Understanding COVID New Variant XFG and BA.3.2 impact on public health: करोनाची लाट ओसरली असली तरी धोका टळलेला नाही. सूक्ष्मजीव शास्त्रज्ञांच्या मते, SARS-CoV-2 विषाणू सातत्याने आपली रूपे बदलत असून आता XFG आणि BA.3.2 (सिकाडा) यांसारखे नवीन उपप्रकार समोर आले आहत, जे अधिक चपळ आणि लवचिक आहेत.करोनाची कथा आता मथळ्यांतून थोडी मागे सरकली असली, तरी ती इतिहासजमा झालेली नाही; उलट ती अधिक सूक्ष्म, अधिक गुंतागुंतीची, आणि म्हणूनच अधिक समजून घेण्यासारखी झाली आहे.

सजीवांच्या अखंड उलगडत जाणाऱ्या प्रवाहात त्यांच्या जनुकांमध्ये घडणारे उत्परिवर्तन हा उत्क्रांतीच्या प्रवासातील अटळ टप्पा मानावा लागतो. सजीवाच्या प्रकृतीनुसार या बदलांची गती आणि व्याप्ती बदलत असली, तरी आरएनए विषाणू आणि काही सूक्ष्मजीवांमध्ये ही प्रक्रिया विशेष ठळकपणे दिसून येते. SARS-CoV-२ हा एकसूत्री आरएनए प्रकारातील विषाणू असल्याने, त्याच्या जनुकांमध्ये बदल तुलनेने जलदगतीने घडू शकतात; आणि याच सततच्या बदलांच्या मालिकेतून नव्या रूपांची, नव्या उपप्रकारांची आणि नव्या वंशप्रकारांची निर्मिती होत राहते.

ओमिक्रॉन शेवटचा नव्हता

वुहानमध्ये प्रथम नोंदवलेल्या SARS-CoV 2 ने जगासमोर आधी अल्फा, बीटा, गॅमा, डेल्टा आणि मग ओमिक्रॉन अशी रूपे उलगडली. या प्रत्येक टप्प्याने महासाथीचा अर्थ बदलला. कधी भीतीच्या स्वरूपात, कधी प्रसाराच्या वेगामुळे, तर कधी प्रतिकारशक्तीला चकविण्याच्या त्याच्या कौशल्यामुळे. पण ओमिक्रॉन हा शेवट नव्हता; तो पुढे जन्माला येणाऱ्या असंख्य उपप्रकारांचा उंबरठाच ठरला.

Award Banner
COVID New Variant XFG and BA.3.2 symptoms update | Latest WHO guidelines on Corona variants 2026 | कोरोनाचा नवा प्रकार XFG आणि लक्षणे | सिकाडा व्हेरिएंटची माहिती आणि लसीकरण
करोनाचा नवा व्हेरिएंट

विषाणूची उत्क्रांती बहुशाखीय

BA.2, BA.2.86, JN.1, NB.1.8.1, LP.8.1, XFG आणि BA.3.2 अशा शाखांनी आणि उपशाखांनी या विषाणूची उत्क्रांती आता एका सरळ रेषेऐवजी बहुशाखीय वृक्षाचे स्वरूप धारण केले आहे. जागतिक आरोग्य संघटना (WHO) च्या मार्च २०२६ च्या सारांशानुसार, त्या वेळी जागतिक पातळीवर XFG हा सर्वाधिक नोंदला जाणारा करोना विषाणूचा वंशप्रकार होता. जागतिक क्रमवारीत त्याचा वाटा सुमारे ४५% इतका होता. NB.1.8.1 वाढत्या प्रमाणात दिसत होता, त्याचा वाटा ३१% वर पोहोचला होता. आणि BA.3.2 हाही बारकाईने निरीक्षणात होता. म्हणजेच, आजचा प्रश्न फक्त “अरे बापरे, पुन्हा करोनाचा नवा प्रकार आला का?” एवढाच उरलेला नाही; खरा प्रश्न असा आहे की, या नव्या रूपांपैकी कोणते रूप विषाणूला अधिक काळ टिकवते, अधिक वेगाने पसरवते, सध्याच्या लसी त्याला कितपत आवर घालू शकतात, आणि तो आपल्या प्रतिकारशक्तीला अधिक सहजपणे वळसा घालू शकतो का?

