हेज फंडचे मुख्य कार्यकारी अधिकारी केन ग्रिफिन यांनी कार्नेगी मेलॉन या खासगी संशोधन विद्यापीठाला ३ अब्ज डॉलरची देणगी जाहीर केली आहे. अमेरिकेतील एखाद्या विद्यापीठाला मिळालेली ही आतापर्यंतची सर्वांत मोठी एकरकमी देणगी असल्याचे विद्यापीठाने म्हटले आहे.

कार्नेगी मेलॉन विद्यापीठाला ३ अब्ज डॉलरची देणगी कशी मिळाली?

हेज फंडचे मुख्य कार्यकारी अधिकारी केन ग्रिफिन यांनी कार्नेगी मेलॉन विद्यापीठाला ३ अब्ज डॉलरची देणगी जाहीर केली आहे. या रकमेतील बहुतांश निधी मियामी येथे समाजासमोरील मोठ्या आव्हानांवर लक्ष केंद्रित करणारे नवे विद्यापीठ कॅम्पस उभारण्यासाठी वापरला जाणार आहे. पिट्सबर्ग येथील या खासगी संशोधन विद्यापीठाने नुकतीच ही घोषणा केली. अमेरिकेतील एखाद्या विद्यापीठाला मिळालेली ही आतापर्यंतची सर्वांत मोठी एकरकमी देणगी असल्याचे विद्यापीठाने म्हटले आहे.

या मोठ्या देणगीचा वापर कसा होणार आहे?

ग्रिफिन यांच्या देणगीतील २ अब्ज डॉलर मियामीतील विनवूड परिसरात ३५ एकरांवर नवा कॅम्पस उभारण्यासाठी वापरले जाणार आहेत. हा परिसर शहराच्या मध्यवर्ती भागाच्या उत्तरेला आहे. या कॅम्पसमध्ये पदवी, पदव्युत्तर आणि डॉक्टरेट अभ्यासक्रमांमध्ये सुमारे ३,५०० विद्यार्थी प्रवेश घेतील. कॅम्पसच्या बांधकामाला पुढील वर्षी सुरुवात होण्याची अपेक्षा आहे.

कॅम्पसचे वैशिष्ट्य काय असेल?

या कॅम्पसमध्ये पारंपरिक पद्धतीने विविध शैक्षणिक शाखांऐवजी सामाजिक आणि वैज्ञानिक आव्हानांवर अभ्यास होणार आहे. याला विद्यापीठ आणि ग्रिफिन यांनी ‘ग्रँड चॅलेंज एरियाज’ असे संबोधले आहे. त्यात मानवी आरोग्य आणि जैविक शोध, राष्ट्रीय सुरक्षा आणि धोरणात्मक क्षमता, ऊर्जा आणि हवामानातील बदलांशी सामना करण्याची क्षमता तसेच प्रगत उत्पादन आणि औद्योगिक परिवर्तन या क्षेत्रांचा समावेश आहे.

उर्वरित निधीचा वापर कसा केला जाईल?

उर्वरित देणगीतील निम्मा निधी पिट्सबर्ग कॅम्पसमधील कॉम्प्युटर सायन्स विभागासाठी दिला जाणार असून, या विभागाला ग्रिफिन यांचे नाव देण्यात येणार आहे. उर्वरित रक्कम मुख्य कॅम्पसमधील इतर प्रकल्पांसाठी वापरली जाणार आहे. कार्नेगी मेलॉनचे अध्यक्ष फर्नाम जहानियन यांनी ग्रिफिन यांच्या देणगीचे कौतुक केले. ते म्हणाले, “आमच्या इतिहासात तंत्रज्ञानातील मोठ्या बदलांची चाहूल कार्नेगी मेलॉनने आधीच घेतली आहे आणि त्यानुसार विचार करण्याच्या व समस्या सोडवण्याच्या नव्या पद्धती विकसित केल्या आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता हा आपल्या काळातील महत्त्वाचा बौद्धिक बदल आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याची पद्धत, संशोधन करण्याची प्रक्रिया आणि इतर संस्थांसोबतची भागीदारी यांचा नव्याने विचार करणे आवश्यक आहे.”

