China Wang Wang Dog : चीनमधून प्राण्यांवरील अत्याचाराची धक्कादायक घटना समोर आली आहे. काही अल्पवयीन मुलांनी ‘वांग वांग’ नावाची एक श्वान आणि तिच्या तीन पिल्लांवर अमानुष अत्याचार केल्याचा आरोप आहे. यानंतर मुलांनी या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओदेखील सोशल मीडियावर पोस्ट केला, त्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे.
मुलांनी ‘वांग वांग’ या श्वानाच्या गळ्याभोवती वायर गुंडाळली, तसेच तिला फरफटत नेले आणि नंतर तिच्यावर ज्वलनशील पदार्थ टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला असा आरोप आहे. यादरम्यान या श्वानाचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर चीनमधील अनेक नागरिकांनी ‘वांग वांग’ला श्रद्धांजली वाहण्यासाठी जागोजागी फलक आणि बॅनर लावले आहेत. प्राणीप्रेमींनी ही अमानुष घटना असल्याचे सांगत तीव्र निषेध नोंदवला आहे, तर या कृत्यास जबाबदार असलेल्या मुलांवर कठोर कारवाई करण्याची मागणीदेखील केली आहे. यामुळे चीनमधील प्राण्यांवरील वाढत्या अत्याचारांविरोधात कठोर कायदे करण्याची मागणीही आता जोर धरू लागली आहे.
या घटनेनंतर चीनमधील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. सोशल मीडियावर वांग वांगवर झालेल्या छळाच्या निषेधार्थ अनेक पोस्ट केल्या जात आहेत. प्रशासनाने अशा सोशल मीडिया पोस्टसवर निर्बंध आणण्यास सुरुवात केली आहे. तसेच, तिच्या स्मरणार्थ विविध ठिकाणी लावण्यात आलेले फलक आणि पोस्टर्सही हटवण्यात आले आहेत. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, ???या प्रकरणात सामील असलेल्या त्या चार अल्पवयीन ळ्यदेखील विचार करावा.
या निर्बंधांनंतरही जनक्षोभ कमी झालेला नाही. उलट, प्राणीप्रेमींनी ही मोहीम आता देशाच्या सीमांपलीकडे नेली आहे. न्यूयॉर्क आणि मिलानसारख्या शहरांमध्येही ‘वांग वांग’साठी न्यायाची मागणी करणारे फलक लावण्यात आले आहेत. चीनसारख्या देशात, जिथे ऑनलाइन किंवा ऑफलाइन विरोधी मतांवर कडक नियंत्रण ठेवले जाते आणि सरकारच्या भूमिकेशी विसंगत ठरणाऱ्या मजकुरावर सेन्सॉरशिप लागू केली जाते, अशा परिस्थितीत या मोहिमेला विशेष महत्त्व प्राप्त झाल्याचे मानले जात आहे.
प्रशासनाने निर्बंध लादल्यानंतरही या घटनेविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. चीनमधील प्राणीप्रेमींनी आता ही लढाई सोशल मीडियापुरती मर्यादित न ठेवता ते प्रत्यक्षात विरोध दर्शवत आहेत, ज्याचे आंतरराष्ट्रीय स्तरावरदेखील पडसाद उमटले आहेत. न्यूयॉर्क आणि मिलानसारख्या शहरांमध्ये ‘वांग वांग’ला न्याय मिळावा या मागणीचे होर्डिंग्ज आणि फलक झळकले आहेत. जिथे ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही स्तरांवरील विरोधी मतांवर कठोर नियंत्रण ठेवले जाते आणि सरकारच्या भूमिकेशी विसंगत ठरणाऱ्या मजकुरावर सेन्सॉरशिप लागू केली जाते, अशा चीनमध्ये या मोहिमेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
‘वांग वांग’च्या मृत्यूमुळे चीन शोकमग्न
सुमारे महिनाभरापूर्वी चीनच्या ग्वांगडोंग प्रांतातील जियेयांग शहरात ‘वांग वांग’ नावाच्या भटक्या श्वानावर चार किशोरवयीन मुलांनी अत्याचार केल्याची घटना समोर आली होती. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ त्यांनी चित्रित केला होता, ज्यामध्ये एक मुलगा श्वानावर हसतानाचा आवाज ऐकू येतो. हा व्हिडीओ जेव्हा सोशल मीडियावर व्हायरल झाला, तेव्हा देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.
घटनेनंतर दोन दिवसांनी स्थानिक प्रशासनाने अधिकृत निवेदन जारी करून ‘वांग वांग’वर अत्याचार झाल्याची पुष्टी केली. संबंधित चारही मुलांचे वय फौजदारी गुन्हा दाखल करण्याच्या किमान वयोमर्यादेपेक्षा कमी असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. मात्र, त्यांना सुधारात्मक शिक्षणासाठी विशेष निवासी संस्थेत पाठवण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
प्रशासनाने निवेदनात या घटनेचा उल्लेख करताना ‘क्रूरता’ किंवा ‘छळ’ यांसारखे शब्द वापरले नसल्याचे वृत्त आहे. उलट, नागरिकांनी या प्रकरणाशी संबंधित माहिती सोशल मीडियावर प्रसारित करू नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तसेच, अल्पवयीन मुलांविरोधात ऑनलाइन ट्रोलिंग किंवा सायबर बुलिंग टाळून त्यांच्या विकासासाठी पोषक वातावरण निर्माण करा, असे आग्रहाचे आवाहन प्रशासनाने केले आहे, त्यामुळे या प्रकरणामुळे सध्या चीनमधील वातावरण तापले आहे.
