डॉ. देवदत्त पोखरकर
कालपर्यंत आपल्या दैनंदिन आयुष्यात केवळ एक घाणेरडा, उपद्रवी आणि किळसवाणा कीटक म्हणून दुर्लक्षित राहिलेल्या ‘झुरळा’ने अचानक समाजमाध्यमांपासून ते थेट राजकीय व्यासपीठांपर्यंत चर्चेत मुख्यस्थान पटकावले आहे. याला कारणीभूत ठरली ती भारताचे सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी कोर्टात केलेली एक तोंडी टिप्पणी. एका वकिलाच्या ज्येष्ठतेच्या (सीनिअर असण्याच्या) दाव्यावर सुनावणी सुरू असताना, सरन्यायाधीशांनी “काही बेरोजगार तरुण हे झुरळासारखे असतात” असे वादग्रस्त विधान केले. त्यांच्या या वक्तव्यानंतर चहुबाजूंनी संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या असून अनेकांनी त्यावर कडक शब्दांत टीकाही केली आहे.
वादापलीकडचे विज्ञान: एक यशस्वी जीव
सध्याच्या विविध सार्वजनिक वक्तव्यांमध्ये, उपरोधिक टिपण्यांमध्ये आणि सामाजिक चर्चांमध्ये झुरळाचा हा संदर्भ मोठ्या प्रमाणावर चर्चिला जातोय. मात्र, या वादाच्या आणि राजकीय चर्चांच्या पलीकडे जाऊन जर आपण विज्ञान, उत्क्रांती आणि जैवशास्त्राच्या नजरेतून पाहिले, तर एक विलक्षण सत्य समोर येते. ते म्हणजे, मानवी जगतात कितीही तुच्छ मानले गेले तरी प्रत्यक्षात ‘झुरळ’ हा पृथ्वीवरील सर्वात यशस्वी, चिवट आणि दीर्घकाळ टिकून राहिलेल्या जीवांपैकी एक आहे.
झुरळाच्या पूर्वजांनी अस्तित्व टिकवून ठेवले
मानवाने विज्ञान, तंत्रज्ञान, उद्योग आणि संस्कृतीच्या माध्यमातून स्वतःला पृथ्वीवरील सर्वोच्च प्राणी मानले आहे. परंतु निसर्गाला श्रेष्ठत्वाच्या कल्पना मान्य नसतात. निसर्गाच्या नियमांमध्ये टिकून राहणारा तोच महान असतो, जो बदलत्या परिस्थितीत स्वतःला बदलू शकतो. या कसोटीवर झुरळ हा जीव एक विलक्षण उदाहरण ठरतो. पृथ्वीवर १८ कोटी वर्षे महाकाय डायनासोर राज्य करत होते, आज त्यांचे अस्तित्व नाही. प्रचंड हिमयुगे आली आणि गेली, महासागरांचे स्वरूप बदलले, वातावरणातील ऑक्सिजनचे प्रमाण बदलले, उल्कापात झाले, ज्वालामुखी फुटले, असंख्य जीव नष्ट झाले; पण झुरळाच्या पूर्वजांनी या सर्व संकटांमधून स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवले. ही गोष्ट साधी नाही.
३२ कोटी वर्षांचा अविरत संघर्ष
सुमारे ३२ कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर झुरळासारख्या कीटकांचा उदय झाला. त्या काळात पृथ्वीवर मानव नव्हता, पक्षी नव्हते, सस्तन प्राणी नव्हते. पण झुरळाच्या पूर्वजांनी उत्क्रांतीच्या प्रत्येक टप्प्यावर स्वतःला परिस्थितीनुसार बदलत ठेवले. आज आपल्या घरात दिसणारे झुरळ हे त्या प्राचीन सजीवांच्या संघर्षाचे आधुनिक रूप आहे. आपण त्याला मारण्याचा प्रयत्न करतो, घरातून हाकलून देतो, विषारी औषधे वापरतो, पण तरीही तो पुन्हा दिसतो. कारण झुरळ फक्त जगत नाही, तर जगण्यासाठी आवश्यक असलेली प्रत्येक कला त्याला अवगत आहे.
