-मंगल हनवते

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३ प्रकल्प अनेक कारणांनी चर्चेत असताना आता खर्चात झालेली भरमसाट वाढ पुन्हा एकदा चर्चेचे निमित्त ठरली आहे. मेट्रो ३ मार्गिकेच्या खर्चात तब्बल रु. १० हजार २७० कोटींनी वाढ झाली आहे. त्यानुसार आता या प्रकल्पाचा खर्च रु. २३ हजार १३६ कोटींवरून रु. ३३ हजार ४०५ कोटी असा झाला आहे. या सुधारित प्रकल्प खर्चाला नुकतीच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या प्रकल्पाचा खर्च इतका कसा वाढला? कारशेडचे काम रखडल्याने इतका खर्च वाढू शकतो का? आणखी खर्च वाढणार का? या प्रश्नांच्या अनुषंगाने घेतलेला हा आढावा.

मुंबईतील पहिली भुयारी मार्गिका?

मुंबई महानगरात आंतरराष्ट्रीय दर्जाची वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून ३३७ किमीचा मेट्रो प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पातील कुलाबा-वांद्रे-सीप्झ अशी मेट्रो ३ या मार्गिकेची लांबी ३३.५ किमी आहे. मुंबईतील पहिल्या आणि सध्या तरी एकमेव अशा या भुयारी मेट्रो मार्गावर आठ डब्यांची गाडी धावणार आहे.

कामास सुरुवात कधीपासून?

वांद्रे ते कुलाबा मेट्रोची संकल्पना २००४मध्ये मांडण्यात आली. त्यानंतर एमएमआरडीएच्या प्रकल्पात कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३ अशी मार्गिका करण्यात आली. प्रकल्पाचे नियोजन आणि आराखडा २०११मध्ये करण्यात आला. मात्र या प्रकल्पाला सरकारची मान्यता २०१४मध्ये मिळाली. त्यानंतर आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून कार्यादेश काढल्यानंतर  प्रत्यक्ष काम सुरू करण्यास २०१६ उजाडले. मुंबईसारख्या दाट लोकसंख्येच्या ठिकाणी भूगर्भात खोदकाम करण्याचे मोठे आव्हान एमएमआरसीसमोर होते. हे आव्हान पेलण्यासाठी आणि अंदाजे ५२ किमीचे (येण्यासाठी-जाण्यासाठी) भुयारीकरण करण्यासाठी एमएमआरसीने अत्याधुनिक अशा टनेल बोअरिंग मशीन अर्थात टीबीएम तंत्रज्ञान वापरले. या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात झाल्यापासून पाच वर्षात प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यात येणार होते. मात्र तांत्रिक अडचणी, आव्हानात्मक काम तसेच प्रकल्प अनेक कारणांनी वादात अडकल्याने त्याचा कामावर परिणाम झाला आणि प्रकल्पाचा कालावधी वाढला

खर्चवाढीचा मुद्दा काय?

आरे कारशेडचा वाद पुन्हा पेटला असताना दुसरीकडे एमएमआरसीकडून मेट्रो ३ मार्गिकेसह आरे कारशेडचे काम वेगाने सुरू आहे. मात्र आता या प्रकल्पाच्या खर्चाचा नवा मुद्दा समोर आला आहे. या प्रकल्पाच्या खर्चात अंदाजे ४४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. प्रकल्पाचा प्रस्तावित खर्च २३ हजार १३६ कोटी रुपये असून हा प्रकल्प २०२१ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र अनेक कारणांनी प्रकल्प लांबला असून परिणामी प्रकल्पाचा खर्च १० हजार २७० कोटी  रुपयांनी वाढला आहे. त्यामुळे आता प्रकल्पाचा खर्च ३३ हजार ४०५ कोटी रुपयांवर गेला आहे. या खर्च वाढीवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कारशेडचे काम रखडल्याने हा खर्च वाढल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. मात्र कारशेडच्या कामाचा आणि प्रकल्पाचा खर्च वाढण्याचा काही संबंध नसल्याचा दावा पर्यावरणप्रेमींनी केला आहे.

खर्च वाढीची अनेक कारणे?

