CJP Protest Delhi JantarMantar : दिल्लीतील जंतरमंतरवर आमरण उपोषण करणाऱ्या ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन (AISA)च्या नेहा बोरा, मनीष कुमार आणि आमीन अमितोज या तीन विद्यार्थ्यांनी तब्बल २३ दिवसांनंतर सोमवारी (२० जुलै) उपोषण मागे घेतले आहे. नीटसह वैद्यकीय प्रवेश परीक्षांच्या पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी त्यांनी हे आंदोलन छेडले होते. जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या लाखो तरुणांचा मोर्चा सोमवारी संसदेवर धडकला होता. या मोर्चाला अनेक विविध क्षेत्रांतील लोकांनी पाठिंबा दिला. खासदार मनोज झा, राजाराम सिंह आणि अमरा राम यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने डॉ. योगेंद्र यादव, वकील प्रशांत भूषण, प्राध्यापक अतुल सूद आणि बॉलीवूड अभिनेते प्रकाश राज व शबाना आझमी यांच्यासह केलेल्या आवाहनानंतर तिन्ही उपोषणकर्त्यांनी आपले अनिश्चितकालीन उपोषण संपवले आहे.

राज्यसभा खासदार मनोज झा, राजाराम सिंह आणि अमरा राम यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने तिन्ही उपोषणकर्त्यांची भेट घेतली, त्यानंतर त्यांनी आपले आमरण उपोषण मागे घेतले. या शिष्टमंडळात डॉ. योगेंद्र यादव, ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण, प्रा. अतुल सूद तसेच अभिनेते प्रकाश राज आणि शबाना आझमी यांचाही समावेश होता.

यावेळी डॉ. योगेंद्र यादव म्हणाले, ‘ही केवळ उपोषणाची सांगता नाही, तर संघर्षाच्या एका टप्प्याची सांगता आहे.’ तर खासदार मनोज झा यांनी नमूद केले की, ‘तुमच्या आंदोलनामुळे सरकार अनेक मुद्द्यांवर उघडे पडले आहे, तुमचा संघर्ष मोठे यश मिळवून देणारा ठरला.’ अभिनेत्री शबाना आझमी यांनीही विद्यार्थ्यांचे कौतुक केले. ‘आमची पिढी जेन झी पिढीसाठी जे करू शकली नाही, पण ती दिशा तुम्ही आम्हाला दाखवली आहे,’ अशा शब्दांत त्यांनी आंदोलकांना शुभेच्छा दिल्या.

दरम्यान, सोमवारी कॉक्रोच जनता पार्टीच्या (CJP) ‘चलो संसदे’ मोर्चादरम्यान तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली. पोलिसांनी आणि निमलष्करी दलाने जमावाला पांगवण्यासाठी आंदोलकांवर लाठीचार्ज केला, अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या, यामुळे संसद भवन परिसरातील वातावरण तापले होते. याचदरम्यान कॉक्रोच जनता पार्टीच्या प्रवक्त्यांनी भाजपाचे ज्येष्ठ नेते जे. पी. नड्डा यांची भेट घेतली. यादरम्यान त्यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर चर्चा केली जाईल असे आश्वासन दिले, त्यामुळे संस्थापक अभिजीत दिपके यांनीही आपले उपोषण सोडले आहे.

पण, ज्यांनी विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी २३ दिवस उपोषण केले ते कोण आहेत जाणून घेऊयात..

नेहा बोरा

नेहा बोरा या २९ वर्षीय संशोधक असून त्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (JNU) पीएचडी करत आहेत. ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन (AISA)च्या त्या राष्ट्रीय अध्यक्षा आहेत. नेहा या उत्तराखंडमधून येतात, पण त्यांनी पदवीचे शिक्षण दिल्ली विद्यापीठातून, तर पदव्युत्तर शिक्षण आंबेडकर विद्यापीठातून पूर्ण केले आहे.

सध्या त्या स्कूल ऑफ आर्ट्स अँड एस्थेटिक्समध्ये पीएचडी करत आहेत. विद्यार्थी चळवळीतील सक्रिय कार्यकर्त्या म्हणून त्यांची ओळख असून, त्या रंगभूमिशीही सक्रियपणे जोडलेल्या आहेत.

