Covid 19 and Dormant Virus Relation : कोविडची लागण झाली की शरीरात वर्षानुवर्षे सुप्त असलेले विषाणूही पुन्हा सक्रिय होऊ शकतात, त्यामुळे आजार अधिक गंभीर होण्याबरोबरच कोविड दीर्घकाळासाठी सक्रिय राहण्याचा धोकाही वाढू शकतो, असा दावा नेचर (Nature) या प्रतिष्ठित नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या नव्या संशोधनातून करण्यात आला आहे.

अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सास, ऑस्टिन येथील संशोधकांनी कोविडच्या पहिल्या लाटेदरम्यान रुग्णालयात दाखल झालेल्या एक हजारांहून अधिक रुग्णांच्या नमुन्यांचा अभ्यास केला. या अभ्यासात जवळपास निम्म्या रुग्णांच्या शरीरात वर्षानुवर्षे निष्क्रिय असलेले सामान्य विषाणू पुन्हा सक्रिय झाल्याचे आढळून आले आहे, त्यामुळे कोविडनंतर शरीरावर होणाऱ्या दीर्घकालीन परिणामांविषयी नव्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

कोविडदरम्यान सक्रिय झालेल्या विषाणूंमध्ये हर्पिस (Herpes) कुटुंबातील एपस्टीन-बार विषाणू (EBV) आणि सायटोमेगालोव्हायरस (CMV) यांचा समावेश होता. ईबीव्हीमुळे ग्लॅंड्युलर फिव्हर (Infectious Mononucleosis) हा आजार होऊ शकतो, तर सायटोमेगालो (CMV) या विषाणूमुळे बहुतेक निरोगी व्यक्तींमध्ये कोणतीही विपरीत लक्षणे दिसत नाहीत. मात्र, नवजात बाळं आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या व्यक्तींमध्ये या सीएमव्हीमुळे गंभीर स्थिती निर्माण होऊ शकते.

संशोधकांना अ‍ॅनेलोव्हायरस (Anelloviruses) या विषाणूंचा गटदेखील पुन्हा सक्रिय होण्याचे पुरावे आढळले आहेत. हे विषाणू मानवांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळतात. मात्र, ते निष्क्रीय मानले जातात.

तज्ज्ञांच्या मते, जगभरातील बहुतांश प्रौढांच्या शरीरात यापैकी एक किंवा अधिक विषाणू असतात. पहिल्या संसर्गानंतर हे विषाणू आयुष्यभर शरीरात सुप्त अवस्थेत राहतात. मानवी शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती या विषाणूंना नियंत्रणात ठेवत असते.

वेगवेगळे विषाणू वेगवेगळ्या टप्प्यांवर सक्रिय

या संशोधनात आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. सर्व सुप्त विषाणू एकाच वेळी सक्रिय होत नाहीत. कोविडवरील उपचार सुरू असतानाच एपस्टीन-बार विषाणू (EBV) आणि अ‍ॅनेलोव्हायरस हे विषाणू सक्रिय होत असल्याचे आढळले. रुग्णलयात दाखल होताच या विषाणूंचा प्रभाव वाढत होता. याउलट, सायटोमेगालोव्हायरस (CMV) आणि हर्पिस सिम्प्लेक्स विषाणू (HSV) हे साधारण तीन आठवड्यांनंतर सक्रिय झाल्याचे अभ्यासात आढळले. हे विषाणू मुख्यतः फुप्फुसे आणि श्वसनमार्गात आढळल्याचे संशोधक सांगतात.

संशोधकांच्या मते, कोविडच्या संसर्गामुळे रोगप्रतिकारक शक्तीवर तात्पुरता ताण येतो, त्यामुळे अनेक वर्षे सुप्त अवस्थेत असलेले विषाणू पुन्हा सक्रिय होऊ शकतात. हे विषाणू सक्रिय झाल्यानंतर कोविडमुळे आधीच सुरू असलेली शरीरातील दाहक प्रक्रिया (Inflammation) अधिक वाढू शकते, त्यामुळे रुग्णाची प्रकृती आणखी गंभीर होण्याची शक्यता असते.

