Corona Cicada Variant BA.3.2 Symptoms : पश्चिम आशियात युद्धाचा वणवा पेटला असतानाच करोनाच्या नव्या व्हेरिएंटने जगभरातील अनेक देशांत धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. या नवीन व्हेरिएंटला ‘सिकाडा’ असे नाव देण्यात आले असून, अमेरिकेसह २० देशांत त्याचे रुग्ण आढळून आले आहेत. सध्या जागतिक आरोग्य संघटना आणि अमेरिकेची सीडीसी आरोग्य संस्था या व्हेरिएंटवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. जगभरातील वाढती रुग्णसंख्या पाहता भारत सरकारनेही खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर करोनाचा हा नवीन व्हेरिएंट नेमका किती घातक आहे? त्याबाबत तज्ज्ञांचे मत काय? त्याला रोखण्यासाठी केंद्र सरकारने काय उपाययोजना लागू केल्या? त्याविषयीचा आढावा…
करोनाचा नवा व्हेरिएंट किती घातक?
करोनाच्या या नव्या विषाणूला ‘BA.3.2’ असे नाव देण्यात आले आहे. अमेरिकेच्या ‘सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन’ या संस्थेने आपल्या साप्ताहिक अहवालात त्याच्या वाढत्या धोक्याची पुष्टी केली आहे. BA.3.2 विषाणूचे पहिले प्रकरण नोव्हेंबर २०२४ मध्ये दक्षिण आफ्रिकेत आढळून आले होते, त्यानंतर २०२५ मध्ये त्याचा प्रसार वेगाने वाढू लागला. संशोधकांनी या विषाणूला ‘सिकाडा’ असे टोपणनाव दिले आहे, जे एका कीटकावर आधारित आहे. हा विषाणू प्रत्यक्षात समोर येण्यापूर्वी दीर्घकाळ ‘सुप्त अवस्थेत’ भूमिगत राहिला असावा, असा अंदाज संशोधकांनी व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे या विषाणूमध्ये तब्बल ७० ते ७५ उत्परिवर्तने (म्युटेशन्स) आढळून आली आहेत. इतर कोणत्याही विषाणूंच्या तुलनेत ही संख्या खूप जास्त असल्याने तो अत्यंत संसर्गजन्य मानला जात आहे.
नव्या व्हेरिएंटची लक्षणे कोणती?
जगभरात वेगाने पसरणाऱ्या करोनाच्या नव्या विषाणूची लक्षणे आणि त्यावर लसींच्या होणाऱ्या परिणामांबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, घशातील तीव्र खवखव हे ‘BA.3.2’ विषाणूचे प्रमुख लक्षण आहे. त्याशिवाय नाक बंद होणे किंवा सर्दी, सतत खोकला, ताप किंवा थंडी वाजणे, तोंडाची चव जाणे, थकवा, स्नायूचे दुखणे, डोकेदुखी, मळमळ आणि उलट्या होणे, जुलाब लागणे, श्वास घेण्यास त्रास होणे अशीही लक्षणे दिसून येतात. या विषाणूवर लसीकरण कितपत प्रभावी ठरेल, हा सध्या सर्वांत मोठा प्रश्न आहे. काही संशोधकांच्या मते, सुदैवाने सध्या प्रचलित असलेल्या इतर विषाणूंपेक्षा ‘BA.3.2’ हा अधिक घातक किंवा जीवघेणा असल्याचे कोणतेही पुरावे अद्याप मिळालेले नाहीत. मात्र, करोनाच्या जुन्या प्रकारापेक्षा या विषाणूवर होणारा लसीचा परिणाम तुलनेने कमी असू शकतो.
आणखी वाचा : Inflation Alert : रुपया घसरला अन् तेलही महागलं; देशात महागाईचा प्रचंड भडका उडणार? अर्थतज्ज्ञांचा इशारा काय?
नव्या व्हेरिएंटबाबत तज्ज्ञांचे मत काय?
