How to Get Good Sleep at Night Naturally : दिवसभराचा थकवा असूनही रात्री अंथरुणावर पडल्यावर अनेकांना बऱ्याचदा झोप लागत नाही; तर मध्यरात्री गाढ झोपेत असताना काहीजण अचानक खडबडून जागे होतात. परिणामी अपुरी झोप होणे ही आता एक सामान्य समस्या झाली आहे. जगभरातील लोकांना ही समस्या असल्याने त्यावर विविध ठिकाणी संशोधन सुरू आहे. यादरम्यान नुकत्याच केलेल्या एका संशोधनातून शांत झोप लागण्यासाठी अतिशय सोपा आणि सरळ उपाय सांगण्यात आला आहे, त्याविषयीचा हा आढावा…

झोप का महत्त्वाची आहे?

झोप ही केवळ विश्रांतीसाठीच नव्हे तर शरीरातील अनेक प्रक्रियांसाठी महत्त्वाची असते. दिवसभराच्या थकव्यानंतर मेंदूला पुन्हा ताजेतवाने करण्यासाठी शरीराला झोपेची अत्यंत आवश्यकता असते. शरीरातील रोगप्रतिकारशक्ती मजबूत ठेवण्याचे काम झोपेद्वारे होते. त्याशिवाय स्मरणशक्ती सुधारण्याची प्रक्रियाही झोपेदरम्यानच घडते. पुरेशी झोप घेतल्यास मधुमेहासह हृदयविकार आणि लठ्ठपणा यांसारख्या गंभीर आजारांचा धोका कमी होतो, त्यामुळेच झोपेची वेळ आणि कालावधी याकडे गांभीर्याने लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. तज्ज्ञांच्या मते, ‘कॉग्निटिव्ह शफलिंग’ म्हणजेच विचारांमधील फेरबदल ही पद्धत झोपेच्या समस्यांवर नैसर्गिक उपाय म्हणून काम करू शकते. या पद्धतीचा रात्री नियमित वापर केल्यास मेंदू शांत होऊन लवकर झोप येण्यास मदत होते.

‘कॉग्निटिव्ह शफलिंग’ म्हणजे काय?

‘कॉग्निटिव्ह शफलिंग’ ही झोप येण्यास मदत करणारी एक मानसिक पद्धत आहे. ही संकल्पना प्रसिद्ध शास्त्रज्ञ ल्युक बोडॉइन यांनी एका संशोधनाद्वारे मांडली आहे. या तंत्राचा उद्देश मेंदूला झोपेच्या अवस्थेकडे सहजपणे नेणे हा आहे. सामान्यतः झोप येण्यासाठी लोक नकारात्मक विचार थांबवण्याचा प्रयत्न करतात; परंतु ‘कॉग्निटिव्ह शफलिंग’मध्ये मेंदूला वेगळ्या विचारांकडे वळवले जाते, त्यामुळे तणाव आणि चिंता कमी होऊन झोप लागण्यास मदत होते असा दावा ल्युक बोडॉइन यांनी केला आहे. झोपेचे हे तंत्र वापरण्यासाठी तज्ज्ञांनी काही उदाहरणेही दिली आहेत.

आणखी वाचा : सोन्याचे दागिने आणि गाड्या विकून इराणला मदत; जम्मू-काश्मीरमध्ये नेमकं चाललंय तरी काय?

नेमके काय आहे झोपेचे तंत्र?

प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ डॉ. लेआ कायलर यांच्या मते, कॉग्निटिव्ह शफलिंग ही अशी मानसिक पद्धत आहे, जी विचारांची गोंधळलेली मालिका कमी करून मेंदूला तणाव आणि चिंतेपासून दूर नेते आणि झोप लागण्यास मदत करते. ही पद्धत मेंदूमध्ये झोप येण्याच्या आधी नैसर्गिकरित्या निर्माण होणाऱ्या विस्कळीत विचारांच्या प्रवाहासारखीच असते, त्यामुळे जागेपणातून झोपेच्या अवस्थेत जाणे अधिक सोपे होते. या पद्धतीचा वापर करण्यासाठी एखादा शब्द निवडून त्या शब्दातील प्रत्येक अक्षरासाठी वेगवेगळी प्रतिमा मनात निर्माण करावी लागते. CAT हा शब्द घेतल्यास C साठी कार, A साठी अंतराळवीर आणि T साठी चहा अशी कल्पना करावी. अशा प्रकारे मेंदू गुंतून राहतो आणि झोप येण्यास मदत होते.

झोपेबाबत केलेले संशोधन काय सांगते?

