Why is Cockroach Farming in China trending: ‘कॉक्रोच जनता पार्टी’ (CJP) सध्या चांगलीच चर्चेत आहे. सुप्रीम कोर्टाच्या एका सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी सरकार किंवा व्यवस्थेविरोधात आवाज उठवणाऱ्या बेरोजगार तरुणांची तुलना ‘झुरळांशी’ (Cockroaches) आणि परजीवींशी केल्याने ३० वर्षीय मराठी तरुणाने १६ मे २०२६ रोजी व्यंगात्मक (Satirical) ‘कॉक्रोच जनता पार्टी’ची सुरुवात केली. अवघ्या काही दिवसात या पक्षाच्या इंस्टाग्रामवर फॉलोअर्सची संख्या १५ ते १८ दशलक्षावर गेली. किंबहुना या आकड्याने भाजप आणि काँग्रेससारख्या देशातील सर्वात मोठ्या राजकीय पक्षांनाही मागे टाकले.

त्यानंतर ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे X (पूर्वीचे ट्विटर) खाते राष्ट्रीय सुरक्षेचे कारण देत प्रतिबंधित (Withheld) करण्यात आले. त्यामुळे उत्क्रांतीच्या स्पर्धेत चिवट ठरलेल्या झुरळाची चर्चा सर्वत्र सुरू आहे. भारतात सध्या हे घडत असलं तरी भारताचा शेजारी देश असलेल्या चीनमध्ये झुरळांच्या जिवावर काही कोटींपेक्षा जास्त नफा मिळवला जातो.

चीनमध्ये ‘झुरळांची शेती’ का केली जाते?

चीनमध्ये होणारी ‘झुरळांची शेती’ (Cockroach (कॉक्रोच) Farming) हा एक अत्यंत फायदेशीर आणि अधिकृत उद्योग आहे. या उद्योगातून दरवर्षी कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. यामागे चार प्रमुख कारणं आहेत. औषध निर्मिती क्षेत्र, सौंदर्यप्रसाधनं निर्मितीत होणारा वापर, कचरा व्यवस्थापन, स्वस्त पशुखाद्य आणि खत निर्मिती या चार क्षेत्रात झुरळांना प्रचंड मागणी आहे.

Cockroach Janata Party
‘कॉक्रोच जनता पार्टी

औषध निर्मिती क्षेत्राकडून होणारी प्रचंड मागणी (Pharmaceutical Industry)

चीनमध्ये होणार्‍या झुरळांच्या शेतीसाठी हे सर्वात मोठे कारण आहे. पारंपरिक चिनी औषधांमध्ये (Traditional Chinese Medicine) झुरळांचा वापर होतो. औषध कंपन्या झुरळांना एका विशिष्ट तापमानावर उकळतात आणि त्यांची पावडर करतात किंवा त्यांचा अर्क काढतात. या अर्काचा वापर पोटाचे विकार (उदा. गॅस्ट्रिक अल्सर), श्वसनाचे आजार, जखमा लवकर भरणे, यकृताचे (Liver) आजार आणि हृदयविकारांवर औषधे तयार करण्यासाठी केला जातो. चीनमधील अनेक रुग्णालयांमध्ये या औषधांचा सर्रास वापर केला जातो.

Cockroach Farming in China
Cockroach Farming in China

पारंपरिक चिनी औषधांत कीटकांचा वापर

पारंपरिक चिनी औषधपद्धतीत काही कीटकांचे अर्क शरीरातील दाह कमी करणे, जखम भरणे, रक्ताभिसरण सुधारणे किंवा ऊतकांचे संरक्षण करणे अशा कारणांसाठी वापरले जाते. ‘पेरिप्लेनेटा अमेरिकाना’ (Periplaneta americana) पासून तयार केलेल्या अर्कात पेप्टाइड्स, अमिनो आम्ले, न्यूक्लिओसाइड्स आणि इतर जैवसक्रिय घटक आढळतात. काही प्रयोगशाळा आणि प्राण्यांवरील संशोधनात या घटकांमुळे हृदयाच्या पेशींवरील oxidative stress, inflammation, platelet activation आणि fibrosis कमी होऊ शकते असे सुचवले आहे.

हार्ट अटॅकवरही उपचार

पेरिप्लेनेटा अमेरिकानाच्या अर्कावर आधारित Xinmailong हे इंजेक्शन चीनमध्ये chronic heart failure सारख्या स्थितींमध्ये पूरक उपचार म्हणून वापरता येईल का यावर संशोधन केले गेले आहे; मात्र ते हार्टअटॅकवरील मुख्य किंवा तातडीचा उपचार नाही.

झुरळांच्या (कॉक्रोच) अर्काचे औषध

चीनमध्ये झुरळांच्या अर्कापासून तयार केलेलं ‘कांगफूक्सिन लिक्विड’ (Kangfuxin Liquid) हे सिरप अत्यंत लोकप्रिय आहे. हे चवीला थोडे गोड आणि चहासारख्या रंगाचे असते. चीनमधील कोट्यवधी रुग्ण हे औषध डॉक्टरांच्या सल्ल्याने घेतात. तसेच जखमांवर लावण्यासाठी याच्या क्रीम्स आणि मलमही उपलब्ध आहेत.

