Colorectal Cancer Treatment Frog Bacteria : ‘कर्करोग’ असे नाव ऐकले तरी अनेकांच्या पोटात भीतीचा गोळा उठतो. जगभरात कर्करोगाने ग्रस्त असलेल्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या जीवघेण्या आजाराचा नायनाट करण्यासाठी सध्या अनेक देशांमध्ये संशोधन सुरू आहे. यादरम्यान कर्करोगाच्या उपचारांमध्ये आमूलाग्र क्रांती घडवून आणणारा शोध जपानमधील वैज्ञांनिकांनी लावला आहे. बेडूक आणि सरड्याच्या आतड्यात आढळणाऱ्या जीवाणूमध्ये कर्करोगाच्या पेशी नष्ट करण्याची अफाट क्षमता असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. त्याबाबत उंदरांवर केलेला प्रयोग यशस्वी ठरल्याचे संशोधकांनी सांगितले आहे. त्यांच्या या दाव्यामुळे जगातील लाखो लोकांचे प्राण वाचण्याची आशा निर्माण झाली आहे. त्याविषयीचा हा आढावा…

जगभरात कर्करोगग्रस्त रुग्णांची संख्या वाढतच असल्याने अनेक ठिकाणी या आजारावर संशोधन सुरू आहे. कर्करोगाच्या नव्या रुग्णांमध्ये महिलांची संख्या जास्त असली तरी त्यामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण पुरुषांमध्ये अधिक असल्याचे दिसून येत आहे. भारतातील चित्र या बाबतीत थोडेसे वेगळे आहे. २०२२ मध्ये देशातील प्रत्येकी एक लाख लोकांपैकी सरासरी १९७ जणांना कर्करोग झाल्याचे निदान झाले होते. त्यामध्ये महिलांच्या तुलनेत पुरुषांची स्थिती अधिक वाईट होती. त्यावेळी पुरुषांमध्ये कर्करोगाचे प्रमाण २१२ आणि महिलांमध्ये १८६ असल्याचे एका अहवालातून समोर आले होते.

संशोधकांचा नेमका दावा काय?

जपानी शास्त्रज्ञांच्या दाव्यानुसार, बेडकांच्या आणि सरड्यांच्या पचनसंस्थेत आढळणारे काही विशिष्ट जीवाणू मानवामधील आतड्याच्या कर्करोगाचा मुळापासून नायनाट करू शकतात. या शोधामुळे भविष्यात पारंपरिक केमोथेरपी आणि इम्युनोथेरपीच्या तुलनेत कर्करोगावरील अधिक सुरक्षित आणि परिणामकारक उपचारांचा मार्ग मोकळा होऊ शकतो. बेडकांच्या आतड्यांमध्ये आढळणाऱ्या या जीवाणूने आतड्याच्या कर्करोगावर उपचार करण्याची जबरदस्त क्षमता दाखवली आहे. या संशोधनामुळे भविष्यातील कर्करोगावरील उपचार कमी त्रासदायक आणि रुग्णांसाठी अधिक सोईस्कर असण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Award Banner

आणखी वाचा : कॅनडातील हिंदूंना कोण लक्ष्य करतंय? भारतीय वंशाच्या तरुण-तरुणीची हत्या कोणी केली?

संशोधनातून काय समोर आले?

जपानमधील नागोया विद्यापीठातील संशोधकांनी गेल्या आठवड्यात कर्करोगावरील एक अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालात ‘इविंगेला अमेरिकाना’ नावाच्या एका विशिष्ट जीवाणूचा त्यांनी उल्लेख केला. हा जीवाणू प्रामुख्याने बेडूक आणि सरड्यांसारख्या उभयचर प्राण्यांच्या पचनसंस्थेत नैसर्गिकरीत्या आढळून येतो. आतापर्यंत निरुपयोगी मानला जाणारा हा जीवाणू आता कर्करोगाविरुद्धच्या लढ्यात प्रभावी शस्त्र ठरणार असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. संशोधकांनी अभ्यासादरम्यान जपानी ट्री फ्रॉग, जपानी फायर-बेली न्यूट व जपानी गवताळ सरडे यांच्या आतड्यांमधून एकूण ४५ जीवाणूंचे प्रकार वेगळे केले. या सर्वांची सखोल तपासणी केली असता, त्यातील नऊ प्रकारच्या जीवाणूंमध्ये कर्करोगविरोधी गुणधर्म असल्याचे आढळून आले. यादरम्यान ‘इविंगेला अमेरिकाना’ या जीवाणूची कर्करोगावरील उपचार क्षमता सर्वांत जास्त असल्याचे दिसून आले.

