Chinese Humanoid Robot : चीनमधील एका ह्युमनॉइड रोबोटने अशी कामगिरी केली आहे, जी ऐकायला थोडी आश्चर्यकारकच आणि अविश्वसनीय आहे. त्याने १०० मीटरच्या शर्यतीत उसेन बोल्टचा विश्वविक्रम मोडला आहे. त्याने बोल्टपेक्षा कमी वेळात ही शर्यत पूर्ण केली. तियांगोंग अल्ट्रा (Tiangong Ultra) या रोबोटने बीजिंगमध्ये झालेल्या World Humanoid Robot Games च्या प्राथमिक फेरीत १०० मीटर अंतर ९.३९ सेकंदांत पूर्ण केले. हा रोबोट Beijing Humanoid Robot Innovation Center ने विकसित केला आहे. विशेष म्हणजे, उसेन बोल्टने २००९ मध्ये १०० मीटरच्या शर्यतीत नोंदवलेला विश्वविक्रम ९.३९ सेकंदांचा आहे. म्हणजेच आकडे पाहिल्यास समजते की, रोबोटने बोल्टपेक्षा ०.१९ सेकंद कमी वेळात शर्यत पूर्ण केली.
‘तियानगोंग अल्ट्रा’ हा एकटाच वेगवान रोबोट नव्हता. ‘ऑनर’ या चिनी स्मार्टफोन कंपनीने तयार केलेल्या ‘लायटनिंग’ नावाच्या आणखी एका रोबोटने १०० मीटरचे अंतर ९.४७ सेकंदांत पूर्ण केले. मात्र, शर्यत संपल्यानंतर या रोबोटला स्ट्रेचरवरून (stretcher) बाहेर न्यावे लागले.
विज्ञानाच्या दृष्टीने ही कामगिरी नक्कीच उल्लेखनीय आहे. त्याशिवाय ह्युमनॉईड रोबोट (humanoid robot) क्षेत्रातील चीनचे वाढते वर्चस्वही यातून दिसून येते. पण, त्यामुळे एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो आणि तो म्हणजे रोबोटला धावायला कशासाठी शिकवलं जातं? त्याचा नेमका उपयोग कोणाला आणि कसा होणार?
माणूस जे करतो, तेच रोबोट शिकतोय…
बीजिंगमध्ये सुरू असलेल्या वर्ल्ड ह्युमनॉईड रोबोट गेम्सच्या (World Humanoid Robot Games) दुसऱ्या पर्वात रोबोट केवळ धावत नाहीत, तर फुटबॉलही खेळत आहेत. त्याशिवाय हे रोबोट विजेच्या गाड्यांना चार्ज करणृे, केबल जोडणे आणि साहित्य एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणे, अशी कामेही करीत आहेत.
हे सगळे केवळ देखाव्यासाठी आणि प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी नाही. तर माणूस रोजच्या आयुष्यात ज्या परिस्थितींना सहजपणे सामोरा जातो, त्या परिस्थिती रोबोट किती चांगल्या प्रकारे हाताळू शकतो, हे तपासण्याचा हा एक मार्ग आहे.
माणसाचृे शरीर ही खरोखरच एक विलक्षण यंत्रणा आहे. आजूबाजूचे वातावरण कितीही अस्ताव्यस्त किंवा अनपेक्षित असले तरी डोळे, कान, नाक आणि स्नायूंकडून मिळणारी माहिती मेंदू सतत समजून घेत असतो आणि त्यानुसार शरीराच्या हालचाली बदलत असतो.
याचे साधे उदाहरण म्हणजे चालताना पाय अडखळणे. समजा, असमान जमिनीवर चालताना आपण अचानक अडखळलो, तर क्षणार्धात मेंदूला शरीराचा तोल बिघडल्याचे जाणवते. शरीर कोणत्या दिशेने झुकतेय, ते ओळखून तोल कसा सावरायचा हे मेंदू ठरवतो आणि त्यानुसार अनेक स्नायूंना एकाच वेळी हालचाल करण्याचे संकेत देतो. मग आपण लगेच दुसरे पाऊल टाकतो, शरीराचा भार सावरतो. कधी तोल जाताना आपण हात पुढे करतो, कधी शरीराची ठेवण बदलतो, तर कधी फक्त एक अतिरिक्त पाऊल टाकून पडण्यापासून स्वतःला वाचवतो.
हे सगळं इतक्या कमी वेळात आणि सहजपणे घडते की, आपल्याला त्याचा विचारही करावा लागत नाही. पण याच गोष्टी रोबोटला शिकवणे हे मोठे तांत्रिक आव्हान ठरत आहे.
म्हणूनच चालताना पाय अडखळणे आणि लगेच स्वतःला सावरणे ही दिसायला अगदी साधी गोष्ट असली तरी त्यामागे क्षणार्धात अनेक गोष्टी घडत असतात. काय घडलेय हे शरीराला जाणवणे, पुढच्या क्षणी शरीर कुठे झुकणार याचा अंदाज घेणे, त्यानुसार निर्णय घेणे आणि लगेच शरीराची हालचाल करणे सगळे मिली सेकंदांमध्ये घडते.
रोबोटला हे सगळे योग्य प्रकारे करता येणे खूप कठीण आहे. म्हणूनच चाचणी करण्यासाठी किंवा रोबोटलाही कार्यक्षम बनविण्यासाठी १०० मीटर धावण्याची शर्यत किंवा इतर खेळ महत्त्वाचे ठरतात. कारण- अशा कामांमधून रोबोटला एकाच वेळी अनेक गोष्टी शिकाव्या लागतात. त्याला वेग पकडावा लागतो, हात-पायांचा योग्य समन्वय साधावा लागतो, धावताना शरीराचा तोल सांभाळावा लागतो, हालचालींमध्ये होणारे अगदी छोटे बदल ओळखून, त्यानुसार त्याला स्वतःला सावरावे लागते आणि शेवटी वेग कमी करून थांबावे लागते.
