पार्थसारथी श्रीनिवासन ऊर्फ कमल हासन सध्या कर्नाटक भाषकांच्या टीकेचे लक्ष्य बनले आहेत. कन्नड भाषेची उत्पत्ती तमिळमधून झाली या त्यांच्या वक्तव्याने वाद सुरू झाला. कमल हासन हे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आदरणीय नाव. विशेषत: तमिळमध्ये त्यांची अभिनेते, निर्माते आणि आता राजकीय नेते अशी ७० वर्षीय हासन यांची वाटचाल सुरू आहे. ‘ठग लाइफ’ या चित्रपटापूर्वीच त्यांच्या भाषेबाबतच्या वक्तव्याने वाद रंगला. कर्नाटकमध्ये चित्रपट प्रदर्शनास नकार देण्यात आला. तर वक्तव्याचा विपर्यास केल्याचा दावा हासन यांनी केला. यातून विरोधकांच्या इंडिया आघाडीतील पक्षांमध्येच तेढ निर्माण झाली. विशेषत तमिळनाडूत द्रमुक व कर्नाटकमध्ये काँग्रेस अशी मित्रपक्षांचीच सरकारे आहेत. कर्नाटकातील चित्रपट प्रदर्शनाच्या वादात कोट्यवधींचा आर्थिक फटकाही त्यांना बसला. देशभरात अन्यत्र हा चित्रपट प्रदर्शित झाला. वाद कर्नाटक उच्च न्यायालयात गेल्यावर न्यायालयाने कमल हासन यांना माफी मागण्यास सांगितले. मात्र त्यांनी दिलगिरी व्यक्त करण्यास नकार देत कर्नाटकमध्ये हा चित्रपट प्रदर्शित न करण्यास सहमती दर्शवली.
उमेदवारी अर्ज लांबणीवर
कमल हासन हे तमिळनाडूतून राज्यसभेसाठी सोमवारी अर्ज दाखल करणार होते. मात्र चित्रपट प्रदर्शित झाल्यावर ते अर्ज भरतील असे चित्र आहे. हासन यांचा मक्कमल निधी मय्यम हा पक्ष तमिळनाडूतील सत्तारूढ आघाडीत आहे. लोकसभा निवडणुकीत (२०२४) मध्ये त्यांनी द्रमुकला पाठिंबा दिला. त्या बदल्यात राज्यसभेची एक जागा कमल हासन यांना देण्याचे मान्य केल्यानुसार द्रमुकने राज्यातील त्यांना मिळणाऱ्या चार जागांपैकी एका जागेवर हासन यांच्या पक्षाला संधी दिली. यातून त्यांचा राज्यसभेत पर्यायाने संसदेत जाण्याचा मार्ग मोकळा झाला. मात्र आता त्यांच्या वक्तव्याने वादाची ठिणगी पडली. कर्नाटकमधील सत्ताधारी काँग्रेसच्या मंत्र्यांनी कमल हासन यांच्यावर टीकास्त्र सोडले. ९ जूनपर्यंत राज्यसभेसाठी अर्ज दाखल करायचा आहे. आता हासन यांच्या अर्ज दाखल करण्याबाबतच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे.
भाजपचे कडवे टीकाकार
भारतीय जनता पक्षाचे कडवे वैचारिक विरोधक अशी कमल हासन यांची अलीकडची ओळख. तमिळनाडूत २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत दक्षिण कोईम्बतूर मतदारसंघात भाजपच्या महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्ष वानिती श्रीनिवासन यांच्याकडून अवघ्या १७०० मतांनी ते पराभूत झाले. मात्र येथे त्यांच्या पक्षाची ताकद यातून दिसून आली. यामुळेच २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरोधात मतविभागणी टाळण्यासाठी हासन यांचा पाठिंबा द्रमुकचे सर्वेसर्वा व तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के.स्टॅलीन यांनी घेतला. त्याचा फायदाही झाला. एकीकडे द्रमुकच्या नेतृत्वाखालील आघाडी राज्यात भक्कम असताना, भाजप आघाडी व अण्णा द्रमुक स्वतंत्र लढले. परिणामी राज्यातील सर्व ३९ जागा द्रमुकच्या नेतृत्वातील आघाडीने लोकसभेला पटकावल्या.
सामाजिक कार्यात अग्रेसर
दक्षिणेत अफाट लोकप्रियतेच्या जोरावर अभिनेते राजकारणात प्रवेश करतात. कमल हासनही त्याला अपवाद नाहीत. मात्र चाहत्यांनी स्थापन केलेल्या फॅन क्लबचे रूपांतर त्यांनी कमल नारपानी इय्यकम या संस्थेत करत सामाजिक कार्य सुरू केले. असा उपक्रम सुरू करणारे ते पहिलेच तमिळ अभिनेते. स्वच्छ भारत अभियानातही त्यांनी योगदान दिले. सामाजिक कार्याबद्दल त्यांना विविध पुरस्काराने गौरवण्यात आले. मदुराईमध्ये २१ फेब्रुवारी २०१८ रोजी मक्कल निधी मय्यम (एमएनएम) पक्षाची स्थापना केली. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी ३७ जागा लढविल्या. मात्र एकाही ठिकाणी यश मिळाले नाही तर पावणे चार टक्के मते मिळाली. तमिळनाडूत द्रमुक विरुद्ध अण्णा द्रमुक यांच्या संघर्षात डाळ शिजणार नाही असे ओळखून त्यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत द्रमुकला पाठिंबा दिला.
भूमिकेवर ठाम
कन्नड भाषेवरून वाद झाल्यावर बुधवारी पहिल्यांदा त्यांनी पत्रकार परिषद घेत तमिळ म्हणून बोलण्यासारखे खूप आहे, मात्र नंतर संवाद साधेन असे नमूद केले. तसेच पाठीशी उभे राहिल्याबद्दल तमिळनाडूच्या जनतेचे त्यांनी आभार मानले. एकूणच भूमिकेवर ठाम असल्याचे सूचित केले तसेच राज्यातील जनतेला साद घातली. आपल्याकडे भाषेच्या मुद्द्यावर तीव्र भावना आहेत. त्यामुळेच त्यांच्या वक्तव्यावर कर्नाटकमधून लगेचच तीव्र प्रतिक्रिया उमटली. त्यातही कमल हासन यांचे दक्षिणेतील चित्रपट सृष्टीतील स्थान ध्यानात घेता याचे गांभीर्य वाढले. आता तर राज्यसभेतील त्यांच्या संभाव्य प्रवेशाने त्याची तीव्रता वाढली. चित्रपटसृष्टीत अफाट लोकप्रियता मिळवली असली तरी, राजकारणात हासन यांना विशेष यश मिळाले नाही. आता द्रमुकच्या सहकार्याने राजकीय क्षेत्रात आगेकूच करण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो. आता हा वाद कसा शमवतात यातच त्यांचे कसब असेल.