राखी चव्हाण

वन्य कासव आणि गोड्या पाण्यातील कासवांचे संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी काम करणाऱ्या आंतरराष्ट्रीय ‘टर्टल सर्व्हायव्हल अलायन्स’ने गेल्या महिन्यात ‘टर्टल सर्व्हायव्हल अलायन्स’ इंडियाचे संचालक शैलेंद्र सिंग यांच्यावरील लैंगिक छळाच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर त्यांना या पदावरून दूर केले. ‘मी टू’ चळवळीतून उघड झालेल्या प्रकारांचे उदाहरण भारतातील वन्यजीव संवर्धन क्षेत्रातही आढळून आल्याची ही कदाचित पहिलीच वेळ आहे. विशेष म्हणजे या संस्थेत काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांनी समाजमाध्यमावरून या विषयाला वाचा फोडली आणि त्याची दखल घेतली गेली. त्यामुळे वन्यजीव आणि पर्यावरण संवर्धनात काम करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

The conservation role of women
स्त्रियांची जतनसंवर्धक भूमिका
light
विश्लेषण: डोळे दिपवणारी रोषणाई प्रदूषणकारक आहे का ?
CJI DY Chandrachud
केंद्रीय तपास यंत्रणांना सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा मोलाचा सल्ला; म्हणाले, “राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित…”
Inheritance of girls and women Two main types of property ownership
मुली आणि महिलांचा वारसाहक्क

वन्यजीव संवर्धनातील या प्रकाराला वाचा कशी फुटली?

देशातील विज्ञान आणि निसर्ग क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांच्या एका इन्स्टाग्राम पोस्टमध्ये या क्षेत्रात काम करणाऱ्या काही महिलांनी ‘टर्टल सर्व्हायव्हल अलायन्स’ इंडियामधील त्यांचे अनुभव लिहिल्यानंतर ही समस्या समोर आली. एका ज्येष्ठ पर्यावरण पत्रकाराने या महिलांशी संवाद साधल्यानंतर या संस्थेत होणाऱ्या लैगिक, मानसिक छळाचा पाढा त्यांनी वाचला. अगदी प्रशिक्षणार्थी महिलांपासून तर अनुभवींना संस्थेच्या संचालकांकडून होणाऱ्या आरोपाला सामोरे जावे लागले. ‘टर्टल सर्व्हायव्हल अलायन्स’ने ही बाब गांभीर्याने घेतली असून या महिलांशी देखील संपर्क साधला आहे.

पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्रातही छळाचा सामना करावा लागतो का?

वन्यजीव शास्त्रज्ञांना क्षेत्रीय संशोधन करताना वर्णद्वेष आणि छळाचा सामना करावा लागतो, अशा तक्रारी पढे येऊ लागल्या आहेत. अनेक वर्षांपासून या क्षेत्रात वर्णद्वेष सुरू आहे. मात्र, संशोधक आता याबाबत मोकळेपणाने बोलू लागले आहेत. कॅलिफोर्नियातील सांता क्लारा युनिव्हर्सिटीतील जैविक मानववंशशास्त्रज्ञ रॉबिन नेल्सन यांनी प्रसारमाध्यमांसमोरच हे सांगितले की, या क्षेत्रात अशा गोष्टी घडणे अजिबात स्वीकारार्ह नाही. नेल्सन यांनी २०१४मध्ये एक सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात त्यांना असे दिसून आले की ७० महिला प्रतिसादकर्त्यांना या क्षेत्रात छळाचा अनुभव आला होता. केवळ महिलांनाच लैंगिक छळाचा सामना करावा लागतो असे नाही तर या क्षेत्रात वर्णद्वेषाचा देखील सामना करावा लागतो.

संशोधन क्षेत्रातील हा छळ बाहेर का येत नाही?