या सगळ्या गोष्टी रोबोटला नीट जमल्या, तर त्याचा उपयोग केवळ शर्यतीपुरताच मर्यादित राहणार नाही. हॉटेलमध्ये जेवण पोहोचवण्यापासून घराची साफसफाई करण्यापर्यंत, धोकादायक ठिकाणी स्फोटके शोधण्यापासून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यापर्यंत रोबोट अनेक कामे करू शकेल.
विशेषतः आपत्तीच्या काळात अशा रोबोटचा मोठा उपयोग होऊ शकतो. एखाद्या इमारतीत आग लागली, कुठे बांधकाम कोसळले किंवा धोकादायक औद्योगिक ठिकाणी माणसाला पाठवणे शक्य नसेल, तर रोबोट तिथे जाऊ शकतो. मात्र, त्यासाठी त्याला फक्त चालता येणे एवढेच पुरेसे नाही. त्याला पायऱ्या, ढिगारा आणि असमान जमीन पार करता आली पाहिजे. उतारावरून चालता आले पाहिजे, एखादी वस्तू शोधून उचलता आली पाहिजे, दरवाजा उघडता आला पाहिजे किंवा एखादा वॉल्व्ह (valve) फिरवता आला पाहिजे.
एकंदरीत आता १०० मीटरच्या शर्यतीच्या माध्यमातून भविष्यातील धोकादायक परिस्थितीत वेळीच माणसाच्या मदतीला धावून येऊ शकेल असा रोबोट तयार केला जात आहे.
अमेरिकेतील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्टँडर्ड्स अँड टेक्नॉलॉजी (NIST)देखील आपत्तीच्या काळात मदत करू शकणारे रोबोट विकसित करण्यासाठी एका प्रकल्पावर काम करीत आहे. या प्रकल्पात रोबोटच्या वेगवेगळ्या क्षमतांना आकार दिला जातो. अडथळ्यांमधून मार्ग काढणे, वेगवेगळ्या ठिकाणी हालचाल करणे, वस्तू हाताळणे, आजूबाजूची परिस्थिती ओळखणे, दीर्घकाळ काम करणे, संदेशवहन करणे, कठीण परिस्थितीत टिकून राहणे आणि शक्य तितक्या स्वतंत्रपणे काम करणे यांसारख्या गोष्टींचा त्यात समावेश आहे.
हीच गोष्ट युद्धाच्या परिस्थितीलाही लागू होते. याचे एक उदाहरण म्हणजे ड्रोन (drone). आज ड्रोन केवळ हवेत उडणारे यंत्र राहिलेले नाही. तो आजूबाजूची परिस्थिती पाहू शकतो आणि त्यानुसार हालचाल करू शकतो आणि माणसाला पाठवणे धोकादायक ठरेल अशा ठिकाणीही तो पोहोचू शकतोे
लष्करी ड्रोनचा वापर एखाद्या भागावर नजर ठेवण्यासाठी, माहिती मिळविण्यासाठी, आवश्यक उपकरणं नेण्यासाठी किंवा जिथे माणसाला पाठवणे धोकादायक ठरू शकते अशा ठिकाणी काम करण्यासाठी केला जाऊ शकतो.
कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) आता भौतिक जगात प्रवेश
कृत्रिम बुद्धिमत्तेवर (AI) आधारित चॅटबॉट्स आज आपल्या दनंदिन जीवनातील भाग बनले आहेत. मोठ्या प्रमाणात माहिती समजून घेण्याची आणि त्यावर प्रक्रिया करण्याची एआयची क्षमता दिवसेंदिवस वाढत आहे; पण एआयची पुढची मोठी झेप केवळ कॉम्प्युटर स्क्रीनपुरती मर्यादित राहणार नाही. मशिन्सना प्रत्यक्ष जगात काम करता यावे यासाठी यंत्रणा विकसित केली जात आहे.
त्यामध्ये जमिनीवरून वेगवेगळ्या ठिकाणी जाऊ शकणारे रोबोट, साहित्य किंवा आवश्यक वस्तू वाहून नेणारे रोबोट आणि भविष्यात सैनिकांसोबत काम करू शकणारे रोबोटही विकसित केले जाणार आहेत.
याच कारणामुळे चीन रोबोटिक्स (robotics) क्षेत्रात मोठी गुंतवणूक करीत आहे. इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ रोबोटिक्सच्या (International Federation of Robotics) मते, चीनच्या २०२६ ते २०३० या कालावधीतील नव्या पंचवार्षिक योजनेत रोबोटिक्सला ‘आधुनिक औद्योगिक व्यवस्थेच्या केंद्रस्थानी’ ठेवण्यात आले आहे.
चीनची रोबोटिक्स क्षेत्रातील आघाडी आधीपासूनच दिसून येते. जगभरात दरवर्षी स्थापित होणाऱ्या औद्योगिक रोबोटपैकी ५४ टक्के रोबोट चीनमध्ये कार्यान्वित करण्यात आले आहेत. चीनच्या नव्या पंचवार्षिक योजनेत एआय संशोधनाचा भर प्रत्यक्ष वापरावर, विशेषतः रोबोटिक्ससारख्या भौतिक क्षेत्रांकडे वळण्याच्या दिशेने आहे. या प्रक्रियेत रोबोट्सना आर्थिक विकासाचे प्रमुख साधन बनवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
