तांब्याच्या दरवाढीमुळे सोने आणि चांदीसारख्या मौल्यवान धातूंच्या दरावर परिणाम होणार का, असा प्रश्न गुंतवणूकदारांना सध्या पडला आहे. त्याचा हा आढावा.

तांब्याचे महत्त्व कशामुळे वाढले?

तांबे हा प्रामुख्याने औद्योगिक क्षेत्राचा कणा मानला जाणारा धातू आहे. हरित ऊर्जेचा वाढता वापर, इलेक्ट्रिक वाहनांचा झपाट्याने होत असलेला प्रसार तसेच विकसनशील देशांमध्ये पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी होत असलेली मोठ्या प्रमाणातील गुंतवणूक यामुळे तांब्याची मागणी सातत्याने वाढत आहे. ऊर्जा, वाहतूक आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील बदलांमुळे या धातूचे महत्त्व अधिक ठळक झाले आहे. मात्र, मागणीच्या तुलनेत तांब्याचा पुरवठा अपेक्षित वेगाने वाढू शकलेला नाही. अनेक देशांमध्ये खाणींचे उत्पादन मर्यादित राहिले असून, राजकीय अस्थिरता, कठोर पर्यावरणीय धोरणे आणि नव्या खाण प्रकल्पांना होणारा विलंब यामुळे उत्पादन क्षमतेवर परिणाम झाला आहे. त्यातच जागतिक पुरवठा साखळीतील अडथळ्यांमुळे तांब्याची उपलब्धता आणखी कमी झाली आहे. या सर्व घटकांमुळे मागणी आणि पुरवठ्यातील तफावत वाढली असून, त्याचा थेट परिणाम तांब्याच्या किमतींवर दिसून येत असल्याचे बाजारातील जाणकार सांगतात.

नकली दागिन्यांमध्ये तांब्याचा वापर?

सोन्याच्या किमती सातत्याने वाढत असल्याने सर्वसामान्य ग्राहकांपासून गुंतवणूकदारांपर्यंत अनेकांच्या खरेदीच्या सवयी आता बदलताना दिसत आहेत. सोन्याच्या दरांनी विक्रमी पातळी गाठल्यामुळे नकली व अलंकारिक दागिन्यांच्या मागणीत मोठी वाढ झाली असून, या दागिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर तांब्याचा वापर केला जात आहे. परिणामी, तांब्याच्या वापरात आणि मागणीत लक्षणीय वाढ नोंदवली जात आहे, असे बाजारातील जाणकार सांगतात. परंपरागतपणे सोन्याला सामाजिक आणि सांस्कृतिक महत्त्व असले, तरी वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्य ग्राहकांसाठी ते अधिक महागडे ठरत आहे. याच पार्श्वभूमीवर कमी किमतीत आकर्षक दिसणारे नकली दागिने मोठ्या प्रमाणावर बनवले जात आहेत. या दागिन्यांचा मुख्य घटक तांबे असल्याने, दागिन्यांच्या उद्योगात तांब्याची मागणी वाढली आहे. लग्नसमारंभ, सण-उत्सव आणि दैनंदिन वापरासाठी नकली दागिन्यांना वाढता प्रतिसाद मिळत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

तांब्यातही चढ उताराची जोखीम?