मात्र, वांग वांगच्या मृत्यूप्रकरणी प्रशासनाने घेतलेल्या सौम्य भूमिकेमुळे चीनमध्ये नाराजीचे वातावरण आहे; तर ‘वांग वांग’च्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर प्राणीसंवर्धन आणि प्राण्यांवरील अत्याचारांविरोधात कठोर कायदा करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. विशेष म्हणजे हा विरोध केवळ सोशल मीडियापुरता मर्यादित राहिलेला नाही. ‘वांग वांग’च्या स्मरणार्थ पूर्ण देशभरात विविध उपक्रम राबवण्यात आले आहेत. नागरिकांकडून क्राउडफंडिंगच्या माध्यमातून देशातील अनेक शहरांतील व्यापारी भागांमध्ये असलेल्या एलईडी स्क्रीनवर तिच्या स्मरणार्थ आपुलकीचे संदेश लिहिण्यात आले. शेनझेनमधील एका सौंदर्यप्रसाधन कंपनीनेही मॉलमध्ये जाहिरात प्रसिद्ध केली, ‘प्राण्यांवरील अत्याचाराला विरोध करा; त्यासाठी कठोर कायदा असायलाच हवा,’ असा संदेश जाहिरातीतून देण्यात आलाय.
तसेच, डालियान येथे झालेल्या एका फुटबॉल सामन्यापूर्वी स्टेडियमच्या मोठ्या स्क्रीनवर ‘वांग वांग’ आणि तिच्या पिलांचे व्यंगचित्र प्रदर्शित करण्यात आले. त्यासोबत ‘प्रत्येक जीव सन्मान आणि दयेला पात्र आहे,’ असा प्रेमळ संदेश झळकवण्यात आला, बीबीसीने यासंबंधी वृत्त दिले आहे.
यासह, चीनमधील सर्वांत मोठे ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म ‘ताओबाओ’वर ‘वांग वांग’ आणि तिच्या पिलांचे स्टिकर्स तसेच वाहनांवर लावण्यासाठीचे डेकल्स विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत.
‘वांग वांग’ प्रकरणाबद्दल चित्रपट क्षेत्रातूनही चिंता व्यक्त करण्यात आली. अनेक सेलिब्रिटींनी या घटनेचा निषेध व्यक्त करत ही घटना गंभीर असल्याचे म्हटले आहे. चिनी अभिनेता डू जियांग यांनी ५ जुलैला Douyin या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत या घटनेचा निषेध केला; तर तैवानची अभिनेत्री जो चेन यांनी १४ जुलै ला Weibo वरून प्राण्यांवरील या क्रूरतेविरोधात आवाज उठवला.
या मोहिमेला हाँगकाँगमधूनही मोठा प्रतिसाद मिळाला आहे. Suppaw या प्राणी दत्तक घेणाऱ्या एका संस्थेने क्राउडफंडिंगद्वारे अवघ्या दोन तासांत सुमारे ९५ हजार हाँगकाँग डॉलर (सुमारे १२ हजार अमेरिकी डॉलर) जमा केले. या निधीतून ‘वांग वांग’चा मोठा फोटो असलेली जाहिरात हाँगकाँगमधील ट्रामवर झळकवण्यात आली. त्या माध्यमातून न्यायाची मागणी करण्यात आली.
प्रशासनाकडून सेन्सॉरशिपची कारवाई
‘वांग वांग’ प्रकरणामुळे सोशल मीडियावर व्यक्त होणारा जनक्षोभ पाहता चीनमधील प्रशासनाने सोशल मीडियावरील संबंधित पोस्ट्स हटवण्यास सुरुवात केली आहे. अभिनेता डू जियांग आणि अभिनेत्री जो चेन यांनी केलेल्या पोस्ट्स कोणतेही कारण न देता प्लॅटफॉर्मवरून हटवण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, या पोस्ट्स हटवल्याची बाब आता सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. काही वापरकर्त्यांनी असा दावा केला की, नागरिकांच्या पोस्ट्स शेअर करण्याच्या अधिकारावर मर्यादा घालण्यात आली आहे.
दरम्यान, या प्रकरणाविरोधात सुरू असलेली जनमोहीम थांबवण्यासाठी प्रशासनाने सार्वजनिक ठिकाणांवरील होर्डिंग्स आणि फलक हटवण्यास सुरुवात केली आहे. बीबीसीच्या वृत्तानुसार, चांगशा शहरातील वान जिया ली या मॉलमधील ‘वांग वांग’च्या समर्थनार्थ लावलेले डिजिटल फलक काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मॉलमधील एका कर्मचाऱ्याने सांगितले की, “आता प्राणीसंवर्धनाशी संबंधित फलक लावण्यास मनाई करण्यात आली आहे. हा आदेश नेमका सरकारने दिला का, याबाबत प्रश्न उपस्थित होतो; मात्र हे फलक तातडीने हटवण्यास सांगितले आहेत.”
याशिवाय, ग्वांगझू शहरातील बीजिंग रोड परिसरात ‘वांग वांग’च्या स्मरणार्थ झळकवण्यात आलेले डिजिटल संदेशही हटवण्यात आले. तेथील कर्मचाऱ्यांनीही प्रशासनाच्या आदेशानुसार हे फलक काढण्यात आल्याचे सांगितले आहे. हाँगकाँगमध्येही अशाच प्रकारची कारवाई करण्यात आली आहे. २३ जुलै रोजी ‘वांग वांग’चे पोस्टर प्रदर्शित करण्यात आलेल्या एका बॉक्सिंग जिममध्ये अधिकाऱ्यांनी धडक दिली आणि व्यवस्थापकाला ते पोस्टर तातडीने हटवण्याचे निर्देश दिले आहेत.
