दिवसेंदिवस वाढत असलेल्या तापमानाचा परिणाम प्राण्यांवर देखील होत आहे. यामुळे भविष्यात सापांचा मानवाशी संपर्क वाढून सर्पदंशाचा धोका वाढत जाईल असा निष्कर्ष जागतिक आरोग्य संघटनेच्या संशोधनात व्यक्त करण्यात आला आहे. काय आहे हे संशोधन आणि धोका कसा वाढेल याचा हा आढावा…

संशोधनात काय आढळले?

जागतिक आरोग्य संघटनेच्या नेतृत्वाखालील संशोधनानुसार, तापमानात दिवसेंदिवस होत असलेली वाढ आणि वाढते नागरीकरण या गोष्टीला तोंड देण्यासाठी सर्वच प्राणी त्यांचे अधिवास बदलत असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये सापांचाही समावेश आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या विषारी सापांवरील एका अभ्यासात आढळून आले की हवामान आणि भूपृष्ठावरील बदल यामुळे आफ्रिकेतील कोब्रा, युरोप आणि दक्षिण अमेरिकेतील वायपर, उत्तर अमेरिकेतील कॉटन माऊथ मोकासीन आणि आशियातील क्रेट हे मानवांच्या अधिक संपर्कात येत आहेत. या संशोधनामध्ये पुढील काही वर्षात हा संपर्क अधिक वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच भविष्यात सापांच्या काही प्रजाती नष्ट होतील असेही नमूद करण्यात आले आहे. जागतिक आरोग्य संघटना आणि मेलबर्न विद्यापीठातील शोध निबंधाचे लेखक डेव्हिड विल्यम्स यांनी सर्प आणि मानवांचा वाढत असलेला संपर्क हा भविष्यातील खूप मोठा धोका असल्याचे सांगितले आहे.

संशोधन कसे करण्यात आले?

संशोधकांनी सर्प दंशाच्या घटनांची आणि सर्प असलेल्या ठिकाणांची माहिती गोळा केली. त्याचबरोबर विविध संग्रहालयातील नोंदी, वैज्ञानिक साहित्य आणि तज्ज्ञांच्या निरीक्षणांचा वापर करून, संशोधकांनी पृथ्वीवरील महत्त्वाच्या सर्व ५०८ सापांच्या प्रजातींच्या संचाराचा नकाशा तयार केला. त्यानंतर, वाढत्या तापमानामुळे २०५० आणि २०९० पर्यंत मानवी वस्तीसोबतच्या त्यांच्या सहवासात कसा बदल होईल, याचा अंदाज त्यांनी वर्तवला. हे संशोधन ‘पीएलओएस नेग्लेक्टेड ट्रॉपिकल डिसीजेस’मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. संशोधकांनी सर्पदंशाची आकडेवारी अपूर्ण असल्याचे नमूद केले आहे. यासाठी त्यांनी, अनेक घटना दुर्गम भागात घडतात आणि त्यांची नोंद होत नाही असे कारण दिले आहे. दरम्यान, या शोधनिबंधाच्या लेखकांच्या मते, दरवर्षी सर्पदंशाची सुमारे ४० लाख प्रकरणे घडतात, त्यापैकी बहुसंख्य प्रकरणे उष्णकटिबंधीय प्रदेशातील असतात. संशोधनानुसार यातील बहुतेक प्रकरणे धोकादायक नसली तरी दरवर्षी १,३८,००० जणांचा मृत्यू आणि ४,००,००० जणांना अपंगत्व येत असल्याचे उघड झाले आहे. तसेच यापैकी जवळपास निम्मी प्रकरणे दक्षिण आशियामधील असल्याचे या संशोधनातून समोर आले आहे. संशोधकांच्या मते आतापर्यंत विषारी सापांचा धोका केवळ स्थानिक किंवा राष्ट्रीय स्तरावर आहे असे मानले जात होते. तसेच हवामान आणि जागतिक लोकसंख्या वाढीमुळे भविष्यात यात कसा बदल होऊ शकतो याचे फारसे विश्लेषण झाले नव्हते. ताज्या संशोधनात हा धोका प्रकर्षाने समोर आला आहे.

सापांनाच अधिक धोका?

