सहकारी बँकांवर सलग १० वर्षे संचालक असणाऱ्यांना पुढील कालावधीसाठी निवडणूक लढण्यास व बँकांवर काम करण्यास अपात्र ठरवण्याचे धोरण भारतीय रिझर्व्ह बँकेने आणले. पदावर ठाण मांडून असलेल्या काही संचालकांनी याविरोधात न्यायालयांची पायरी देखील चढली. मात्र, उच्च व सर्वोच्च न्यायालयांनीही धोरणावर शिक्कामोर्तब केले. २९ जून २०२०पासूनच ही तरतूद लागू असून त्यामध्ये २५ मे २०२६ रोजी रिझर्व्ह बँकेने नव्याने सुधारणा निर्देश दिले. त्यानंतरही अनेक जिल्हा मध्यवर्ती आणि नागरी सहकारी बँकांवर सलग १० वर्षांचा कार्यकाळ झाला असतानाही नियमबाह्य पद्धतीने संचालक पदावर कायम आहेत.
सहकारी बँकांची स्थिती व तरतूद काय?
आरबीआय आणि नाबार्डच्या अहवालानुसार, देशभरात ३५२ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, तर १,४५७ नागरी सहकारी बँका आहेत. महाराष्ट्रात एकूण ३१ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, तर शेकडो नागरी सहकारी बँका कार्यरत आहेत. या बँकामध्ये सत्ता विशिष्ट संचालकांमध्येच केंद्रित होऊ नये, मक्तेदारी संपुष्टात येण्यासह इतरांनाही समान संधी मिळण्यासाठी केंद्र सरकारने बँकिंग नियमन कायद्यात सुधारणा केली. सहकारी बँकेमध्ये सलग १० वर्षे किंवा त्याहून अधिक काळ संचालक राहिलेल्या व्यक्तींना अपात्र ठरवितांना आगामी निवडणूक लढविण्यास सुद्धा अपात्र ठरविण्याची तरतूद केली आहे.
संचालकांच्या सलग कार्यकाळाची कमाल मर्यादा किती? कधीपासून लागू झाली?
रिझर्व्ह बँकेने २८ नोव्हेंबर २०२५ रोजी भारतीय रिझर्व्ह बँक (शहरी सहकारी बँका – प्रशासन) निर्देश, २०२५ जारी केले होते. या निर्देशांच्या प्रकरण-२ मध्ये संचालक मंडळाची रचना आणि संचालकांच्या नियुक्तीसंबंधी तरतुदी आहेत. बँकिंग नियमन (सुधारणा) अधिनियम, २०२० ने बँकिंग नियमन अधिनियम, १९४९ च्या कलम १० अ (२अ) (i) प्राथमिक (शहरी) सहकारी बँकांना लागू केले गेले. त्यात संचालकांच्या सलग कार्यकाळावर कमाल मर्यादा निश्चित केली. ही तरतूद २९ जून २०२०पासून नागरी सहकारी बँकांसाठी लागू झाली. या तरतुदीत पुढे बँकिंग कायदे (सुधारणा) अधिनियम, २०२५द्वारे सुधारणा करून नागरी सहकारी संस्थांच्या संचालकांचा कमाल सलग कार्यकाळ आठ वर्षांवरून १० वर्षांपर्यंत वाढवण्यात आला आणि ही सुधारित तरतूद १ ऑगस्ट २०२५ रोजी लागू झाली.
संचालकांनी कोणत्या पळवाटा शोधल्या? नवे निर्देश काय?
संचालक कायद्यातील तरतुदींना बगल देण्यासाठी पळवाटा शोधून त्याचा अवलंब करीत असल्याचे प्रकार समोर आले. पदावरून थोड्या काळासाठी राजीनामा देणे आणि अल्पावधीतच संचालक मंडळावर पुन्हा निवडून येणे किंवा सह-निवडून येण्याचे प्रकार झाले. त्यामुळे कायद्याने परवानगी असलेल्या कार्यकाळापेक्षा जास्त काळ नागरी सहकारी संस्थेच्या संचालक मंडळावर ते राहिले. वैधानिक तरतुदीचा हेतू आणि मूळ उद्देशालाच हरताळ फासली. या प्रकारावर आळा बसण्यासाठी इतर सर्व तरतुदी व कायद्यांचा वापर करून सुधारणा निर्देश जारी केले आहेत.
रिझर्व्ह बँकेचे सुधारणा निर्देश कोणते? ‘कुलिंग-ऑफ’ कालावधी म्हणजे काय?
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मुख्य महाव्यवस्थापकांनी (शहरी सहकारी बँका-प्रशासन) सुधारणा निर्देश २५ मे २०२६ रोजी जारी केले. शहरी सहकारी बँकेच्या संचालक मंडळावरील संचालक, पदावर सलग दहा वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर, किमान तीन वर्षांचा ‘कुलिंग-ऑफ’ कालावधी पूर्ण केल्यावरच, निवडणुकीद्वारे, सह-निवडीद्वारे किंवा इतर कोणत्याही प्रकारे, त्याच संचालक मंडळावर संचालक म्हणून पुनर्नियुक्तीसाठी पात्र असेल. ‘कुलिंग-ऑफ’ कालावधी दरम्यान सदस्य किंवा ग्राहक या नात्याव्यतिरिक्त इतर कोणत्याही प्रकारे बँकेच्या संबंधित राहता येणार नाही. हे निर्देश तत्काळ प्रभावाने लागू केले आहेत.
कार्यकाळ कसा मोजला जाईल? सुधारणा निर्देशानंतर चित्र काय?
सलग कार्यकाळाचा कालावधी मोजण्यासाठी संचालक मंडळावर काम केलेला एकूण कालावधी विचारात घेतला जाईल. त्यात तीन वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या खंडनापूर्वीच्या संचालकपदाच्या कालावधीचा समावेश असेल, मात्र तो कालावधी वगळला जाईल, असे रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले. या निर्देशानंतर अनेक वर्षांपासून बँकांच्या संचालक पदावर चिकटून असलेल्यांना मोठा धक्का बसला. हे सुधारित निर्देश आल्यानंतरही अनेक नागरी सहकारी बँकांच्या मंडळामध्ये सलग १० वर्षांपेक्षा अधिक कालावधी झालेले संचालक अद्यापही कार्यरत आहेत. या प्रकारावर रिझर्व्ह बँकेच्या पुढील भूमिकेकडे बँकिंग वर्तुळाचे लक्ष राहील.
prabodh.deshpande@expressindia.com