विलक्षण अनुकूलनक्षमता (Adaptability)
पृथ्वीच्या इतिहासात काही जीव असे आहेत ज्यांनी काळाच्या प्रत्येक वादळाला तोंड दिले. झुरळ हा त्यापैकी एक आहे. डायनासोरांचा अंत झाला, पण झुरळ टिकले. यामागे केवळ नशीब नव्हते, तर त्यांची विलक्षण अनुकूलनक्षमता होती. झुरळाचा जीवाश्म इतिहास पाहिला, तर असे दिसून येते की त्यांच्या पूर्वजांचे स्वरूप आजच्या झुरळांसारखेच होते. याचा अर्थ असा की उत्क्रांतीच्या दृष्टीने त्यांची शरीररचना इतकी यशस्वी होती की त्यात फारसा बदल करण्याची गरजच पडली नाही.
निसर्गाची अद्भुत रचना: कायटिनचे बाह्यकवच
मानवाने स्वतःला अत्यंत बुद्धिमान समजले असले, तरी मानवजातीचा इतिहास फार तर काही लाख वर्षांचा आहे. त्या तुलनेत झुरळांचे अस्तित्व कोट्यवधी वर्षांचे आहे. त्यांनी पृथ्वीवरील जवळपास प्रत्येक प्रकारचे हवामान अनुभवले आहे. उष्णकटिबंधीय जंगलांपासून वाळवंटांपर्यंत, हिमप्रदेशांपासून शहरांतील गटारांपर्यंत, झुरळांनी प्रत्येक ठिकाणी स्वतःचे साम्राज्य निर्माण केले. झुरळाचे शरीर निसर्गाची एक अद्भुत रचना आहे. झुरळाच्या शरीराची रचना अत्यंत जटील आहे. त्यांच्या शरीरावर कायटिन नावाचे कठीण पण हलके बाह्यकवच असते. हे कवच त्यांना बाह्य आघातांपासून संरक्षण देते. हेच कवच त्यांना पाण्याची कमतरता असताना शरीरातील आर्द्रता टिकवून ठेवण्यास मदत करते.
शरीराची लवचिकता आणि ‘बिनडोक्याचे’ अस्तित्त्व
मानवाचे शरीर हाडांच्या अंतर्गत सांगाड्यावर उभे असते, पण झुरळाचे शरीर बाह्य सांगाड्यावर आधारित असते. या रचनेमुळे त्यांना अरुंद जागांमधून सहज शिरता येते. आपण अनेकदा पाहतो की झुरळ अगदी छोट्याशा फटीतूनही आत शिरते. यामागे त्याच्या शरीराची लवचिकता कारणीभूत असते. त्याचे शरीर स्वतःच्या उंचीच्या एक तृतीयांश एवढ्या अरुंद जागेतूनही जाऊ शकते. झुरळाविषयी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्याचे डोके छाटले तरी ते काही दिवस जिवंत राहू शकते. मानवासाठी हे अकल्पनीय आहे.
अनोखी मज्जासंस्था आणि श्वसनप्रणाली
मानवाच्या शरीरात मेंदू हा सर्व नियंत्रणाचा केंद्रबिंदू असतो. पण झुरळाच्या मज्जासंस्थेची रचना वेगळी आहे. त्यांच्या शरीरातील प्रत्येक भागात स्वतंत्र मज्जाकेंद्रे असतात. त्यांची रक्ताभिसरण प्रणाली खुली असते. त्यामुळे डोके वेगळे झाले तरी रक्तदाब अचानक कोसळत नाही. झुरळ श्वास घेण्यासाठी तोंड किंवा नाकावर अवलंबून नसते. त्यांच्या शरीरावर स्पायरॅकल्स नावाची सूक्ष्म छिद्रे असतात. या छिद्रांमधून हवा थेट शरीरात प्रवेश करते. यामुळे डोके नसतानाही शरीराला ऑक्सिजन मिळत राहतो. शेवटी झुरळाचा मृत्यू मेंदूच्या अभावामुळे होत नाही, तर अन्न आणि पाणी घेता न आल्यामुळे होतो.