करोनाची सूसूत्र नामपद्धती

आपल्याला दिसणारी BA, JN, NB, LP किंवा XFG ही नावे काही गूढ संक्षेप नाहीत; ती या विषाणूच्या उत्क्रांतीपथावरील महत्त्वाचे टप्पे आहेत. विषाणूच्या उत्क्रांतीचा ठाव घेण्यासाठी विज्ञानाने तयार केलेली ही एक नेमकी आणि सुसूत्र नामपद्धती आहे. BA.2.86 पासून JN.1 घडला; JN.1 पासून NB.1.8.1 सारख्या पुढील शाखा तयार झाल्या; आणि LP.8.1 इतका महत्त्वाचा ठरला की WHO ने डिसेंबर २०२५ मध्ये अद्ययावत कोविड लसींसाठी एकघटक LP.8.1 -आधारित प्रतिजन हा शिफारस केलेला पर्याय म्हणून स्वीकारला.

चपळ आणि लवचिक उत्क्रांती

दुसरीकडे XFG हा केवळ हळूहळू बदलत आलेला प्रकार नसून, LF.7 आणि LP.8.1.2 या दोन वेगळ्या वंशरेषांच्या जनुकीय संयोगातून निर्माण झालेला पुनर्संयोजित प्रकार आहेत. साध्या शब्दांत सांगायचे, तर विषाणू आता केवळ शब्द बदलत नाही; तो कधी कधी दोन वेगवेगळ्या वाक्यांची ताकद एकत्र करून नवे वाक्य घडवतो. यामुळे त्याची उत्क्रांती अधिक चपळ, अधिक लवचिक झाली आहे. म्हणूनच आजचा करोना हा फक्त संसर्गजन्य आजार राहिलेला नाही; तो जनुकशास्त्र, रोगप्रतिकारशास्त्र आणि लोकआरोग्य यांच्या संगमावर उभा असलेला एक जिवंत धडा बनला आहे.

७०हून अधिक उत्परिवर्तने

गेल्या काही महिन्यांत अमेरिकेत विशेष चर्चेत आलेला प्रकार म्हणजे BA.3.2. काही संशोधकांनी आणि माध्यमांनी त्याला लोकप्रियरित्या ‘सिकाडा’ म्हणून ओळख दिली; परंतु शास्त्रीय दृष्टीने त्याचे महत्त्व नावात नाही, तर त्याच्या स्पाइक प्रथिनातील असंख्य बदलांमध्ये आहे. येथे “स्पाइक” म्हणजे कोरोना विषाणूच्या पृष्ठभागावर असलेली काट्यासारखी प्रथिनरचना, जी त्याला मानवी पेशींमध्ये प्रवेश मिळवून देते. BA.3.2 हा मूळ BA.3 वंशापासून उगम पावला असून त्याच्या स्पाइक प्रथिनात BA.3 च्या तुलनेत ५०पेक्षा अधिक आणि मूळ वूहान विषाणूच्या तुलनेत ७०पेक्षा अधिक उत्परिवर्तने नोंदवण्यात आली आहेत.

सांडपाण्यातून विषाणूची चाहूल

CDC च्या अहवालानुसार, BA.3.2 ची नोंद फेब्रुवारी- मार्च २०२६ पर्यंत अमेरिकेतील किमान २५ राज्यांमध्ये झाली होती. ही नोंद केवळ रुग्णांच्या नमुन्यांतूनच नव्हे, तर प्रवाशांच्या नाकातील स्वॅब नमुन्यांतून, विमानांतील सांडपाण्यातून, निदानासाठीच्या नमुन्यांतून आणि सामुदायिक सांडपाणी निरीक्षणातूनही झाली. ही गोष्ट अत्यंत लक्षणीय आहे; कारण ती आपल्याला शिकवते की, विषाणू कधी कधी दवाखान्यातील आकड्यांपेक्षा आधी सांडपाण्यात आपली चाहूल देतो.

