How Chinese Tourist Visit To Ladakh Sparked Concern : चीनमधून भारतात आलेल्या एका २९ वर्षीय तरुणाला श्रीनगर पोलिसांनी सोमवारी ताब्यात घेतले. त्याने कोणतीही अधिकृत परवानगी न घेता लडाख आणि काश्मीरच्या संवेदनशील भागात टेहाळणी केल्याचे समोर आले आहे. हा प्रकार उघडकीस येताच देशभरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी भारतीय सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून श्रीनगरमधील पर्यटकांवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. यादरम्यान लडाख–काश्मीरमध्ये परवानगीशिवाय फिरणारा चिनी तरुण कोण? यासंदर्भातील चर्चा समाजमाध्यमांवर सुरू झाली आहे. त्याविषयीचा हा आढावा…

व्हिसा नियमांचे केले उल्लंघन

लडाख–काश्मीरसारख्या संवेदनशील भागात चिनी तरुणाने केलेली टेहाळणी गंभीर सुरक्षा प्रश्न निर्माण करणारी ठरली आहे. हू कोंगताई असे ताब्यात घेण्यात आलेल्या तरुणाचे नाव असून- तो चीनच्या गुआंगडोंग प्रांतातील रहिवासी आहे. कोंगताईने या प्रदेशात नेमके कुठे-कुठे प्रवास केला, कोणाशी संपर्क साधला आणि त्याच्या भेटीचा उद्देश काय होता? याची कसून चौकशी केली जात आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार- या चिनी तरुणाची उपस्थिती सर्वात आधी लष्कराच्या लक्षात आली होती. या भागात काही असामान्य इंटरनेट ॲक्टिव्हिटी होत असल्याचे त्यांना दिसून आले होते.

कोण आहे हू कोंगताई?

चिनी तरुणाची संशयास्पद हालचाल लक्षात येताच भारतीय लष्कराने त्याला तातडीने ताब्यात घेऊन पोलिसांच्या स्वाधीन केले. या घटनेनंतर स्थानिक हॉटेल्स आणि खासगी विश्रामगृहे यांच्याकडून परदेशी पर्यटकांची नोंद कशी घेतली जाते, याची स्थानिक पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार- हू कोंगताई हा मूळ चीनच्या गुआंगडोंग प्रांतातील रहिवासी आहे. १९ नोव्हेंबर रोजी तो अधिकृत व्हिसा घेऊन भारतात पर्यटनासाठी आला होता. कोंगताईला भारतातील काही ठराविक बौद्ध धार्मिक स्थळांना भेट देण्याची परवानगी देण्यात आली होती. परंतु त्याने परवानगीचे उल्लंघन करीत थेट लडाख आणि जम्मू–काश्मीरचा प्रवास केला.

आणखी वाचा : तांदळावर ट्रम्प यांनी टॅरिफ लावल्यास अमेरिकेचे होणार नुकसान? निर्यातीची आकडेवारी काय सांगते?

परवानगी नसतानाही संवेदनशील भागांत प्रवेश

हू कोंगताईने अमेरिकेतील बोस्टन विद्यापीठातून भौतिकशास्त्राची पदवी घेतलेली आहे. गेल्या नऊ वर्षांपासून तो अमेरिकेतच राहत असल्याची माहिती आहे. त्याच्या पासपोर्टवर अमेरिका, न्यूझीलंड, ब्राझील, फिजी आणि हाँगकाँगसह अनेक देशांमध्ये प्रवासाची नोंद आहे. श्रीनगर पोलिसांनी त्याची चौकशी केली असता कोंगताईने आपल्याला प्रवासाची आवड असल्याचे सांगितले आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार- कोंगताईने त्याला घालून दिलेल्या व्हिसा नियमांचे स्पष्टपणे उल्लंघन केले आहे. त्याला वाराणसी, आग्रा, नवी दिल्ली, जयपूर, सारनाथ, गया आणि कुशीनगर यांसारख्या ठराविक बौद्ध स्थळांना जाण्याचीच परवानगी होती. तरीही त्याने लेह, झांस्कर आणि काश्मीर खोरे अशा संवेदशील भागांत मुक्तपणे प्रवास केला.

कोंगताईने पोलिसांना कसा दिला चकमा?

२० नोव्हेंबरला कोंगताई हा विमानाने लेहला गेला होता. त्यावेळी विमानतळावरील स्थानिक प्रवाशांमध्ये मिसळून त्याने पोलिसांना चकमा दिला. १ डिसेंबर रोजी तो श्रीनगरमध्ये पोहोचला आणि एका अनोंदणीकृत विश्रामगृहात राहिला. यादरम्यान त्याने काश्मीरमधील अनेक संवेदनशील ठिकाणांना भेट दिल्याचे सांगितले जात आहे, ज्यामध्ये हरवान बौद्ध मठ, शंकराचार्य टेकडी, हजरतबल, डल लेक परिसरातील मुगल गार्डन आणि अवंतीपूर या ठिकाणांचा समावेश आहे.

कोंगताईच्या मोबाईलमध्ये काय आढळले?

अधिकाऱ्यांनी कोंगताईच्या मोबाईल फोनची तपासणी केली असता, त्यात काश्मीरमधील सीआरपीएफच्या तैनाती, कलम ३७० आणि सुरक्षेशी संबंधित इतर विषयांवरील शोध दिसून आले. त्याने स्थानिक दुकानातून भारतीय सिम कार्डही विकत घेतले होते. लडाखमध्ये गेल्यानंतर कोंगताईने झांस्कर प्रदेशासह अनेक ठिकाणांवर प्रवास केला. ही ठिकाणे अतिशय संवेदनशील मानली जातात. सध्या कोंगताईला श्रीनगर पोलिसांनी सखोल चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. तो जाणूनबुजून संवेदनशील क्षेत्रांमध्ये घुसला होता का, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. हू कोंगताई याला ताब्यात घेतल्यानंतर श्रीनगरमध्ये मोठी आणि व्यापक तपासणी मोहीम सुरू झाली आहे.

हेही वाचा : Asim Munir : पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांचा भारताला पुन्हा इशारा; नेमके काय म्हणाले असीम मुनीर?

कोंगताईच्या प्रवासामागील हेतूची चौकशी सुरू

तपासणीदरम्यान अनेक आस्थापनांनी आवश्यक फॉर्म-सी तपशील सादर न करता परदेशी पाहुण्यांना आश्रय दिल्याचे पोलिसांना आढळून आले आहे. यानंतर पाच आस्थापनांच्या मालकांवर तडकाफडकी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. अलीकडील उल्लंघनांमध्ये रशिया, इस्रायल, रोमानिया आणि स्पेन या देशांतून आलेल्या पर्यटकांचा समावेश असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. कोंगताई हा लडाख आणि काश्मीरमध्ये तब्बल दोन आठवडे फिरूनही कोणाच्या लक्षात कसा आला नाही, याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. यादरम्यान तपासातून नेमक्या कोणकोणत्या गोष्टी समोर येणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.