बदलती जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे विविध गंभीर आजाराचे प्रमाण वाढले आहे. कर्करोगग्रस्त रुग्णांची वाढती संख्या हा त्याचाच भाग असल्याचे आरोग्यतज्ज्ञांचे मत आहे. तरुणांमध्ये आतड्याचा कर्करोग झपाट्याने वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. आहारातील अतिप्रक्रिया केलेले पदार्थ आणि या कर्करोगाचा संबंध थेटपणे जोडला जात आहे. यादरम्यान एखाद्या व्यक्तीच्या आहारात अशा पदार्थांचे प्रमाण १० टक्क्यांनी वाढल्यास मोठ्या आतड्याच्या कर्करोगाचा धोका ४ टक्क्यांनी वाढू शकतो, असा धक्कादायक खुलासा एका संशोधनातून करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर हे अतिप्रक्रिया केलेले पदार्थ नेमके कोणते? त्याचा आरोग्यावर कसा परिणाम होतो आणि शरीर निरोगी ठेवण्यासाठी आहारात कोणते बदल आवश्यक आहे? त्याविषयी…
‘द बीएमजे’ आणि ‘फ्रंटियर्स इन न्यूट्रिशन’ या नामांकित नियतकालिकांमधील संशोधनानुसार, अतिप्रक्रिया केलेले पदार्थ जास्त खाल्ल्याने आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. या पदार्थांमुळे लठ्ठपणा, हृदयविकार, मोठ्या आतड्याचा कर्करोग आणि टाईप-२ मधुमेहासारखे गंभीर आजार जडण्याची शक्यता वाढते. हे पदार्थ अधिक चविष्ट आणि वारंवार खावेसे वाटतील अशा पद्धतीने रासायनिक प्रक्रियेद्वारे तयार केले जातात. मात्र, या प्रक्रियेमुळे अन्नातील मूळ पोषक घटक नष्ट होतात. त्यामुळे यात फक्त अतिरिक्त कॅलरीज उरतात आणि शरीराला आवश्यक असणारे पोषण मिळत नाही. या धोक्यांना प्रसिद्ध कर्करोग तज्ज्ञ डॉ. वर्तिका विश्वानी यांनीही दुजोरा दिला आहे. अतिप्रक्रिया केलेले पदार्थ जास्त खाल्ल्याने कोलोरेक्टल म्हणजेच मोठ्या आतड्याच्या कर्करोगाचा धोका वाढू शकतो, असे त्यांनी इन्स्टाग्रामवरून केलेल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.
अतिप्रक्रिया केलेले कोणते पदार्थ खाणे टाळावे?
डॉ. विश्वानी यांनी इन्स्टाग्रामवरील एका पोस्टमधून कर्करोगाच्या धोक्याशी संबंधित अतिप्रक्रिया केलेल्या पदार्थांकडे लक्ष वेधले आहे. मोठ्या आतड्याच्या कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी आहारात कोणते पदार्थ टाळावेत, असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी नागरिकांना महत्त्वाचा सल्ला दिला आहे. त्यांच्या मते, अतिप्रक्रिया केलेल्या अनेक पदार्थांमध्ये अतिरिक्त साखर, मीठ, आरोग्यास अपायकारक चरबी आणि रिफाइंड घटकांचे प्रमाण जास्त असते. याउलट या पदार्थांमध्ये शरीरासाठी आवश्यक असलेल्या आहारातील फायबरचे प्रमाण कमी असते. फायबरचे प्रमाण कमी असलेला आहार दीर्घकाळ घेतल्यास आतड्यांच्या कार्यावर आणि पचनसंस्थेच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे दैनंदिन आहारात अशा पदार्थांचे सेवन मर्यादित ठेवणे आणि पोषक घटकांनी समृद्ध असलेल्या अन्नपदार्थांना प्राधान्य देणे महत्त्वाचे आहे.