छळाच्या अनेक घटना बाहेर येत नाही कारण या क्षेत्रातील महिलांना एकतर बदनामीची भीती वाटते आणि दुसरे म्हणजे त्यांचे करिअर. छळाची तक्रार केल्यानंतर आपण संशोधनाच्या क्षेत्रातूनच बाहेर पडू, अशी भीती त्यांना सतत असते. दुर्गम भागात संशोधन करताना प्रामुख्याने संशोधकांना अशा विशिष्ट परिस्थितीचा सामना करावा लागतो. सर्वच संशोधन संस्थांमध्ये हा प्रकार घडत नाही. मात्र, संशोधनात तरुण पिढी असल्याने या घटना घडण्याची शक्यता जास्त असते. त्यातल्या अनेक घटना या नोंदवल्याच जात नाही. पनामामधील एका प्रतिष्ठित संशोधन केंद्रात लैगिक छळाचा प्रकार उघडकीस आल्यानंतर ही बाब समोर आली.

वैज्ञानिक संशोधन क्षेत्रातही या घटना घडतात का?

वैज्ञानिक संशोधनाच्या क्षेत्रात लैंगिक छळ ही एक प्रदीर्घ समस्या आहे. ज्यामुळे काही महिलांना त्यांच्या शैक्षणिक आणि करिअरच्या ध्येयांचा पाठपुरावा करण्यापासून परावृत्त होण्यास भाग पाडले जाते. वैज्ञानिक कार्यशक्तीमध्ये महिलांना टिकवून ठेवण्यात अपयश येत आहे आणि त्यातील सर्वात मोठा घटक म्हणजे छळाची संस्कृती. कौशल्य असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले जाते. अनेकदा त्यांना लैगिक छळाच्या धमक्या देखील दिल्या जातात. पृथ्वी विज्ञानातील महिलांना दुर्गम भागात क्षेत्रीय अनुभवांदरम्यान सहकाऱ्यांकडून छळवणूक आणि धमक्यांचा सामना करावा लागल्याची नोंद आहे.

तक्रारीनंतर गुन्हेगारांना शिक्षा होते का?

संशोधन प्रयोगशाळा आणि कार्यक्षेत्रावर महिला सहकाऱ्यांचा लैंगिक छळ होतो. त्यांना मारहाणदेखील केली जाते, पण जेव्हा स्त्रिया पुढे येतात, तक्रार करतात तेव्हा गुन्हेगारांना शिक्षा होत नाही. कारण बरेचदा यात संस्थेच्या प्रतिष्ठेचा प्रश्न असतो. अनेक संस्था या जागतिक पातळीवरील संशोधनाचे कार्य करत असतात.

समाजमाध्यमांवर तक्रारींचा पाऊस का पडतो?

या क्षेत्रात जेव्हाही लैगिक किंवा मानसिक छळाच्या घटना घडतात तेव्हा महिला संशोधक राग व्यक्त करण्यासाठी समाजमाध्यमाचा आधार घेतात. समाजमाध्यमावर जेव्हा या घटना उघडकीस येतात, तेव्हा त्याची दखल घ्यावीच लागते. ‘टर्टल सर्व्हायव्हल अलायन्स’ संस्थेतही हेच घडले. अनेक वर्षांपासून या संस्थेत महिलांचा छळ सुरू होता. मात्र, समाजमाध्यमावर व्यक्त होताना बरेचदा त्यांना यावर मात करण्यासदेखील सांगितले जाते. तर अनेकदा त्यावर विनोद केला जातो.

लैंगिक छळाबाबतचे सर्वेक्षण काय म्हणते?

जुलै २०१४ मध्ये, क्लॅन्सी आणि तिचे सह-लेखक रॉबिन नेल्सन, ज्युलियन रदरफोर्ड, आणि केटी हिंडे यांनी एका सर्वेक्षणाचे निकाल प्रकाशित केले. सर्वेक्षणात सहभागी ३२ विविध विषयांतील ६६६ शास्त्रज्ञांपैकी ६४ टक्के लोकांनी सांगितले की त्यांनी या क्षेत्रात वैयक्तिकरित्या लैंगिक छळाचा अनुभव घेतला आहे आणि २० टक्के लोकांनी लैंगिक अत्याचार झाल्याचे सांगितले. स्त्रियांना पुरुषांपेक्षा ३.५ पटीने जास्त छळ किंवा अत्याचाराचा अनुभव आला होता. त्यांना प्रामुख्याने वरिष्ठांकडून त्रास दिला गेला होता आणि त्यांच्यावर हल्ला केला गेला होता.

rakhi.chavhan@expressindia.com