Critical Care Insurance Policy coverage and benefits in Marathi explanation: सध्याच्या स्पर्धात्मक युगात सर्वसामान्यांचे जीवन कमालीचे धकाधकीचे झाले आहे. सततचा मानसिक ताण, कामाचे अनियमित तास, अपुरी झोप आणि वेळीअवेळी जेवण यामुळे अगदी तरुण वयातच हृदयविकार (Heart Attack), मधुमेह, किडनीचे आजार आणि कर्करोग (Cancer) यांसारखे गंभीर आजार जडत असल्याचे चित्र समोर येत आहे. अशा गंभीर आजारांवरील उपचार खूप खर्चिक असतात. अशा गंभीर आजारांवर वेळीच उपचार घ्यावे लागतात आणि ते बऱ्यापैकी खर्चिक असतात. तसेच या उपचारांच्या दरम्यान संबंधित रुग्णास नोकरी असल्यास प्रसंगी बिनपगारी रजासुद्धा घ्यावी लागते. किंवा व्यवसाय असल्यास व्यवसायात अडथळा येऊन आर्थिक नुकसानसुद्धा होऊ शकते…
बिनपगारी रजेचीही नुकसानभरपाई
अशा प्रसंगी आपल्याकडे नेहमीची हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी असेल तर त्यातून काहीप्रमाणात हॉस्पिटलायझेशनवर झालेल्या खर्चाची काही रक्कम (पॉलिसी कव्हरनुसार ) क्लेम पोटी मिळू शकते. मात्र बिनपगारी रजा तसेच व्यावसायिक नुकसान याची भरपाई क्लेमपोटी मिळू शकत नाही. अशा वेळी क्रिटिकल केअर इन्श्युरन्स पॉलिसी असल्यास या नुकसानीची भरपाई पॉलिसी कव्हरनुसार मिळू शकते.
रक्कम एकमुठी मिळते
तथापि, अजूनही या पॉलिसीबाबत सर्वसामान्य लोकांना फारशी माहिती नाही. म्हणूनच आज आपण क्रिटिकल केअर इन्श्युरन्सबाबत सविस्तर माहिती समजावून घेऊ. या पॉलिसीला क्रिटिकल इलनेस इन्शुरन्स पॉलिसी (Critical Illness Insurance Policy) असेही म्हणतात. क्रिटिकल इलनेस म्हणजे गंभीर आणि जीवघेणा आजार. अशा गंभीर वा जीवघेण्या आजारांसंदर्भात आर्थिक संरक्षण देणारी एक विशेष विमा पॉलिसी होय. जेव्हा एखाद्या व्यक्तीला या पॉलिसीमध्ये समाविष्ट असलेल्या गंभीर आजाराचे (उदा. कॅन्सर, हार्ट अटॅक, पॅरालिसीस , ब्रेन ट्युमर , किडनी ट्रान्सप्लांट, ऑर्गन ट्रान्सप्लांट) निदान होते, त्यावेळी विमा कंपनी रुग्णास पॉलिसी कव्हर इतकी रक्कम एकमुठी देऊ करते. आपल्या नेहमीच्या हेल्थ इन्शुरन्सपेक्षा ही पॉलिसी पूर्णपणे वेगळी असते.

क्रिटिकल इलनेस पॉलिसीची वैशिष्ट्ये काय असतात?
- एकरकमी पेआउट (Lump-sum Payout): आजाराचे निदान होताच विम्याची पूर्ण रक्कम एकाच वेळी दिली जाते. हा पैसा तुम्ही हॉस्पिटलचे बिल भरण्यासाठी, कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी किंवा घरखर्चासाठी कुठेही वापरू शकता किंवा अन्य कुठल्याही कारणासाठी वापरू शकता .
- वेटिंग पिरियड: पॉलिसी घेतल्यापासून ९० दिवसांच्या आत गंभीर आजाराचे निदान झाल्यास क्लेम मिळत नाही.
- सर्वसाधारणपणे १८ ते ६५ वयापर्यंत ही पॉलिसी मिळू शकते. तर वयाच्या ७० ते ७५ पर्यंत पॉलिसीचे नूतनीकरण करता येते.
- सर्व्हायव्हल पिरियड (Survival Period): या पॉलिसीमध्ये सामान्यतः ३० दिवसांचा सर्व्हायव्हल पिरियड असतो. म्हणजेच, आजाराचे निदान झाल्यानंतर पॉलिसीधारकाने किमान ३० दिवस जिवंत राहणे आवश्यक असते, तरच क्लेम मिळतो.
- पॉलिसी घेण्याचे पर्याय: तुम्ही ही पॉलिसी स्वतंत्रपणे (Standalone Plan) खरेदी करू शकता किंवा तुमच्या चालू असलेल्या टर्म इन्शुरन्स/ हेल्थ इन्शुरन्ससोबत ‘रायडर’ (Rider) म्हणून जोडू शकता.
या पॉलिसीमध्ये कोणते आजार प्रामुख्याने समाविष्ट असतात?
विमा कंपन्यांनुसार आजारांची संख्या बदलू शकते, परंतु खालील महत्त्वाचेआजार यामध्ये प्रामुख्याने समाविष्ट असतात
- कॅन्सर (Cancer) – कर्करोग
- हार्ट अटॅक (First Heart Attack) – हृदयविकाराचा झटका
- किडनी निकामी होणे (Kidney Failure) – मूत्रपिंड निकामी होणे
- स्ट्रोक किंवा पॅरालिसिस (Stroke / Paralysis) – अर्धांगवायू
- प्रमुख अवयव प्रत्यारोपण (Major Organ Transplant) – अवयव ट्रान्सप्लांट
- ओपन चेस्ट CABG (By-pass Surgery) – बायपास शस्त्रक्रिया
नेहमीची हेल्थ इन्शुरन्स/ फ्लोटर हेल्थ इन्शुरन्स व क्रिटिकल इलनेस इन्शुरन्स पॉलिसी यात काय फरक आहे?

क्रिटिकल केअर इन्श्युरन्स पॉलिसी कुणी आवर्जून घेणे गरजेचे आहे ?
ज्यांच्या कुटुंबात हृदयविकार, कॅन्सर, पॅरालिसिस अशा गंभीर आजारांचा पूर्व इतिहास (आनुवंशिक ) असेल अशांनी ही पॉलिसी आवर्जून घ्यावी. त्याचबरोबर आपण घरातील एकमेव कमावते असाल व आपण गृह कर्ज किंवा अन्य मोठे कर्ज घेतले असेल तर ही पॉलिसी घेणे हितावह असते.
क्रिटिकल केअर पॉलिसीचे कव्हर किती असावे व त्यासाठी साधारणपणे किती वार्षिक प्रीमियम असतो?
आनुवंशिक आजारांची शक्यता व त्यासाठी येणारा खर्च विचारात घेऊन पॉलिसी कव्हरची रक्कम ठरवावी. २५ वर्षे वयाच्या व्यक्तीस रु.१५ लाखाचे कव्हर असणारी पॉलिसी घेण्यासाठी सुमारे १० ते १२ हजार इतका वार्षिक प्रीमियम पडू शकतो. प्रीमियम इन्श्युरन्स कंपनी व अर्जदाराचे वय आणि फॅमिली हिस्ट्री या नुसार कमी अधिक असू शकतो.
