CJP Delhi Protest Apps Used : दिल्लीतील कॉक्रोच जनता पार्टीच्या (CJP) आंदोलनात आंदोलक मोबाईल नेटवर्क आणि इंटरनेटशिवाय एकमेकांशी कसा संपर्क साधत होते हा प्रश्न उपस्थित होत आहे. ‘चलो संसद’ आंदोलनादरम्यान ब्लूटूथवर आधारित मेसेजिंग ॲप्सचा वापर झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या दाव्यांची दिल्ली पोलिस चौकशी करत आहेत. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने यासंबंधी वृत्त दिले आहे आंदोलनादरम्यान नेमक्या कोणत्या ॲपचा वापर झाला, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तसेच, दिल्ली पोलिसांनीही कोणत्याही विशिष्ट ॲपचे नाव जाहीर केलेले नाही.
तथापि, या वृत्तानंतर व्हॉट्सॲप किंवा सिग्नलसारख्या पारंपरिक मेसेजिंग ॲप्सपेक्षा वेगळ्या पद्धतीने काम करणाऱ्या ब्लूटूथ-आधारित मेसेजिंग ॲप्सची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. हे ॲप्स कसे काम करतात, यापूर्वी त्यांचा वापर झाला का आणि ते पूर्णपणे ट्रॅकिंगपासून सुरक्षित असतात का, हे जाणून घेऊयात.
हे ॲप्स नेमके कसे काम करतात?
व्हॉट्सॲप किंवा सिग्नलसारख्या ॲप्सना संदेश पाठवण्यासाठी इंटरनेट किंवा मोबाईल नेटवर्कची गरज असते. मात्र, बरेचसे मेसेजिंग ॲप्स ब्लूटूथ लो एनर्जी (BLE) तंत्रज्ञानाचा वापर करून जवळपास असलेल्या मोबाईलमध्ये थेट संदेश पाठवू शकतात.
या ॲप्समध्ये इंटरनेट किंवा मोबाईल टॉवरऐवजी ‘मेश नेटवर्क’ तयार केले जाते. या नेटवर्कमध्ये जवळपास असलेले मोबाईल एकमेकांशी जोडले जातात आणि प्रत्येक फोन पुढील फोनपर्यंत संदेश पोहोचवण्याचे काम करतो.
दोन वापरकर्ते साधारण १०० मीटरच्या ब्लूटूथ रेंजमध्ये असतील तर संदेश थेट एका फोनवरून दुसऱ्यावर पाठवला जाऊ शकतो. त्यानंतर हा संदेश एकामागोमाग एका फोनवरून दुसऱ्या फोनकडे जात अखेर संबंधित व्यक्तीपर्यंत पोहोचतो. इंटरनेटशिवाय हे सगळं शक्य होतं.
सामान्यत: पाहायला गेलं तर ब्लूटूथची रेंज मर्यादित असते. मात्र, अनेक फोन एकमेकांशी जोडले गेल्यास संदेश अधिक लांब अंतरापर्यंत पोहोचू शकतो. या प्रकारातील ‘Briar’ हे सर्वाधिक चर्चेत असलेल्या ॲप्सपैकी एक आहे. या ॲपच्या अधिकृत संकेतस्थळानुसार, इंटरनेट उपलब्ध नसतानाही ब्लूटूथ किंवा वाय-फायच्या माध्यमातून संदेशांची देवाणघेवाण करता येते. तसेच, संदेश एंड-टू-एंड एन्क्रिप्शनद्वारे सुरक्षित ठेवले जातात आणि त्यासाठी कोणत्याही केंद्रीय सर्व्हरचा वापर केला जात नाही.
Briar Project च्या माहितीनुसार, इंटरनेट सेवा खंडित झाल्यास किंवा नेटवर्क उपलब्ध नसल्यासही संवाद सुरू ठेवता यावा, या उद्देशाने या तंत्रज्ञानाची रचना करण्यात आली आहे.
यापूर्वीही या ॲप्सची चर्चा का झाली होती?
ब्लूटूथवर आधारित मेश मेसेजिंग ॲप्स ही काही नवीन संकल्पना नाही. यापूर्वीही विविध देशांतील आंदोलनांदरम्यान या ॲप्सचा वापर चर्चेत आला आहे.
२०१९ मध्ये हाँगकाँगमधील सरकारविरोधी आंदोलनावेळी इंटरनेट सेवा खंडित होण्याची किंवा डिजिटल पाळत ठेवली जाण्याची भीती व्यक्त करण्यात आली होती. त्यावेळी आंदोलकांनी त्वरित संदेश पाठवता येणारे ऑफलाइन मेसेजिंग ॲप्स डाउनलोड केले होते.
रॉयटर्सच्या २०२१ मधील वृत्तानुसार, म्यानमारमध्ये लष्करी उठावानंतर ‘ब्रिजफाय’ (Bridgefy) या मेश मेसेजिंग ॲपच्या डाउनलोडच्या संख्येत मोठी वाढ झाली होती. इंटरनेट सेवा बंद पडली किंवा खंडित झाली तरी संपर्क कायम ठेवता यावा, यासाठी अनेकांनी या ॲपचा वापर करण्यास सुरुवात केली होती.
