Constant Fatigue Causes Explained : सकाळी उठल्यानंतरही अंगात उत्साह वाटत नाही? सात ते आठ तासांची झोप पूर्ण करूनही दिवसभर सुस्ती आणि थकवा जाणवत राहतो? सकाळी उठताच तुमचे शरीर फक्त कॉफी मागत असेल, तर ती तुमची क्रेविंग्स नाही, तर शरीरातील हार्मोन्समधील संतुलन बिघडत असल्याचा तो इशारा आहे. बहुतेक लोक आपल्या धकाधकीच्या जीवनशैलीत अशा शारीरिक इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करतात. पण, सावधान! शरीरात दीर्घकाळ सुस्ती जाणवत असेल, तर हे अनेकदा हार्मोन्समधील असंतुलनाचे पहिले लक्षण असते, असे डॉक्टर सांगतात. हार्मोनल थकवा म्हणजे नेमके काय, त्यामागील कारणे कोणती आणि त्याची लक्षणे कशी ओळखायची? याविषयी जाणून घेऊया.

शरीरातील छुपा घटक

हार्मोनल थकव्यामागे नेमकी कोणती कारणे आहेत हे विजयवाडा येथील मणिपाल रुग्णालयातील अंतःस्रावशास्त्र सल्लागार डॉ. भानू प्रवीण नायडू यांनी एका वृ्त्तपत्राला दिलेल्या विशेष मुलाखतीत उलगडून सांगितले आहे. यावेळी त्यांनी पुरेशा विश्रांतीनंतरही ही समस्या का कमी होत नाही याबद्दलची माहिती सांगितली आहे. त्यांच्या मते, थकवा येणे हा नेहमीच केवळ व्यग्र जीवनशैलीचा परिणाम नसून, त्यामागे हार्मोन्समधील असंतुलनासारखी वैद्यकीय कारणे असू शकतात.

डॉक्टर नायडू सांगतात की, पूर्णवेळ काम केल्यामुळे, झोपेची कमतरता जाणवत असल्यामुळे आणि तणावपूर्ण परिस्थितीत असल्यामुळे लोकांना लवकर थकवा येतो. डॉ. नायडूंनी पुढे असेही नमूद केले की, बहुतेक प्रकरणांमध्ये हे विधान खरे ठरते. पुरेशी झोप घेतल्यानंतरही सकाळी उठल्यावर थकवा जाणवत असेल आणि ही अवस्था दिवसभर कायम राहत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नये. तज्ज्ञांच्या मते, अशा प्रकारचा सततचा थकवा हा चिंतादायी संकेत असू शकतो.

डॉ. भानू प्रवीण नायडू यांच्या मते, शरीरातील हार्मोन्स हे अंतर्गत संदेशवाहक म्हणून काम करतात आणि शरीराची अनेक महत्त्वाची कार्ये सुरळीत ठेवतात. चयापचय प्रक्रिया, झोपेचे चक्र, भावनिक संतुलन, भूक, तसेच ऊर्जेचे उत्पादन आणि वापर यांसारख्या प्रक्रियांवर हार्मोन्सचे नियंत्रण असते.

मात्र, या हार्मोन्सच्या बदलामुळे शरीराच्या नैसर्गिक संतुलनावर परिणाम होतो. परिणामी, कोणतेही विशेष काम न करता किंवा पुरेशी विश्रांती घेतल्यानंतरही व्यक्तीला सतत थकवा जाणवू शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले.

थायरॉईड ग्रंथीचा परिणाम?

डॉ. नायडू पुढे गंभीर गोष्ट सांगतात की, सतत जाणवणाऱ्या शारीरिक थकव्यामागील सर्वांत सामान्य कारणांपैकी एक म्हणजे थायरॉईड ग्रंथीची कमी क्रियाशीलता (हायपोथायरॉईडीझम). त्याची दैनंदिन लक्षणे वाढत्या वयाशी संबंधित सामान्य लक्षणांसारखीच असल्याने अनेक रुग्ण वर्षानुवर्षे कोणाचाही वैद्यकीय सल्ला घेत नाहीत.