उपासमारीवर मात करणारा थंड रक्ताचा जीव
झुरळ हे थंड रक्ताचे प्राणी आहेत. त्यांना शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी सतत ऊर्जा खर्च करावी लागत नाही. मानव दिवसातून अनेक वेळा अन्न खातो, पण झुरळ अनेक आठवडे अन्नाशिवाय जगू शकते. जर पाणी उपलब्ध असेल, तर ते महिनाभर उपाशी राहू शकते. ही क्षमता उत्क्रांतीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. अन्नटंचाईच्या काळात जिवंत राहणारे जीवच पुढे उत्क्रांत होतात.
अणुकिरण सोसण्याची ताकद आणि सर्वभक्षी सैनिक
झुरळांविषयी सर्वाधिक प्रसिद्ध असलेला दावा म्हणजे अणुबॉम्बनंतरही ते जिवंत राहू शकतात. या विधानामध्ये काही प्रमाणात अतिशयोक्ती असली, तरी त्यामागे विज्ञान आहे. रेडिएशनचा सर्वाधिक परिणाम वेगाने विभाजित होणाऱ्या पेशींवर होतो. मानवाच्या शरीरात पेशी सतत विभाजित होत असतात. झुरळांमध्ये ही प्रक्रिया तुलनेने मंद असते. त्यामुळे त्यांची रेडिएशन सहनशक्ती अधिक असते. अनेक प्रयोगांमध्ये असे दिसून आले की झुरळे मानवापेक्षा खूप जास्त प्रमाणातील किरणोस्तार सहन करू शकतात. झुरळ म्हणजे निसर्गातील एक सर्वभक्षी सैनिक आहे. त्याला जगण्यासाठी विशिष्ट अन्नाची गरज नसते. स्वयंपाकघरातील उरलेले अन्न, साखर, भाजीपाला, कागद, कपडे, साबण, चामडे, मृत त्वचा, केस उपलब्ध असलेली जवळपास कोणतीही सेंद्रिय वस्तू तो खाऊ शकतो. ही क्षमता त्याला जगातील जवळपास प्रत्येक वातावरणात टिकून राहण्यास मदत करते.
सुपर-फास्ट प्रतिक्षिक्षप्त क्रिया आणि रासायनिक प्रतिकारशक्ती
झुरळाच्या पचनसंस्थेत असंख्य सूक्ष्मजीव राहतात. हे जीवाणू आणि प्रोटोझोआ कठीण पदार्थांचे विघटन करतात. म्हणूनच झुरळांना सामान्य प्राण्यांना न पचणाऱ्या गोष्टी पचवता येतात. निसर्गात ते कचरा व्यवस्थापकाची भूमिका निभावतात. झुरळाला जगण्यासाठी फार कमी संसाधने लागतात. ते एक महिना अन्नाशिवाय राहू शकते. काही प्रजाती पाण्याशिवायही अनेक दिवस टिकतात. त्यांच्या शरीरावरील कायटिनचे आवरण पाण्याचे बाष्पीभवन कमी करते. झुरळाची प्रतिक्षिप्त क्रिया इतर प्राण्यांच्या तुलनेत वेगवान असते. त्यांच्या शरीराच्या मागील भागात सर्सी नावाचे संवेदनशील अवयव असतात. हे अवयव हवेमधील सूक्ष्म हालचाली ओळखतात. आपण हात उगारण्याआधीच झुरळाला धोका समजतो. हा संदेश थेट त्यांच्या पायांपर्यंत पोहोचतो. म्हणूनच ते विचार करण्याआधी धावू लागतात. मानवाने झुरळांना नष्ट करण्यासाठी असंख्य रसायने तयार केली. पण झुरळांनीही हार मानली नाही. काही पिढ्यांमध्येच त्यांनी त्या रसायनांविरुद्ध प्रतिकारशक्ती विकसित केली. त्यांच्या जनुकांमध्ये वेगाने बदल होतात. त्यामुळे विषारी पदार्थ निष्प्रभ करणारे एन्झाईम्स तयार होतात. ही उत्क्रांती प्रत्यक्ष डोळ्यांसमोर घडताना दिसते.
