Congress leaves DMK for TVK: तमिळनाडूत काँग्रेस पक्षाने आज (६ मे) द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाबरोबर असलेली आघाडी तोडली आहे. काँग्रेस पक्ष विजय यांच्या पक्षाबरोबर सत्तेत सहभागी होणार आहे. याबाबतची अधिकृत घोषणा काँग्रेसकडून करण्यात आली. २०२६ च्या विधानसभा निवडणुकीत विजय यांचा तमिळगा वेत्री कळघम पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला. तमिळनाडूच्या विधानसभेतील एकूण २३४ जागांपैकी विजय यांच्या पक्षाने १०८ जागा जिंकल्या आहेत. तमिळनाडू विधानसभेची निवडणूक काँग्रेस व द्रमुकने एकत्रितपणे लढली होती.

विजय यांच्या टीव्हीके पक्षाबरोबर काँग्रेस नव्याने आघाडी करत आहे. “ही नवी आघाडी दोन्ही पक्षांच्या एकमेकांप्रति असलेल्या आदरावर, जागांच्या वाटपावर आणि वाटून घेतलेल्या जबाबदारीवर अवलंबून आहे. फक्त आताचे सरकार स्थापन करण्यासाठी ही आघाडी नसून भविष्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था, लोकसभा आणि राज्यसभेच्या निवडणुकांसाठी असेल”, असे तमिळनाडूचे काँग्रेस प्रभारी गिरीश छोडनकर यांनी माध्यमांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. द्रमुकच्या प्रवक्त्याने काँग्रेसच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना “पाठीत सुरा खुपसल्याची” भावना व्यक्त केली. तमिळनाडूतील काँग्रेस व द्रमुकमध्ये मागील दोन दशकांपासून असलेल्या संबंधांना तडा गेला आहे. काँग्रेस व द्रमुक यांच्यातील तुटलेल्या आघाडीचा इतिहास काय होता? ते जाणून घेऊयात.

तमिळनाडूतील काँग्रेस – द्रमुक आघाडीचा इतिहास

द्रविड मुन्नेत्र कळघमने १९६७ साली पहिल्यांदा तमिळनाडूत सरकार स्थापन केले होते. त्यावेळी द्रमुकने काँग्रेसचा पराभव केला होता. काँग्रेस जबरदस्तीने हिंदी लादत आहे आणि संघराज्य व्यवस्थेचा फायदा घेत आहे, असा प्रचार काँग्रेसविरोधात द्रमुकने केला होता. द्रमुकने १९६७ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीतही दमदार कामगिरी केली. लोकसभेच्या ३९ पैकी ३६ जागा द्रमुकने जिंकल्या, तर काँग्रेसला फक्त तीन जागा जिंकता आल्या. त्याआधी १९६२ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने ३१ जागा जिंकल्या होत्या.

१९६९ साली काँग्रेसचे विभाजन झाले. एका काँग्रेसचे नेतृत्व तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींकडे होते. तर तमिळनाडू काँग्रेसचे नेतृत्व स्टॉलवार्ट के कामराज यांच्याकडे होते. त्यावेळी द्रमुकने १९७१ च्या लोकसभा निवडणुकांसाठी इंदिरा गांधींच्या काँग्रेसबरोबर आघाडी केली. पण, त्यानंतर एका वर्षाने एम. जी. रामचंद्रन यांच्या अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम (AIADMK) या पक्षाचा जन्म झाला. त्यानंतर इंदिरा गांधी यांनी नव्या जन्मलेल्या पक्षाबरोबर आघाडी केली.

आणीबाणीनंतर झालेल्या १९७७ च्या लोकसभा निवडणुकीत इंदिरा गांधी यांचे केंद्रातील सरकार पडले. परंतु, इंदिरा गांधी यांची काँग्रेस व अण्णाद्रमुक आघाडीने तमिळनाडू विधानसभा निवडणूक जिंकली. त्यानंतर १९७९ मध्ये थंजावूर मधील पोटनिवडणूक लढवून इंदिरा गांधी यांना लोकसभेत जायचे होते. त्याला एमजी रामचंद्रन यांनी विरोध केला. त्यामुळे काँग्रेस व एआयएडीएमके आघाडी तुटली. १९८० मध्ये इंदिरा काँग्रेसने तमिळनाडूत द्रमुकबरोबर आघाडी केली. ती चार वर्षांनी तुटल्यानंतर इंदिरा काँग्रेसने पुन्हा एकदा अण्णा द्रमुक बरोबर आघाडी केली. १९८७ ला एमजी रामचंद्रन यांचे निधन होईपर्यंत ती आघाडी कायम राहिली.

तमिळनाडूचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि द्रमुक पक्षाचे अध्यक्ष एम. करूणानिधी यांना तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी नवी दिल्लीत बोलावले होते. त्यावेळी झालेल्या भेटीचे छायाचित्र (२९ ऑक्टोबर १९९८, एक्स्प्रेस अर्काइव्ह)

जयललितांनी एका मताने पाडले वाजपेयींचे सरकार

१९९० मध्ये जे. जयललिता सत्तेत असताना काँग्रेसने अण्णाद्रमुकला समर्थन दिले होते. पण, १९९८ मध्ये जयललिता यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वातील भाजपाशी युती केली. त्यावेळी पुन्हा काँग्रेसने AIADMK ला दिलेले समर्थन काढून घेतले. १९९९ मध्ये जयललिता यांच्या पक्षाने केंद्रातील अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार केवळ एका मताने पाडले. वाजपेयी यांच्याविरोधात अविश्वास ठराव घेण्यात आला होता. वाजपेयी यांच्या सरकारच्या बाजूने २६९, तर विरोधात २७० मते पडली होती. ऐनवेळी जयललिता यांच्या अण्णाद्रमुकने भाजपाबरोबर असलेली युती तोडली होती. १९९९ मध्येच द्रमुकने भाजपाबरोबर युती केली होती. ती युती पुढील चार वर्ष टिकली. परंतु, २००४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी द्रमुकने भाजपा प्रणित एनडीएतून बाहेर पडत काँग्रेस प्रणित यूपीएत प्रवेश केला. द्रमुकने भाजपाला असलेला पाठिंबा काढून घेतला.

२जी स्पेक्ट्रममध्ये द्रमुक नेत्यांना कारावास, तरीही आघाडी अबाधित

२००४ ते २०१४ पर्यंत द्रमुक काँग्रेस प्रणित संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) चा भाग होता. या कालावधीत २ जी स्पेक्ट्रम घोटाळ्याने काँग्रेस व द्रमुकमध्ये तडा गेला होता. परंतु, तरीही दोन्ही पक्षांची आघाडी कायम राहिली होती. तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी २जी स्पेक्ट्रम घोटाळ्याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले. त्यात द्रमुकचे नेते व तत्कालीन केंद्रीय दळवळण मंत्री ए. राजा व तत्कालीन राज्यसभा खासदार के. कनिमोझी यांना तुरूंगवासाची शिक्षा झाली होती. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी श्रीलंकन तमिळ नागरिकांच्या मुद्द्यावरून द्रमुकने काँग्रेसबरोबर असलेली आघाडी तोडली. त्यानंतर दोन्ही पक्षांना जोरदार फटका बसला. तमिळनाडूत जयललिता यांच्या अण्णाद्रमुकला लोकसभा निवडणुकीत दमदार कामगिरी करता आली. राष्ट्रीय पातळीवर काँग्रेसचे सरकार गेले. त्यानंतर २०१६ च्या तमिळनाडू विधानसभा निवडणुकीपूर्वी पुन्हा एकदा द्रमुकने काँग्रेसबरोबर आघाडी केली.

तमिळनाडूत टीव्हीकेचा उदय आणि आघाडीचा अस्त

तमिळनाडूत टीव्हीके पक्षाचा झालेला उदय काँग्रेस व द्रमुकमधील आघाडी तुटण्यास कारण ठरला. २००४ पासून काँग्रेस व द्रमुकने लोकसभा तसेच विधानसभा निवडणूक एकत्रितपणे लढवली. राहुल गांधी व द्रमुकचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी राहुल गांधी यांना यूपीएचे पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून समर्थन दिले. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी एका सभेत राहुल गांधी यांनी एम.के. स्टॅलिन यांना मोठे बंधु म्हणून संबोधले.

२०२१ च्या तमिळनाडू विधानसभा निवडणुकीनंतर द्रमुकने सरकार स्थापन केले होते. त्यावेळी एम.के. स्टॅलिन यांच्या नेतृत्वातील सरकारने काँग्रेसला सत्तेत स्थान दिले नव्हते. त्यामुळे काँग्रेस नेत्यांमध्ये असंतोष होता. परंतु, त्यावेळी काँग्रेसची देशातील इतर राज्यांमधील परिस्थिती बिघडत चालली होती. त्यामुळे या मुद्द्यावरून द्रमुकबरोबर असलेले संबंध तोडणे काँग्रेसने टाळले होते.

२०२६ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी द्रमुकचे नेते व मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्या विरोधात सत्ताविरोधी लाट असल्याने टीव्हीकेबरोबर जावे, असे काँग्रेस नेत्यांनी सुचवले होते. तसेच टीव्हीके बरोबर गेल्यास द्रमुक देत असलेल्या जागांपेक्षा अधिक जागा मिळतील, असे काँग्रेस नेत्यांना वाटत होते. त्यातच राहुल गांधी आणि एमके स्टॅलिन यांनी निवडणुकीसाठी एकत्रित प्रचार केला नाही. या परिस्थितीतही काँग्रेसने द्रमुकने दिलेल्या २८ जागांवर निवडणूक लढवली. त्यापैकी ५ जागा जिंकल्या. आता टीव्हीके सरकार स्थापन करण्याच्या तयारीत आहे. टीव्हीके बरोबर सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. त्यामुळे दीर्घकाळापासून सोबती असलेल्या द्रमुकबरोबरील संबंधांना तडा गेला आहे.