Colonel Hunny Bakshi Neem Karoli Baba: लष्करात ‘कर्नल हनी बक्षी’ या नावाने ओळखले जाणारे निवृत्त लष्करी अधिकारी कर्नल मुनीश्वर नाथ बक्षी यांची कहाणी विलक्षण आहे. एकेकाळी अत्यंत गोपनीय समजल्या जाणाऱ्या टेक्निकल सपोर्ट डिव्हिजन (टीएसडी) या गुप्तचर युनिटचं नेतृत्व करणारे बक्षी निवृत्तीनंतर थेट रुपेरी पडद्यावर पोहोचले आणि त्यांनी २०२६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हनुमान अंश’ या चित्रपटात नीम करोली बाबा ऊर्फ महाराज यांची भूमिका साकारली. लष्करी गुप्तहेरगिरीपासून आध्यात्मिक व्यक्तिरेखेपर्यंतचा हा प्रवास खरोखरच थक्क करणारा आहे.
लष्करी कारकिर्दीची सुरुवात
कर्नल बक्षी यांची लष्करी कारकीर्द डिसेंबर १९८८ मध्ये सुरू झाली. डेहराडूनच्या इंडियन मिलिटरी अकादमीमध्ये प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर ते मिलिटरी इंटेलिजन्स कोरमध्ये अधिकारी म्हणून रुजू झाले. यानंतर त्यांची कारकीर्द जम्मू-काश्मीर, ईशान्य भारत आणि विविध गुप्तचर मोहिमांशी जोडली गेली. आपल्या सेवाकाळात त्यांनी आयईडी (IED) निकामी करण्याच्या मोहिमांमध्ये सहभाग घेतला आणि ईशान्येकडील शस्त्रसंधीशी संबंधित जबाबदाऱ्याही सांभाळल्या. एवढंच नाही, तर सेवेदरम्यान त्यांच्यावर तीनदा आयईडी हल्ले झाले, यातून ते सुखरूप वाचले, असं त्यांनी स्वतः अनेक मुलाखतींमध्ये सांगितले आहे. त्यांच्या या शौर्यपूर्ण सेवेसाठी त्यांना विशिष्ट सेवा पदक (VSM) देऊन गौरवण्यात आले.
२००७ ते २०१० या काळात त्यांनी कोलकात्यातील एका मिलिटरी इंटेलिजन्स युनिटचे नेतृत्व केले. याच अनुभवाच्या जोरावर पुढे त्यांना एका अतिशय संवेदनशील आणि गोपनीय जबाबदारीसाठी निवडण्यात आलं.
टेक्निकल सपोर्ट डिव्हिजन (टीएसडी) आणि वादाचं वादळ
कर्नल बक्षी यांची खरी ओळख निर्माण झाली ती म्हणजे टेक्निकल सपोर्ट डिव्हिजन अर्थात टीएसडी या युनिटमुळे. तत्कालीन लष्करप्रमुख जनरल व्ही. के. सिंह यांच्या कार्यकाळात २०१० साली हे तात्पुरतं गुप्तचर युनिट स्थापन करण्यात आले होते. हे युनिट उभारण्याची आणि त्याचं नेतृत्व करण्याची जबाबदारी कर्नल बक्षी यांच्यावर सोपवण्यात आली. दिल्ली कँटोन्मेंटमधून कार्यरत असलेलं हे युनिट अत्यंत संवेदनशील गुप्तचर कारवायांसाठी ओळखलं जातं आणि त्याचं बहुतांश काम कायमच सार्वजनिक नजरेपासून दूर राहिलं.
पुढील काळात या युनिटच्या कार्यपद्धतीबद्दल अनेक दावे प्रसारमाध्यमांतून आणि मुलाखतींमधून समोर आले. कर्नल बक्षी यांनीही स्वतः वेळोवेळी टीएसडीबद्दल आणि आपल्या गुप्तचर कारकिर्दीबद्दल जाहीरपणे भाष्य केलं. मात्र, यातील अनेक मोहिमा आजही अतिगोपनीय असून युनिटशी संबंधित अनेक दावे अद्याप अधिकृत सरकारी नोंदींद्वारे सिद्ध झालेले नाहीत. जनरल व्ही. के. सिंह निवृत्त झाल्यानंतर २०१२ साली टीएसडी हे युनिट बरखास्त करण्यात आले.
चौकशी आणि कायदेशीर लढाईचा काळ
टीएसडी बंद झाल्यानंतरचा काळ कर्नल बक्षी यांच्यासाठी अत्यंत खडतर ठरला. या युनिटच्या कामकाजाबाबत, विशेषतः पाळत ठेवण्याची उपकरणे, गोपनीय साहित्य आणि गुप्त निधीतून झालेला खर्च यासंदर्भात अनेक आरोप आणि चौकशा सुरू झाल्या . या प्रकरणी त्यांच्यावर जनरल कोर्ट मार्शलची कारवाई सुरू करण्यात आली.
