देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईसह खेटूनच असलेल्या नवी मुंबईच्या आगामी वाटचालीची दिशा स्पष्ट करणारा महत्त्वाकांक्षी असा अर्थसंकल्प सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी नुकताच सादर केला. दळणवळण, पायाभूत सुविधा, आर्थिक विकास अशा त्रिसूत्रीवर आधारित हा अर्थसंकल्प असला तरी आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजले जातील आणि जागतिक उद्योग संस्थांना हे शहर भविष्यात आपलेसे वाटेल अशा पद्धतीची वातावरणनिर्मिती करण्याचा पूर्ण प्रयत्न या अर्थसंकल्पात केलेला दिसतो. एज्युसिटीची आखणी करत जगातील दहा मोठ्या विद्यापीठांबरोबरचे करार, खारघर भागात वांद्रे-कुर्ला व्यापारी संकुलाच्या धर्तीवर व्यापार केंद्र, भारत-द. आफ्रिका या दोन देशांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय वाणिज्य संकुल आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाभोवती हजारो कोटी रुपयांच्या प्रकल्पांमुळे येत्या काळात हा संपूर्ण पट्टा देशातील आर्थिक विकासाचे एक मोठे केंद्र ठरेल असे दावे केले जात आहेत.

सिडकोचा यंदाचा अर्थसंकल्प काय म्हणतो?

सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करताना पायाभूत सुविधा विस्तार, प्रादेशिक दळणवळणाचे सक्षमीकरण आणि गृहनिर्माण विकासावर विशेष भर दिलेला दिसतो. या आर्थिक वर्षासाठी १६ हजार २५० कोटी रुपयांचा हा अर्थसंकल्प आहे. सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा आढावा घेताना सिडकोने ९७७४, २३ कोटींचे सुधारित उत्पन्न आणि रु. ९७७०.२६ कोटींचा खर्च नोंदवला आहे. मोठ्या प्रकल्पांची आखणी करत असतानाही तीन हजार कोटी रुपयांच्या ठेवी हे सिडकोचे वैशिष्ट्य ठरले. नव्या आर्थिक वर्षासाठी रु. १६,२५० कोटींचे उत्पन्न आणि रु. १६,१५० कोटींचा खर्च अपेक्षित असून १०० कोटी शिल्लक रहातील अशा प्रकारचे सिडकोचे नियोजन आहे.

आंतरराष्ट्रीय विमानतळ महत्त्वाचा का?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत गेल्या वर्षी अखेरीस नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला. सिडकोच्या इतिहासात हा एक महत्त्वाचा टप्पा ठरला. या विमानत‌ळावरून सध्या दररोज ७६ शहरांमध्ये एकूण १५० विमानांद्वारे (एअर ट्रॅफिक मूव्हमेंट्स) वाहतूक सुरू असते. साधारणपणे १९ हजार प्रवाशांची दररोज वाहतूक येथून केली जाते. एप्रिल २०२६ मध्ये या विमानतळावरुन आंतरराष्ट्रीय विमाने उड्डाण घेतील असा दावा सिडकोकडून केला जात आहे. या विमानतळाच्या पहिल्या टप्प्यात दरवर्षी २ कोटी प्रवासी आणि ०.५ दशलक्ष टन मालवाहतुकीची क्षमता निर्माण करण्यात आली आहे. ३,७०० मीटर लांबीची धावपट्टी मोठ्या विमानांच्या उड्डाणांसाठी सक्षम आहे. पुढील टप्प्यात टर्मिनल-२, सेंट्रल टर्मिनल कॉम्प्लेक्स, मल्टीमोडल ट्रान्सपोर्ट हब आणि जनरल एव्हिएशन टर्मिनल उभारण्याची योजना असून वॉटर टॅक्सी सेवा आणि फेडएक्स कार्गो हब सुरू करण्याचाही प्रस्ताव आहे.

मेट्रो प्रकल्पांचा विस्तार निर्णायक?

राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ जोडणारी ३४.८९ किमी लांबीची मेट्रो लाईन ८ विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. या मार्गिकेत एकूण २० स्थानकांचा समावेश असणार आहे. नवी मुंबईच्या उत्तरेकडील उपनगरांसाठी ही पहिली मेट्रो मार्गिका ठरणार आहे. या मार्गिकेस लागूनच सिडकोने तयार केलेल्या मेट्रो मार्गिकांचा विस्तार केला जाणार आहे. सिडकोने मेट्रो लाईन १ए (बेलापूर–एनएमआयए, ३.२ किमी) आणि मेट्रो लाईन २ (पेंढार–एनएमआयए टर्मिनल- ४, १५ किमी) या मार्गांसाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार केला असून राज्य सरकारच्या मान्यतेसाठी पाठविला आहे. या मेट्रो मार्गिका नवी मुंबई विमानतळास जोडल्या जाणार आहेत. या विमानतळाच्या भोवती मेट्रो मार्गिकांचे वर्तुळ असावे असा प्रयत्न असणार आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय केंद्र?

पायाभूत सुविधांचे वेगवेगळे प्रकल्प आखत असताना सिडकोने यंदाच्या वर्षात या शहराला आंतरराष्ट्रीय आर्थिक विकासाचे केंद्र बनविण्याचे ध्येय आखलेले दिसते. ठराविक उद्दिष्टांवर आधारित विकास प्रकल्प हे या आखणीचे वैशिष्ट्य ठरणार आहे. सिडकोतर्फे नवी मुंबई विमानतळाभोवती विशेष आर्थिक जिल्ह्यांच्या माध्यमातून आयकॉनिक सिटी डेव्हलपमेन्ट धोरण राबविण्याचे नक्की झाले आहे. या माध्यमातून सुमारे २७० हेक्टर क्षेत्रात एरोसिटी विकसित करण्यात येणार असून त्यामध्ये व्यावसायिक जिल्हे, आतिथ्य सुविधा, परिषद केंद्रे आणि मिश्र वापराचे शहरी विकास प्रकल्प असतील.

याशिवाय विमानतळास लागूनच असलेल्या करंजाडे परिसरात सुमारे १०० हेक्टर क्षेत्रात विकसित होणाऱ्या ‘एज्युसिटी’मध्ये जागतिक दर्जाच्या विद्यापीठांना स्थान देण्याची योजना आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी हा एक प्रकल्प आहे. युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क, युनिव्हर्सिटी ऑफ अबर्डीन, इलिनॉय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया आणि आयईडी – इस्तितुतो युरोपेओ दी डिझाईन यासारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबर सामंजस्य करार यापूर्वीच करण्यात आले आहेत.

नवी मुंबईला जागतिक शिक्षण केंद्र म्हणून विकसित करण्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. याशिवाय सुमारे १०० हेक्टर क्षेत्रात प्रस्तावित मेडिसिटीमध्ये अत्याधुनिक रुग्णालये, क्रीडा वैद्यक केंद्रे, संशोधन सुविधा आणि वैद्यकीय तंत्रज्ञान अधोसंरचना विकसित करण्यात येणार आहे. खारघर येथे १५५ हेक्टर क्षेत्रात आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट पार्क विकसित करण्याची योजना असून येथे कॉर्पोरेट कार्यालये, आयटी सेवा, परिषद सुविधा आणि व्यावसायिक क्षेत्र विकसित करण्यात येणार आहे.

जेएनपीए आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ दरम्यान ५६० हेक्टर क्षेत्रात इंटिग्रेटेड लॉजिस्टिक्स पार्क विकसित करण्याचा प्रस्ताव असून आधुनिक गोदामे, कंटेनर फ्रेट स्टेशन आणि पुरवठा साखळी सुविधा उभारण्यात येणार आहेत. खारघर येथे प्रस्तावित द. आफ्रिका–भारत आंतरराष्ट्रीय विकास क्षेत्र हा जागतिक दर्जाच्या व्यवसाय, प्रदर्शन आणि सांस्कृतिक केंद्राच्या माध्यमातून भारत–आफ्रिका आर्थिक सहकार्य अधिक बळकट करण्यासाठी राबविण्यात येणारा एक महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे.

अंदाजे २० एकरवर उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पात एकात्मिक व्यापार, परिषद, प्रदर्शन आणि आतिथ्यविषयक पायाभूत सुविधा यांसह सद्यःस्थितीत सिडकोतर्फे अंतिमीकरण करण्यात येत असलेली एसपीव्ही संरचना यांचा समावेश असणार आहे. या प्रकल्पांची अंमलबजावणी हे येत्या काळात सिडकोपुढील महत्त्वाचे आव्हान असेल हे स्पष्ट आहे.