Effective Chronic Pain Management: दरवर्षी सप्टेंबर महिना ‘आंतरराष्ट्रीय वेदना जागरूकता महिना’ म्हणून साजरा केला जातो. वेदना समजून घेणे, शिक्षण देणे आणि योग्य उपचारांसाठी प्रोत्साहन देणे या बाबी अधोरेखित करण्यासाठीच हा महिना साजरा केला जातो.नया वर्षीची संकल्पना आहे ‘अंडरस्टँड’, ‘एज्युकेट’, ‘एडव्होकेट’ आणि ‘पार्टनर’ अर्थात समजून घेणं, जागरूक करणं, वेदना व्यवस्थापनाचं पुरस्करण करणं आणि वेदना व्यवस्थापनासाठी विविध आरोग्य व्यावसायिक आणि रुग्णांनी एकत्रित काम करणं.

या लेखाच्या पहिल्या भागात आपण वेदनेचे जैविक आणि मानसिक पैलू पाहिले, आता या भागात आपण वेदनेचे सांस्कृतिक पैलू, महिलांमध्ये येणारा वेदनेचा अनुभव आणि वेदना व्यवस्थापनामध्ये फिजिओथेरेपीचं योगदान याविषयी जाणून घेऊया.

वेदनेवर संस्कृतीचा प्रभाव

वेदनेबाबत आपण कसं बोलतो, मदत कुणाकडे मागतो, कोणत्या उपचारांवर विश्वास ठेवतो यावर आपल्या संस्कृतीचाही प्रभाव असतो. जसं की घरगुती उपाय, पारंपारिक उपचार पद्धती, श्रद्धांशी निगडीत उपाय, अनुभवजन्य उपाय, इत्यादी. अर्थात यांना सरसकट नाकारण्यापेक्षा अशा व्यक्तींच्या धारणांचा, विश्वासाचा आदर करत योग्य, सुरक्षित आणि वैज्ञानिक माहिती पुरवणं अधिक महत्त्वाचं आहे. त्यात भाषेची, शब्दांची भूमिका फार महत्त्वाची आहे. झीज झाली आहे, नस दबली आहे, डिस्क सरकली आहे अशी भाषा ही वैद्यकीय तथ्यांना अनुसरूनही नाही शिवाय अशी भाषा रुग्णाच्या मनातही भीती निर्माण करते. म्हणूनच वेदनांवर उपचार करताना, शरीर समजून घेतांना रुग्णाची भाषा, संस्कृती, दृष्टिकोन समजून घेणंही आवश्यक आहे.

हार्मोनलच्या लेबलखाली महिलांच्या वेदनेकडे दुर्लक्ष

संस्कृती वेदना घडवू शकते पण त्याच संस्कृतीच्या आधारे रुग्णाच्या वेदनेचा अनुभव आपण ठरवू शकत नाही.
महिलांच्या बाबतीत बोलायचं झालं तर एखाद्या स्त्रीची वेदनेची समज तिची सामाजिक भूमिका, तिच्याकडून केल्या जाणाऱ्या अपेक्षा यावर अवलंबून असते. घर, नोकरी, मुलांची, ज्येष्ठांची जबाबदारी सांभाळतांना स्वतःच्या वेदनेकडे दुर्लक्ष करणं अनेक महिलांच्या बाबतीत घडू शकतं. कधी कधी वेदना व्यक्त करणं म्हणजे कमकुवतपणा असंही समजलं जातं. महिलांच्या वेदनांकडे कधी कधी भावनिक, हॉर्मोनल अशी लेबलं लावूनही दुर्लक्ष होण्याची शक्यता असते.