प्रतिकारशक्ती वाढवण्याची क्षमता झुरळांमध्ये

झुरळांमध्ये शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्याची आणि सूज कमी करण्याची क्षमता असते, असे पारंपरिक चिनी औषधोपचारात (TCM) मानले जाते. झुरळे अत्यंत घाणेरड्या जागेतही जिवंत राहतात. शास्त्रज्ञांना असे आढळले आहे की, त्यांच्या मेंदूत आणि शरीरात अशी काही प्रोटीन्स असतात जी मानवी शरीरातील घातक बॅक्टेरियांना (उदा. MRSA) मारू शकतात.

सौंदर्यप्रसाधने (Cosmetics Industry)

चीनमधील काही ब्युटी प्रॉडक्ट्समध्ये झुरळांचा वापर होतो. झुरळांच्या शरीरात प्रथिनांचे (Protein) प्रमाण खूप जास्त असते. त्यांच्या त्वचेमध्ये एक विशिष्ट प्रकारचे ‘सेल्युलर रेझिस्टन्स’ असते. त्यामुळे सौंदर्यप्रसाधनात वापर केला जातो.

कचरा व्यवस्थापन (Waste Management)

चीनमधील वाढत्या लोकसंख्येमुळे रोज हजारो टन अन्न वाया जाते (Food Waste). हे अन्न नष्ट करण्यासाठी चीनने झुरळांचा ‘सफाई कामगार’ म्हणून वापर करण्यास सुरुवात केली आहे. चीनमधील काही मोठ्या कचरा व्यवस्थापन प्रकल्पांमध्ये अब्जोवधी झुरळे पाळली जातात.

जैविक खतांसाठीही वापर

झुरळांमध्ये प्रथिनांचे प्रमाण भरपूर असल्याने त्यांची पावडर करून ती कोंबड्या, बदके आणि माशांचे खाद्य (Poultry and Fish Feed) म्हणून वापरली जाते. झुरळांची विष्ठा आणि त्यांचे अवशेष यांपासून उत्तम दर्जाचे जैविक खत (Organic Fertilizer) तयार होते.

झुरळांची ‘हाय-टेक’ शेती (Smart Farming)

चीनमध्ये झुरळांची (कॉक्रोच) शेती ही साध्या कोंदट खोलीत केली जात नाही, तर यासाठी अब्जोवधी रुपयांचे आधुनिक प्रकल्प उभारले गेले आहेत. उदा. सिचुआन प्रांतातील ‘गुडॉक्टर फार्मास्युटिकल ग्रुप’ (Gooddoctor Pharmaceutical Group) हा जगातील सर्वात मोठा झुरळ पैदास प्रकल्प चालवला जातो. या फार्म्समध्ये तापमान, आर्द्रता आणि अंधार नियंत्रित करण्यासाठी AI आणि अल्गोरिदमचा वापर केला जातो. एकाच छताखाली दरवर्षी साधारण ६ अब्ज (600 Crores) झुरळांची पैदास केली जाते. झुरळांना सुरक्षित आणि स्वच्छ वातावरणात वाढवले जाते आणि त्यांना भाजीपाला तसेच धान्याची पावडर दिली जाते.

चीनमध्ये खरच झुरळ खाल्लं जात का?

युनान सारख्या प्रांतांमध्ये किंवा बीजिंग, शांघायमधील रात्रीच्या बाजारपेठांमध्ये (Night Markets) तळलेली झुरळे (कॉक्रोच) प्रामुख्याने पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी किंवा एक ‘चॅलेंज’ (Adventure) म्हणून विकली जातात. चीनमधील सामान्य नागरिकांचे रोजचे जेवण आपल्यासारखेच सामान्य असते. त्यांच्या आहारात प्रामुख्याने भात, नूडल्स, डुकराचे मांस (Pork), चिकन, मासे आणि भरपूर पालेभाज्यांचा समावेश असतो. कीटक किंवा झुरळे खाण्याची परंपरा चीनमधील काही विशिष्ट दुर्गम आदिवासी जमातींपुरती किंवा विशिष्ट भागांपुरतीच मर्यादित आहे. आधुनिक आणि सुशिक्षित चिनी तरुणांमध्ये या खाद्यपदार्थांबद्दल फारशी आवड नाही.

Reference/संदर्भ

Zeng, C., Liao, Q., Hu, Y., Shen, Y., & Geng, F. (2019). The Role of Periplaneta americana in Modern Versus Traditional Chinese Medicine. Journal of Medical Entomology, 56(6), 1522–1526. https://doi.org/10.1093/jme/tjz081

Zhu, J. J., Yao, S., Guo, X., Yue, B. S., Ma, X. Y., & Li, J. (2018). Bioactivity-Guided Screening of Wound-Healing Active Constituents from American Cockroach (Periplaneta americana). Molecules, 23(1), 101. https://doi.org/10.3390/molecules23010101

Lin, S. S., Liu, C. X., Wang, X. L., & Mao, J. Y. (2019). Intervention Mechanisms of Xinmailong Injection, a Periplaneta Americana Extract, on Cardiovascular Disease: A Systematic Review of Basic Researches. Evidence-Based Complementary and Alternative Medicine, 2019, 8512405. https://doi.org/10.1155/2019/8512405