एका काँग्रेस नेत्याने खासदार शशी थरूर यांचा उल्लेख भाजपाचे सुपर प्रवक्ते, असा केला आहे. काँग्रेस नेते उदित राज यांनी म्हटले की, शशी थरूर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारच्या बाजूने सतत बोलत आहेत. ऑपरेशन सिंदूरनंतर भारत सरकारने दहशतवादविरोधी भूमिकेला पाठिंबा मिळविण्यासाठी अनेक सर्वपक्षीय संसदीय शिष्टमंडळे विदेशांत पाठवली आहेत. त्यामध्ये काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्या नेतृत्वाखालील एका प्रमुख शिष्टमंडळाचादेखील समावेश आहे.
शशी थरूर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ
शशी थरूर यांच्या शिष्टमंडळात भाजपा, झारखंड मुक्ती मोर्चा, टीडीपी व शिवसेना यांसारख्या विविध राजकीय पक्षांच्या खासदारांचा समावेश आहे. त्यांनी अमेरिका, गयाना व पनामा या देशांना भेटी दिल्या आहेत. तिथे त्यांनी अधिकारी, कायदेकर्ते, माध्यमे आणि परदेशस्थ भारतीय यांच्याशी संवाद साधून भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.
शशी थरूर यांच्यावर टीका
काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते शशी थरूर यांच्यावर टीका करताना उदित राज म्हणाले, “भाजपा नेते जे बोलत नाहीत, ते शशी थरूर पंतप्रधान मोदी आणि सरकारच्या बाजूने बोलत आहेत. त्यांनी शशी थरूर यांच्या मागील सरकारांच्या योगदानाबद्दलच्या समजुतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच त्यांनी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर भारतीय सशस्त्र दलांचे श्रेय घेतल्याचीही टीका केली. २०१६ मध्ये उरी सर्जिकल स्ट्राईकपूर्वी भारताने कधीही नियंत्रण रेषा ओलांडली नव्हती, असे विधान शशी थरूर यांनी केले होते. या विधानावर काँग्रेस पक्षाचे नेतृत्वही प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आहे. सूत्रांच्या मते, काँग्रेस असा प्रश्न उपस्थित करीत आहे की, शशी थरूर असे विधान का करतील, जे मागील काँग्रेस नेतृत्वाखालील सरकारांनी केलेल्या कृतींच्या विरोधात असेल.
शिष्टमंडळासाठी शशी थरूर काँग्रेसची पसंती नव्हते?
दहशतवादावर भारताची भूमिका मांडण्यासाठी विदेशांत पाठविल्या जाणाऱ्या शिष्टमंडळांमध्ये केंद्राने काँग्रेस पक्षाला चार नावे समाविष्ट करण्यास सांगितले होते. त्या यादीत माजी कॅबिनेट मंत्री आनंद शर्मा, लोकसभेतील पक्षाचे उपनेते गौरव गोगोई, राज्यसभेचे खासदार डॉ. सय्यद नसीर हुसेन व लोकसभेचे खासदार राजा ब्रार यांच्या नावांचा समावेश होता. परंतु, संसदीय कामकाज मंत्रालयाने शशी थरूर यांचे नाव जाहीर केले. भाजपाचे प्रवक्ते अमित मालवीय यांनी ‘एक्स’ (पूर्वी ट्विटर)वर सांगितले की, राजनैतिक बैठकांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी काँग्रेस पक्षाची निवड गंभीरपणे संशयास्पद आहे
शशी थरूरांकडून पनामामध्ये पाकिस्तानच्या दहशतवादाचा निषेध
पनामा येथे भारताला लक्ष्य करून सुरू असलेल्या दहशतवादी कारवायांबद्दल शशी थरूर यांनी पाकिस्तानवर जोरदार टीका केली. काही काळात देशात झालेल्या बदलामुळे दहशतवाद्यांना आता त्याची किंमत मोजावी लागेल हे समजले आहे, असे त्यांनी म्हटले. त्यांनी सप्टेंबर २०१५ मध्ये झालेल्या उरी सर्जिकल स्ट्राईकचा उल्लेख केला आणि म्हटले की, भारताने पहिल्यांदाच नियंत्रण रेषा ओलांडून दहशतवादी लाँच पॅडला लक्ष्य केले होते. शशी थरूर यांनी निदर्शनास आणून दिले की, कारगिल युद्धादरम्यानही भारताने नियंत्रण रेषा ओलांडली नव्हती, परंतु, उरीमध्ये आणि जानेवारी २०१९ मध्ये पुलवामा हल्ल्यानंतर भारताने असे केले होते.
“यावेळी आम्ही केवळ नियंत्रण रेषाच नाही, तर आंतरराष्ट्रीय सीमादेखील ओलांडली आणि बालाकोटमधील दहशतवादी मुख्यालयावर हल्ला केला,” असे ते ऑपरेशन सिंदूरचा संदर्भ देत म्हणाले. ते म्हणाले, “यावेळी आम्ही या दोन्हींच्याही पलीकडे गेलो आहोत. आम्ही पाकिस्तानची प्रशिक्षण केंद्रे आणि दहशतवादी मुख्यालयेही उद्ध्वस्त केली आहेत.”