सोने आणि चांदी पारंपरिक सुरक्षित गुंतवणुकीचे आश्रयस्थान मानले जातात. आर्थिक मंदीसह भूराजकीय तणाव, महागाई किंवा शेअर बाजारातील अस्थिरता वाढली की गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणावर या मौल्यवान धातूंमध्ये गुंतवणूक करतात. मात्र, सध्या जागतिक अर्थव्यवस्थेत औद्योगिक पुनरुज्जीवनाची चिन्हे दिसत असल्याने आणि विकासाशी निगडित धातूंना मागणी वाढत असल्याने काही प्रमाणात गुंतवणूक तांब्यासारख्या औद्योगिक धातूंकडे वळताना दिसत आहे. त्यामुळे अल्पकालीन कालावधीत सोने आणि चांदीच्या किमतींवर दबाव येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तथापि, बाजार विश्लेषकांच्या मते तांबे आणि सोने-चांदी यांची भूमिका वेगळी आहे. तांब्याची वाढ ही प्रामुख्याने आर्थिक वाढ आणि औद्योगिक मागणीचे द्योतक आहे, तर सोने आणि चांदी अजूनही जोखीम व्यवस्थापनासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. अर्थात, दरातील चढउताराची जेवढी जोखीम सोने आणि चांदीत आहे, तेवढी तांब्यातही असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. कारण, सोने-चांदी प्रमाणेच दर वाढल्यानंतर गुंतवणूकदार नफा वसुलीसाठी तांब्याची सुद्धा विक्री करतात.

तांब्याची आंतरराष्ट्रीय स्थिती कशी?

जगातील सर्वात मोठा तांबे उत्पादक देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिलीची तांबे निर्यात जानेवारी २०२६ मध्ये ४.५५ अब्ज डॉलर्सवर पोहोचली असून, ही रक्कम मागील वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत ७.९ टक्क्यांनी अधिक आहे. प्रथमदर्शनी ही आकडेवारी चिलीच्या तांबे क्षेत्राची मजबुती दर्शवित असली, तरी या महसूल वाढीमागे उत्पादनातील वाढ नसून केवळ किमतींमधील तीव्र वाढ कारणीभूत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे निर्यात मूल्य आणि प्रत्यक्ष उत्पादन यामधील वाढता फरक बाजारासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. उपलब्ध माहितीनुसार, जानेवारी २०२६ मध्ये तांब्याच्या सरासरी किमतींमध्ये जानेवारी २०२५ च्या तुलनेत तब्बल ३४ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली. याच किमतींच्या वाढीमुळे निर्यात महसूल वाढलेला दिसतो. मात्र, तांब्याच्या प्रत्यक्ष उत्पादनात सातत्याने घट होत असून २०२५ च्या अखेरीस सलग पाच महिने उत्पादनात घसरण नोंदवली गेली आहे. म्हणजेच अधिक तांबे निर्यात झाल्यामुळे नव्हे तर महाग दरांमुळे चिलीला जास्त महसूल मिळत आहे, हे चित्र समोर आले आहे.

चिलीसमोर कोणती आव्हाने?

चिलीचा जागतिक तांबे बाजारातील वाटा अजूनही भक्कम स्थितीत असून, जगातील उत्खनन केलेल्या एकूण तांब्यापैकी सुमारे एक चतुर्थांश हिस्सा चिलीचा आहे. मात्र, उत्पादनातील सततची घट ही दीर्घकालीन दृष्टीने धोक्याची घंटा मानली जात आहे. निर्यात महसूल आणि उत्पादन खंडांमधील वाढता फरक हा पुरवठा-बाजूच्या समस्यांना किमतींच्या वाढीमुळे तात्पुरते झाकले जात असल्याचे दर्शवतो. ३४ टक्के किंमत प्रीमियममुळे कमी झालेल्या टनेजची भरपाई होत असली तरी हा उपाय कायमस्वरूपी ठरू शकत नाही. जागतिक पातळीवर हरित ऊर्जा, इलेक्ट्रिक वाहने आणि पायाभूत सुविधांमुळे तांब्याची मागणी वाढत असताना, चिलीतील उत्पादन मर्यादा अधिक गंभीर ठरू शकतात. बाजारातील नेतृत्व टिकवण्यासाठी उत्पादनवाढीवर लक्ष केंद्रित करणे चिलीसमोर मोठे आव्हान ठरणार आहे.

भारतात तांब्याचे दर असे (प्रति किलो)

● शुद्ध तांबे (बार) – २००० रुपये

● तांब्याची भांडी – १८०० रुपये

● मोड – ९०० रुपये

patil.jitendra@expressindia.com