सध्या अमेरिकेत BA.3.2 चे प्रमाण कमी असले तरी तेथील आरोग्य तज्ज्ञांनी नागरिकांना आवश्यक खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे. या नवीन व्हेरिएंटमुळे लॉकडाऊनसारखी परिस्थिती निर्माण होईल का, अशी भीती सर्वसामान्यांच्या मनात आहे. याबाबत केआयएमएस रुग्णालयाचे ज्येष्ठ सल्लागार डॉ. एस. एम. फैयाज यांनी टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले की, करोना विषाणूची उत्क्रांती सतत सुरू असून त्यामध्ये तब्बल ७० ते ७५ उत्परिवर्तने आढळून आली आहेत. जगभरातील अनेक देशांत नव्या व्हेरिएंटने डोके काढले असले तरीही यावेळी आपण अधिक सुरक्षित आहोत, कारण या महामारीचा सामना करण्यासाठी लोकांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती तयार झाली आहे. ही प्रतिकारशक्ती लसीकरण आणि पूर्वी झालेल्या संसर्गाच्या मिश्रणातून आपल्याला मिळाली आहे, त्यामुळे नवीन व्हेरिएंटची लागण झाली तरी आजाराची तीव्रता कमी राहण्याची शक्यता आहे. तसेच आता आपल्याकडे चाचण्या, उपचार पद्धती आणि अँटीव्हायरल औषधांची उत्तम सोय उपलब्ध आहे.
नव्या व्हेरिएंटचा सर्वाधिक धोका कोणाला?
डॉ. फैयाज पुढे म्हणाले की, करोनाच्या या नव्या व्हेरिएंटमध्ये ‘इम्यून एस्केप’ हा गुणधर्म आहे. याचा अर्थ हा विषाणू शरीरातील जुन्या प्रतिकारशक्तीवर पूर्णपणे मात करू शकत नाही. ज्यांना आधी करोनाची लागण झाली आहे, त्यांना पुन्हा हा संगर्ग होऊ शकतो. मात्र, संसर्ग होणे आणि गंभीर आजारी पडणे यात फरक आहे. बहुतेक निरोगी लोकांमध्ये या व्हेरिएंटची लक्षणे ओमिक्रॉनच्या लाटेसारखीच सौम्य ते मध्यम स्वरूपाची असू शकतात. दिलासादायक बाब म्हणजे, निरोगी लोक यातून घरच्या घरी उपचार घेऊन लवकर बरे होऊ शकतात. जरी हा व्हेरिएंट सौम्य वाटत असला, तरी वृद्ध नागरिक, गरोदर महिला, मधुमेह, हृदयविकार यांसारखे जुने आजार असलेले रुग्ण यांच्यासाठी तो धोकादायक ठरू शकतो. अनेकांनी करोनाकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली असली तरी त्याबाबतची खबरदारी घेणे आवश्यक आहे. करोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे घाबरण्याची गरज नाही; पण सतर्क राहणे गरजेचे आहे, असे डॉ. फैयाज यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा : इराण युद्धादरम्यान अमेरिकेला मित्रदेशाचाच दणका; स्पेनने हवाई हद्द कशामुळे रोखली? कारण काय?
केंद्र सरकारच्या उपाययोजना काय?
‘सिकाडा’ व्हेरिएंटवर जागतिक स्तरावर लक्ष ठेवले जात असले तरी भारतात अद्याप या विषाणूचा धोका दिसून आलेला नाही. तरीही नागरिकांनी गाफील न राहता सावधगिरी बाळगण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, सध्या भारतात उपलब्ध असलेल्या करोनाच्या लसी या नवीन व्हेरिएंटमुळे होणाऱ्या गंभीर आजारापासून संरक्षण देतील अशी पूर्ण अपेक्षा आहे. जरी या व्हेरिएंटच्या उत्परिवर्तनात मोठ्या प्रमाणात बदल झाले असले, तरी इतर विषाणूंच्या तुलनेत तो अधिक वेगाने पसरत असल्याचे अद्याप सिद्ध झालेले नाही. यादरम्यान भारतातील परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने काही उपाययोजना लागू केल्या आहेत. परदेशातून विशेषतः ज्या देशांमध्ये ‘सिकाडा’ व्हेरिएंटचे रुग्ण जास्त आहेत, तिथून येणाऱ्या प्रवाशांची विमानतळावर थर्मल स्क्रीनिंग आणि लक्षणे आढळल्यास चाचणी केली जात आहे. संशयित रुग्णांना क्वारंटाईन करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
नागरिकांना काय आवाहन करण्यात आले?
केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे की, भारतात सध्या तरी या व्हेरिएंटमुळे रुग्णसंख्येत कोणतीही चिंताजनक वाढ झालेली नाही, त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. विषाणूच्या बदलत्या रूपाचा मागोवा घेण्यासाठी जनुकीय तपासणीवर अधिकच भर देण्यात आला आहे. विशेषतः वृद्ध नागरिक आणि गंभीर आजार असलेल्या व्यक्तींना प्रतिबंधात्मक बूस्टर डोस घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी शक्यतो सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करावा, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, स्वच्छतेच्या नियमांसह वारंवार हात धुणे गरजेचे आहे. करोनाची कुठलीही लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
