Cloudburst Science Meaning Nashik : चार दिवसांपासून राज्यातील विविध भागांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू आहे. मुंबईसह पुण्याला तर पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे. नाशिक जिल्ह्यात मंगळवारी ढगफुटीसदृश पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्याने प्रशासकीय यंत्रणांनी सज्ज राहावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. या पार्श्वभूमीवर ढगफुटी म्हणजे काय? ढग खरोखरच फुटतात का? असा प्रश्न सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे, त्याविषयीचा हा सविस्तर आढावा…
मुख्यमंत्र्यांनी काय इशारा दिला?
राज्यातील संभाव्य नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी माध्यमांशी संवाद साधला. आपल्याला ८ जुलैपर्यंतच्या हवामान परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्याची गरज आहे. मंगळवारी नाशिकमधील काही भागांत ढगफुटी होण्याची शक्यता आहे. या भागात जवळपास ३०० मिमी पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. या परिस्थितीवर आमचे बारकाईने लक्ष असून सर्व यंत्रणांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यादरम्यान मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर नाशिकमधील प्रशासन सतर्क झाले असून जिल्ह्यातील शाळांना सुट्टी देण्यात आली. ग्रामीण भागात कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ मदत पोहोचवण्यासाठी अंगणवाडी सेविका आणि आशा सेविकांना २४ तास अलर्ट राहण्याचे आदेश देण्यात आले. नदीकाठच्या गावांमध्ये पूरस्थिती किंवा दरड कोसळण्यासारखी कोणतीही दुर्घटना घडल्यास त्याची माहिती तात्काळ जिल्हा प्रशासनाला देण्याचे आवाहन करण्यात आले.
ढग खरोखरच फुटतात का?
ढगफुटी ही हवामानाशी संबंधित एक अत्यंत तीव्र आणि गंभीर घटना आहे. यामध्ये अतिशय कमी वेळात एका छोट्या परिसरात प्रचंड प्रमाणात पाऊस कोसळतो. भारतीय हवामान विभागाच्या मते, एखाद्या २० ते ३० चौरस किलोमीटर परिसरात एका तासात १०० मिमी किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास त्याला ढगफुटी असे म्हटले जाते. ‘ढगफुटी’ या नावावरून ढग एखाद्या फुग्यासारखे फुटतात, असा अनेकांचा समज असतो; पण प्रत्यक्षात वैज्ञानिकदृष्ट्या तसे घडत नाही. ही घटना वातावरणातील काही विशिष्ट प्रक्रियांमुळे घडते. समुद्रावरून आलेली उबदार आणि भरपूर बाष्प असलेली हवा डोंगराळ भागात पोहोचल्यावर पर्वतांच्या उतारांमुळे वेगाने वरच्या दिशेने ढकलली जाते. या प्रक्रियेला ओरोग्राफिक लिफ्ट असे म्हणतात. ही बाष्पयुक्त हवा वर जाताच तिचे तापमान झपाट्याने कमी होते आणि त्यातून विशाल क्युम्युलोनिंबस (काळेभोर आणि महाकाय) ढग तयार होतात.
ढगफुटी इतकी धोकादायक का असते?
यादरम्यान खालून वर जाणाऱ्या हवेचे तीव्र प्रवाह तयार होणाऱ्या पाण्याच्या थेंबांना खाली पडू न देता पुन्हा वर ढकलतात. त्यामुळे पाण्याचे थेंब ढगामध्येच अडकून राहतात आणि ढग अधिक दाट होत जातात. काळानुसार ढगामध्ये पाण्याचे प्रमाण प्रचंड वाढते. मात्र, एका टप्प्यानंतर उर्ध्वगामी वाऱ्यांचा वेग कमी होतो किंवा साचलेल्या पाण्याचे वजन खूप वाढते. त्यामुळे ढगामधील मोठ्या प्रमाणातील पाणी एकाच वेळी खाली कोसळते आणि अतिशय कमी वेळात मुसळधार पाऊस पडतो. यालाच ढगफुटी असे म्हटले जाते. ढगफुटी ही अत्यंत धोकादायक नैसर्गिक घटना मानली जाते. कारण, अतिशय कमी वेळात प्रचंड प्रमाणात पाऊस पडल्याने स्थानिक परिस्थितीवर त्याचा गंभीर परिणाम होतात. ढगफुटीदरम्यान इतक्या वेगाने पाऊस पडतो की, जमिनीला ते पाणी शोषून घेण्यासाठी वेळ मिळत नाही. परिणामी, काही मिनिटांतच अचानक पूरस्थिती निर्माण होऊ शकते.