रात्रीची शांत झोप येण्यासाठी धडपडणाऱ्या लोकांसाठी ‘कॉग्निटिव्ह शफलिंग’ हे तंत्र एक आशेचा किरण ठरत आहे. शास्त्रज्ञ ल्युक बोडॉइन यांच्या ‘सोम्नोलेंट इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग’ या सिद्धांतावर आधारित असलेले हे तंत्र केवळ कल्पनाविलास नसून त्यावर संशोधनदेखील करण्यात आले आहे. २०१६ मध्ये बोडॉइन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शांत झोप लागत नसलेल्या तब्बल १५४ विद्यार्थ्यांवर या तंत्राचा प्रयोग केला. त्यातील एका गटाला बोडॉइन यांनी विकसित केलेले अ‍ॅप वापरून ‘रँडम’ शब्द ऐकण्यास आणि त्यांची चित्रे मनात उभी करण्यास सांगण्यात आले; तर दुसऱ्या गटाला त्यांच्या चिंता आणि त्यावरील उपाय एका डायरीत लिहिण्यास सांगितले गेले. संशोधनात असे दिसून आले की, चित्रांची सरमिसळ करण्याची पद्धत सर्वात प्रभावी ठरली. त्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे या तंत्राचा वापर तुम्ही अंथरुणावर पडल्यानंतरही करू शकता.

झोपेच्या नवीन तंत्राबाबत तज्ज्ञांचे मत काय?

लंडनमधील रॉयल ब्रॉम्प्टन रुग्णालयातील तज्ज्ञ एलाना हेअर यांनी सांगितले की, कॉग्निटिव्ह शफलिंग मेंदूवर ‘पूश-अँड-पूल’ म्हणजेच ओढा आणि ढकला असे यंत्राप्रमाणे काम करते. हे तंत्र तुम्हाला एका बाजूने झोपेकडे खेचते, तर दुसऱ्या बाजूने तुमच्या झोपेत अडथळा आणणाऱ्या चिंतांना शांत करते. ऑस्ट्रेलियातील मोनॅश विद्यापीठातील मानसशास्त्रज्ञ एलेनी कवलियोटिस यांच्या मते, ही पद्धत मेंदूचे लक्ष विचलित करून झोपेत अडथळा आणणाऱ्या विचारांना दूर करते. १५-२० मिनिटे अंथरुणावर पडूनही झोप येत नसेल किंवा रात्री मध्येच जाग येत असेल, तेव्हा ही पद्धत वापरणे सर्वात योग्य ठरते. यादरम्यान अनेकांनी झोपेच्या समस्यांवर ‘कॉग्निटिव्ह शफलिंग’ ही एक प्रभावी आणि ‘गेम-चेंजर’ पद्धत मानली आहे.

हेही वाचा : होर्मुझच्या सामुद्रधुनीत भारतीय कॅप्टनचा मृत्यू; मदतीअभावी गेला जीव? कोण होते राकेश सिंह?

शांत झोप येण्यासाठी काय करावे?

झोपेची वेळ ठरवणे सोपे असले तरीही आजच्या धावपळीच्या जीवनात तिचे पालन करण्यात अनेकदा दुर्लक्ष होते. मात्र, काही सोप्या सवयी अंगीकारल्यास निरोगी आणि दर्जेदार झोपेची सवय सहज लावता येऊ शकते. तज्ज्ञांच्या मते, चांगल्या आरोग्यासाठी प्रत्येकाने दररोज झोपण्याची आणि सकाळी उठण्याची एकच वेळ निश्चित करायला हवी. अगदी सुट्टीच्या दिवशीही याच वेळापत्रकाचे पालन करायला हवे. रात्री झोपण्याआधी बेडरूममधील लाईट्स बंद केल्यास अंधारात लवकर झोप येते. झोपण्यापूर्वी किमान एक तास मोबाईल, लॅपटॉप किंवा टीव्ही पाहणे बंद करायला हवे; त्याऐवजी एखादे पुस्तक वाचण्याची सवय लावल्यास लवकर झोप येते. रात्री जड जेवण किंवा मद्यपान केल्यास झोपेच्या चक्रात अडथळा येतो. त्याऐवजी सुका मेवा किंवा फळांसारखे हलक्या पदार्थांचे सेवन करायला हवे, जेणेकरून रक्तातील साखर संतुलित ठेवण्यास मदत होते. सकाळी उठल्यानंतर नियमित योगा किंवा व्यायाम केल्यास रात्री अधिकच शांत झोप लागते, असा सल्लाही तज्ज्ञांनी दिला आहे.