CJP absence in Jharkhand : काही आठवड्यांपूर्वी पेपरफुटीच्या मुद्द्यावर दिल्लीतील जंतरमंतर आंदोलनाचा चेहरा ठरलेली कॉक्रोच जनता पार्टी आता झारखंडमधील कथित परीक्षा गैरप्रकारांच्या मुद्द्यावरूनही चर्चेत आहे. मात्र, सीजेपीची दिल्लीसारखी उपस्थिती झारखंडच्या आंदोलनात सुरुवातीला दिसली नाही, त्यामुळे सीजेपीच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. मात्र, हे चित्र जाणीवपूर्वक उभे केले जात असल्याचा दावा सीजेपीकडून केला जात आहे. झारखंडमधील विद्यार्थ्यांच्या मागण्यांच्या समर्थनार्थ उपोषणावर बसलेल्या झारखंड लोकतांत्रिक क्रांतिकारी मोर्चाचे (जेएलकेएम) नेते देवेंद्र नाथ महातो यांच्याशी अभिजीत दिपकेंनी व्हिडीओ कॉलद्वारे संवाद साधला. त्याच्या दुसऱ्या दिवशी संभाजीनगर येथे पत्रकारांनी दिपकेंना रांचीला जाणार का असे विचारले असता ते म्हणाले, “महातो झारखंडमधील आंदोलनाचे नेतृत्व करत आहेत. ते प्रभावीपणे आंदोलनाचे नेतृत्व करत होते, आम्हाला हे आंदोलन हायजॅक करायचे नाही.”
सीजेपीने यामागचे कारण स्पष्ट केले असले तरी तिच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. गेल्या काही वर्षांतील मोठ्या विद्यार्थी आंदोलनांपैकी एका आंदोलनाचे नेतृत्व करणारी आणि आता देशभर संघटन वाढवण्याच्या तयारीत असलेली सीजेपी रांचीतील आंदोलनापासून मात्र दूर का राहिली? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
या आंदोलनात बाहेरील संघटनांचा हस्तक्षेप नको, अशी भूमिका अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून (ABVP) मांडण्यात आली आहे. अभाविपचे नेते सत्यम मिश्रा यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, झारखंडमधील विद्यार्थ्यांनी सीजेपीला पाठिंबा दिलेला नाही. सीजेपीला आंदोलनात सहभागी व्हायचे असल्यास त्यांचे स्वागत आहे; मात्र त्यांनी आंदोलनाची योग्य पद्धत वापरावी, असे त्यांनी स्पष्ट केले.
दिल्लीतील जंतरमंतर आंदोलनाचा दाखला देत मिश्रा यांनी हिंसक आंदोलनाची पुनरावृत्ती झारखंडमध्ये होऊ नये असे म्हटले. तसेच ‘आझादी’सारख्या घोषणांची झारखंडमधील आंदोलनात गरज नसल्याचेही त्यांनी सांगितले. अभाविप ही झारखंड मुक्ती मोर्चा-काँग्रेस सरकारविरोधातील विद्यार्थी आंदोलनात सहभागी आहे.
‘आंदोलनाचे नेतृत्व करण्याची इच्छा नाही’: सीजेपी
द इंडियन एक्स्प्रेसने अभिजीत दिपके आणि सौरव दास यांच्याशी संपर्क साधला. यावेळी त्यांना रांचीतील आंदोलनावरील भूमिकेबाबत विचारण्यात आले, याबाबत त्यांनी प्रतिक्रिया दिली नाही.
दरम्यान, सीजेपीच्या कायदेविषयक प्रमुख रत्ना सिंह यांनी संघटनेची भूमिका स्पष्ट केली. त्यांनी इंडियन एक्स्प्रेसला संवाद साधताना नमूद केले की, जंतरमंतरवरील आंदोलनही नेतृत्वविरहित ठेवण्याचा सीजेपीचा प्रयत्न होता. आता सीजेपीने राजकीय दबावगट म्हणून काम करण्याची भूमिका घेतली आहे, त्यामुळे संघटनेचे तीन प्रमुख चेहरेच प्रत्येक आंदोलनाचे नेतृत्व करतील किंवा प्रत्येक प्रश्नावर त्यांनीच पुढे यावे, अशी अपेक्षा ठेवू नये.
२५ जुलैच्या आंदोलनातील यशानंतर तरुण अधिक सक्षम झाले आहेत. कुठेही गैरप्रकार झाला तर कोणत्याही सरकारला जबाबदारी घेण्याची मागणी करण्यासाठी ते स्वतः संघटित होऊ शकतात, असेही रत्ना सिंह यांनी स्पष्ट केले.
रत्ना सिंह यांच्या मते, आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना बाहेरील नेतृत्वाने आपल्या नियंत्रणाखाली घेण्याऐवजी स्वतःच्या ताकदीची जाणीव होणे महत्त्वाचे आहे. सरकारला जाब विचारण्यासाठी आणि बदल घडवण्यासाठी विद्यार्थी स्वतः आंदोलन उभे करू शकतात, असा विश्वास सीजेपीला आहे.
