देशांतर्गत बाजारपेठेत आंतरराष्ट्रीय स्तरावरील आर्थिक व राजकीय घडामोडीनंतर सोने,चांदी सारख्या मौल्यवान धातुंच्या किमतीत वाढ होण्याऐवजी घसरण नोंदवली गेली आहे. त्यानंतर तांबे, पितळ, लोखंड तसेच इतर औद्योगिक धातुंच्या किमतींवरही दबाव निर्माण झाल्याचे चित्र आहे.
धातू बाजाराची सद्यःस्थिती कशी?
जागतिक व्यापारातील बहुतांश व्यवहार अमेरिकन डॉलरमध्ये होत असल्याने डॉलरचे मूल्य वाढल्यास इतर देशातील चलनांच्या माध्यमातून वस्तू खरेदी करणे ग्राहकांसाठी अधिक महाग ठरते. अशा परिस्थितीत मागणी कमी झाल्याने तांबे, पितळ, अॅल्युमिनियम, लोखंड यांसारख्या औद्योगिक धातुंवरही दबाव संभवतो. प्रसंगी त्यांच्या किमती स्थिर राहतात किंवा काही प्रमाणात घटही होऊ शकते. सध्याच्या आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढलेल्या भू-राजकीय तणावांचा धातू बाजारावरही परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे.
अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील तणावपूर्ण परिस्थितीमुळे जागतिक बाजारपेठेत अनिश्चितता निर्माण झाल्यानंतर देशांतर्गत बाजारपेठांना भीती आहे, की हा तणाव आणखी वाढल्यास जागतिक व्यापार, पुरवठा साखळी आणि आर्थिक क्रियाकलापांवर परिणाम होऊन त्याचा थेट परिणाम औद्योगिक धातुंच्या मागणीवर आणि दरावर होईल.
देशांतर्गत धातुंचे दर कसे?
देशांतर्गत बाजारपेठेत साधारण दोन महिन्यांपूर्वी तांबे, पितळ, लोखंड या काही धातुंच्या किमतीमध्ये काही प्रमाणात वाढ झाली होती. मात्र, त्यानंतर बाजारातील मागणी मंदावल्यामुळे दर पुन्हा स्थिरावले आहेत. सध्या बाजारात मोठ्या प्रमाणावर खरेदी होत नसल्यामुळे खरेदी विक्रीचे व्यवहार मर्यादित स्वरूपात सुरू आहेत. उद्योग धंदे, इलेक्ट्रिकल साहित्य निर्मिती तसेच बांधकाम क्षेत्राची मागणी कमी असल्यामुळे धातू बाजारात फारशी हालचाल दिसून आलेली नाही. किरकोळ बाजारात सध्या शुद्ध तांब्याचा दर प्रतिकिलो साधारण १८०० ते २००० रुपयांच्या दरम्यान आहे. तर मोड तांब्याचा दर ९०० ते ९५० रुपये प्रतिकिलोपर्यंत आहे. पितळ धातूच्या दरामध्येही स्थिरता कायम असून, शुद्ध पितळाचा दर सध्या प्रतिकिलो ११५० ते १३०० रुपये इतका आहे. मोड पितळाचा दर सुमारे ६०० रुपये प्रतिकिलोपर्यंत आहे. लोखंडाच्या दरातही गेल्या काही आठवड्यांपासून स्थिरता कायम आहे. सध्या लोखंडाचा दर प्रतिक्विन्टल ५७०० ते ५८०० रुपये इतका आहे, तर भंगार लोखंडाचा दर ३००० ते ३२०० रुपये प्रतिक्विन्टलपर्यंत आहे. बांधकाम क्षेत्रात लोखंडाची मोठ्या प्रमाणावर मागणी असते. मात्र सध्या बांधकाम प्रकल्प मंदावल्यामुळे लोखंडाच्या मागणीतही काही प्रमाणात घट झाल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
भंगार बाजारावरही मंदीचे सावट?
