भारताचा युवा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने सलग दुसऱ्यांदा प्रतिष्ठेच्या कँडिडेट्स बुद्धिबळ स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे. वर्षभरात ‘फिडे’ सर्किटमध्ये केलेल्या सर्वोत्तम कामगिरीच्या आधारे तो या स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. प्रज्ञानंदची ही कामगिरी भारतासाठी महत्त्वाची का ठरते आणि पुढील जगज्जेतेपदासाठी विद्यमान जगज्जेता दोम्माराजू गुकेश आणि प्रज्ञानंद या दोन भारतीय बुद्धिबळपटूंमध्ये लढत होण्याची कितपत शक्यता आहे, याचा आढावा.
कँडिडेट्स स्पर्धेबाबत…

कँडिडेट्स म्हणजेच आव्हानवीरांची स्पर्धा. या स्पर्धेतून जगज्जेत्याला आव्हान देणारा बुद्धिबळपटू निश्चित केला जातो. कँडिडेट्स स्पर्धा पुढील वर्षी २८ मार्च ते १६ एप्रिल या कालावधीत सायप्रस येथे रंगणार आहे. यात आठ बुद्धिबळपटूंचा सहभाग असेल. स्पर्धेतील विजेता बुद्धिबळपटू विद्यमान जगज्जेत्या भारताच्या दोम्माराजू गुकेशविरुद्ध खेळण्याची संधी मिळवेल.

प्रज्ञानंद या स्पर्धेसाठी कसा पात्र ठरला?

कँडिडेट्स स्पर्धेसाठी पात्र ठरण्याचे विविध निकष असतात. यापैकी एक म्हणजे, वर्षभरात ‘फिडे’च्या कार्यक्रमातील स्पर्धांत सर्वोत्तम कामगिरी करणारा बुद्धिबळपटू थेट कँडिडेट्ससाठी पात्रता मिळवतो. यंदाच्या ‘फिडे’ सर्किटमध्ये १९ वर्षीय प्रज्ञानंदने टाटा स्टील मास्टर्स, सुपरबेट चेस रोमेनिया, उझचेस चषक आणि लंडन चेस क्लासिक स्पर्धांचे जेतेपद पटकावले. तसेच स्टेपन अवाग्यान स्मृती आणि सिंकेफिल्ड चषक या अन्य दोन स्पर्धांत तो उपविजेता ठरला. त्यामुळे ‘फिडे’ सर्किटमध्ये प्रज्ञानंदचे सर्वाधिक ११५.१७ गुण झाले आणि तो सलग दुसऱ्यांदा कँडिडेट्स स्पर्धेत प्रवेश मिळविण्यात यशस्वी झाला. दुसऱ्या स्थानावरील अनिश गिरीचे ८१.१८ गुण, तर तिसऱ्या स्थानावरील नोदिरबेक अब्दुसत्तोरोवचे ७१.६१ गुण आहेत.

लंडन स्पर्धेतील सहभाग मोलाचा

प्रज्ञानंद लंडन चेस क्लासिक स्पर्धेत सहभाग नोंदवणे आधी नियोजित नव्हते. मात्र, गोवा येथे झालेल्या विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेच्या चौथ्याच फेरीत प्रज्ञानंदला डॅनिल डुबोव याच्याकडून हार पत्करावी लागली. त्यामुळे त्याच्यासमोर अन्य एखादी स्पर्धा खेळण्याचा पर्याय खुला झाला. २६ नोव्हेंबर ते ७ डिसेंबर या कालावधीत झालेल्या लंडन चेस क्लासिक स्पर्धेत आमंत्रितांच्या गटातील खेळाडू आधीच निश्चित झाले होते. त्यामुळे प्रज्ञानंदला खुल्या विभागात खेळावे लागले. त्याने हा धोका पत्करला आणि स्पर्धेचे संयुक्त जेतेपदही पटकावले. त्यामुळे त्याला कँडिडेट्ससाठी पात्र ठरणे अधिक सोपे गेले. ‘फिडे’ सर्किटच्या गुणतालिकेत अग्रस्थानासाठी प्रज्ञानंद आणि उझबेकिस्तानचा नोदिरबेक अब्दुसत्तोरोव यांच्यात स्पर्धा होती. मात्र, लंडन स्पर्धेच्या माध्यमातून प्रज्ञानंदने ८.१७ गुणांची कमाई केली. त्यामुळे अब्दुसत्तोरोवने वर्षअखेरीस होणाऱ्या जागतिक जलद आणि अतिजलद या दोन्ही स्पर्धा जिंकल्या, तरी तो ‘फिडे’ सर्किटच्या गुणतालिकेत प्रज्ञानंदला गाठू शकणार नाही हे स्पष्ट झाले.

कँडिडेट्समध्ये अन्य कोणते स्पर्धक?

पुढील वर्षीच्या कँडिडेट्स स्पर्धेसाठी पुरुषांमध्ये प्रज्ञानंदसह २०२४च्या ‘फिडे’ सर्किटचा विजेता अमेरिकेचा फॅबियानो कारुआना; ग्रँड स्विस स्पर्धेतील विजेता नेदरलँड्सचा अनिश गिरी आणि उपविजेता जर्मनीचा माथियस ब्लुबाऊम; विश्वचषक स्पर्धेतील विजेता उझबेकिस्तानचा जावोखिर सिंदारोव, उपविजेता चीनचा वे यी आणि तिसरा क्रमांक मिळविणारा रशियाचा आंद्रे एसिपेन्को; तसेच ऑगस्ट २०२५ ते जानेवारी २०२६ या कालावधीत सर्वाधिक गुणांकन असलेला अमेरिकेचा हिकारू नाकामुरा हे बुद्धिबळपटू पात्र ठरले आहेत.

प्रज्ञानंदची कामगिरी का महत्त्वाची?

भारतीय बुद्धिबळसाठी २०२५ हे वर्ष संमिश्र यश देणारे ठरले. गेल्या वर्षी जगज्जेतेपद मिळविल्यानंतर दोम्माराजू गुकेशच्या कामगिरीचा आलेख उतरताच राहिला. अर्जुन एरिगेसीने काही लक्षवेधी विजय मिळवले, पण त्याच्या कामगिरीतही सातत्याचा अभाव होता. विदित गुजराथीही लौकिकाला साजेशी कामगिरी करू शकला नाही. त्यामुळे यंदा प्रज्ञानंदच्या रूपात किमान एका भारतीय बुद्धिबळपटूने तरी कँडिडेट्समध्ये प्रवेश मिळविणे महत्त्वाचे ठरते. प्रज्ञानंदने यंदाच्या हंगामात सातत्यपूर्ण कामगिरी केली. आता हीच लय कायम राखल्यास तो जगज्जेतेपदासाठी लढण्याची संधी मिळवू शकेल. दुसरीकडे, विश्वचषक स्पर्धेतील विजेती दिव्या देशमुख, उपविजेती कोनेरू हम्पी, तसेच ग्रँड स्विस स्पर्धेची विजेती आर. वैशाली या भारतीय बुद्धिबळपटू कँडिडेट्स स्पर्धेत महिलांमध्ये खेळतील. पुरुष आणि महिलांची कँडिडेट्स स्पर्धा एकाच वेळी होत आहे.