झारखंडमधील विद्यार्थ्यांच्या संपर्कात सीजेपीचे प्रमुख नेते असल्याचेही सिंह यांनी सांगितले. सीजेपीच्या २० ते २५ सदस्यांच्या शिष्टमंडळाने विद्यार्थ्यांची भेट घेतली असून, त्यानंतरही संघटनेचे सदस्य आंदोलकांच्या संपर्कात आहेत. १० ऑगस्टला पोलिसांकडून मारहाण झालेल्या विद्यार्थ्यांसोबतही सीजेपीचे कार्यकर्ते होते. आंदोलनाला सीजेपीच्या उपस्थितीची गरज भासल्यास आपण नक्की सहभागी होऊ, असे सिंह यांनी स्पष्ट केले.
रांचीमध्ये पोहोचल्यानंतर सीजेपीच्या शिष्टमंडळाने सर्वप्रथम विद्यार्थी आणि स्वयंसेवकांशी चर्चा करून त्यांच्या मागण्या आणि अपेक्षा समजून घेतल्या. आंदोलन शांततेत पार पाडणे आणि सुरक्षा व्यवस्था सांभाळणे, याबाबत विद्यार्थ्यांनी सीजेपीची मदत मागितल्याचे मुकेश ऑलराऊंडर यांनी सांगितले.
झारखंडमधील आंदोलक विद्यार्थ्यांचा अनुभव जाणून घेतल्यानंतर सीजेपीच्या शिष्टमंडळाने सीजेपीच्या राष्ट्रीय नेतृत्वाशी चर्चा केली. त्यानंतर आंदोलनाला ‘मंचावरून नाही, तर मंचामागून पाठिंबा द्यायचा’ अशी सूचना देण्यात आली. यावरून आंदोलनाचे थेट नेतृत्व करण्याऐवजी पडद्यामागून मदत करण्याची सीजेपीची भूमिका असल्याचे स्पष्ट होते.
झारखंडमध्ये सीजेपीची संघटनात्मक जबाबदारी झारखंड उच्च न्यायालयातील वकील अमित सिंह यांच्याकडे आहे. दिपके आणि रांका यांच्याशी त्यांचे पूर्वीपासून संबंध आहेत. मात्र, सध्या सीजेपीची झारखंडमधील संघटनात्मक उपस्थिती रांचीपुरतीच मर्यादित असून जिल्हानिहाय टीम अद्याप उभी राहिलेली नाही.
आंदोलनाच्या ठिकाणीही गटबाजी
२५ जुलै रोजी रांचीतील बापू वाटिका येथे आंदोलनाला सुरुवात झाली. त्यानंतर २९ जुलैला विद्यार्थ्यांना जयपाल सिंह मुंडा स्टेडियममध्ये हलवण्यात आले. सुरुवातीला परीक्षेतील गैरप्रकारांची सीबीआय चौकशी व्हावी, ही एकच मागणी घेऊन सर्व विद्यार्थी एकवटले होते.
मात्र, काही दिवसांतच आंदोलकांमध्ये दोन गट पडले. त्यातून JPSC-JSSC Reform Manch आणि JPSC-JSSC Abhyarthi Nyay Manch असे दोन स्वतंत्र गट तयार झाले, त्यामुळे परीक्षा गैरप्रकाराविरोधातील आंदोलनासोबतच आंदोलनाचे नेतृत्व आणि दिशा यावरूनही संघर्ष सुरू झाल्याचे दिसून येते.
JPSC-JSSC Reform Manch आणि JPSC-JSSC Abhyarthi Nyay Manch यांच्यातील मतभेद अधिक तीव्र झाले आहेत. रिफॉर्म मंचने दुसऱ्या गटातील काही विद्यार्थ्यांचा झारखंड लोकतांत्रिक क्रांतिकारी मोर्चा (JLKM)शी संबंध असल्याचा आरोप केला आहे, तर न्याय मंचने रिफॉर्म मंच हा ‘भाजपाचा गट’ असल्याचा आरोप केला. भाजपाचे नेते आणि कार्यकर्ते या गटाच्या आंदोलनस्थळी नियमितपणे भेट देत असल्याचा त्यांचा दावा आहे. दोन्ही गटांनी सरकारशी स्वतंत्रपणे चर्चा केल्याने हा संघर्ष आणखी स्पष्ट झाला.
रांची आंदोलनातील प्रमुख चेहऱ्यांपैकी २७ वर्षीय उम्मे हबीबा यांनी अभिजीत दिपके यांच्याशीही चर्चा झाल्याचे सांगितले. दिपकेंची प्रकृती ठीक नसल्याने सध्या येता आले नाही, मात्र प्रकृती सुधारल्यानंतर ते आंदोलनात सहभागी होणार असल्याचे हबीबा म्हणाल्या.
आंदोलनातील काही भाजपासमर्थक विद्यार्थ्यांना सीजेपीचा हस्तक्षेप नको आहे. मात्र, हबीबा यांनी नमूद केले की, आंदोलनाला वेग मिळवून देण्यात सीजेपीचीच भूमिका होती हे नाकारता येणार नाही.
आंदोलनाचे आयोजक चंदन रजक म्हणाले, सीजेपीच्या पाठिंब्याचे आम्ही स्वागत करतो. मात्र, सीजेपीच्या नेत्यांनी आंदोलनाचे थेट नेतृत्व करू नये, अशी भूमिका त्यांनी मांडली. “अन्याय आणि भ्रष्टाचाराविरोधात लढण्याची प्रेरणा निर्माण करण्यात सीजेपीची भूमिका महत्त्वाची आहे. मात्र, आंदोलनाचे नेतृत्व किंवा मंचावर कोणत्याही एका संघटनेचे वर्चस्व आम्हाला नको,” असे रंजक यांनी स्पष्ट केले आहे.
