Austria Cow Scratching with Brush: ऑस्ट्रिया या देशातील एक गाय ब्रशने पाठ व पोट खाजवताना आढळून आली आहे. या गायीचे नाव व्हेरोनिका असे आहे. ही गाय ब्रशचा वापर वेगवेगळ्या पद्धतीने करते. मुख्यत: शरीराचे अवयव खाजवण्यासाठी व्हेरोनिका गाय ब्रश व ब्रशच्या टोकाने पाठ व पोट खाजवताना आढळून आली आहे. अशा प्रकारची कृती फक्त माकड, चिंपांझी या श्रेणीतील प्राण्यांमध्ये तसेच हत्तींमध्ये यापूर्वी आढळून आली होती. गाय हा प्राणी त्याच्या शांत स्वभावासाठी ओळखला जातो. परंतु, व्हेरोनिका गायीने ब्रशचा वापर विविध मार्गाने केल्याने शास्त्रज्ञ गायीच्या या लक्षणाचा अभ्यास करत आहेत. यापूर्वी गायींनी स्वत:हून इतर वस्तूंचा वापर केल्याचे आढळून आलेले नाही, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. याबाबत सविस्तर जाणून घेऊ.
ऑस्ट्रियातील नॉच या गावात एका कुटुंबाने गाय पाळली असून तिचे नाव व्हेरोनिका असे ठेवले. १३ वर्षांची ही गाय स्वित्झर्लंड मधील एका प्रजातीची असून तिचा रंग चॉकलेटी आहे. पाठीवरील कडक भाग तसेच पोटाच्या खालील मऊ भाग ही गाय ब्रशने किंवा ब्रशच्या टोकाने दाब कमी जास्त करून खाजवते. या प्रकारचे लक्षण याआधी गायींमध्ये आढळून आल्याची नोंद नसल्याचे म्हटले जात आहे. व्हेरोनिका गायीचा ब्रशने खाजवतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून व्हिएन्नातील पशुवैद्यकीय विद्यापीठातील दोन संशोधकांनी व्हेरोनिका गाय राहते त्या ठिकाणी भेट दिली.
संशोधकांनी काय निरीक्षण नोंदवले ?
व्हिएन्न पशुवैद्यकीय विद्यापीठातील संशोधकांनी केलेल्या निरीक्षणाचा अहवाल ‘करंट बायोलॉजी’ या मासिकात प्रकाशित झाला आहे. व्हेरोनिका गायीचे दहा सत्रांमध्ये निरीक्षण करण्यात आले. त्यापैकी सात सत्रांमध्ये तिने ७६ वेळा स्वत:हून ब्रशचा वापर केल्याचे आढळून आले. खूर असणाऱ्या सस्तन प्राण्यांमध्ये हे लक्षण याआधी हत्तीमध्ये नोंदवण्यात आले होते. गायींमध्ये हे लक्षण कधी दिसले नव्हते, असे त्या अभ्यास अहवालात म्हटले आहे.
यापूर्वी ‘या’ प्राण्यांमध्ये आढळले होते व्हेरोनिका गायीसारखे लक्षण
१९६० च्या दशकात वन्यजीव अभ्यासक जेन गुडॉल यांनी चिंपांझींमध्ये असे लक्षण दिसल्याची नोंद केली होती. वारूळातून कीटक बाहेर काढून खाण्यासाठी चिंपांझी गवताच्या पात्यांचा वापर करत असल्याचे गुडॉल यांना आढळून आले होते. कालांतराने कावळा, पोपट, व्हेल्स, हत्ती, लांडगा या प्राण्यांमध्ये इतर वस्तूंचा वापर करण्याचे लक्षण दिसून आले होते. पण, व्हेरोनिका गाय ब्रश व ब्रशच्या शेवटच्या टोकाचा वापर खाजवण्यासाठी करताना आढळून आली. दरम्यान, एकाच वस्तूचा वेगवेगळ्या प्रकारे वापर करण्याचे लक्षण प्राण्यांमध्ये अत्यंत दुर्मिळ मानले जाते. ते फक्त चिंपांझींमध्ये आढळून येते. परंतु, ते आता गायीमध्येही आढळले आहे.
व्हेरोनिका ही स्मार्ट गाय आहे का ?
व्हेरोनिका गाय अंग खाजवण्यासाठी ब्रशचा वापर स्वत: करत असल्याबद्दल संशोधकांनी मत व्यक्त केले आहे. ही गायीची कमाल नसून ती ज्या परिस्थितीत आहे, त्यामुळे तिने हे गुण आत्मसात केले असतील. व्हेरोनिका ही एक पाळीव गाय आहे. तिचा सांभाळ करणाऱ्या कुटुंबाने तिला दुधासाठी पाळलेले नाही. तसेच व्हेरोनिकाच्या आईलाही त्या कुटुंबाने पाळले होते, व तिचाही खूप चांगल्या प्रकारे सांभाळ केला होता. व्हेरोनिकाला जिथे ठेवले जाते तिथे तिला भरपूर प्रमाणात गवत चरण्यासाठी मिळते. तिचा अनेक लोकांशी संपर्क येतो. त्यामुळे ती माणसाळली आहे. १३ वर्षांचे एक चांगले आयुष्य ती जगत आल्याने तिच्यात हे लक्षण विकसित झाले असावे, असा अंदाज संशोधकांनी व्यक्त केला आहे.
तसेच गायींना मुख्यत: दूध व मांस यांसाठी पाळले जाते. या गोष्टींचा विचार न करता गायींना पाळले तर त्यांची बुद्धिमत्ता व इतर हालचालींचे निरीक्षण करणे सोपे जाईल. व्हेरोनिका गायीला जसे समृद्ध जीवन मिळाले तसेच इतर गायींनाही मिळाले, तर त्यांच्यातही हे लक्षण दिसून येईल, असे संशोधकांनी म्हटले आहे.
गायीच्या लक्षणाबाबत दोन शक्यता कोणत्या ?
बंगळुरूतील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अॅडव्हान्स्ड स्टडिजचे प्रीमॅटोलॉजिस्ट (माकड, चिंपांझीसारख्या प्राण्यांचा अभ्यास करणारे) अनिंद्य सिन्हा यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, “व्हेरोनिका गायीचे प्रकरण हे फक्त तिच्यापुरतेच मर्यादीत आहे. इतर गायींमध्ये असे दिसून आलेले नाही. दोन शक्यता आहेत, एक म्हणजे व्हेरोनिका गायीने ट्रायल अँड एररनुसार ब्रशचा खाजवण्यासाठी वापर केला असेल. त्यावेळी तिने तो परत परत करून पाहिल्यानंतर तिला तशी सवय लागली असेल. दुसरी शक्यता ही आहे की, एकाच वस्तूचा वापर वेगवेगळ्या प्रकारे केला जाऊ शकतो याची जाणीव तिला झाली असेल. जर तसे असेल तर हा संशोधनाचा विषय ठरू शकतो.” गायींमध्ये बुद्धिचा विकास होत आहे का ? याचा अभ्यास व्हेरोनिका गायीच्या सहाय्याने केला जाऊ शकतो, असे काही संशोधकांचे म्हणणे आहे.