संशोधकांच्या मते बदलत्या हवामानाचा जसा मानवांना धोका आहे तसाच किंबहुना त्याहून अधिक धोका सापांना आहे. आफ्रिकेतील पफ ॲडर, ॲमेझॉनमधील कोरल स्नेक आणि पापुआ न्यू गिनी व ऑस्ट्रेलियातील कॉपरहेड यांसारख्या बहुतेक प्रजातींना वाढत्या उष्ण हवामानामुळे आणि जंगले, पाणथळ जागा व गवताळ प्रदेशांचे शहरांमध्ये होणाऱ्या रूपांतरणामुळे संघर्ष करावा लागेल. काही प्रजाती तर नामशेष होऊ शकतात, असेही मत संशोधकांनी यात मांडले आहे. त्याचप्रमाणे काही सापांचे अधिवास बदलण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. प्रामुख्याने ब्लॅक मांबा केनियाच्या किनारपट्टीवरून आणि इथिओपिया, एरिट्रिया, काँगो व जिबूतीच्या अनेक भागांतून माघार घेऊन दक्षिण आफ्रिका आणि नायजेरिया व सोमालियाच्या काही भागांमध्ये येण्याची शक्यता आहे. काही प्रकरणांमध्ये विषारी साप अशा ठिकाणी येऊ शकतात जिथे त्यांचे यापूर्वी कधीच वास्तव्य नव्हते किंवा त्यांचा अधिवास नव्हता. संशोधकांनी अमेरिकेतील कॉटनमाउथ मोकासिन साप न्यूयॉर्कपर्यंत उत्तरेकडे जाण्याचा अंदाज वर्तवला आहे आहे. आशियातील क्रेट साप म्यानमार आणि चीनच्या युनान प्रांतातील जंगलांमधून चीनच्या दाट लोकवस्तीच्या मध्य आणि उत्तरेकडील शहरांमध्ये स्थलांतर करू शकतात, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. तर यूकेमध्ये आढळणाऱ्या युरोपियन व्हायपरचा मानवांशी संपर्क वाढण्याची शक्यता आहे, मात्र व्हायपरच्या इतर प्रजातींची संख्या कमी होऊ शकते, असेही संशोधनात मांडले आहे. भारताबाबत बोलायचे झाल्यास येथे दरवर्षी सुमारे ६०,००० मृत्यू सर्पदंशामुळे होतात. अशातच संशोधकांनी नाग, मण्यार आणि घोणस हे साप दक्षिणेकडून उत्तरेकडे अधिक लोकसंख्या असलेल्या ठिकाणी जाण्याचा धोका व्यक्त केला आहे.

आरोग्य यंत्रणेसाठी आव्हान काय ?

शोध निबंधाचे लेखक विल्यम्स यांनी सांगितले की, आगामी ५० वर्षांत अशा ठिकाणी सापांच्या प्रजाती दिसू शकतात ज्या ठिकाणी यापूर्वी सापांचा अधिवास अजिबात नव्हता. त्यामुळे तेथील आरोग्य यंत्रणेला आणि मानवांनाही अधिक सज्ज राहण्याची आवश्यकता असेल. त्यांच्या अंदाजानुसार काही देशांमध्ये शेतांच्या परिसरात किंवा पाण्याच्या स्रोतांजवळ विषारी साप आढळतील. तर काही देशांमध्ये खुल्या मैदानांजवळ साप दिसून येतील. त्यामुळे सर्वच देशांतील आरोग्य यंत्रणेला अधिक सक्षम होण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे. संशोधकांनी यासाठी ऑस्ट्रेलियाचे उदाहरण दिले आहे. ऑस्ट्रेलियामध्ये सापांच्या अनेक विषारी प्रजाती आहेत, परंतु मृत्युदर खूपच कमी आहे, कारण तेथील शेतमजूर बूट, ट्रॅक्टर वापरतात. तसेच सर्पदंशावर उपचार असले असलेले दवाखाने असल्याने मृत्युदर कमी आहे. संशोधकांच्या मते, या नवीन अभ्यासाने आरोग्य अधिकाऱ्यांना उच्च जोखमीच्या क्षेत्रांवर संसाधने केंद्रित करण्यास आणि मानव व साप या दोघांसाठीही भविष्यात येणाऱ्या बदलांची तयारी करण्यास मदत होईल. तसेच या संशोधनातील माहितीमुळे, येथे वर्तवण्यात आलेल्या अंदाजामुळे कोणत्या विषारी सापांचा अधिवास कोठे असेल हे समजून येईल. त्यामुळे तेथे कोणत्या प्रकारची आरोग्य यंत्रणा उभी करायची, प्रत्येक आरोग्य सुविधेची पुरेशी क्षमता कशी सुनिश्चित करायची, दुर्गम आणि धोक्यात असलेल्या समुदायांपर्यंत आरोग्यसेवेची उपलब्धता कशी सुधारायची, आणि धोक्यात असलेल्या सर्प प्रजातींच्या संवर्धनासाठी काय प्रयत्न करावे लागतील हे ठरवता येईल असे संशोधकांनी म्हटले आहे.

dharmesh.shinde@expressindia.com