धातू बाजारात भंगार बाजारालासुद्धा महत्त्वाचे स्थान असते. साधारणपणे भंगार धातुंच्या दरात वाढ झाली तर शुद्ध धातुंच्या दरात वाढ होण्याची शक्यता निर्माण होते. परंतु सध्या भंगार बाजारात अपेक्षित हालचाल दिसून आलेली नाही. भंगार धातुंचे दरही स्थिर असल्यामुळे शुद्ध धातुंच्या बाजारात मोठे चढउतार होताना दिसून आलेले नाहीत. व्यापाऱ्यांच्या मते आंतरराष्ट्रीय पातळीवरील काही घडामोडींमुळे सोने आणि चांदीच्या दरांमध्ये मोठे चढउतार होत आहेत. मात्र, औद्योगिक वापरासाठी उपयोगात येणारे तांबे, पितळ आणि लोखंड या धातुंवर त्याचा थेट परिणाम झालेला नाही. त्यामुळे स्थानिक बाजारात या धातुंचे दर स्थिर राहिले आहेत. सध्या बाजारातील परिस्थिती पाहता धातुंच्या तात्काळ दरवाढ होण्याची शक्यता कमी आहे. मात्र एप्रिलनंतर बांधकाम आणि औद्योगिक क्षेत्रातील मागणी वाढल्यास तांबे, पितळ, लोखंड या धातुंच्या मागणीत वाढ होऊ शकते.
व्यापारी, गुंतवणूकदारांची भूमिका?
विशेषतः तांबे हा औद्योगिक क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाचा धातू मानला जातो. पायाभूत सुविधा प्रकल्प, वीज निर्मिती आणि वितरण व्यवस्था, इलेक्ट्रिकल वायरिंग, मोटार उद्योग, इलेक्ट्रॉनिक उपकरणे तसेच विविध उत्पादन उद्योगांमध्ये तांब्याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेतील हालचालींचा तांब्याच्या मागणीवर थेट परिणाम होतो.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये इराण आणि अमेरिका यांच्यात शांतता चर्चेचा प्रयत्न झाल्याच्या काही बातम्या समोर आल्या होत्या. मात्र, अशा चर्चेच्या बातम्या नंतर फेटाळून लावण्यात आल्याचे सांगण्यात आले. या परस्परविरोधी बातम्यांमुळे जागतिक आणि देशांतर्गत बाजारपेठेत संभ्रम आणि अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. गुंतवणूकदार आणि व्यापारी परिस्थिती सुरळीत होण्याची वाट पाहत आहेत. धातू बाजारात कोणताही व्यवहार करताना सध्या सावध भूमिका घेतली जात असल्याचे दिसून येत आहे.
चीनच्या हालचालींकडे लक्ष
तांब्याच्या जागतिक बाजारपेठेत चीनची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जाते. कारण चीन हा जगातील सर्वात मोठा तांब्याचा वापरकर्ता देश आहे. चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा प्रकल्प, औद्योगिक उत्पादन तसेच तंत्रज्ञान क्षेत्रातील गुंतवणूक होत असल्यामुळे तांब्याची मागणीही मोठ्या प्रमाणावर असते. परिणामी, चीनकडून येणाऱ्या कोणत्याही आर्थिक धोरणांमुळे किंवा गुंतवणुकीच्या निर्णयांमुळे जागतिक तांबे बाजारावर परिणाम होतो. तज्ज्ञांच्या मते, जर चीनने पायाभूत सुविधांसह हरित ऊर्जा, इलेक्ट्रिक वाहन उद्योग आणि तंत्रज्ञान क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक वाढवली, तर भविष्यात तांब्याच्या मागणीत वाढ होऊ शकते. त्यामुळे जागतिक बाजारात तांब्याच्या किमतींना काही प्रमाणात आधार मिळण्याची शक्यता आहे. मात्र सध्या मजबूत अमेरिकन डॉलर, भू-राजकीय तणाव, जागतिक अर्थव्यवस्थेतील अनिश्चितता आणि औद्योगिक मागणीतील घट या घटकांमुळे तांब्याचा बाजार काहीसा दबावाखाली असल्याचे चित्र आहे.
patil.jitendra@expressindia.com
