-हृषिकेश देशपांडे

मल्लिकार्जुन खरगे विरुद्ध शशी शरूर या दक्षिणेतीलच दोन नेत्यांमध्ये काँग्रेस अध्यक्षपदाची लढत १७ ऑक्टोबरला होत आहे. त्यामुळे २५ वर्षांनंतर पक्षाचे अध्यक्षपद गांधी घराण्याच्या बाहेरील व्यक्तीकडे येणार आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत गांधी कुटुंबाचा कुणालाही पाठिंबा नाही हे वारंवार सांगितले जात आहे. मात्र खरगे यांच्या सुचक-अनुमोदक यादीकडे पाहता पक्षश्रेष्ठींचा कल लक्षात येतो. त्यामुळेच या लढतीची केवळ औपचारिकता आहे. प्रश्न इतकाच आहे की एकूण नऊ हजार मतदारांपैकी थरूर किती मते घेणार?

निष्ठावंत व अनुभवी खरगे…

कर्नाटकमधील मल्लिकार्जुन खरगे हे नऊ वेळा आमदार तर दोनदा लोकसभेवर निवडून आले आहेत. १९६०पासून ते राजकारणात आहेत. देवराज अरस यांच्यापासून कर्नाटकमधील बहुसंख्य काँग्रेस मंत्रिमंडळात त्यांनी महत्त्वाची खाती सांभाळली आहेत. मुख्यमंत्रीपदाने मात्र त्यांना नेहमीच हुलकावणी दिली आहे. इंदिरा गांधी यांच्यापासून त्यांनी पक्ष संघटनेत काम केले आहे. शांत, संयमी व्यक्तिमत्त्व, विरोधकांशी उत्तम समन्वय ही त्यांची बलस्थाने आहेत. मात्र ८० वर्षीय खरगे २०२४मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापुढे आव्हान उभे करतील काय, हा प्रश्न आहे. कर्नाटकमध्ये पुढील वर्षी निवडणूक आहे. त्या दृष्टीने खरगेंची उमेदवारी काँग्रेसला उपयोगी पडू शकते. कर्नाटकमध्ये काँग्रेसची स्थिती चांगली आहे. उत्तर भारतात काँग्रेस कमकुवत आहे. उत्तर प्रदेशमध्ये सोनिया गांधी प्रतिनिधित्व करीत असलेली रायबरेली ही एकमेव जागा पक्षाकडे आहे. बिहारमध्ये संयुक्त जनता तसेच राष्ट्रीय जनता दल आघाडीत काही जागा जिंकण्याची काँग्रेसला अपेक्षा आहे. उत्तर भारतातून खरगे यांच्या करिष्म्यावर काँग्रेसला मते मिळण्याची शक्यता कमी आहे. त्या तुलनेत मध्य प्रदेशातील ज्येष्ठ नेते कमलनाथ प्रभावी आहेत. उद्योगजगताशी त्यांचा उत्तम स्नेह आहे. याखेरीज सातत्याने लोकसभेवर ते विजयी झाले आहेत. मात्र मध्य प्रदेशचे राजकारण सोडायचे नसल्याने कमलनाथ यांनी पक्षाध्यक्षपदासाठी नकार दिल्याचे सांगितले जाते. खरगे यांच्या पाठीशी ‘जी-२३’ म्हणून बंडखोर मानले जाणारे अनेक नेते आहेत. त्या अर्थाने खरगे सर्वसंमतीचे उमेदवार ठरले आहेत. राज्यसभेतही विरोधी पक्षनेते म्हणून त्यांची कामगिरी उजवी आहे. खरगे तसेच थरूर यांनी प्रचार सुरू केला आहे. काँग्रेसमध्ये बदल हवा असेल तर मत द्या असे थरूर यांचे आवाहन आहे. खरगेंना त्यांनी खुल्या चर्चेचे आव्हान दिले आहे.