ढगफुटीचा अचूक अंदाज बांधणे कठीण
अचानक मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यास डोंगराळ भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात माती आणि दगड वाहून जातात. त्यामुळे चिखलाचे प्रवाह तयार होतात आणि दरडी कोसळण्याच्या घटना घडतात. अशा घटनांमुळे जीवित आणि वित्तहानीचा धोका वाढतो. ढगफुटी अत्यंत मर्यादित परिसरात आणि अल्पावधीत घडत असल्याने तिचा अचूक अंदाज हवामान विभागालाही आधीच बांधणे कठीण जाते. त्यामुळे अशा घटनांबाबत पूर्वसूचना देणे आव्हानात्मक ठरते. नाशिकची भौगोलिक रचना पश्चिम घाटाच्या (सह्याद्रीच्या रांगा) वाऱ्याच्या दिशेकडील उतारावर आहे. त्यामुळे अरबी समुद्रावरून येणारे मान्सूनचे गरम आणि बाष्पयुक्त वारे नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या उभ्या डोंगराळ भागाला धडकतात. त्यामुळे ही हवा वेगाने वर जाते आणि मोठ्या प्रमाणात ढगाची निर्मिती होते. त्यानंतर अचानक मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वाढते.
नाशिकमध्ये ढगफुटीचा धोका जास्त का असतो?
पश्चिम घाटातील उंच पर्वतरांगा अरबी समुद्रातून येणाऱ्या दमट मान्सूनच्या वाऱ्यांना वेगाने वर जाण्यास भाग पाडतात. परिणामी उंचावर गेल्यानंतर दमट हवेचे तापमान वेगाने कमी होते आणि काळेभोर आणि महाकाय ढग तयार होतात. त्यातच खोल दऱ्यांमध्ये आर्द्रता साचते आणि स्थानिक पातळीवर ढग अधिक दाट होतात. जागतिक तापमानवाढीमुळे वातावरणात अधिक आर्द्रता साठत आहे. त्यामुळे अल्पावधीत अतिवृष्टी आणि ढगफुटीसारख्या घटनांची वारंवारता वाढत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. नाशिकमधील त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, नाशिक ग्रामीण या तीन तालुक्यांच्या परिसरात ढगफुटीचा अंदाज आहे. त्याशिवाय सभोवतालचा नाशिक तालुका, पेठ, दिंडोरी आणि संपूर्ण पश्चिम पट्टा म्हणजे कळवण आणि बागलाण तालुक्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. पावसाच्या रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर, वन विभागाने त्र्यंबकेश्वर वन परिक्षेत्रातील दुगारवाडी धबधबा, हरिहर गड, पहीनेसह इतर सर्व पर्यटनस्थळे पुढील आदेशापर्यत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. खोल दरीत कोसळणाऱ्या दुगारवाडी धबधब्याचे पर्यटकांना मोठे आकर्षण असते. धबधबा पाहण्यासाठी खोल दरीत उतरून जावे लागते. त्यातच अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने दुगारवाडी धबधब्यासह अन्य पर्यटनस्थळांवर यापूर्वी दुर्घटना घडलेल्या आहेत. ढगफुटीसारख्या पावसाचा अंदाज वर्तविला गेल्याने वन विभागाने तातडीने सर्व पर्यटन स्थळांवर पर्यटकांना प्रवेश बंद केला आहे.