मात्र, मार्च २०१८ मध्ये कोर्टाने कायदेशीर आणि नियमांच्या आधारावर मांडलेला त्यांचा युक्तिवाद मान्य केला. यात चौकशी समितीसंबंधीचे प्रश्न आणि बचावासाठी मागितलेल्या कागदपत्रांचाही समावेश होता. यामुळे ही कारवाई रद्द करण्यात आली आणि त्यांना निर्दोष मुक्त केले. या प्रकरणानंतरही कर्नल बक्षी यांनी लष्करी सेवा सुरूच ठेवली आणि अखेर ५ नोव्हेंबर २०१९ रोजी त्यांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली.
निवृत्तीनंतर संरक्षणविषयक भाष्यकार म्हणून नवी ओळख
निवृत्तीनंतर कर्नल बक्षी यांनी संरक्षण आणि राष्ट्रीय राष्ट्रीय सुरक्षेच्या विविध विषयांवर भाष्यकार म्हणून नवी ओळख निर्माण केली. मिलिटरी इंटेलिजन्स, काश्मीर प्रश्न, अंतर्गत सुरक्षा, अग्निपथ भरती योजना, खलिस्तानशी संबंधित सुरक्षाविषयक चिंता आणि मणिपूरमधील परिस्थिती अशा विविध विषयांवर त्यांनी मुलाखती आणि सार्वजनिक चर्चांमध्ये सहभाग घेतला. टीएसडीबद्दलच्या त्यांच्या तपशीलवार मुलाखतींमुळे त्यांच्याबद्दलची उत्सुकता आणखी वाढली.
नीम करोली बाबांच्या भूमिकेत अनपेक्षित प्रवेश
लष्करी गुप्तहेरगिरीपासून थेट चित्रपटसृष्टीपर्यंतचा हा प्रवास खरोखरच अनपेक्षित होता. कर्नल बक्षी स्वतः लिहिलेली एक पटकथा घेऊन दिग्दर्शक विशाल चतुर्वेदी यांच्याकडे गेले होते आणि याच भेटीतून पुढे त्यांना एक वेगळीच संधी मिळाली. नीम करोली बाबांशी असलेलं त्यांचं शारीरिक साम्य पाहून त्यांना या आध्यात्मिक व्यक्तिमत्त्वाची भूमिका देण्यात आली.
कर्नल बक्षी यांनी महाराजांची भूमिका साकारण्यासाठी आहाराचे विशिष्ट नियम पाळले चित्रपटाच्या व्यावसायिक यशाबद्दल बोलताना त्यांनी याला ‘चमत्कार’ असं संबोधलं. ज्यांचे संपूर्ण आयुष्य गुप्तहेरगिरी आणि राष्ट्रीय सुरक्षेशी निगडित राहिले, अशा अधिकाऱ्यासाठी रुपेरी पडद्यावरील हा अनुभव पूर्णपणे वेगळा आणि अनपेक्षित ठरला.
पुढे आणखी मोठी भूमिका?
निवृत्तीनंतरही कर्नल बक्षी यांनी सर्जनशील कामात रस दाखवला असून, वेब सीरिज आणि इतर प्रकल्पांसाठी पटकथा लिहीत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. नीम करोली बाबांच्या भूमिकेतील त्यांच्या या छोट्याशा सहभागानंतर, नियोजित सिक्वलमध्ये प्रेक्षकांना त्यांची आणखी मोठी भूमिका पाहायला मिळू शकते, असे संकेतही त्यांनी दिले आहेत.
एक विलक्षण जीवनप्रवास
डेहराडूनच्या इंडियन मिलिटरी अकादमीतून पदवी घेणे, इंटेलिजन्स कोरमध्ये सेवा बजावणे, भारतीय लष्करातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या गुप्तचर युनिटचं नेतृत्व करणे आणि शेवटी पडद्यावर नीम करोली बाबांची भूमिका साकारणं – कर्नल हनी बक्षी यांचा हा प्रवास अनेक टप्प्यांतून गेला आहे. ‘हनुमान अंश’मधील त्यांची भूमिका ही त्यांच्या आयुष्यातील आणखी एक नवा अध्याय ठरली आहे. अशा या निवृत्त अधिकाऱ्याची लष्करी कारकीर्द आणि विशेषतः टीएसडीमधील त्यांचा कार्यकाळ आजही लोकांच्या कुतूहलाचा विषय ठरला आहे