उपमुख्यमंत्र्यांनी अडीच वर्ष प्रकल्प रखडल्याने, कारशेड़चे काम रखडल्याने खर्चात वाढ झाल्याचे सांगितले आहे. मात्र कारशेड हेच एकमेव कारण खर्चवाढीस नसून या मागे अनेक कारणे असल्याचे एमएमआरसीने स्पष्ट केले आहे.  एमएमआरसीच्या  म्हणण्यानुसार, मेट्रो ३ मार्गिकेचे नियोजन (आराखडा) २०११ मध्ये करण्यात आले. दिल्ली मेट्रो रेलच्या मेट्रो कामाच्या धर्तीवर १० टक्क्यांची वाढ करत मेट्रो ३ चा अंदाजित खर्च निश्चित करण्यात आला. त्यानुसार २३ हजार १३६ कोटी असा हा खर्च होता. या प्रकल्पाचे काम प्रत्यक्षात सुरुवात झाल्यापासून पाच वर्षांत, २०२१ पर्यंत ते पूर्ण होणे गरजेचे होते. मात्र मुंबईसारख्या शहरात भुयारी मार्गाचे काम करणे अत्यंत कठीण, आव्हानात्मक होते. दिल्ली आणि मुंबईच्या भौगोलिक परिस्थितीत, दिल्लीतील मातीत आणि मुंबईतील मातीत मोठा फरक आहे. मुंबईत भूगर्भात टणक दगड असल्याने तसेच रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू असताना खाली भुयारीकरणाचे काम करावे लागत असल्याने हे काम काळजीपूर्वक करावे लागले, त्यात वेळ गेला. दिल्लीतील मेट्रो स्थानके छोटी असून मुंबईत मोठी स्थानके आणि अधिकाधिक प्रवेशद्वारे बांधण्यात येत आहेत. त्यामुळे दिल्लीच्या धर्तीवर मेट्रो ३चा खर्च निश्चित करण्यात आला, पण प्रत्यक्षात काम करताना त्यात वाढ झाली. तसेच जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतींच्या परिसरातून ही मार्गिका जात असल्याने या इमारतींना धक्का न लागता, आवश्यक त्या इमारतींचे पुनर्वसन करून प्रकल्प मार्गी लावला जात आहे. तसेच मेट्रो ३ची स्थानके अनेक ठिकाणी इतर मेट्रो स्थानकांशी जोडली जात आहेत. या पार्श्वभूमीवरही खर्च वाढला आहे. तांत्रिक अडचणींमुळे खर्च वाढला असतानाच २०२० मध्ये आलेल्या करोना संकटाचाही फटका काही अंशी प्रकल्पाला बसला. या सर्व बाबींचा एकत्रित परिणाम म्हणजे १० हजार कोटींची वाढ झाल्याचे एमएमआरसीकडून  सांगितले जात आहे.

वाढीव खर्चास हवी केंद्राचीही मंजुरी?

मेट्रो ३ खर्चात झालेली ही वाढ २०१८ ते २०२१ या दरम्यानची आहे. या अतिरिक्त खर्चवाढीस नुकतीच राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.  मात्र आता यासाठी केंद्राचीही मंजुरी घेणे आवश्यक असणार आहे. त्यामुळे आता यासंबंधीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात येईल. केंद्राची मान्यता मिळाल्यानंतर ‘जायका’ या जपानी संस्थेकडून ६६०० कोटींचा निधी (कर्ज) घेण्यात येईल आणि त्यानुसार प्रकल्पाचा खर्च भागविला जाणार आहे. दरम्यान मेट्रो ३ मार्गिकेचा प्रस्तावित खर्च २३ हजार १३६ कोटी असा आहे. यापैकी आतापर्यंत एमएमआरसीला २१ हजार ८९० कोटी रुपये इतका निधी उपलब्ध झाला आहे. यातील २१ हजाार ५२० कोटी रुपये इतका खर्च आतापर्यंत करण्यात आला आहे.

आणखी वाढ होण्याची शक्यता?

आजच्या घडीला प्रकल्पाचे एकूण ७५ टक्के तर आरे कारशेडचे २९ टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा एमएमआरसीने केला आहे. त्यानुसार २५ टक्के आणि कारशेडचे ७१ टक्के काम होणे बाकी आहे. महत्त्वाचे म्हणजे एमएमआरसीच्या म्हणण्यानुसार १० हजार कोटींची वाढ ही २०२१ पर्यंतची आहे. तर हा संपूर्ण प्रकल्प जून २०२४मध्ये पूर्ण करण्याचे एमएमआरसीचे नियोजन आहे. तेव्हा २०२१ ते जून २०२४ या काळात प्रकल्पाचा खर्च आणखी वाढण्याची शक्यता आहे. याला एमएमआरसीनेही दुजोरा दिला आहे. झाल्यास मेट्रो ३ मार्गिका ही आतापर्यंतची आणि यापुढेची ही सर्वात महाग मार्गिका ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Colaba bandra seepz metro 3 corridor increase in cost print exp scsg
First published on: 17-08-2022 at 08:31 IST