थरूर यांचे वक्तृत्व प्रभावी…

सफाईदार इंग्रजी, माध्यमांशी उत्तम स्नेह अशा गुणांमुळे साहित्य वर्तुळ तसेच तरुणांमध्ये शशी शरूर लोकप्रिय आहेत. केरळच्या तिरुवनंतपुरममधून दोनदा ते लोकसभेवर निवडून आले आहेत. आंतरराष्ट्रीय विषयांचा त्यांचा अभ्यास आहे. केरळमधील अनेक नेते त्यांच्या पाठीशी आहेत, पण व्यापक पाठिंबा त्यांना मिळताना दिसत नाही. काँग्रेसमधील जुने तसेच गांधी घराण्याशी एकनिष्ठ असलेले बहुतेक नेते खरगे यांच्या मागे आहेत. थरूर प्रचारासाठी नागपूरला दोन दिवसांपूर्वी आले होते, तेव्हा आशीष देशमुख यांचा अपवाद वगळता इतर नेते गैरहजर होते. त्यामुळे थरूर यांची वाट अवघड असल्याचे स्पष्टच आहे. खरगेंप्रमाणे थरूर हेही व्यापक जनाधार असलेले नेते नाहीत. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी थरूर यांचे वर्णन उच्चभ्रू असे करत विरोध सूचित केला आहे.

अंतर्गत लोकशाही आहे का?

अध्यक्षपदाच्या निवडणुकीत प्रचार करण्यासाठी गौरव वल्लभ यांच्यासारख्या नेत्यांनी प्रवक्तेपद सोडल्याचे खरगेंनी सांगितले. मुळात पक्षांतर्गत निवडणुकीत याची गरज आहे काय? प्रवक्ता हा पक्षाची बाजू मांडतो. या निवडणुकीत कुणावर अंतर्गत टीका-टिप्पणी करण्याचा विषय नाही. त्यामुळे अशी भूमिका अनाकलनीय आहे. निवडणुकीनंतर थरूर यांच्याबरोबर काम करणार असल्याचे खरगेंनी स्पष्ट केले आहे. भाजपपेक्षा आमचा पक्ष खरा लोकशाहीवादी आहे. त्यामुळे आमच्या अध्यक्षीय निवडीबाबत माध्यमात जरा जास्तच चर्चा सुरू आहे, असा काँग्रेस नेत्यांचा सूर आहे. अर्थात आपल्याकडे डावे पक्ष वगळता पक्षांतर्गत निवडणूक म्हणजे देखावाच असतो. बहुतेक वेळा वरिष्ठ पातळीवर ठरलेले असते त्याची अंमलबजावणी निम्नस्तरावर कोणीतरी करतो, आताही खरगेंच्या बाबत तसेच आहे असे म्हणण्यास वाव आहे.

खरेगेंपुढे आव्हान…

काँग्रेस पक्ष संघटनेत दीर्घकाळ कार्यरत असल्याने खरगेंना बारकावे माहीत आहेत. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला प्रतिसाद मिळत आहे. हे असताना राजस्थानमध्ये मात्र नवे संकट उभे ठाकले आहे. अशोक गेहलोत तसेच सचिन पायलट यांच्यातील वाद संपण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे पायलट संधी मिळाल्यास नवा पर्याय शोधू शकतात. काँग्रेससाठी पायलट यांचा अवमान होणार नाही याची खबरदारी घ्यावी लागेल. त्यामुळे अध्यक्ष झाल्यास खरगेंना काँग्रेसच्या हाती असलेल्या दोनपैकी राजस्थान या महत्त्वाच्या राज्यात लक्ष द्यावे लागेल. लगेचच गुजरात तसेच हिमाचल प्रदेशची मोहीम आव्हानात्मक असेल. अध्यक्षपदाचा निकाल १९ ऑक्टोबरला जाहीर होणार असला तरी, प्रमुख नेत्यांचा कल पाहता खरगेंच्या निवडीची औपचारिकताच बाकी आहे.