रोबोटिक्समधील उपयोग आणि पर्यावरणातील भूमिका
मानवाला झुरळाचा तिरस्कार वाटतो. कारण ते अस्वच्छता, अंधाऱ्या गलिच्छ जागा आणि विविध रोगांशी जोडले गेले आहे. पण विज्ञानासाठी झुरळ हे अभ्यासाचा एक अद्भुत नमुना आहे. रोबोटिक्समध्ये झुरळाच्या हालचालींचा अभ्यास केला जातो. आपत्तीग्रस्त भागात काम करणारे सूक्ष्म रोबोट तयार करताना त्यांच्या शरीररचनेचा उपयोग होतो. झुरळ पूर्णपणे एकाकी नसते. ते एकमेकांशी रासायनिक संकेतांद्वारे संवाद साधतात. त्यांना अन्न, धोका आणि सुरक्षित जागांची माहिती मिळते. निसर्गातील प्रत्येक जीवाची एक भूमिका असते. झुरळे सेंद्रिय पदार्थांचे विघटन करतात. त्यामुळे पर्यावरणातील कचरा कमी होतो. ते अनेक पक्षी, सरडे आणि इतर जीवांचे अन्नही आहेत. झुरळ आपल्याला एक महत्त्वाचा धडा शिकवते. परिस्थिती कितीही कठीण असो, बदल स्वीकारणारा जीव टिकतो. सौंदर्य, शक्ती किंवा आकार यापेक्षा अनुकूलन महत्त्वाचे असते.
डार्विनचा सिद्धांत आणि निसर्गाचा अजिंक्य योद्धा
चार्ल्स डार्विनने सांगितले होते की, सर्वात शक्तिशाली जीव टिकत नाहीत; तर बदलांना सर्वाधिक चपळतेने स्वीकारणारे जीव टिकतात. झुरळ हे त्या तत्त्वज्ञानाचे सर्वात प्रभावी उदाहरण आहे. झुरळाकडे आपण अनेकदा तिरस्काराने पाहतो. पण निसर्गाच्या दृष्टीने तो एक अजिंक्य योद्धा आहे. तो अंधारात जगतो, संकटांमध्ये वाढतो, उपासमारी सहन करतो आणि प्रत्येक पिढीत स्वतःला अधिक सक्षम करतो. कदाचित म्हणूनच कोट्यवधी वर्षांनंतरही पृथ्वीवर त्याचे अस्तित्व कायम आहे. मानवाने आंतरिक्षाचा कानकोपरा धुंढाळला चंद्रावर पाऊल ठेवले, महासागराचा तळ गाठला , अणुबॉम्ब तयार केले; पण अजूनही आपल्या घरातील एका छोट्याशा झुरळाला पूर्णपणे संपवू शकलेला नाही. हीच झुरळाची खरी ताकद आहे. झुरळ म्हणजे केवळ एक कीटक नाही. तो निसर्गाच्या अलौकिक जिद्दीचे प्रतीक आहे. झुरळ आपल्याला सांगते, हे विश्व् बदलत राहील. संकटे येतील. साम्राज्ये कोसळतील. पण जो स्वतःला बदलू शकतो, तो कधीच संपत नाही.