Chronic Pain Management Physiotherapy | Women Health Pain Relief Treatment | दीर्घकालीन वेदना व्यवस्थापन आणि फिजिओथेरेपी | महिलांचे दुखणे आणि आरोग्य मार्गदर्शन
वेदनेचा विचार शास्त्रीय पद्धतीने व्हायला हवा (Image- Gemini)

वेदनांवरील उपचारांमध्ये भेद

स्त्रीत्व अथवा पुरुषत्व यांचा देखील वेदनेवर प्रभाव असू शकतो. पण हेही खरं आहे की वेदनेचा अनुभव केवळ त्या एका परिणामावर ठरवता येत नाही. त्यामुळे उपचार करताना जैविक फरकांसोबतच रुग्णांची जीवनशैली, जबाबदाऱ्या, अनुभव, भावना, सामाजिक संदर्भ समजून घेणं आवश्यक आहे. जगभरात कोट्यावधी लोक दीर्घकालीन वेदनांसोबत जगत आहेत. वेदनेचा भार सर्वत्र सारखा असला तरी वेदनेवरील उपचारांची उपलब्धता मात्र सारखी नाही असं खेदानं नमूद करावं लागतं. अल्प आणि मध्यम उत्पन्न देशांमध्ये (लो एंड मिडल इनकम कंट्रीज) ही दरी अधिक स्पष्टपणे दिसून येते. इथे केवळ उपचारांची उपलब्धता हे एकमेव आव्हान नाही तर वेदना समजून घेण्यासाठी त्यावर उपचार करण्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची कमतरता, आरोग्यसेवेपर्यंत पोहोचण्यातील अडथळे, उपचारांचा खर्च, औषधांची उपलब्धता, पुनर्वसन सेवांची उपलब्धता, वेदनांसंदर्भात अपुरी आणि अशास्त्रीय माहिती अशा अनेक उणिवा एकमेकात गुंतलेल्या आहेत. त्यात भाषिक, सांस्कृतिक संदर्भाचे प्रश्नही भरच घालत आहेत. त्यामुळे वेदनांवर योग्य उपचार आहेत एवढ्यावर समाधान मानून चालणार नाही तर हे उपचार प्रत्येक गरजूंपर्यंत त्यांच्या सर्व संदर्भांचा विचार करून पोहोचत आहेत का, हा प्रश्न महत्त्वाचा ठरतो.

वेदनेबाबतची भीती व गैरसमज दूर होणे गरजेचे

वेदनांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलायचा असेल तर केवळ नवनवीन उपचार पद्धती विकसित करून चालणार नाही तर वेदना शिक्षण, आरोग्य व्यावसायिकांचं प्रशिक्षण, परवडणाऱ्या पुनर्वसन सेवांची उपलब्धता, रुग्णाचा निर्णय प्रक्रियेतील सहभाग वाढवणारी आरोग्य व्यवस्था या सगळ्याची नितांत गरज आहे. वेदना ही जागतिक आणि सर्वव्यापी समस्या असली तरी वेदनेपासून दिलासा देणाऱ्या संधी मात्र अजूनही सर्वत्र समान नाहीत असं खेदानं म्हणावं लागतं. वेदनेवर उपचार करताना योग्य आणि पूर्ण माहिती देणं ही उपचारातील पहिली महत्त्वाची पायरी आहे. मात्र पेन एज्युकेशन, (वेदना शिक्षण) म्हणजे केवळ ‘तुम्हाला अमूक आजार आहे’ किंवा ‘तुम्ही अमूक तमूक व्यायाम करा’ एवढ्याच मर्यादित नाही. रुग्णाला त्याच्या वेदनेचा अर्थ समजून घेण्यासाठी मदत करणं, वेदनेबद्दलची भीती-गैरसमज दूर करणं, स्वतःच्या आरोग्य निर्णयात अधिक सक्रिय होण्यास मदत करणं इतका व्यापक, सार्वकालिक, सर्वसमावेशक त्याचा उद्देश आहे.

रुग्ण माहितीचा अर्थ कसा लावतो हेही महत्त्वाचं

वेदना जेव्हा दीर्घकाळ टिकते तेव्हा तर ही गरज अधिकच गहिरी होत जाते. काही समजुती जशा की दुखतंय म्हणजे शरीराचं नुकसान होतंय, झीज झाली आहे म्हणजे आता हालचाल धोकादायक आहे किंवा एमआरआयमध्ये बदल आहेत म्हणजे वेदना कायम राहणार अशा अनेक गैरसमजुती रुग्णाच्या वर्तनावर परिणाम करू शकतात. त्यामुळे वेदना समजवून सांगताना केवळ आजार किंवा शारीरिक बदल या विषयी सांगणं पुरेसं नसतं तर त्या माहितीचा रुग्ण कसा अर्थ लावतो आहे हे बघणंही आवश्यक ठरतं.

