्या निर्यातीवर परिणाम होत आहे. पश्चिम आशियातील युद्ध आता चीनसाठी बाहेरील मुद्दा राहिलेला नसून तो घरगुती (देशांतर्गत) मुद्दा झाला आहे.

चिनी रिफायनर्सला अमेरिकन नाकेबंदीचा तडाखा?

चीनमधील काही स्वतंत्र रिफायनर्स इराणमधून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी करतात. स्वतंत्र रिफायनर्सना टीपॉट्स असे म्हटले जाते. त्यांच्या रिफायनरी मुख्यत: चीनमधील शँन्डाँग भागात आहेत. त्यांना तेल खरेदीवर इराणकडून मोठ्या प्रमाणात सुट मिळते, तसेच अमेरिकेने निर्बंध लादलेल्या तेलाची ते खरेदी करतात. आतापर्यंत या रिफायनर्सच्या साखळीला धक्का लागलेला नव्हता. अमेरिकेच्या नाकेबंदीने या रिफायनर्स समोर संकट उभे राहिले आहे. रिफायनर्सना होणारा इंधन पुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे इतके दिवस गप्प बसलेल्या चीनला आता आवाज उठवणे आवश्यक असल्याची उपरती झाली आहे. ऊर्जेची पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याने चीनसाठी मुत्सद्देगिरी आता दुय्यम झाली आहे.

एकाच वेळी इराण व आखाती देशांशी सलोखा साधण्याचा प्रयत्न का?

चीन ऊर्जेसाठी आखाती देशांवर अवलंबून आहे. आखाती देशांमध्ये चीनचे लॉजिस्टिक हब आहे. तसेच दीर्घ काळासाठी केलेली गुंतवणूक (लाँग टर्म इव्हेस्टमेंट) आहे. आर्थिकदृष्ट्या चीन इराणला पाठिंबा देतोय, पण थेट लष्करी सहकार्य टाळतोय. इराणला चीन समर्थन देत असला तरी इराणला कोणतेही आश्वासन देणे चीनने टाळले आहे. त्याचे कारण म्हणजे इराणचे आखातातील इतर देशांशी संबंध बिघडले आहेत. तर चीनसाठी आखातातील इतर देशही इराण इतकेच महत्वाचे आहेत.

अमेरिकेशी शा‍ब्दिक बाचाबाची चीनला झोंबणार?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे लवकरच चीनच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्याआधी चीन अमेरिकेवर टीका करत आहे. ट्रम्प यांचा चीन दौरा या आधी एकदा पुढे ढकलण्यात आला होता. ट्रम्प यांचा दौरा म्हणजे चीनसाठी आर्थिक हित जोपासण्याची तसेच शांतता प्रस्थापित करण्यासाठी एक संधी आहे. परंतु, चीनकडून अमेरिकेवर होणारी टीका चीनसाठीच त्रासदायक ठरू शकते. अमेरिका व इराणमध्ये दीर्घकाळ संघर्ष सुरू राहीला तर चीनवर गंभीर तेलसंकट ओढवू शकते. तसेच वारंवार चीनने अमेरिकेवर टीका केल्यास, चीनवर आर्थिक निर्बंध तसेच टॅरिफ लावण्याचा पर्याय अमेरिका अवलंबू शकते. या परिस्थितीत जागतिक पातळीवरील परिस्थिती अधिकच बिघडण्याची शक्यता आहे.

अमेरिकेची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न?

चीनला इराणबरोबर संबंध ठेवताना आखातातील इतर देशांबरोबरही संबंध ठेवायचे आहेत. चीनला भूमिका अधिक स्पष्ट करणे येत्या काळात अत्यावश्यक ठरेल, अशी शक्यता आहे. फार वेळ चीनला संदिग्धता ठेवून पुढे जाता येणार नाही, असे अभ्यासकांना वाटते. अमेरिकन नौदलाने इराणच्या केलेल्या नाकेबंदीला चीनने “धोकादायक व बेजबाबदार कृत्य” म्हटले आहे. अमेरिका शक्तीचा वापर करून अस्थिरता निर्माण करत आहे, असे जागतिक पातळीवर ठसवण्याचा चीनने प्रयत्न केला. चीन स्वत: स्थिरता आणि आंतरराष्ट्रीय कायद्यांचे पालन करतो, असे चीनने युरोप व ग्लोबल साऊथला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. जागतिक पातळीवर चीन एक संतुलन साधण्याचा प्रयत्न करतोय, पण हे संतुलन फार काळ चीनला टीकवता येणार नाही, असे आंतरराष्ट्रीय घडामोडींशी संबंधित अभ्यासकांना वाटते.