इतकी अवाढव्य देणगी देणारे ग्रिफिन कोण आहेत?

ग्रिफिन हे रिपब्लिकन पक्षाचे मोठे देणगीदार आहेत. ते अमेरिकेतील सर्वात मोठ्या मार्केट मेकर्सपैकी एक असलेल्या सिटाडेल सिक्युरिटीजचे देखील मालक आहेत. जानेवारी २०२६पर्यंत, ग्रिफिन यांची अंदाजित एकूण संपत्ती ५१.२ अब्ज डॉलर्स इतकी होती, ज्यामुळे ते जगातील ३४ वे सर्वात श्रीमंत व्यक्ती झाले. फोर्ब्सच्या २०२३च्या अमेरिकेतील सर्वात उदार देणगीदारांच्या यादीत ग्रिफिन यांचा समावेश होता, त्यानुसार त्यांनी प्रामुख्याने शिक्षण, आर्थिक गतिशीलता आणि वैद्यकीय संशोधन या क्षेत्रांतील विविध धर्मादाय कार्यांसाठी १.५६ अब्ज डॉलर्स दान केले होते. मियामीमध्ये त्यांचे समुद्रकिनारी घर आहे. मियामीचा समावेश असलेल्या या महानगर क्षेत्राची लोकसंख्या ६४ लाखांहून अधिक आहे.

मियामीची शैक्षणिक वैशिष्ट्ये कोणती?

मियामी परिसरात आधीपासूनच युनिव्हर्सिटी ऑफ मियामी, फ्लोरिडा इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी आणि मियामी डेड कॉलेज या प्रमुख शैक्षणिक संस्था आहेत. युनिव्हर्सिटी ऑफ मियामी हे खासगी संशोधन विद्यापीठ, तर फ्लोरिडा इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी हे सार्वजनिक संशोधन विद्यापीठ आहे. मियामी डेड कॉलेजची सुरुवात कम्युनिटी कॉलेज म्हणून झाली; मात्र आता ते चार वर्षांचे काही पदवी अभ्यासक्रमही चालवते. या तीन संस्थांमध्ये मिळून सुमारे १ लाख ३५ हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. याशिवाय या परिसरात काही छोटी खासगी महाविद्यालयेही आहेत.

ग्रिफीन यांचा उद्देश काय?

ग्रिफिन यांना या परिसरात नव्या प्रकारच्या शैक्षणिक संस्थेसाठी संधी असल्याचे वाटले. वैद्यकीय संशोधन, चार्टर स्कूल्स आणि इतर विद्यापीठांसह विविध क्षेत्रांना त्यांनी यापूर्वीही देणग्या दिल्या आहेत. ग्रिफिन यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले की कार्नेगी मेलॉनला मियामीमध्ये आणण्याची संधी मिळाल्याने हे शहर मानवी आणि वैज्ञानिक प्रगतीच्या केंद्रस्थानी येईल. तसेच विद्यापीठाची आंतरराष्ट्रीय पोहोच आणि प्रभावही वाढेल. ग्रिफिन हे आता कार्नेगी मेलॉनच्या विश्वस्त मंडळातही सहभागी होणार आहेत.

यापूर्वी अब्जावधी डॉलरच्या देणग्या कोणाला?

न्यूयॉर्क शहराचे माजी महापौर मायकेल ब्लूमबर्ग यांनी २०१८ मध्ये जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाला दिलेल्या १.८ अब्ज डॉलरची देणगी दिली होती. नायकीचे सहसंस्थापक फिल नाइट आणि त्यांच्या पत्नी पेनी यांनीही शिक्षण आणि आरोग्य क्षेत्राला मोठ्या देणग्या दिल्या आहेत. २०२५ मध्ये ओरेगॉन हेल्थ अँड सायन्स युनिव्हर्सिटीला त्यांनी २ अब्ज डॉलरची मोठी देणगी दिली होती.