बायोसायकोसोशल’ (Biopsychosocial) दृष्टिकोन

आरोग्यसेवेत आजाराचं निदान करण्यासाठी शरीरातील बदल तपासण्या, निदान आणि औषधोपचार यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. पण यासोबतच गरज आहे ती ‘बायोसायकोसोशल’ (Biopsychosocial) दृष्टिकोनाची. कारण दीर्घकालीन वेदना शरीरातील केवळ एखाद्या बदलातून सांगता येणं अवघड आहे. ही संकल्पना तशी व्यापक आहे, यात शरीरातील जैविक घटकांसोबतच व्यक्तीच्या भावना, झोपेची स्थिती, ताणतणाव, भीती, पूर्वानुभव, कुटुंब, कामाचं स्वरूप, दैनंदिन दिनक्रम यांचाही विचार केला जातो. याचा अर्थ असा नाहीच की वेदना फक्त मानसिक आहेत. उलट वेदना ही आधी शारीरिक अनुभूती आहे, तिच्या असण्यावर अनेक घटक एकाचवेळी परिणाम करू शकतात, हे स्वीकारणं म्हणजेच बायोसायकोसोशल दृष्टिकोन होय.

उपचार ‘द्यायचे’- ‘घ्यायचे’च्या पलीकडे

वेदना जेव्हा दीर्घकाळ असते, अर्थात क्रॉनिक असते, तेव्हा तिच्या उपचारात प्रश्न केवळ कुठे दुखतं असा नसावा, तर या वेदनेचा व्यक्तीच्या जगण्यावर काय परिणाम होत असावा याचं सखोल मूल्यमापन व्हावं. इथं भौतिक उपचार पद्धती म्हणजेच फिजिओथेरेपीची भूमिका केवळ व्यायाम देण्यापुरती मर्यादित राहत नाही. फिजिओथेरेपीमध्ये उपचाराचा मूळ उद्देश केवळ ‘वेदना नाहीशी करणं’ हा नसून, व्यक्तीला तिच्यासाठी महत्त्वाच्या हालचाली आणि कामांमध्ये पुन्हा सहभागी होण्यास सक्षम करणं हा आहे. त्यासाठी व्यायाम, शारीरिक सक्रियता, स्व-व्यवस्थापन (self-management), पेन एजुकेशन आणि रुग्णासोबत ठरवलेली उद्दिष्टं यांचा उपयोग केला जातो. यासाठी रुग्णाने उपचार ‘घ्यायचे’ आणि फिजिओथेरेपिस्टने ते ‘द्यायचे’ अशी एकतर्फी भूमिका पुरेशी नसते. रुग्णाचा अनुभव आणि फिजिओथेरेपिस्टचं शास्त्रीय ज्ञान यांची सांगड घालून उपचाराचा मार्ग ठरवणं (यालाच आपण शेअर्ड डिसिजन मेकिंग म्हणतो) हे महत्वाचं आहे.

या ठिकाणी ‘अंडरस्टँड’, ‘एज्युकेट’ ‘अॅडव्होकेट’ अॅण्ड ‘पार्टनर’ या संकल्पना पुन्हा एकत्र येतात. दीर्घकालीन वेदनाग्रस्त व्यक्तीला समजून घेणं, तिच्या हालचाली, तिची कार्यक्षमता याचं मूल्यमापन करणं, हालचालींबद्दलची भीती कमी करण्यासाठी मार्गदर्शन करणं, वेदना समजावून देणं अशा अनेक गोष्टींचा समावेश होतो. त्यानंतर पुनर्वसनाच्या भागात रुग्ण हळूहळू दैनंदिन दिनक्रमांकडे कामांकडे परतण्यास तयार झालेला असतो. कारण आता त्यांनी वेदना समजून घेतलेली असते, वेदना उमजून घेतलेली असते.