CJP Protest Delhi Jantar Mantar Updates : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीने आज दिल्लीत आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली असून राजधानी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलिसांच्या या भूमिकेमुळे आंदोलनाच्या आयोजकांकडे उपलब्ध असलेले कायदेशीर अधिकार आणि पर्याय याबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर आंदोलन करण्याच्या अधिकाराबाबत कायदा काय सांगतो? पोलिसांनी परवानगी नाकारल्यास आयोजकांकडे कोणते पर्याय उरतात? त्याविषयीचा हा आढावा…

लोकशाहीत शांततापूर्वक आंदोलन करणे हा प्रत्येक भारतीयाला राज्यघटनेने दिलेला मूलभूत अधिकार आहे. मात्र, कोणतेही आंदोलन करण्याआधी आयोजकांना स्थानिक प्रशासनाची अथवा पोलिसांची अधिकृत परवानगी घ्यावी लागते. दिल्ली पोलिसांच्या म्हणण्यानुसार, सीजेपी म्हणजेच कॉक्रोच जनता पार्टीने जंतरमंतर येथे आंदोलन करण्यासाठी परवानगी मागितली होती; पण नियोजित मोर्चाच्या अवघ्या तीन दिवस आधी ७ ऑक्टोबरला त्यांनी अर्ज केला होता. सार्वजनिक ठिकाणी सभा किंवा आंदोलने करण्यासाठी किमान १० दिवस आधी परवानगी घेणे आवश्यक असते. त्यामुळे नियमांनुसार सीजेपीच्या आंदोलनाचा अर्ज फेटाळून लावण्यात आला असून त्यांना परवानगी नाकारण्यात आली आहे.

आंदोलनाच्या अधिकाराबाबत कायदा काय सांगतो?

लोकशाहीत प्रत्येक नागरिकाला आपापली मते मांडण्याचा आणि अन्यायाविरोधात आवाज उठवण्याचा अधिकार आहे. सरकारचा एखादा निर्णय मान्य नसेल, एखाद्या मागणीसाठी पाठपुरावा करायचा असेल किंवा एखाद्या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधायचे असेल, तर नागरिक शांततेच्या मार्गाने आंदोलन करू शकतात. भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद १९ (१) (अ) नागरिकांना भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार देते, तर अनुच्छेद १९ (१ )(ब) नुसार प्रत्येकाला शांततेने आणि शस्त्रांशिवाय एकत्र येण्याचा अधिकार बहाल करते. मात्र असे असले तरीही हे दोन्ही अधिकार अमर्यादित नाहीत. राज्यघटनेतील अनुच्छेद १९ (२) नुसार सार्वजनिक सुव्यवस्थेसह काही विशिष्ट कारणांच्या आधारे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर निर्बंध घालता येतात. त्याचप्रमाणे अनुच्छेद १९ (३) अंतर्गत सार्वजनिक सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने शांततेने एकत्र येण्याच्या अधिकारावर वाजवी निर्बंध घातले जाऊ शकतात.

शांततापूर्वक आंदोलनाबाबत न्यायालयाचे निरीक्षण काय?

२०१८ मध्ये मजदूर किसान शक्ती संघटना खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने आंदोलनाचा घटनात्मक अधिकार आणि सार्वजनिक सुव्यवस्था यांच्यातील समतोलाबाबत महत्त्वपूर्ण भूमिका मांडली होती. दिल्ली पोलिसांनी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या (CrPC) कलम १४४ अंतर्गत मध्य दिल्लीत पूर्वपरवानगीशिवाय जाहीर सभा, मोर्चे आणि निदर्शनांवर बंदी घालण्याचे आदेश काढले होते. त्याविरोधात आंदोलनकर्त्यांनी थेट सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. त्यावेळी या प्रकरणाची सुनावणी राष्ट्रीय हरित लवादाच्या एका आदेशाविरोधातील याचिकेबरोबर करण्यात आली. जंतरमंतर रस्त्यावरील आवाजाचे प्रदूषण, कचरा आणि सार्वजनिक वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याचा स्थानिकांच्या तक्रारीनंतर लवादाने तिथे आंदोलन करण्याची परवानगी नाकारली होती. या दोन्ही याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती ए. के. सिक्री आणि न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या खंडपीठाने महत्वाचे निरीक्षण नोंदवले होते. आपल्या तक्रारी मांडण्यासाठी आणि त्या संबंधित यंत्रणांपर्यंत पोहोचवण्यासाठी नागरिकांना शांततापूर्ण आंदोलन करण्याचा मूलभूत अधिकार असल्याचे खंडपीठाने स्पष्ट केले होते. त्याचवेळी आंदोलनाचे योग्य नियमन करण्यात संबंधित प्रशासनही अपयशी ठरल्याने स्थानिक रहिवाशांच्या समस्या वाढल्याचे न्यायमूर्तींनी नमूद केले होते. त्यामुळे अशा आंदोलनांपूर्वी आयोजकांना पोलिसांची पूर्वपरवानगी घेण्याची तरतूद करता येऊ शकते, असेही खंडपीठाने स्पष्ट केले होते.

आंदोलनासाठी दिल्ली पोलिसांचे नियम काय?

