scorecardresearch

विश्लेषण : तापमानवाढ रोखण्याची मुदत संपत चालली! आयपीसीसी अहवालात इशारा!

औद्याेगिक आणि निम औद्योगिक क्षेत्रांमध्ये प्रदूषणकारी उत्सर्जन तात्काळ कमी केल्याशिवाय १.५ अंश सेल्सिअसच्या वर जागतिक तापमानवाढ रोखणे आवाक्याबाहेर

temperature raise
हवामान बदल आंतर-सरकारी तज्ज्ञ समितीच्या सहाव्या मूल्यांकन अहवाल सादर (फाइल फोटो सौजन्य : रॉयटर्स)

– राखी चव्हाण

आयपीसीसी म्हणजेच हवामान बदल आंतर-सरकारी तज्ज्ञ समितीच्या सहाव्या मूल्यांकन अहवालाचा तिसरा भाग चार एप्रिलला जाहीर करण्यात आला. औद्याेगिक आणि निम औद्योगिक क्षेत्रांमध्ये प्रदूषणकारी उत्सर्जन तात्काळ कमी केल्याशिवाय १.५ अंश सेल्सिअसच्या वर जागतिक तापमानवाढ रोखणे आवाक्याबाहेर असल्याचेही या अहवालात म्हटले आहे. या अहवालात जागतिक तापमानवाढ रोखण्याचे आवाहन केले आहे. यासाठी केवळ तीनच वर्षे उरली असून जागतिक तापमानवाढ थांबवण्यासाठी प्रत्येक क्षेत्रासाठी विविध उपाययोजना सुचवल्या आहेत.

जागतिक तापमान स्थिर कसे होईल?

तापमानवाढ १.५ अंश सेल्सिअसपर्यंत मर्यादित ठेवण्याची शक्यता फार कमी आहे, पण ते मर्यादित ठेवण्यासाठी २०२५पूर्वी जागतिक हरितगृह वायू उत्सर्जन कमी करणे आवश्यक आहे. २०३० पर्यंत ते ४३ टक्केपर्यंत कमी करणे आवश्यक आहे. त्याचवेळी मिथेन देखील सुमारे एक तृतीयांश कमी करणे आवश्यक आहे. जेव्हा कार्बन डायऑसाईड उत्सर्जन २०५० पर्यंत निव्वळ शून्यावर पोहोचेल तेव्हा जागतिक तापमान स्थिर होईल. मात्र, जागतिक अर्थव्यवस्था कार्बनचा स्तर कमी करण्यासाठी शक्य ते बदल करण्यात कमी पडत आहे.

हरितगृह वायू उत्सर्जन आणि मानवी जीवनशैली व वर्तनाचा परिणाम?

मानवी जीवनशैली आणि वर्तनात बदल घडवून आणणे आवश्यक आहे. विशेषत: मिथेन कमी करण्यासाठी आहारात बदल आवश्यक आहे. या बदलाकरिता योग्य धोरणे, पायाभूत सुविधा आणि इतर पर्यायांचा अवलंब केल्यास २०५० पर्यंत हरितगृह वायू उत्सर्जनात ४० ते ७० टक्के घट होऊ शकते. शहरे तसेच इतर शहरी भागदेखील उत्सर्जन कमी करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात. कमी ऊर्जेचा वापर, कमी उत्सर्जन-ऊर्जा स्रोतांच्या संयोगाने वाहतुकीचे विद्युतीकरण आणि निसर्गाचा वापर करून कार्बन शोषण आणि संचय वाढवणे साध्य केले जाऊ शकते.

उद्याेगातील उत्सर्जन कसे कमी करता येईल?

जागतिक हरितगृह वायू उत्सर्जनात उद्योगांचा वाटा मोठा आहे. त्यामुळे उद्योगांमुळे होणारे उत्सर्जन आधी कमी करावे लागेल. ते कमी करताना उद्योगासाठी लागणाऱ्या साहित्याचा अधिक कार्यक्षमतेने वापर करावा लागेल. उत्पादनांचा पुनर्वापर आणि कचरा कमी करणे यावर अधिक भर द्यावा लागणार आहे. पोलाद, बांधकाम साहित्य आणि रसायनांसह मूलभूत साहित्यासाठी शून्य हरितगृह वायू उत्पादन प्रक्रिया या उद्योगांना राबवावी लागणार आहे. शून्य उत्सर्जन साध्य करणे आव्हानात्मक आहे.

जीवाश्म इंधनांचे काय?

१.५ अंश सेल्सिअस तापमानाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यसाठी कार्बन उत्सर्जन कमी करणे आवश्यक आहे. त्यासाठी दीर्घकालीन कोळशाचा वापर प्रभावीपणे मर्यादित करावा लागेल. जगभरात सध्या अस्तित्वात असलेली जंगले आणि इतर नैसर्गिक कार्बन साठ्याचे रक्षण करणे याला प्राधान्य असले पाहीजे. नवीन जंगले वाढवणे आणि माती पुनर्संचयित करणे आवश्यक आहे. मात्र, जीवाश्म इंधन उत्सर्जनाचे परिणाम नाहीसे करण्यासाठी नुसती वृक्ष लागवड पुरेशी ठरणार नाही. त्यासाठी इतरही उपाय योजावे लागतील.

आयपीसीसीने कोणत्या उपाययोजना निदर्शनास आणल्या आहेत?

कार्बनडाय ऑक्साईड कमी करण्यासाठी प्रति टन १०० डॉलरपेक्षा कमी किंमत असलेल्या पर्यायांद्वारे कार्बन उत्सर्जनाची पातळी निम्म्यावर आणली जाऊ शकते. याबाबत प्रगती होत असल्याचेही आयपीसीसीने मान्य केले आहे. कार्बन उत्सर्जन कमी करणारी धाेरणे आणि कायद्यांचा सातत्यपूर्ण जागतिक विस्तार झाल्यामुळे कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण कमी झाले असल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Climate change ipcc scientists say it is now or never to limit warming print exp scsg

ताज्या बातम्या