डॉ. नायडूंच्या मते, थायरॉईड ग्रंथी शरीराच्या चयापचय प्रक्रियेचे नियमन करणारी महत्त्वाची ग्रंथी आहे. शरीरातील ऊर्जानिर्मिती आणि तिचा वापर नियंत्रित करण्यात तिची महत्त्वाची भूमिका असते. मात्र, थायरॉईड संप्रेरकांची पातळी कमी झाल्यास शरीराची चयापचय प्रक्रिया मंदावू लागते आणि परिणामत: व्यक्तीला सतत थकवा आणि सुस्ती जाणवू लागते.

हायपोथायरॉईडीझमची इतर प्रमुख लक्षणे म्हणजे एकाग्रता राखण्यात अडचण येणे, अनपेक्षितपणे वजन वाढणे, तसेच थंडीबाबतची संवेदनशीलता वाढणे. नायडूंनी पुढे इशारा देत म्हटले की, लोकांना वाटते की, ही लक्षणे कामाच्या अतिभारामुळे किंवा वाढत्या वयामुळे दिसू लागतात; पण प्रत्यक्षात ती टप्प्याटप्प्याने विकसित होत असतात. ज्यांच्या शरीरात थायरॉईडचे असंतुलन असते; परंतु त्यांनी उपचार घेतले नाहीत, तर त्यांना सतत अशक्तपणा, मन:स्थितीत बदल यांसारख्या आरोग्य समस्या जाणवू लागतात. त्यानंतर त्यांना त्या आजाराचे निदान होते.

मात्र, सततच्या थकव्यामागे केवळ थायरॉईडच जबाबदार नसतो. आधुनिक जीवनशैलीतील वाढता ताणही शरीराच्या दैनंदिन सतर्कतेवर परिणाम करीत असल्याचे तज्ज्ञ सांगतात. दीर्घकाळ मानसिक तणावाखाली राहिल्याने शरीराच्या सतर्कता आणि ऊर्जेचे नियमन करणाऱ्या यंत्रणेवर परिणाम होतो. परिणामी, अनेक जण दिवसभर थकवा आणि रात्री झोप न लागणे या चक्रात अडकतात.

डॉ. नायडू यांच्या मते, ताणाला शरीराकडून मिळणारा हार्मोनल प्रतिसाद हा सततच्या थकव्यामागील गंभीर कारण ठरतो. अधिवृक्क (Adrenal) ग्रंथींकडून तयार होणारे कॉर्टिसोल हे ताणाला प्रतिसाद देणारे प्रमुख हार्मोन असून, शरीराची सतर्कता, ऊर्जा आणि कार्यक्षमता टिकवून ठेवण्यात त्याची महत्त्वाची भूमिका असते. मात्र, दीर्घकालीन ताण, झोपेतील व्यत्यय आणि सततचा मानसिक दबाव यांमुळे कॉर्टिसोलच्या नैसर्गिक उत्पादनात बिघाड होऊ शकतो. अशा परिस्थितीत दिवसा प्रचंड थकवा जाणवणे आणि रात्री झोपेच्या समस्या निर्माण होणे ही लक्षणे दिसून येतात.

डॉ. नायडू यांच्या मते, कॉर्टिसोलचे असंतुलन दीर्घकाळ कायम राहिल्यास त्याचे परिणाम केवळ झोपेपुरते मर्यादित राहत नाहीत. त्यामुळे शारीरिक ऊर्जा घटणे, भावनिक अस्थिरता वाढणे आणि मानसिक गोंधळ निर्माण होणे अशा विविध समस्या उद्भवू शकतात. याचाच परिणाम म्हणून या काळात अनेक लोकांना चिडचिड, एकाग्रतेचा अभाव, डोकेदुखी किंवा गोड पदार्थ खाण्याची तीव्र इच्छा यांसारखे त्रास होतात.

