“डॉक्टर, माझ्या एमआरआयमध्ये किंवा एक्स-रेज वर काही विशेष दिसत नाही म्हणताय, पण मला वेदना मात्र खूप होतात. मग त्या येतात कुठून?”
हा प्रश्न फिजिओथेरेपी क्लिनिकमध्ये वारंवार ऐकायला मिळतो. अनेकदा एखाद्या दुखापतीनंतर, कंबरदुखी, मानदुखी किंवा सांधेदुखी काही आठवड्यांत कमी व्हायला हवी असते. पण काही लोकांमध्ये वेदना महिनोन महिने किंवा वर्षानुवर्षे टिकून राहतात. तपासण्या केल्या जातात, एक्स-रे किंवा एमआरआय पाहिले जातात, पण वेदनांच्या तीव्रते इतकी मोठी समस्या रिपोर्टमध्ये दिसत नाही.
अशावेळी रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांमध्ये संभ्रम निर्माण होतो. “रिपोर्ट नॉर्मल आहे, मग वेदना इतक्या का?” याचं उत्तर आधुनिक वेदना विज्ञानात सापडतं. त्यातील एक महत्त्वाची संकल्पना म्हणजे पेन सेंसिटाइझेशन, म्हणजेच वेदना सक्रिय करणारी प्रणाली अधिक संवेदनशील होणं.
वेदना म्हणजे फक्त दुखापतीचा पुरावा नाही
आपल्यापैकी बहुतेकांना लहानपणापासून शिकवलं जातं की वेदना म्हणजे शरीरात काहीतरी नुकसान झालं आहे. खरं तर अनेक वेळा हे बरोबरही असतं. हात भाजला, पाय मुरगळला किंवा हाड मोडलं तर वेदना होतात. पण दीर्घकालीन वेदनांमध्ये हे समीकरण नेहमी लागू होत नाही. वेदना ही फक्त शरीरातून आलेली संवेदना नसते. ती मेंदूने तयार केलेली एक संरक्षणात्मक प्रतिक्रिया असते. शरीरातून आलेली माहिती, पूर्वीचे अनुभव, भावना, भीती, झोप, ताणतणाव आणि परिस्थिती यांचा विचार करून मेंदू वेदनेचा अनुभव निर्माण करतो. म्हणूनच दोन व्यक्तींना सारखी दुखापत झाली तरी त्यांना जाणवणाऱ्या वेदना वेगळ्या असू शकतात.
वेदनांचं ‘व्हॉल्यूम कंट्रोल’
समजा तुम्ही टीव्ही पाहत आहात. कार्यक्रम तोच आहे, पण तुम्ही रिमोटने आवाज कमी-जास्त करू शकता. पेन सेंसिटाइझेशन मध्ये काहीसं असंच घडतं. शरीरातून येणारे संदेश पूर्वीसारखेच असतात, पण मज्जासंस्था आणि मेंदू त्यांची तीव्रता वाढवतात. परिणामी लहानसा ताण, साधी हालचाल किंवा हलका स्पर्शसुद्धा जास्त वेदनादायक वाटू शकतो. म्हणजेच काही वेळा समस्या शरीरातील दुखापतीमध्ये नसते, तर वेदना प्रक्रिया करणाऱ्या प्रणालीच्या संवेदनशीलतेमध्ये असते.
हे का घडतं?
जेव्हा एखाद्या व्यक्तीला दीर्घकाळ वेदना होत असतात, तेव्हा मज्जासंस्था सतत सतर्क राहू लागते. उदाहरणार्थ:
- दीर्घकालीन कंबरदुखी
- अनेक वर्षांची मानदुखी
- ऑस्टिओआर्थरायटिस मधील सततचा त्रास
- शस्त्रक्रियेनंतर टिकून राहिलेल्या वेदना
- जुन्या दुखापतीनंतरचा त्रास
- या परिस्थितींमध्ये शरीराची वेदना प्रणाली वारंवार सक्रिय होत राहते. कालांतराने ती अधिक संवेदनशील बनू शकते.
- याची तुलना घरातील सुरक्षा अलार्मशी करता येईल. सुरुवातीला तो फक्त चोर आल्यावर वाजतो. पण जर तो खूप संवेदनशील झाला, तर वाऱ्याने खिडकी हलली तरी अलार्म वाजू लागतो.
- पेन सेंसिटाइझेशन मध्येही काहीसं असंच घडू शकतं.
कोणती लक्षणं दिसू शकतात?
