scorecardresearch

विश्लेषण: चीनच्या ‘वुल्फ वॉरियर डिप्लोमॅट’ची अचानक बदली का? जिनपिंग यांनी धोरण बदलले की अन्य कारण?

चीनचे ‘वुल्फ वॉरियर डिप्लोमॅट’ अशी ओळख असलेल्या या अधिकाऱ्याला अचानक पडद्यामागे का टाकण्यात आले, याची चर्चा आता जगभरात सुरू आहे.

विश्लेषण: चीनच्या ‘वुल्फ वॉरियर डिप्लोमॅट’ची अचानक बदली का? जिनपिंग यांनी धोरण बदलले की अन्य कारण?
चीनच्या ‘वुल्फ वॉरियर डिप्लोमॅट’ची अचानक बदली का? जिनपिंग यांनी धोरण बदलले की अन्य कारण? (फोटो – रॉयटर्स संग्रहीत)

अमोल परांजपे

सरकारी खात्यांमधील अधिकाऱ्यांच्या बदल्या नेहमीच होत असतात आणि त्यात चर्चा करावी किंवा त्याचे खास ‘विश्लेषण’ करावे, असे फारसे काही नसते. मात्र, एखाद्या वलयांकित व्यक्तीची अचानक बदली झाली तर मात्र त्याला महत्त्व प्राप्त झाल्याशिवाय राहात नाही. चीनमध्ये सध्या हेच घडले आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजिआन यांची पदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. चीनचे ‘वुल्फ वॉरियर डिप्लोमॅट’ अशी ओळख असलेल्या या अधिकाऱ्याला अचानक पडद्यामागे का टाकण्यात आले, याची चर्चा आता जगभरात सुरू आहे.

झाओ लिजिआन कोण आहेत?

पाश्चिमात्य देशांचे कडवे टीकाकार, अशी ओळख असलेले झाओ लिजिआन हे अत्यंत आक्रमक प्रवक्ते म्हणून ओळखले जातात. अमेरिका, ऑस्ट्रेलिया आदी देशांमध्ये जिनपिंग यांच्या खालोखाल या लिजिआन यांनाच लोक ओळखत असल्याचेही सांगितले जाते. ट्विटरवर त्यांचे १९ लाख ‘फॉलोअर्स’ आहेत. ट्विटरवर वादग्रस्त आणि सनसनाटी दावे करायचे आणि पाश्चिमात्य राष्ट्रांची खोडी काढायची, हे त्यांचे परराष्ट्र धोरण चीनमध्ये प्रचंड लोकप्रिय झाले. एक ऑस्ट्रेलियन सैनिक रक्ताळलेला चाकू अफगाणी मुलाच्या गळ्याला लावत असल्याचे छायाचित्र त्यांनी ट्विटरवर प्रसारित केले होते. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये ताणले गेलेले संबंध अधिकच खराब झाले. मात्र, लिजिआन यांनी आपली आक्रमकता काही कमी केली नाही. त्यामुळे त्यांना हे टोपणनाव मिळाले.

‘वुल्फ वॉरियर डिप्लोमसी’ या नावाचा उगम काय?

‘वुल्फ वॉरियर’ नावाचा एक चिनी चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये एक संवाद आहे. तो असा : चीनचा अवमान करणाऱ्याला शिक्षा ही झालीच पाहिजे, मग ते कितीही कठीण असो… गेल्या काही वर्षांपासून चीनचे परराष्ट्र धोरण हे या वाक्याला अनुसरून होत आहे. त्यामुळे जिनपिंग यांनी अवलंबिलेल्या परराष्ट्र धोरणाला ‘वुल्फ वॉरियर डिप्लोमसी’ हे नाव पडले. लिजिआन हे जिनपिंग यांच्या आक्रमक परराष्ट्र धोरणाचा आंतरराष्ट्रीय चेहरा ठरले. केवळ परराष्ट्र मंत्रालयाच्या पत्रकार परिषदांमध्येच नव्हे, तर ट्विटरवरून त्यांनी अनेक वादग्रस्त विधाने करून प्रसिद्धी मिळवली. करोनाच्या साथीवरून अमेरिका आणि चीनमध्ये जुंपली असताना ‘हा विषाणू अमेरिकेच्या लष्कराने वुहानच्या प्रयोगशाळेत आणला असावा,’ असा बिनबुडाचा सनसनाटी आरोप त्यांनी केला होता. एकूणात, पाश्चिमात्य राष्ट्रांसाठी डोकेदुखी ठरलेले लिजिआन चिनी राज्यकर्त्यांसाठी मात्र योग्य तीच भाषा करत होते. असे असताना त्यांची अचानक बदली झाल्याने अनेक शंकांना जन्म दिला आहे.