मात्र आजवरच्या पुराव्यांनुसार, तो इतर सध्याच्या प्रकारांच्या तुलनेत अधिक गंभीर सार्वजनिक आरोग्यधोका निर्माण करतो, असे म्हणण्यास पुरेसा आधार नाही. त्याची लक्षणेही मुख्यतः परिचितच आहेत. उदाहरणार्थ- घसा खवखवणे, नाक बंद होणे, कोरडा खोकला, सौम्य ताप, अंगदुखी, थकवा. म्हणून हा क्षण घबराटीचा नाही; तर तो चिकित्सक जागरूकतेचा आहे. करोना आज वादळासारखा घोंगावत नसला, तरी धुक्यासारखा आजुबाजूलाच आहे, ठळक नाही पण निश्चितच अस्तित्व राखून!

वाचकांसाठी याचा अर्थ काय?

पहिली दिलासा देणारी गोष्ट म्हणजे, आजच्या RT-PCR चाचण्या अजूनही मोठ्या प्रमाणावर उपयोगी आहेत; विशेषतः अनेक जनुकीय लक्ष्य तपासणाऱ्या बहुलक्ष्यी चाचण्या अधिक विश्वासार्ह ठरतात. FDA ने स्पष्ट केले आहे की, काही विशिष्ट उत्परिवर्तनांमुळे एकच लक्ष्य तपासणाऱ्या चाचण्यांत खोटे निगेटिव्ह निष्कर्ष येऊ शकतात; पण याचा अर्थ चाचण्या निकामी झाल्या, असा अजिबात नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, अद्ययावत कोविड लशी अजूनही गंभीर आजार, रुग्णालयात भरती होणे आणि मृत्यू यांपासून संरक्षण देत आहेत. WHO ने LP.8.1-आधारित अद्ययावत लसींना प्राधान्य दिले असून, आधीच्या JN.1 किंवा KP.2 -आधारित पर्यायांनाही मान्य आणि उपयुक्त पर्याय म्हणून स्थान दिले आहे.

सजग शहाणपण अधिक आवश्यक

याचा सारांश असा: विषाणू बदलतो आहे, पण विज्ञान त्याच्यामागे धापा टाकत पळत नाही; ते त्याच्याबरोबर पाऊल जुळवत पुढे सरकत आहे. म्हणूनच आज आपल्याला भीतीपेक्षा विवेक, अफवांपेक्षा विश्वासार्ह संदर्भ, आणि थकव्यापेक्षा सजग शहाणपण अधिक आवश्यक आहे. करोना आज दररोजच्या गदारोळात दिसत नसेल; पण तरीही तो सार्वजनिक आरोग्याच्या चर्चेतून अदृश्य झालेला नाही; उलट नव्या रूपांनी तो आपल्याला सतत सावध, सजग आणि अभ्यासू राहण्याचे आवाहन करीत आहे. त्यामुळे, त्याचे आकलन मांडणारी आपली भाषा ही केवळ प्रवाहीच नव्हे, तर नेमकी, परिपक्व आणि भविष्याभिमुख असली पाहिजे.

  • अधिक माहितीसाठी संदर्भ :
  • https://data.who.int/dashboards/covid19/summary
  • https://www.cdc.gov/mmwr/volumes/75/wr/mm7510a1.htm
  • https://www.who.int/news/item/15-05-2025-statement-on-the-antigen-composition-of-covid-19-vaccines
  • https://www.fda.gov/medical-devices/coronavirus-covid-19-and-medical-devices/sars-cov-2-viral-mutations-impact-covid-19-tests
  • https://www.who.int/activities/tracking-SARS-CoV-2-variants/Top of Form