मनीष कुमार

मनीष कुमार हे ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन (AISA)चे उत्तर प्रदेश राज्याध्यक्ष असून सध्या इलाहाबाद विद्यापीठात पीएचडीचे शिक्षण घेत आहेत. ते उत्तर प्रदेशातील आझमगढ येथील रहिवासी असून ते विद्यार्थी चळवळींमध्ये सक्रिय सहभाग घेतात.

कार्यकर्ते म्हणून केलेल्या आंदोलनांमुळे ते यापूर्वीही इलाहाबाह विद्यापीठ प्रशासनाच्या चर्चेत आले होते. विशेषतः इलाहाबाद विद्यापीठातील शुल्कवाढीविरोधात आंदोलन केल्याने त्यांच्याविरोधात काही गुन्हे दाखल झाले आहेत.

आमीन अमितोज

आमीन अमितोज हे दिल्लीतील आंबेडकर विद्यापीठातील ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशनचे उपाध्यक्ष आहेत. पंजाबमधील लुधियाना येथील रहिवासी असलेले आमीन यांनी श्री गुरु तेग बहादूर (SGTB) खालसा कॉलेजमधून पदवीचे शिक्षण घेतले आहे. सध्या ते आंबेडकर विद्यापीठात अर्बन स्टडीज विषयात पीएचडी करत आहेत. ते विद्यार्थी चळवळींमध्ये सक्रिय असून २०२०-२१ मधील शेतकरी आंदोलनातही त्यांनी सहभाग घेतला होता.

आमरण उपोषणाचा प्रकृतीवर परिणाम

२३ दिवसांच्या उपोषणामुळे तिन्ही विद्यार्थ्यांची प्रकृती खालावल्याचा स्टुडंट्स असोसिएशनचा दावा आहे. संघटनेच्या माहितीनुसार, उपोषणादरम्यान तिघांच्याही वजनात १२ टक्क्यांहून अधिक घट झाली. रक्तातील साखरेची पातळीही मोठ्या प्रमाणात घसरल्याने शरीराच्या अवयवांवर परिणाम होऊ लागल्याचे सांगण्यात आले.

नेहा बोरा यांचे उपोषण सुरू होण्यापूर्वीचे वजन ६६ किलो होते. उपोषणादरम्यान त्यांचे सुमारे ७.५ किलो वजन घटल्याचे नमूद करण्यात आले. रक्तातील साखरेची पातळी धोकादायकरित्या कमी झाल्याने डॉक्टरांनी त्यांना उपोषण थांबवून तातडीने उपचार घेण्याचा सल्ला दिला होता.

मनीष कुमार यांचे सुरुवातीचे वजन ८५.७ किलो होते. २३ दिवसांच्या उपोषणात त्यांचे सुमारे १०.४ किलो वजन कमी झाले. दीर्घकाळ अन्नत्याग केल्यामुळे त्यांची प्रकृतीही गंभीर असल्याचे वृत्त आहे; आमीन अमितोज यांचे उपोषण सुरू होण्यापूर्वीचे वजन ६९.३ किलो होते. आंदोलनाच्या आयोजकांच्या माहितीनुसार, उपोषणादरम्यान त्यांचे सुमारे ९.३ किलो वजन घटले आहे. अनेक दिवस अन्नत्याग केल्यामुळे त्यांची प्रकृतीही खालावल्याचा दावा स्टुडंट असोसिएशनने केला आहे.

सीजेपीच्या ‘चलो संसद’ मोर्चादरम्यान सोमवारी आंदोलनकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. मोर्च्याला परवानगी दिली नसल्याचे पोलिसांनी सांगितले, तरीही आंदोलक संसदेवर धडकले. पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. मोर्चा रोखण्यासाठी दिल्ली पोलिसांसह रॅपिड ॲक्शन फोर्स (RAF) तैनात करण्यात आली होती. गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचेही वृत्त आहे, पण सर्व सुरक्षाकवच भेदून तरुणांनी हल्लाबोल केला. शिक्षणतज्ज्ञ आणि पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी केलेल्या आवाहनानंतर ‘चलो संसद’ हा मोर्चा जाहीर करण्यात आला होता.