या संशोधनातील आणखी एक धक्कादायक निष्कर्ष म्हणजे, फक्त कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या व्यक्तींमध्येच नव्हे, तर रोगप्रतिकारक शक्ती जास्त असलेल्या रुग्णांमध्येही हे विषाणू पुन्हा सक्रिय झाले. याआधी एचआयव्हीग्रस्त किंवा रोगप्रतिकारक शक्ती कमी करणारी औषधे घेणाऱ्या रुग्णांनाच हा धोका अधिक असल्याचे मानले जात होते. मात्र, नव्या संशोधनात अशी औषधे घेणाऱ्या रुग्णांमध्ये आणि इतर रुग्णांमध्ये फारसा फरक आढळला नाही. यावरून कोविड जेव्हा जेव्हा गंभीर पातळीवर पोहोचतो, तेव्हा शरीराची रोगप्रतिकारक शक्ती इतकी कमकुवत होऊ शकते की, सुप्त विषाणू पुन्हा सक्रिय होतात, असे संशोधकांनी सूचित केले.

दीर्घकाळ कोविड सक्रिय राहण्याचा धोकाही वाढू शकतो

कोविड काळानंतर संशोधकांनी तब्बल एक वर्ष बाधित रुग्णांचा पाठपुरावा केला. काही रुग्णांच्या शरीरात अ‍ॅनेलोव्हायरस पुन्हा सक्रिय झाले, अशा रुग्णांमध्ये कोविड दीर्घकाळासाठी सक्रिय असल्याचे आढळले. अशा स्थितीत थकवा, श्वास घेण्यास त्रास, लक्ष केंद्रित न होणे (ब्रेन फॉग) अशी लक्षणे अनेक महिने किंवा वर्षभरही दिसू शकतात.

यापूर्वीच्या काही संशोधनांमध्ये एपस्टीन-बार विषाणू (EBV) आणि मल्टिपल स्क्लेरोसिस, ल्युपस यांसारख्या ऑटोइम्यून आजारांमध्ये संबंध आढळला आहे, त्यामुळे सुप्त विषाणू पुन्हा सक्रिय झाल्यास काही रुग्णांमध्ये दीर्घकालीन आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात, असा अंदाज संशोधकांनी व्यक्त केला आहे.

मात्र, संशोधक असेही नमूद करतात की, या संशोधनात केवळ कोविड आणि सुप्त विषांणूमधील संंबंध दर्शवण्यात आला आहे. यातून आरोग्यावर थेट परिणाम होतो हे सिद्ध झालेले नाही; म्हणजे हे विषाणूच दीर्घकाळ कोविड सक्रिय राहण्यास कारणीभूत आहेत असे निश्चितपणे सांगता येत नाही. कोविडमुळे रोगप्रतिकारक शक्तीवर आलेल्या ताणाचे ते एक लक्षण असू शकते, असे संशोधकांनी स्पष्ट केले.

उपचाराची कितपत शक्यता?

संशोधकांनी ज्या रुग्णांमध्ये सुप्त विषाणू पुन्हा सक्रिय झालेत, त्या रुग्णांची तुलना इतर रुग्णांशी केली. ज्यांच्यामध्ये विषाणू पुन्हा सक्रिय झाले होते, त्यांच्यामध्ये शरीरातील दाह (Inflammation), रोगप्रतिकारक यंत्रणेची अतिसक्रियता आणि पेशींचे नुकसान अधिक प्रमाणात आढळले.

तज्ज्ञांच्या मते, हर्पिस कुटुंबातील विषाणूंवर प्रभावी ठरणारी काही अँटीव्हायरल औषधे भविष्यात दीर्घकाळ सक्रिय राहणाऱ्या कोविडच्या उपचारांमध्ये उपयोगी ठरू शकतात. यासाठी सध्या विविध क्लिनिकल चाचण्या सुरू आहेत.

या संशोधनातून आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. आजवर निष्क्रीय समजल्या जाणाऱ्या विषाणूंमुळे शरीरात आधीच असलेल्या संसर्गजन्य आजारांवर गंभीर परिणाम होऊ शकतो, असे संशोधकांचे मत आहे.