पेन सेंसिटाइझेशन असलेल्या व्यक्तींमध्ये खालील गोष्टी आढळू शकतात:
- वेदना अपेक्षेपेक्षा जास्त जाणवणं
- वेदनांचा भाग मोठा वाटणं
- हलका स्पर्श किंवा दाब त्रासदायक वाटणं
- थकवा वाढणं
- झोपेच्या समस्या
- मानसिक ताण वाढल्यावर वेदना वाढणं
- हवामान बदलल्यावर वेदना वाढल्यासारख्या वाटणं
- महत्त्वाचं म्हणजे याचा अर्थ वेदना काल्पनिक आहेत असा अजिबात नाही. वेदना पूर्णपणे खऱ्या असतात. फक्त त्यामागची यंत्रणा अधिक गुंतागुंतीची असते.
मेंदू वेदना वाढवू शकतो का?
होय, काही प्रमाणात. मेंदू हा सतत परिस्थितीचा अंदाज घेत असतो. त्याला एखादी हालचाल, परिस्थिती किंवा अनुभव धोकादायक वाटला, तर तो वेदनांचा प्रतिसाद वाढवू शकतो. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीला एकदा वाकताना तीव्र कंबरदुखी झाली असेल, तर पुढच्या वेळी वाकताना मेंदू अधिक सावध होऊ शकतो.
परिणामी:
- स्नायू ताठर होतात
- हालचाल मर्यादित होते
- वेदना लवकर जाणवतात
- हा प्रतिसाद सुरुवातीला संरक्षणासाठी असतो, पण दीर्घकाळ टिकल्यास तोच त्रासदायक ठरू शकतो.
भीती आणि वेदना यांचं नातं
वेदनांमुळे अनेक लोक हालचाली टाळू लागतात.
“चाललं तर वाढेल.”
“वाकलो तर डिस्क सरकेल.”
“व्यायाम केला तर झीज वाढेल.”
अशा समजुती निर्माण होतात.
मग हालचाल कमी होते, स्नायू कमकुवत होतात आणि शरीराची क्षमता घटते. परिणामी साधी कामंही कठीण वाटू लागतात.
याला फियर अवॉईडंस साइकिल म्हणतात.
वेदना → भीती → कमी हालचाल → कमी क्षमता → अधिक वेदना
हे दुष्टचक्र वेदना टिकवून ठेवू शकतं.
फिजिओथेरेपीची भूमिका
आधुनिक फिजिओथेरेपीमध्ये पेन सेंसिटाइझेशन हा उपचाराचा महत्त्वाचा भाग मानला जातो.
फक्त वेदनांची जागा पाहून उपचार केले जात नाहीत. त्याऐवजी खालील घटकांचाही विचार केला जातो:
- हालचालींची क्षमता
- झोप
- ताणतणाव
- शारीरिक सक्रियता
- वेदनांबद्दलच्या समजुती
- आत्मविश्वास
- योग्य शिक्षण, क्रमशः वाढवलेली हालचाल, व्यायाम, श्वसन तंत्र आणि जीवनशैलीतील बदल यांमुळे मज्जासंस्थेची संवेदनशीलता कमी होण्यास मदत होऊ शकते.
वेदना जास्त म्हणजे नुकसान जास्त?
हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे. काही वेळा मोठी दुखापत असूनही वेदना कमी असू शकतात. तर काही वेळा लहान समस्या असूनही वेदना खूप जास्त असू शकतात. म्हणूनच वेदनांची तीव्रता आणि शरीरातील नुकसान यांचा संबंध नेहमीच सरळ नसतो.
पेन सेंसिटाइझेशन म्हणजे शरीराची वेदना प्रणाली अधिक संवेदनशील होणं. अशा वेळी मेंदू आणि मज्जासंस्था सामान्य संदेशांनाही धोक्याचा इशारा समजू शकतात आणि वेदनांचं व्हॉल्यूम वाढवू शकतात. म्हणूनच वेदना जास्त आहेत म्हणजे शरीराचं नुकसानही तितकंच जास्त आहे असं समजणं योग्य नाही. वेदना समजून घेणं, त्यांची भीती कमी करणं आणि शरीरावर पुन्हा विश्वास ठेवणं हे पुनर्वसनाच्या प्रवासातील महत्त्वाचे टप्पे आहेत. कारण अनेकदा वेदना कमी करण्याचा पहिला टप्पा म्हणजे वेदनांविषयीची समज बदलणं असतो.
