Coffee Benefits : सकाळी कॉफीचा घोट घेतल्याशिवाय अनेकांचा दिवसच सुरू होत नाही. झोप घालवण्यापासून ते कामाचा ताण कमी करण्यासाठी कॉफी हे आवडते पेय बनले आहे. पण रोज कॉफी पिण्याची ही सवय चांगली की वाईट? असा प्रश्न पडतो. आता याबाबत अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या (AHA) नव्या अहवालातून महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
तज्ज्ञांच्या मते, सर्व प्रकारचे कॅफिन सारखे नसतात. एनर्जी ड्रिंक्स आणि कॅफिन शॉट्समध्ये कमी प्रमाणात कॅफिन असते, पण त्यांचा शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतो.
मॅक्स हेल्थकेअरचे कार्डियाक सायन्सेस विभागाचे अध्यक्ष डॉ. बलबीर सिंग म्हणाले, ‘कॉफी पिल्यामुळे अॅट्रियल फिब्रिलेशन (हृदयाचे ठोके अनियमित होण्याचा सर्वात सामान्य प्रकार) असलेल्या रुग्णांना त्रास होतो, हा गैरसमज या नव्या अभ्यासामुळे दूर झाला आहे. अॅट्रियल फिब्रिलेशन या अवस्थेत हृदयाच्या वरच्या कप्प्यांचे (Atria) ठोके वेगाने आणि अनियमितपणे पडतात, त्यामुळे स्ट्रोक, हृदयविकार आणि इतर हृदयाशी संबंधित आजार होण्याचा धोका वाढतो. मात्र, मर्यादित प्रमाणात कॉफी घेतल्यास त्यातील उपयुक्त घटक अधिक फायदेशीर ठरतात. हे घटक शरीरातील दाह कमी करण्यास मदत करतात आणि रक्तवाहिन्यांचे कार्यही सुधारतात.’
ब्लॅक कॉफीने रक्तदाब वाढतो?
‘ब्लॅक कॉफी पिल्याने रक्तदाब (BP) वाढतो, हा देखील एक गैरसमज आहे. कॉफी घेतल्यानंतर रक्तदाबात थोड्या वेळासाठी वाढ होऊ शकते, पण ती तात्पुरती असते आणि काही वेळाने रक्तदाब पुन्हा पूर्ववत होतो. त्यामुळे कॉफी पिण्याचा रक्तदाबावर दीर्घकालीन परिणाम होतो, असे म्हणता येणार नाही. म्हणूनच आम्ही कॉफी घेतल्यानंतर किमान ३० ते ४५ मिनिटांनंतरच रक्तदाब मोजण्याचा सल्ला देतो, जेणेकरून अचूक मोजमाप मिळेल, असेही बलबीर सिंग म्हणाले.
डॉ. बलबीर सिंग यांनी पुढे नमूद केले की, व्यायाम किंवा जास्त शारीरिक मेहनत करण्यापूर्वी कॉफी पिणे टाळावे, कारण त्यामुळेही रक्तदाब वाढू शकतो. मात्र, प्रत्येक व्यक्तीमध्ये कॉफीचा परिणाम वेगवेगळा असू शकतो. नियमित कॉफी पिणाऱ्यांच्या शरीराला कालांतराने कॉफीची सवय होते आणि रक्तदाबावर होणारा तात्पुरता परिणाम कमी होतो, असे काही अभ्यासात नमूद आहे. तर काही संशोधकांच्या मते, कॉफीमुळे अॅड्रेनालिन हार्मोनचे स्रवण वाढल्याने रक्तदाबात तात्पुरती वाढ होते, असेही सिंग यांनी सांगितले.
डॉ. बलबीर सिंग यांनी स्पष्ट केले की, साखर आणि दूध न घातलेली ब्लॅक कॉफी जे घेतात त्यांनाच हे फायदे होतात. जास्त साखर किंवा दूध घातलेली कॉफी शरीरासाठी फायदेशीर नाही. त्यामुळे कॅलरीज वाढतात आणि काही संशोधनांनुसार कृत्रिम गोड पदार्थांमुळे रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोकाही वाढू शकतो.