उंदरांवर करण्यात आले संशोधन

‘इविंगेला अमेरिकाना’ या जीवाणूची कर्करोगावरील मारक क्षमता तपासण्यासाठी शास्त्रज्ञांनी उंदरांवर प्रयोग केला. त्यांनी सुरुवातीला कर्करोगाचे काही विषाणू उंदरांच्या शरीरात सोडले. नंतर त्याचा नायनाट करण्यासाठी बेडकामधील जीवाणूचा एक डोस उंदराला देण्यात आला. ३० दिवसांनंतर असे लक्षात आले की- बेडकाच्या आतड्यात आढळणारा ‘इविंगेला अमेरिकाना’ जीवाणू हा थेट कर्करोगाच्या ट्यूमरवर म्हणजेच गाठींवर हल्ला करतो. त्याशिवाय गाठीमध्ये प्रवेश करून, तो त्या ठिकाणची रोगप्रतिकार शक्ती जलद गतीने सक्रिय करतो. या जीवाणूच्या प्रभावामुळे शरीरातील ‘टी-सेल्स’ सक्रिय होतात आणि त्या कर्करोगाच्या पेशींना शोधून, त्यांचा नाश करू लागतात. या प्रक्रियेमुळे गाठीची वाढ थांबते आणि हळूहळू तिचा आकार कमी होऊ लागतो.

केमोथेरपीच्या वेदनांपासून कायमची सुटका?

सध्या कर्करोगाच्या उपचारांमध्ये केमोथेरपी ही सर्वाधिक वापरली जाणारी पद्धत आहे. परंतु, या उपचारांमुळे केस गळणे, तीव्र अशक्तपणा, मळमळ यांसारखे गंभीर दुष्परिणाम रुग्णांना सहन करावे लागतात. या पार्श्वभूमीवर जपानी शास्त्रज्ञांचे हे संशोधन पुढील टप्प्यांतील चाचण्यांमध्ये यशस्वी ठरले, तर कमी दुष्परिणाम असलेली जीवाणू उपचारपद्धती विकसित होण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. ही उपचारपद्धती सर्वसामान्यांना परवडणारी आणि रुग्णांसाठी कमी वेदनादायकही ठरणार असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे. ‘इविंगेला अमेरिकाना’ हा जीवाणू आतापर्यंतच्या चाचण्यांमध्ये अतिशय सुरक्षित असल्याचे दिसून आले आहे. उपचारानंतर २४ तासांत हा जीवाणू रक्तप्रवाहात आढळला नाही, तसेच शरीरातील दाहक प्रतिक्रिया ७२ तासांत सामान्य पातळीवर परतल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे.

हेही वाचा : बांगलादेशात हिंदू तरुणाची हत्या कशामुळे झाली? कोण होता अमृत मंडल? युनूस सरकारचा दावा काय?

इतर कर्करोगांवरही ठरणार प्रभावी?

बेडकामध्ये आढळून येणारा हा जीवाणू मानवी शरीरातील आतड्याच्या कर्करोगाचा सहजपणे नायनाट करू शकतो, असा दावा संशोधकांनी केला आहे. भविष्यातील संशोधनामध्ये या जीवाणूचा वापर स्तनाचा कर्करोग आणि स्वादुपिंडाचा कर्करोग यांसारख्या इतर प्रकारच्या कर्करोगांवर उपचार करण्यासाठी करता येईल का, याची तपासणी केली जाणार आहे. या शोधामुळे भविष्यात अधिक प्रभावी आणि सौम्य कर्करोग उपचार मिळण्याची नवी आशा निर्माण झाली आहे. दरम्यान, हा अभ्यास सध्या फक्त उंदरांवर करण्यात आला आहे. त्यामुळे मानवांवर तो किती परिणामकारक ठरेल याबाबत सध्या सांगता येणे कठीण आहे. TANDFONLINE या संकेतस्थळावर या अभ्यासाची माहिती देणारा लेख प्रसिद्ध करण्यात आला आहे.