दिल्ली पोलिसांनी जंतरमंतर येथे आंदोलनाला परवानगी देण्यासाठी एक निश्चित प्रक्रिया ठरवलेली आहे. या मार्गदर्शक तत्वांनुसार, प्रस्तावित आंदोलनाच्या तारखेच्या किमान १० दिवस आधी आयोजकांनी पोलीस उपायुक्तांकडे अर्ज करणे अपेक्षित आहे. मात्र, त्यापेक्षा कमी कालावधीत केलेल्या अर्जांचाही विचार केला जाऊ शकतो. त्यासाठी आंदोलनस्थळी जागा उपलब्ध आहे का आणि आवश्यक व्यवस्था करण्यासाठी पुरेसा वेळ आहे का, याचा विचार केला जातो. जंतरमंतर येथे आंदोलनासाठी आलेल्या अर्जांचा विचार ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वानुसार केला जातो. त्यापूर्वी विशेष शाखा, वाहतूक पोलीस आणि नवी दिल्ली जिल्हा पोलिसांकडून संबंधित बाबींची तपासणी केली जाते. आंदोलनामुळे वाहतुकीत अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे का, मानवी सुरक्षिततेला धोका पोहोचू शकतो का किंवा सार्वजनिक शांतता भंग होण्याची शक्यता आहे का, याचा विचार पोलीस उपायुक्तांना करावा लागतो.

आंदोलनाची परवानगी रद्द कशी करता येते?

आंदोलनाला परवानगी दिल्यानंतरही काही अनपेक्षित परिस्थिती निर्माण झाल्यास दिल्ली पोलिसांना ती रद्द करता येते. उदाहरणार्थ, अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेची गरज निर्माण होणे किंवा गुप्तचर यंत्रणांकडून विशिष्ट माहिती मिळणे, अशा कारणांमुळे परवानगी रद्द केली जाऊ शकते. मात्र, अशा वेळी परवानगी रद्द करण्यामागील कारणांची योग्य नोंद करणे आणि ती आयोजकांना कळवणे आवश्यक असल्याचे मार्गदर्शक आदेशात नमूद करण्यात आले आहे. दिल्ली पोलिसांच्या नियमांनुसार, जंतरमंतर येथे आंदोलनासाठी एकावेळी जास्तीत जास्त १,००० लोकांना एकत्र येण्याची परवानगी आहे. ही मर्यादा ओलांडणाऱ्या आंदोलनांसाठी रामलीला मैदान हा पर्याय उपलब्ध आहे. या मैदानावर ५० हजार लोक सामावू शकतात. एकूणच, जंतरमंतरवरील आंदोलनासाठी १० दिवस आधी अर्ज करणे अपेक्षित असले, तरी उशिरा आलेले अर्जही परिस्थितीनुसार विचारात घेता येतात. त्यामुळे केवळ १० दिवसांची मुदत पूर्ण झाली नाही, या एकाच कारणावरून प्रत्येक उशिराच्या अर्जाचा विचार नाकारला पाहिजे, असा अर्थ या मार्गदर्शक तत्त्वांतून निघत नाही.

आंदोलनाची परवानगी नाकारल्यास काय करता येते?

आंदोलनासाठी परवानगी मागितल्यानंतर पोलिसांनी ती नाकारल्यास आयोजकांसमोर सर्वप्रथम पोलिसांकडे पुन्हा दाद मागण्याचा पर्याय असतो. परवानगी नाकारण्यामागील कारणांचा पुनर्विचार करण्याची विनंती आयोजक करू शकतात. तसेच, आंदोलनातील सहभागींची संख्या कमी करणे, आंदोलनाचा कालावधी कमी करणे किंवा दुसरे ठिकाण सुचवून नव्याने परवानगी मागणे, असे पर्यायही त्यांच्याकडे असतात. मात्र, दिल्ली पोलिसांच्या स्थायी आदेशात परवानगी नाकारण्याच्या निर्णयाविरोधात स्वतंत्र अपील करण्याची प्रक्रिया नमूद केलेली नाही. या आदेशानुसार, पोलीस उपायुक्तांचा निर्णय हा ठेवण्यात आला आहे.

परवानगी नाकारल्यानंतरही आंदोलन केल्यास काय होते?

पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही आंदोलन सुरू ठेवल्यास किंवा लागू असलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधित व्यक्तींवर कायदेशीर कारवाई होऊ शकते. भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम २२३ अंतर्गत कारवाई केली जाऊ शकते. हे कलम एखाद्या सार्वजनिक सेवकाने कायदेशीर अधिकारात जारी केलेल्या आदेशाचे जाणीवपूर्वक उल्लंघन करण्याशी संबंधित आहे. यापूर्वी ही तरतूद भारतीय दंड संहितेच्या कलम १८८ मध्ये होती. कायदेतज्ज्ञांच्या मते, अशा प्रकरणांकडे आंदोलनाच्या घटनात्मक अधिकाराच्या संदर्भातही पाहिले पाहिजे. आंदोलनासाठी पर्यायी जागा न देणे, आंदोलन कुठे करता येईल याबाबत कोणतीही स्पष्टता नसणे आणि निषेध व्यक्त करण्यासाठी प्रभावी पर्याय उपलब्ध न करून देणे, यामुळे आंदोलनाचा अधिकार पूर्णपणे रोखला जात असल्याचा युक्तिवाद संबंधित व्यक्ती न्यायालयात करू शकतात. भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १६३ अंतर्गत अधिकारांचा वापर करताना आंदोलनाच्या घटनात्मक अधिकाराचा विचार करणे आवश्यक आहे.