Understand the concept of pain guarding and how body overprotection affects chronic back and neck pain recovery: “डॉक्टर, एमआरआय (MRI) रिपोर्टमध्ये काहीच विशेष नाही. पण अजूनही कंबर वाकवताना प्रचंड भीती वाटते.” फिजिओथेरेपीच्या बाह्यरुग्ण विभागात (OPD) अनेक रुग्णांच्या तोंडून हे वाक्य वारंवार ऐकायला मिळतं. काही महिन्यांपूर्वी झालेली दुखापत वैद्यकीय दृष्ट्या पूर्णपणे बरी झालेली असते, तरीही व्यक्ती खुर्चीतून उठताना, जिने चढताना किंवा वजन उचलताना कमालीची सावधगिरी बाळगते. दुखापत बरी झाली असूनही शरीर अजूनही एवढं सावध का वागतंय? याचं उत्तर वैद्यकीय भाषेत ‘पेन गार्डिंग’ (Pain Guarding) म्हणजेच शरीराच्या अति-संरक्षणात्मक यंत्रणेमध्ये (Body Overprotection) दडलं आहे.
शरीराचा अंगरक्षक
कल्पना करा की, एखाद्या इमारतीला सुरक्षा रक्षक आहे. त्याचं काम धोका ओळखणं आणि इशारा देणं हे आहे. आपल्या शरीरातही अशीच एक व्यवस्था आहे. जेव्हा एखादी दुखापत होते, तेव्हा वेदना हा एक प्रकारचा इशारा असतो. त्या विशिष्ट भागाची बाकी शरीरापेक्षा अधिक काळजी घ्या, इतकाच याचा अर्थ असतो. उदा. पाय मुरगळला, तर चालताना वेदना होतात. त्यामुळे आपण त्या पायावर कमी वजन देतो. हा शरीराचा अतिशय उपयुक्त संरक्षणात्मक प्रतिसाद आहे.
समस्या कधी सुरू होते?
समस्या तेव्हा सुरू होते, जेव्हा आपल्या शरीराची सरंक्षणात्मक संस्था गरजेपेक्षा जास्त सावध होते. दुखापत बरी झाल्यानंतरही काही वेळा शरीर आणि मेंदू त्या भागाला अजूनही ‘धोकादायक’ समजत राहतात. मग हालचालींची भीती वाटते, स्नायू जास्त ताठ राहतात, शरीर अनावश्यक संरक्षण करतं याला ‘ओव्हर प्रोटेक्शन’ म्हणतात. उदाहरणार्थ- चोर आला तर घरातला अलार्म वाजणं आवश्यक आहे. पण जर तो अलार्म प्रत्येक वेळी मांजर गेल्यावर, वारा आला तरी किंवा दार हललं तरी वाजायला लागला, तर? अलार्म खराब झाला असं नाही. पण तो फक्त खूप संवेदनशील झाला असा त्याचा अर्थ आहे. काही विशिष्ट दीर्घकालीन वेदनांमध्ये हेच घडतं. शरीरात मोठा धोका नसतो, पण नर्वस सिस्टम संवेदनशील झालेली असते.

स्नायूंचा ‘गार्ड’
जेव्हा शरीराला एखाद्या भागाचं संरक्षण करायचं असतं, तेव्हा आसपासचे स्नायू अधिक ताठ होतात. उदाहरणार्थ, कंबरदुखीत कंबरेचे स्नायू, मानदुखीत मानेचे स्नायू सुरुवातीला हे उपयुक्त असतं. पण आठवडे किंवा महिने उलटल्यानंतरही हे स्नायू सतत ताठ राहिले, तर स्टिफनेस वाढतो, हालचाल कमी होते, थकवा वाढतो आणि वेदना तशाच राहतात.
दुखतं म्हणून हालचाल नाही की हालचाल नाही म्हणून दुखतं?
हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. वेदना झाली की, अनेक जण वाकणं टाळतात, चालणं कमी करतात, जिने चढणं उतरणं टाळतात सुरुवातीला हे योग्य असू शकतं. पण दीर्घकाळ असं केल्यास स्नायू कमकुवत होतात, आत्मविश्वास कमी होतो आणि शरीराची सहनशक्ती घटते. मग छोटी हालचालही अवघड वाटू लागते.
पेन गार्डिंग आणि भीती
वेदना हा केवळ शारीरिक अनुभव नाही. त्यात भावना आणि पूर्वानुभवांचाही सहभाग असतो. एकदा एखाद्या हालचालीमुळे वेदना झाली की मेंदू ती हालचाल ‘धोकादायक’ म्हणून लक्षात ठेवू शकतो. मग पुढच्या वेळी वेदना होण्यापूर्वीच भीती वाटते, स्नायू ताठ होतात आणि हालचाल बदलते. अशा प्रकारे संरक्षणाचं चक्र सुरू राहतं.
स्नायूंची ताकद, लवचिकता आणि सहनशक्ती
काही वेळा रुग्ण सांगतात, “मला आता फार दुखत नाही, पण तरीही वाकायला किंवा वजन उचलायला भीती वाटते.” ही भीती केवळ मानसिक नसते. दीर्घकाळ वेदना अनुभवल्यानंतर मेंदू आणि मज्जासंस्था त्या भागाला अधिक संवेदनशील बनवू शकतात. परिणामी, अगदी सुरक्षित हालचालीदेखील धोकादायक असल्याचा संदेश शरीराला मिळू शकतो. त्यामुळे व्यक्ती नकळत हालचाली कमी करते. परंतु हालचाली कमी झाल्यामुळे स्नायूंची ताकद, लवचिकता आणि सहनशक्ती घटू लागते. अशा वेळी समस्या केवळ वेदनेची राहत नाही, तर शरीराच्या कार्यक्षमतेवरही परिणाम होऊ लागतो.
वेदना आणि हालचालीची भीती
म्हणूनच वेदना आणि हालचालीची भीती या दोन्ही गोष्टींकडे एकत्रितपणे पाहणं आवश्यक असतं. यामुळे अनेकदा एक दुष्टचक्र (vicious cycle) तयार होतं. वेदनेच्या भीतीमुळे हालचाल कमी होते, हालचाल कमी झाल्यामुळे शरीराची क्षमता घटते, आणि क्षमता कमी झाल्यामुळे साध्या हालचालीही अधिक कठीण वाटू लागतात. परिणामी, व्यक्तीला वाटतं की समस्या वाढते आहे, पण प्रत्यक्षात शरीराला पुन्हा आत्मविश्वासाने हालचाल करण्याची गरज असते.
ग्रेडेड एक्सपोज़र
फिजिओथेरेपीमध्ये केवळ वेदना कमी करणं हा उद्देश नसतो. शरीराला पुन्हा हालचालींसाठी तयार करणं, हालचालींची भीती कमी करणं, स्नायूंची क्षमता वाढवणं, हालचाली हळूहळू पुन्हा सुरू करणं या गोष्टींचाही समावेश होतो. याला ग्रेडेड एक्सपोज़र म्हणतात.
शरीराला पुन्हा शिकवणं
जसं एखाद्या घाबरलेल्या व्यक्तीला हळूहळू आत्मविश्वास परत मिळतो, तसंच शरीरालाही पुन्हा शिकवावं लागतं की, ही हालचाल सुरक्षित आहे. यासाठी योग्य मार्गदर्शन, नियंत्रित हालचाल आणि नियमित सराव महत्त्वाचा असतो.
वेदना म्हणजे नेहमी नुकसान नसतं
शरीराची संरक्षण यंत्रणा आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. पण काही वेळा ती गरजेपेक्षा जास्त सक्रिय राहू शकते. अशावेळी वेदना, स्टिफनेस आणि हालचालींची भीती टिकून राहते.
लक्षात ठेवा:
- वेदना म्हणजे नेहमी नुकसान नसतं
- शरीर काही वेळा गरजेपेक्षा जास्त संरक्षण करतं
- योग्य हालचाल ही अनेकदा उपचाराचा भाग असते