या ॲपचा ट्रॅकिंगपासून बचाव होतो का?
ब्लूटूथ-आधारित मेसेजिंग ॲप्समध्ये संदेश पाठवण्यासाठी मोबाईल नेटवर्क किंवा इंटरनेटची गरज नसते. मात्र, त्यामुळे या ॲप्सचा मागोवा घेता येत नाही, असा समज चुकीचा ठरेल असे सायबर सुरक्षा तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
युनिव्हर्सिटी ऑफ सरेचे प्राध्यापक ॲलन वूडवर्ड यांनी बीबीसीला सांगितले की, अशा पीअर-टू-पीअर नेटवर्कमधील संदेश एन्क्रिप्टेड असले तरी त्यातून ‘मेटाडेटा’ तयार होत राहते, त्यामुळे संबंधित यंत्रणांना कोणती उपकरणे एकमेकांशी जोडली आहेत, संवाद कधी झाला आणि त्याचा पॅटर्न काय आहे, याची माहिती मिळू शकते. अशा माहितीच्या आधारे आंदोलनाचे समन्वयक किंवा संपर्क साखळीचा अंदाज यंत्रणेला येतो.
दरम्यान, रॉयल होलोवे, युनिव्हर्सिटी ऑफ लंडनच्या संशोधकांनी आंदोलनांमध्ये वापरल्या गेलेल्या Bridgefy ॲपची तपासणी केली होती. त्यांच्या अभ्यासात त्या काळातील ॲपच्या आवृत्तीत अनेक सुरक्षाविषयक त्रुटी समोर आल्या.
संशोधनानुसार, हॅकर्स या त्रुटींचा गैरफायदा घेऊ शकतात. या प्रणालीच्या मदतीने हॅकर्स वापरकर्त्यांना ट्रॅक करू शकतात, बनावट ओळख तयार करू शकतात आणि ॲपच्या सुरक्षा प्रणालीतील कमतरतांचा गैरफायदाही घेऊ शकतात; त्यामुळे अनेकांना वाटतेय तितके हे ॲप सुरक्षित नाही, असे संशोधकांनी नमूद केले आहे.
Bridgefy ॲपने नंतर आपल्या सुरक्षा व्यवस्थेत सुधारणा केल्याचा दावा केला. कंपनीने नंतर ‘सिग्नल प्रोटोकॉल’वर आधारित अधिक सुरक्षित संदेश सांकेतिकीकरण प्रणाली स्वीकारल्याचे सांगितले.
दरम्यान, जुलै २०२५ मध्ये ट्विटरचे सहसंस्थापक जॅक डोर्सी यांनी विकसित केलेल्या Bitchat या ॲपची तज्ज्ञ ॲलेक्स रॅडोशिया यांनी सुरक्षा तपासणी केली. त्यांच्या मते, या ॲपमधील सर्वात मोठी कमतरता म्हणजे ओळख पडताळणीची कमकुवत व्यवस्था. त्यामुळे एखादा हल्लेखोर विश्वासू अशा भासणाऱ्या नावाने स्वतःची खोटी ओळख तयार करून संवाद साधू शकत होता.
यानंतर ट्रेल या सायबर सुरक्षा कंपनीने सांगितले की, या त्रुटींची माहिती मिळाल्यानंतर Bitchatने काही तासांतच आवश्यक सुधारणा केल्या.
या ब्लूटूथ मेसेजिंग तंत्रज्ञानाच्या मर्यादा काय?
सायबर सुरक्षा तज्ज्ञांच्या मते, ब्लूटूथ मेश नेटवर्क सर्व परिस्थितीत प्रभावी ठरत नाही. हे तंत्रज्ञान ब्लूटूथ जोडणीद्वारे मेसेज फॉरवर्ड करण्याचे काम करते, त्यामुळे एकाच परिसरात मोठ्या संख्येने वापरकर्त्यांकडे तेच ॲप असणे आवश्यक असते. वापरकर्त्यांची संख्या कमी असल्यास संदेश फार दूरपर्यंत पोहोचू शकत नाही. याशिवाय ब्लूटूथची मर्यादित रेंज, संदेश पोहोचवण्यास लागणारा अधिक वेळ आणि बॅटरीचा अधिक वापर या अडचणीही तज्ज्ञांनी अधोरेखित केल्या आहेत.
२०२२ मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका संशोधनपत्रातही पूर्णपणे गोपनीय आणि ओळख लपवणारी मेश मेसेजिंग प्रणाली तयार करणे हे अद्याप तांत्रिकदृष्ट्या मोठे आव्हान असल्याचे नमूद करण्यात आले आहे. संशोधकांच्या मते, सध्या उपलब्ध असलेल्या काही प्रणालींमधूनही काही प्रमाणात मेटा डेटा किंवा इतर माहिती उघड होऊ शकते, ज्यावरून वापरकर्त्यांची ओळख पटण्याची शक्यता अधिक असते.