विश्लेषण: खेळणी जप्त का केली जात आहेत?

लिजिआन यांची बदली कमी महत्त्वाच्या पदावर झाली आहे का?

लिजिआन यांची बदली ९ जानेवारीला ‘सीमा आणि सागरी प्रकरणे’ सांभाळणाऱ्या खात्यात उपप्रमुखपदी करण्यात आल्याचे चीनच्या परराष्ट्र खात्याने जाहीर केले. खरे म्हणजे ही दोन्ही पदे समकक्ष आहेत. मात्र, आता लिजिआन हे पडद्यामागे असतील. त्यांना पूर्वीसारखी आणि पूर्वीइतकी प्रसिद्धी निश्चितच मिळणार नाही. ट्विटरवर त्यांचे लाखो फॉलोअर असले तरी आता त्यांचे ट्विट ही परराष्ट्र खात्याची अधिकृत भूमिका मानली जाणार नाही, तर ते त्यांचे वैयक्तिक मत ठरेल. एका अर्थी परराष्ट्रमंत्री क्विन गांग यांनी लिजिआन यांचे पंख छाटले आहेत, असे म्हणता येईल. अचानक एवढा मोठा बदल घडण्यामागे चीनचे बदलते धोरण आहे की लिजिआन यांची बिघडत चाललेली प्रतिमा, असा प्रश्न निर्माण होत आहे.

करोनाकाळातील वाद भोवले?

डिसेंबर २०२१मध्ये जगभरात ओमायक्रॉन धुमाकूळ घालत असताना चीन मात्र करोनामुक्त होता. (किंवा तसे चित्र निर्माण केले गेले होते.) त्यावेळी काही विदेशी पत्रकारांना उद्देशून ‘तुम्ही जागतिक महामारी असताना चीनमध्ये आहात, यामुळे मनातल्या मनात निश्चिंत असाल,’ असे विधान लिजिआन यांनी केले होते. मात्र नंतर चारच महिन्यांत चीनचे सर्वांत श्रीमंत शहर शांघायमध्ये करोनाने टाळेबंदी झाली आणि हे विधान लिजिआन यांच्यावर उलटले. चीनच्या ‘शून्य करोना धोरणा’विरोधात नागरिकांची आंदोलने होत असताना लिजिआन यांची पत्नी तांग तिआनरू या मुखपट्टी न वापरता बागेत फिरत असल्याची छायाचित्रे चिनी समाजमाध्यमांवर पसरली. नंतर चिनी नागरिकांच्या विदेशगमनावर बंदी असताना तिआनरू चक्क जर्मनीत फिरून आल्याचे समोर आले. यामुळे लिजिआन यांच्यावरही टीका होऊ लागली. ज्या करोनाबाबत आक्रमक भाषेमुळे त्यांना प्रसिद्धी मिळाली, त्याच करोनाने त्यांच्या कारकीर्दीमध्ये १८० अंशांचा बदल घडवला, असे म्हणावे लागेल.

विश्लेषण: ‘जगातील सर्वात सुंदर महिला’ असा लौकिक लाभलेली जीना लोलोब्रिगिडा कोण होती?

लिजिआन यांच्या बदलीमुळे चीनचे धोरण बदलेल?

‘वुल्फ वॉरियर डिप्लोमसी’ हे धोरण क्षी जिनपिंग यांच्याच काळात जन्माला आले. मात्र, राष्ट्राध्यक्ष म्हणून आपला तिसरा कार्यकाळ सुरू करताच जिनपिंग यांनी अचानक परदेश दौरे वाढवले. जी-२० परिषदेमध्ये सक्रिय उपस्थिती दर्शविली. त्यामुळे त्यांचे धोरण बदलल्याचे अद्याप दिसत नसले, तरी भूमिका काहीशी मवाळ झाली आहे. लिजिआन यांच्या बदलीमुळे या शक्यतेला अधिक बळ मिळेल, हे खरे असले तरी त्यात लगेच मोठा बदल होईल, ही शक्यता कमी आहे. चीनचे अनेक मुत्सद्दी लिजिआन यांच्या पावलावर पाऊल ठेवून ट्विटरवर प्रचंड सक्रिय आहेत. त्यातून एखादा नवा ‘वुल्फ वॉरियर डिप्लोमॅट’ चीनला मिळणार नाही, असे मानण्याचे कारण नाही.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 18-01-2023 at 08:18 IST

संबंधित बातम्या