अमेरिकेतील विद्यापीठांवर कोणता दबाव आणि का?

‘एआय’मुळे रोजगाराच्या क्षेत्रात वेगाने बदल होत असल्याने विद्यार्थ्यांना त्यासाठी तयार करण्याचा दबाव महाविद्यालये आणि विद्यापीठांवर वाढत आहे. एआय आणि मशीन लर्निंगशी संबंधित कौशल्यांची मागणी असलेल्या किंवा या तंत्रज्ञानाचा उल्लेख असलेल्या नोकऱ्यांच्या जाहिरातींची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्याच वेळी अमेरिकेतील उच्च शिक्षण क्षेत्रावर आर्थिक दबावही वाढत आहे. परदेशी विद्यार्थ्यांची संख्या कमी होत आहे. तसेच अमेरिकेतील लोकसंख्येतील बदलांमुळे अनेक राज्यांमध्ये हायस्कूलमधून पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी होऊ लागली आहे. त्यातच इंधन, आरोग्यसेवा आणि तंत्रज्ञानावरील खर्च वाढत आहेत.

भारतातील खासगी विद्यापीठे आणि निधींची स्थिती काय?

अमेरिका आणि इतर पाश्चात्त्य देशांमध्ये अनेक उद्योजक आणि भांडवलदार विद्यापीठे व शिक्षणसंस्थांना मोठ्या प्रमाणावर देणग्या देतात. त्यामागे केवळ सामाजिक दायित्वाची भावना नसून ज्ञाननिर्मिती ही राष्ट्राच्या प्रगतीसाठीची मूलभूत गुंतवणूक आहे, असा विश्वास असतो. भारतात मात्र अशी संस्कृती विकसित झालेली दिसत नाही. याविषयी करिअर समुपदेशक आशुतोष शिर्के म्हणाले की, ज्ञाननिर्मिती हे राष्ट्रीय कार्य आहे, याची सामाजिक जाणीव आपल्याकडे कमी आहे. त्यातच अनेक खासगी शिक्षणसंस्था आणि विद्यापीठे ही संशोधन व विकासाची केंद्रे होण्याऐवजी शिक्षणाच्या नावाखाली पैसा कमावण्याची केंद्रे बनल्याचे चित्र दिसते. शुल्कवसुली, विस्तार आणि नफा यांना प्राधान्य मिळत असताना संशोधन आणि ज्ञाननिर्मिती दुय्यम ठरते.

भारतीय उद्योगजगत उदासीन?

आपल्या विद्यापीठांमध्ये, सार्वजनिक असोत वा खासगी, तंत्रज्ञान, सामाजिक शास्त्रे किंवा मानवविद्या या क्षेत्रांत जागतिक दर्जाचे ज्ञान निर्माण करण्याची क्षमता आहे, यावर उद्योगजगताचाही अजिबात विश्वास नाही. संस्थांमधील पारदर्शकतेचा अभाव, निधीच्या वापराबाबतचे प्रश्न आणि उद्योग-शैक्षणिक संस्थांमधील सहकार्याची अपुरी व्यवस्था ही त्यामागची काही कारणे आहेत.

परिणामी विद्यापीठांमध्ये होणारी दीर्घकालीन गुंतवणूक आणि ज्ञाननिर्मितीला मिळणारे पाठबळ मर्यादित राहते. आपल्याला केवळ विद्यापीठांची संख्या वाढवायची आहे की संशोधन, विकास आणि ज्ञाननिर्मितीची राष्ट्रीय परिसंस्था उभी करायची आहे, हा प्रश्न आता गांभीर्याने विचारण्याची वेळ आली आहे, असेही आशुतोष शिर्के यांनी सांगितले.

manisha.devne@expressindia.com