हृदयासाठी ब्लॅक कॉफी सुरक्षित?
अमेरिकन हार्ट असोसिएशनने (AHA) Circulation या जर्नलमध्ये प्रसिद्ध केलेल्या वैज्ञानिक अहवालानुसार, बहुतेक निरोगी प्रौढांसाठी मर्यादित प्रमाणात ब्लॅक कॉफी पिणे हृदयासाठी सुरक्षित आहे. साखर, सिरप किंवा क्रीम न घातलेली ब्लॅक कॉफी हृदयविकार, स्ट्रोक, हार्ट फेल्युअर आणि टाइप-२ मधुमेहाचा धोका कमी करण्यास मदत करू शकते.
तज्ज्ञांच्या मते, दिवसभरात ४०० मिलीग्रॅमपर्यंत कॅफिन म्हणजे साधारण ३ ते ५ कप ब्लॅक कॉफी पिणे सुरक्षित मानले जाते.
एनर्जी ड्रिंक्स ठरू शकतात धोकादायक
मर्यादित प्रमाणातील ब्लॅक कॉफी सुरक्षित मानली जात असली, तरी एनर्जी ड्रिंक्सबाबत असे म्हणता येत नाही. अनेक एनर्जी ड्रिंक्स आणि कॅफिन शॉट्समध्ये साध्या कॉफीपेक्षा खूप जास्त प्रमाणात कॅफिन असते. याशिवाय त्यामध्ये इतर उत्तेजक घटकही मिसळलेले असतात, ज्यामुळे शरीरात कॅफिनचा परिणाम अधिक वेगाने होऊ शकतो.
अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या अहवालानुसार, एनर्जी ड्रिंक्समधून जास्त प्रमाणात कॅफिन घेतल्यास रक्तदाब वाढू शकतो आणि हृदयाचे ठोके अनियमित होण्याचा धोका वाढू शकतो. एवढेच नाही तर, एनर्जी ड्रिंक्सचे सेवन केल्यामुळे निरोगी तरुणांच्याही हृदयाच्या ठोक्यांमध्ये बिघाड झाल्याची उदाहरणे समोर आली आहेत.
प्रत्येकाच्या शरीरावर कॅफिनचा परिणाम वेगळा
कॅफिनचा परिणाम प्रत्येक व्यक्तीवर सारखाच होत नाही. वय, अनुवंशिकता (Genetics), यकृताची कार्यक्षमता वाढवण्यासाठी घेतली जाणारी औषधे आणि कॉफी पिण्याची सवय यावर शरीर कॅफिन किती वेगाने पचवते हे अवलंबून असतं.
काही जण दिवसभरात अनेक कप कॉफी पिऊनही त्यांना त्रास जाणवत नाही. तर काहींना एक कप कॉफी घेताच हृदयाचे ठोके वाढणे, अस्वस्थ वाटणे किंवा झोप न लागणे अशा समस्या जाणवू शकतात. अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या आढाव्यानुसार, कॉफी प्यायल्यानंतर साधारण एका तासात कॅफिन रक्तात सर्वाधिक प्रमाणात पोहोचते. मात्र, संवेदनशील व्यक्तींमध्ये त्याचा परिणाम अधिक काळ टिकू शकतो.
मात्र, याचा अर्थ अमर्यादित प्रमाणात कॉफी पिणे सुरक्षित आहे, असा नाही. तज्ज्ञांच्या मते, मर्यादित प्रमाणात ब्लॅक कॉफीचे सेवन केल्यास ती हृदयासाठी पोषक ठरू शकते. त्यामुळे कॉफीचे प्रमाण नियंत्रणात ठेवणे, संतुलित आहारासोबत कॉफी घेणे आणि नियमित व्यायाम करणे अधिक फायदेशीर ठरते.
