Crime Unsolved Mysteries D.B. Cooper: २४ नोव्हेंबर १९७१, अमेरिकेत ‘थँक्सगिव्हिंग’च्या सेलिब्रेशनच्या पूर्वसंध्येला एक मध्यमवयीन, शांत दिसणारा पुरुष पोर्टलँडहून सिएटलला जाणाऱ्या Northwest Orient Airlines Flight 305 मध्ये चढला… त्याने त्याचे नाव सांगितले, Dan Cooper डॅन कूपर. साधा सूट, काळा टाय, गॉगल… कुणालाही संशय येईल असे त्यात काहीच नव्हते. …पण त्यानंतरच्या काही तासांतच या व्यक्तीचे नाव अद्याप उकल न झालेल्या अमेरिकेतील एका महत्त्वाच्या गुन्ह्याशी जोडले गेले! महत्त्वाचे म्हणजे आज ५५ वर्षांनंतरही जगभरातील महत्त्वाच्या गुन्ह्यांपैकी एक म्हणून या गुन्ह्याची चर्चा आजही होते.
नेमकं काय घडलं?
विमान हवेत स्थिरावल्यावर कूपरने एअर होस्टेसकडे एक चिठ्ठी दिली. सुरुवातीला तिला ती गंमतच वाटली… कूपरने तिला शांतपणे सांगितले की, “माझ्याकडे बॉम्ब आहे.” एवढ्यावरच न थांबता त्याच्या ब्रीफकेसमध्ये बॉम्बसदृश दिसणारे उपकरणही त्याने तिला दाखवले…
त्याच्या मागण्या होत्या…
- दोन लाख अमेरिकन डॉलर्स रोख
- चार पॅराशूट्स
- आणि विमान सिएटलमध्ये उतरवावे
पोलीस आणि FBI ने हस्तक्षेप न करता त्याच्या अटी मान्य केल्या.
सिएटलमध्ये त्याला पैसे आणि पॅराशूट्स दोन्ही देण्यात आले. कूपरने विमानाचे क्रू मेंबर्स वगळता सर्वांना सोडले. त्यानंतर त्याने पुन्हा विमानाचे उड्डाण करून ते मेक्सिकोच्या दिशेने नेण्यास सांगितले.
आणि मग… गायब!
वॉशिंग्टनच्या जंगलांवरून रात्रीच्या अंधारात, मुसळधार पावसात, सुमारे १०,००० फूट उंचीवरून कूपरने विमानाच्या मागील जिन्यावरून (airstairs) पॅराशूटसह उडी मारली आणि तेव्हापासून तो गायबच आहे.

- ना मृतदेह सापडला
- ना खात्रीशीर पुरावा सापडला
- ना तो पुन्हा कधीही कुठे कुणाला दिसला
इतिहासात तो आजही ओळखला जातो D.B. Cooper या नावाने (अर्थात त्याने स्वतः डॅन कूपर हे नाव वापरले होते).
हेही वाचा
FBI ने काय केलं?
हा गुन्हा अमेरिकेतील आजवरचा सर्वात दीर्घकाळ चाललेल्या तपासांपैकी एक मानला जातो.
- यात ८०० हून अधिक संशयितांची नोंद करण्यात आली
- जंगल, नद्या, पर्वतरांगांची छाननी करण्यात आली
- पॅराशूट, कपडे, बॉम्बचे अवशेष असे कोणतेही पुरावे तपास यंत्रणांना सापडले नाहीत
त्यानंतर १९८० साली एक धक्कादायक घटना घडली. कोलंबिया नदीकाठी एका मुलाला कूपरने मागितलेल्या पैशांपैकी सुमारे ५८०० डॉलर्सच्या नोटा सापडल्या. नोटा अंशतः कुजलेल्या अवस्थेत होत्या. या गुन्ह्यामध्ये आजवर सापडलेला असा हा एकमेव भौतिक पुरावा होय.
पोलीसही चक्रावले, याचा अर्थ काय समजावा?
- डीबी कूपर तिथे मरण पावला?
- की, मुद्दामहून पैसे तिथे टाकण्यात आले?
- एवढ्या काळानातंर म्हणजे तब्बल ९ वर्षांनंतर तिथे पैसे कुठून आले?
- की, तो जिवंत असावा?
- या प्रश्नांनी पोलीसही भंडावून गेले.
आजही याबाबत दोन शक्यता वर्तवल्या जातात…
पहिली – तो मरण पावला
- रात्र, वादळ, जंगल अशी परिस्थिती अत्यंत प्रतिकूल होती
- कूपरकडे योग्य प्रशिक्षण नव्हते
- त्याने चुकीचे पॅराशूट निवडले होते
दुसरी – तो वाचला असावा
तुलनेने कमी उंचीवरून मारलेली उडी
सैनिकी किंवा पॅराट्रूपर पार्श्वभूमी त्याला असावी… तर वाचणे सहज शक्य
आणि पैशांचा उर्वरित भाग कधीच सापडला नाही
संशयित कोण होते?
- गेल्या पाच दशकांत अनेक नावे पुढे आली:
- Richard McCoy Jr. – विमान हायजॅकिंग केलेला माजी सैनिक
- Kenneth Christiansen – Northwest Airlines मध्ये काम करणारा कर्मचारी
- Robert Rackstraw – युद्धाचा अनुभव असलेला… पण याच्याविरुद्ध पुरेसा पुरावा सापडला नाही
FBI ने कोणालाही अधिकृतपणे दोषी ठरवले नाही.
मग FBI ने केस का बंद केली?
२०१६ मध्ये, तब्बल ४५ वर्षांनंतर, FBI ने अधिकृतपणे तपास थांबवल्याची घोषणा केली.
- त्यावेळेस सांगितलेली कारणे-
- नवे पुरावे उपलब्ध नव्हते
संसाधने अधिक गंभीर गुन्ह्यांसाठी वापरण्याची गरज होती
कूपर जिवंत असण्याची शक्यता अत्यंत कमी होती
पण FBI ने हेही मान्य केलं की… :
D.B. Cooper प्रकरण पूर्णतः सुटलेलेही नाही
ही कथा आजही अनेकांना का थ्रिलर वाटते?
- ही केवळ गुन्ह्याची गोष्ट नाही. तर याकडे परफेक्ट क्राइमची कथा म्हणून पाहिलं जातंय
- अमेरिकन तपास यंत्रणांना मिळालेले आजवरचे सर्वात मोठे आव्हान म्हणूनही याचा वारंवार उल्लेख केला जातो.
- सर्वात महत्त्वाचे म्हणजे ‘तो खरंच निसटलाय का?’ हा प्रश्न अद्याप अनुत्तरितच आहे
D.B. Cooper हा गुन्हेगार कमी आणि आता लोककथेचा नायक अधिक आहे.
FBI च्या प्रत्येक प्रशिक्षणार्थीला या गुन्ह्याचा धडा दिला जातो
आणि पलीकडे अमेरिकेत आजही प्रश्न चर्चिला जातो….
डीबी कूपर होता कोण? आणि तो कुठे गायब झाला?
संदर्भ (References)
- FBI Records: D.B. Cooper Case File – FBI Vault
- Geoffrey Gray, Skyjack: The Hunt for D.B. Cooper
- Smithsonian Magazine – The Mystery of D.B. Cooper
- Northwest Orient Airlines archival records
- The Oregonian archives (1971–1980 coverage)

