scorecardresearch

४५+ वय असणाऱ्यांचे आजपासून लसीकरण; जाणून घ्या नोंदणी, फी, कागदपत्रांबद्दलची महत्वाची माहिती

आजपासून करोना प्रतिबंधक लसीकरणाचा पुढचा टप्पा होतोय सुरु

भारत सरकारने सुरु केलेल्या करोना प्रतिब्ंधक लसीकरण मोहिमेचा आज चौथा टप्पा सुरु होत आहे. या लसीकरणामध्ये ४५ वर्षांपुढील सर्वांना करोनाची लस देण्यात येणार आहे. आतापर्यंत केवळत करोनायोद्धे, सहव्याधी असलेले ४५ वर्षांवरील व्यक्ती आणि ६० वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्यांना लस देण्यात येत होती. मात्र मध्यम वयातील बाधित व्यक्तींचं प्रमाण वाढत असल्याने त्यांचाही कोणत्याही अटी शर्थींशिवाय लसीकरण करण्यात येणाऱ्या व्यक्तींमध्ये समावेश करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. हे लसीकरण कसं होणार आहे, लस घेण्यासाठी कशी कुठे नोंदणी करावी लागणार आहे आणि इतर अनेक प्रश्न सर्वसामान्यांना पडलेत. याचसंदर्भात आपण या लेखामध्ये जाणून घेणार आहोत.

नक्की वाचा >> समजून घ्या : ‘कोव्हॅक्सिन’, ‘कोव्हिशिल्ड’ कोणी घेऊ नये?, लस घेतल्यानंतर साइड इफेक्ट दिसल्यास काय करावं?

प्रश्न :
करोनाची लस घेण्यासाठी वयोमर्यादा काय आहे?
उत्तर :
आरोग्य मंत्रालयाने आजपासून सुरु होणाऱ्या लसीकरण मोहिमेसंदर्भातील कट ऑफ डेट काय असेल याबद्दलची माहिती दिली आहे. सरकारने एक जानेवारी २०२१ च्या आधारावर ही तारीख जाहीर केलीय. १ जानेवारी १९७७ ही कट ऑफ डेट म्हणून जाहीर करण्यात आली आहे. म्हणजेच एक जानेवारी १९७७ आधी जन्म झालेल्या सर्व व्यक्तींना या लसीकरण मोहिमेअंतर्गत लस घेता येईल.

प्रश्न :
लसीकरणासाठी कुठे आणि कशी नोंदणी करणार?
उत्तर :
तुम्ही जर सरकारने ठरवून दिलेल्या वयोगटामध्ये आहात तर लस घेण्यासाठी नोंदणी करणं आवश्यक आहे. कोविन पोर्टल किंवा आरोग्य सेतु अ‍ॅपच्या माध्यमातून लसीकरणासाठी नाव नोंदणी करता येणार आहे. एखाद्या व्यक्तीला या पोर्टल किंवा अ‍ॅपवरुन नोंदणी करता आली नाही ती व्यक्ती थेट लसीकरण केंद्रावर जाऊन नाव नोंदणी करु शकते. लसीकरण केंद्रावरील नियोजित व्यक्तींचं लसीकरण झाल्यानंतर केंद्रावर जाऊन नोंदणी करणाऱ्यांना लसीकरणासाठी प्राधान्य देण्यात येईल.

प्रश्न :
लसीकरणासाठी जाताना कोणती कागदपत्रं सोबत न्यावी लागतील का?
उत्तर :
होय नाव नोंदणी केल्यानंतरही लसीकरणासाठी जाताना आपलं ओळखपत्र न्यावं लागणार आहे. यामध्ये आधारकार्ड, पॅनकार्ड, लायसन्स यासारख्या फोटो असणारी ओळखपत्र ग्राह्य धरली जातील.

प्रश्न :
लसीकरणासाठी अपॉइण्टमेंट कशी बुक करता येईल?
उत्तर :
एका मोबाइल क्रमांकावरुन चार जणांच्या लसीकरणासंदर्भातील नोंदणी करता येईल. नोंदणी करण्यासाठी सर्व माहिती भरुन ती सबमीट केल्यानंतर दिलेल्या क्रमांकावर एक एसएमएस येईल. नोंदणी पूर्ण केल्यानंतर जी माहिती देण्यात आली ती पडताळून पाहण्यासाठी आणि आवश्यक असल्यास बदल करण्यासाठी पर्याय दिला जाईल. त्यानंतर नोंदणी करण्यात आलेल्या प्रत्येक नावाच्या पुढे अ‍ॅक्शन (Action) असा पर्याय दिसेल. त्याखाली कॅलेण्डरचा आयकॉन दिसेल. यावर क्लिक केल्यानंतर हव्या त्या तारखेला लस घेण्यासाठी वेळ निवडता येईल.

प्रश्न :
लसीकरणासाठी किती खर्च येतो?
उत्तर :
सरकारी रुग्णालयामध्ये लसीकरण करुन घेतल्यास लसीकरण मोफत केलं जाईल. खासगी रुग्णालयामध्ये लसीकरण २५० रुपयांना केलं जाईल. यापैकी १५० रुपये लसीची किंमत आणि १०० रुपये सेवा शुल्क आकारण्यात येईल.

प्रश्न :
दुसरा डोस कधी घ्यावा?
उत्तर :
सरकारने काही दिवसांपूर्वीच कोविशील्डच्या दोन डोसच्या कालावधीमध्ये बदल केलाय. पहिला डोस घेतल्यानंतर पुढील डोस कधी घ्यावा हा सल्ला डॉक्टर देतील त्यानुसार निर्णय घ्यावा, असं केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं. सध्या कोविशील्डच्या दोन डोसमध्ये चार ते सहा आठवड्यांचं अंतर ठेवण्यात आलं आहे. मात्र नव्या नियमांनुसार डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे पहिल्या डोस नंतर चार ते आठ आठवड्यांदरम्यान कधीही दुसरा डोस घेता येईल. कोवॅक्सीनचा पहिला डोस घेतल्यानंतर पुढील डोस हा चार ते सहा आठवड्यांमध्ये देता येईल असं स्पष्ट करण्यात आलं आहे.

प्रश्न :
कधीपासून सुरु आहे लसीकरण?
उत्तर :
करोना लसीकरणाची सुरुवात १६ जानेवारीपासून करण्यात आली आहे. करोना योद्ध्यांचं पहिल्या टप्प्यात लसीकरण करण्यात आल्यानंतर सर्वसामान्यांसाठी दुसऱ्या टप्प्यापासून वयानुसार लसीकरण करण्यास सुरुवात करण्यात आली. यामध्ये सहव्याधी असलेले ४५ वर्षांवरील व्यक्ती आणि ६० वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्यांना लस देण्यात आली. आजपासून चौथ्या टप्प्यातील लसीकरणाला सुरुवात होत आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Covid 19 vaccination for all above 45 years opens today all you need to know scsg

ताज्या बातम्या