हवामानात होत असलेल्या बदलामुळे या शतकाच्या अखेरपर्यंत चिकुनगुनियाचा धोका उत्तर अमेरिका, युरोप आणि पूर्व आशियाच्या काही भागांमध्ये वाढू शकतो, असे एका अभ्यासातून उघड झाले आहे. त्या मागील कारण काय, याचा हा आढावा…

हवामानातील बदल डासांसाठी पोषक? 

संशोधकांच्या मते वाढत्या तापमानामुळे रोगवाहक डासांना इतर प्रदेशांमध्ये वास्तव करणे शक्य होत आहे. यामुळे यापूर्वी या डासांचा प्रादुर्भाव जाणवत नव्हता तेथेही या डासांसाठी पोषक वातावरण तयार होत आहे. विशेषत: ‘आशियाई टायगर डास’ (एडीस अल्बोपिक्टस) इतर डासांपेक्षा कमी तापमानात जगू शकतो, त्यामुळे तो पूर्वीच्या थंड प्रदेशांतील उबदार भागांमध्ये पसरत असून चिकुनगुनियाच्या प्रसाराचा धोका वाढवत आहे. हवामानातील बदलांचा अभ्यास केल्यानंतर संशाधेकांनी या शतकाच्या अखेरपर्यंत चिकुनगुनियाचा धोका उत्तर अमेरिका, युरोप आणि पूर्व आशियाच्या काही भागांमध्ये वाढू शकतो, असा अंदाज वर्तवला आहे. डासांमुळे होणारा आजार सध्या प्रामुख्याने उष्णकटिबंधीय आणि उपोष्णकटिबंधीय प्रदेशांमध्ये केंद्रित आहे. संशोधकांच्या मते, वाढत्या तापमानामुळे एडीस डासांना अशा भागांमध्ये टिकून राहणे शक्य होऊ शकते, जे पूर्वी दीर्घकाळ संसर्ग पसरवण्यासाठी शक्य नव्हते. या अभ्यासानुसार, समशीतोष्ण प्रदेशातील देशांनी २०४० पूर्वी या डासांचा प्रतिबंध करण्यासाठी अधिक ठोस पावले उचलण्याची गरज आहे.

चिकुनगुनियाचे सध्याचे उत्पत्तीस्थान कोणते?

चिकुनगुनिया हा आजार सध्या प्रामुख्याने उष्णकटिबंधीय आणि उपोष्णकटिबंधीय प्रदेशांमध्ये केंद्रित आहे. मात्र वाढत्या तापमानामुळे त्याचे वाहक डास उत्तरेकडील प्रदेशांमध्ये पसरण्याची शक्यता वाढली आहे. ‘फ्रंटियर्स इन सेल्युलर अँड इन्फेक्शन मायक्रोबायोलॉजी’ या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या अभ्यासानुसार, हवामान बदलामुळे विषाणूचा प्रसार करणाऱ्या डासांच्या अधिवासात बदल झाल्याने, चिकुनगुनियाचा समशीतोष्ण प्रदेशांमध्ये उत्तरेकडे विस्तार होऊ शकतो. हा रोग एडीस इजिप्टी (Aedes aegypti) आणि एडीस अल्बोपिक्टस (Aedes albopictus) या डासांमुळे पसरतो. चिकुनगुनियामुळे तीव्र ताप, सांधेदुखी, स्नायू आणि पाठदुखी, डोकेदुखी, थकवा, मळमळ आणि त्वचेवर पुरळ येणे यांसारखी लक्षणे दिसू शकतात. जागतिक आरोग्य संघटनेने या रोगाचे वर्गीकरण दुर्लक्षित उष्णकटिबंधीय रोग म्हणून केले आहे. २०२६ मध्ये, जगभरात चिकुनगुनियाची सुमारे ३३ हजार लक्षणे असलेली प्रकरणे आणि नऊ संबंधित मृत्यूंची नोंद झाली आहे, जे प्रामुख्याने दक्षिण अमेरिकेत केंद्रित आहेत, असे युरोपियन सेंटर फॉर डिसीज प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल यांच्या अहवालात म्हटले आहे.

चिकुनगुनियाचा सर्वाधिक धोका कोणत्या प्रदेशात?