लिंगाधारित फरक काय?

हार्मोनल थकव्याची लक्षणे प्रत्येक व्यक्तीत सारखी दिसून येत नाहीत. विशेषतः महिलांमध्ये आयुष्याच्या विविध टप्प्यांवर होणारे हार्मोनल बदल त्यांच्या शारीरिक ऊर्जेवर थेट परिणाम करू शकतात. त्यामुळे महिलांना हार्मोनल थकव्याचा धोका तुलनेने अधिक असू शकतो, असे डॉ. नायडू यांनी सांगितले.

त्यांच्या मते, मासिक पाळी, गर्भधारणा, पेरीमेनोपॉज व मेनोपॉज हे महिलांच्या आयुष्यातील असे महत्त्वाचे टप्पे आहेत, ज्यावेळी इस्ट्रोजेन आणि जेस्टेरॉन या संप्रेरकांच्या पातळीत चढ-उतार होत असतात. या हार्मोनल बदलांचा परिणाम शरीराची ऊर्जा पातळी आणि मानसिक आरोग्य यांवरही होऊ शकतो, असेही त्यांनी नमूद केले.

या काळात अनेक महिलांना झोपेच्या समस्या, दैनंदिन कामांमध्ये रस कमी होणे, सतत थकवा जाणवणे तसेच मनःस्थितीत वारंवार बदल होणे यांसारखी लक्षणे जाणवू लागतात. त्यामुळे अशा लक्षणांकडे केवळ तात्पुरती समस्या म्हणून न पाहता, त्यामागील हार्मोनल कारणांचा विचार करणे गरजेचे असल्याचे डॉ. नायडू यांनी स्पष्ट केले. त्यातच पॉलीएंडोक्राइन मेटाबोलिक ओव्हेरियन सिंड्रोम (PMOS) सारख्या स्थितीत चयापचयाच्या बिघाडामुळे ही समस्या आणखी वाढते. विशेषत: जेव्हा सामान्य पौष्टिक आहाराची कमरतरता असते, तेव्हा इन्सुलिन प्रतिरोध निर्माण होऊन हार्मोन्स असंतुलित होतात, असेही नायडू म्हणाले.

वैद्यकीय मदत कधी घ्यावी?

सतत जाणवणाऱ्या थकव्याकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते. कारण- कालांतराने त्याचा परिणाम व्यक्तीच्या एकूण जीवनमानावर होऊ शकतो, असा इशारा डॉ. भानू प्रवीण नायडू यांनी दिला. त्यांच्या मते, हा थकवा केवळ शारीरिक पातळीपुरता मर्यादित राहत नाही; तर कामातील कार्यक्षमता, एकाग्रता, भावनिक संतुलन आणि दैनंदिन जीवनावरही त्याचा परिणाम होतो.

डॉ. नायडू यांच्या मते, अशा समस्यांचे निदान करण्यासाठी अनेकदा साध्या वैद्यकीय तपासण्याच पुरेशा ठरतात. थायरॉईड कार्यक्षमता चाचणी, रक्तातील साखरेची तपासणी, जीवनसत्त्वांच्या कमतरतेचे निदान, तसेच हार्मोन्सची पातळी मोजणाऱ्या चाचण्यांमधून महत्त्वाची माहिती मिळू शकते.

वेळेत निदान झाल्यास बहुतेक हार्मोनल विकारांवर प्रभावी उपचार उपलब्ध आहेत. त्यामुळे पुरेशी झोप आणि विश्रांती घेतल्यानंतरही थकवा कायम राहत असल्यास त्याकडे केवळ जीवनशैलीचा परिणाम म्हणून न पाहता, वैद्यकीय तपासणी करून घेणे गरजेचे असल्याचे डॉ. नायडू यांनी नमूद केले. प्राथमिक निदान पूर्ण केल्यानंतर बहुतेक हार्मोनल आजार उपचार करण्यायोग्य बनतात, असेही त्यांनी स्पष्ट केले.