A post shared by Dr Vartika Vishwani | Oncosurgeon (@doctorvarti)
डॉ. विश्वानी यांच्या मते, बाजारात मिळणाऱ्या चीज स्लाइस, चीज स्प्रेड आणि फ्लेवर्ड बटरमध्ये मिठाचे आणि चरबीचे प्रमाण जास्त असू शकते. हे पदार्थ मऊ राहावेत आणि सहज वितळावेत, यासाठी त्यात काही विशिष्ट अन्नघटक मिसळले जातात. त्यामुळे असे पदार्थ खरेदी करताना त्यावरील घटकांची माहिती आणि मिठाचे प्रमाण तपासायला हवे. तसेच त्याऐवजी ताजे, साधे पनीर खाणे हा एक पर्याय ठरू शकतो. बाजारात मिळणाऱ्या विविध चवींच्या इन्स्टंट ओट्समध्ये अतिरिक्त साखर मिसळलेली असू शकते. त्यामुळे ओट्स खरेदी करताना त्यातील साखरेचे प्रमाण तपासणे महत्त्वाचे आहे. चवीसाठी साखर मिसळलेल्या ओट्सऐवजी साधे रोल्ड ओट्स किंवा स्टील-कट ओट्स आहारात समाविष्ट करावेत, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
डॉ. विश्वानी पुढे सांगतात की, काही प्रकारच्या पीनट बटरमध्ये चव वाढवण्यासाठी अतिरिक्त साखर आणि तेल मिसळलेले असते. त्यामुळे त्यातून शरीरात अतिरिक्त कॅलरी जाऊ शकतात. अशा पदार्थांचे नियमितपणे आणि जास्त प्रमाणात सेवन केल्यास वजन वाढण्याची शक्यता असते. म्हणूनच पीनट बटर खरेदी करताना त्यावरील घटकांची माहिती तपासून, अतिरिक्त साखर किंवा तेल नसलेल्या प्रकाराची निवड करायला हवी. बाजारात मिळणाऱ्या विविध चवींच्या दह्यामध्येही अतिरिक्त साखर आणि कृत्रिम स्वाद देणारे घटक असू शकतात. अशा दह्याचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास शरीरात अतिरिक्त कॅलरी जाऊ शकतात. साखरेचे अतिसेवन वजन वाढण्यासह इतर आरोग्यविषयक समस्यांचा धोकाही वाढवू शकते. त्यामुळे दही खरेदी करताना त्यातील साखरेचे प्रमाण तपासावे आणि शक्यतो साध्या, साखर न मिसळलेल्या दह्याला प्राधान्य द्यावे, असेही डॉ. विश्वानी यांनी सांगितले. मात्र, या पदार्थांचे सेवन केल्याने थेट मोठ्या आतड्याचा कर्करोग होतो, असा निष्कर्ष काढता येत नाही. कर्करोगाचा धोका अनेक घटकांवर अवलंबून असतो. त्यामुळे संतुलित आहार घेणे आणि प्रक्रिया केलेल्या पदार्थांचे सेवन मर्यादित ठेवणे महत्त्वाचे आहे, असेही त्यांनी नमूद केले.
आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा?
मोठ्या आतड्याचा कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी डॉ. विश्वानी यांनी आहारात भाज्या, फळे, संपूर्ण धान्ये, डाळी, कडधान्ये, सुका मेवा आणि विविध बियांचा समावेश करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच, कमीत कमी प्रक्रिया केलेल्या नैसर्गिक पदार्थांना आहारात प्राधान्य द्यावे, असे त्यांनी सांगितले आहे. एखादा विशिष्ट पदार्थ खाणे किंवा टाळणे यापेक्षा संपूर्ण आहाराच्या सवयी अधिक महत्त्वाच्या असतात, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. कमीत कमी प्रक्रिया केलेले आणि पोषक घटकांनी समृद्ध असलेले पदार्थ खाल्ल्याने शरीराला आवश्यक पोषण मिळण्यास मदत होते. त्यामुळे संतुलित आहार घेणे आणि दीर्घकाळ आरोग्य चांगले राखण्यासाठी योग्य आहाराच्या सवयी अंगीकारणे महत्त्वाचे आहे, असे मतही डॉ. विश्वानी यांनी व्यक्त केले आहे.