संशोधकांच्या मते १३९ देशांमधील २१.२६ टक्के जागतिक भूभाग सध्या चिकुनगुनियाच्या प्रसाराच्या धोक्यात आहे. सध्याचा धोका प्रामुख्याने उष्णकटिबंधीय आणि उपोष्णकटिबंधीय क्षेत्रांमध्ये केंद्रित आहे, ज्यामध्ये उत्तर अमेरिकेचा कॅरिबियन किनारा, पूर्व दक्षिण अमेरिका, आफ्रिकेतील गिनीचे आखात आणि दक्षिण व आग्नेय आशियाचा किनारी भाग यांचा समावेश आहे, असे अभ्यासात म्हटले आहे. यानुसार, खंडीय स्तरावर, दक्षिण अमेरिकेत धोक्यात असलेल्या भूभागाचे प्रमाण सर्वाधिक, म्हणजेच ८३.४१ टक्के होते. त्यानंतर आफ्रिकेत हे प्रमाण ४२.६७ टक्के, तर ओशिनियामध्ये ४१.७७ टक्के होते, असे संशोधकांना आढळले. आशिया, उत्तर अमेरिका आणि युरोपमध्ये सध्याच्या धोक्याचे प्रमाण अनुक्रमे ३०.६९ टक्के, १३.६० टक्के आणि ६.६२ टक्के इतके कमी होते, असे या अभ्यासात म्हटले आहे. 

अभ्यास कसा केला?

संशोधकांनी जगभरातून गोळा केलेल्या ५७ हजारांहून अधिक ठिकाणी डास आढळल्याच्या नोंदी आणि १३ हजार ५०० हून अधिक चिकुनगुनियाच्या नोंदींचे विश्लेषण केले. त्यांना हवामान बदलामुळे डासांच्या राहण्याच्या जागा बदलत असून चिकुनगुनियाचा धोका वाढल्याचे आढळून आले. शोधनिबंधाचे संबंधित लेखक आणि ग्वांगझो कस्टम्स टेक्नॉलॉजी सेंटरचे संशोधक यांग वू यांनी सांगितले की, अभ्यासाच्या निष्कर्षांनुसार, हवामान बदलामुळे चिकुनगुनियावर मुख्यत्वेकरून त्याचे वाहक असलेल्या डासांच्या राहण्याच्या जागा बदलत आहेत. यामध्ये आशियाई टायगर डास विशेष महत्त्वाचा ठरला. या डासाचा विषाणूच्या प्रसारात ७० टक्क्यांहून अधिक सहभाग असल्याचे आढळून आले. आशियाई टायगर डास (एडीस अल्बोपिक्टस) हा एडीस इजिप्टीपेक्षा थंड परिस्थिती अधिक चांगल्या प्रकारे सहन करू शकतो, असे वू म्हणाले. त्यामुळे तापमानवाढीमुळे एडीस अल्बोपिक्टसला पूर्वी खूप थंड असलेल्या ठिकाणी स्थिरावण्याची संधी मिळू शकते, ज्यामुळे स्थानिक पातळीवर चिकुनगुनियाचा प्रसार होण्याची शक्यता वाढेल, असे अभ्यासातून उघड झाले. 

चिकुनगुनियाचा धोका कमी होण्याची शक्यता?

संशोधकांनी केलेल्या अभ्यासात काही उष्णकटिबंधीय प्रदेशांमध्ये धोका कमी होऊ शकतो, असेही आढळून आले. तीव्र तापमानवाढीमुळे काही उष्णकटिबंधीय प्रदेशांमध्ये चिकुनगुनियाच्या प्रसाराचा धोका कमी होऊ शकतो, असे संशोधकांना वाटते. त्यांच्या मते सर्वाधिक तापमान डासांचे शरीर सहन करू शकणार नाही. त्यामुळे आफ्रिका आणि आशियाच्या काही भागांमध्ये या डासांचे प्रमाण कमी होईल. हवामानातील बदल, तापमानातील वाढ यामुळे सुरुवातीला डासांसाठी पोषक वातावरण तयार झाले तरी कालांतराने ते डासांसाठी मारक ठरू शकेल, असे संशोधकांनी शोधनिबंधात म्हटले आहे. संशोधकांच्या मते, युरोप, अमेरिका आणि आशिया या भागात २०४० पूर्वी डासांच्या प्रतिबंधात्मक उपायांना प्राधान्य देणे गरजेचे आहे. तसेच संशोधकांनी युनायटेड किंगडम आणि जर्मनीसह समशीतोष्ण युरोप, ईशान्य अमेरिका आणि चीन व जपानसारख्या पूर्व आशियाई देशांनाही चिकुनगुनिया रोगाच्या प्रादुर्भावाबाबत सतर्क केले आहे.

dharmesh.shinde@expressindia.com