गुजरातमधील वडोदरामध्ये मगरींची गणना करण्यात आली. वडोदरा या शहरातून विश्वामित्री नदी वाहते. शहरातील वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या भागातून जाणाऱ्या नदी पात्रात सर्वाधिक मगरी आढळून आल्या आहेत. गुजरातच्या वनविभागाने आणि महाराजा सयाजीराव विद्यापीठातील प्राणीशास्त्र विभागाने मगरींची गणना केली. मगरींची गणना दोन दिवस सुरू होती. या गणनेत गोळा केलेल्या माहितीचा अभ्यास केला जाणार आहे. त्यातून अनेक आश्चर्यकारक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विश्वामित्री नदीत १७.५ किमी दूर पर्यंत ही गणना करण्यात आली. त्यातून अनेक गोष्टी समोर आल्या आहेत.

मगरींमुळे वडोदरा शहराला वेगळी ओळख

वडोदरा मधील मगरींची गणना करणे आवश्यक असल्याचे गुजरातमधील पर्यावरणीय शिक्षण आणि संशोधन (GEER Foundation) संस्थेने सांगितले होते. त्यानुसार ही गणना करण्यात आली. याआधी २०२० मध्ये मगरींची गणना झाली होती. दरम्यान, वडोदरा महानगरपालिकेने विश्वामित्री नदीतील गाळ काढल्यानंतर पहिल्यांदाच मगरींची गणना झाली आहे. प्राणीशास्त्राचे प्राध्यापक रणजितसिंह देवकर यांच्या अध्यक्षतेखाली ही गणना करण्यात आली. ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला देवकर म्हणाले, मगरींच्या वागणुकीतील व त्यांच्या संख्येतील बदलांचा अभ्यास करणे हे या गणनेचे उद्दिष्ट आहे. फक्त शहरातून जाणाऱ्या नदीत किती मगरी आहेत हे जाणून घेणे, हे एकमेव उद्दिष्ट या गणनेचे नाही.

मगर गणना कशी करायची, याबाबत प्राध्यापक रणजितसिंह देवकर यांनी नियोजन केले होते. वडोदरा शहरातून जाणाऱ्या विश्वामित्री नदीतील मगरींबाबत पाच गोष्टींचा अभ्यास केला जाणार आहे. नदीत राहणाऱ्या मगरींमुळे वडोदरा (बडोदा) शहराला एक वेगळी ओळख मिळाली आहे, असे प्रा. देवकर म्हणाले.

मगरींबाबत कोणती माहिती मिळणार?

वडोदरा शहरात सरपटणारे प्राणी किती, त्यांच्या प्रजाती कोणत्या याची नोंद ठेवण्याच्या प्रक्रियेचा हा भाग असल्याचे देवकर म्हणाले. प्रा. देवकर म्हणाले, “आम्ही मगरींची संख्या मोजत आहोत. पण, आम्हाला मगरींचे वय, आकार, प्रजाती आणि त्यांचे वर्गीकरण यांचा अभ्यास करण्यात अधिक रस आहे. कोणत्या भागात किती मगरी आहेत, त्यांचे वर्तन कशा स्वरूपाचे आहे, त्यांचा अधिवास कुठे आहे, यांबाबत आम्ही सर्वेक्षण व अभ्यास करणार आहोत. त्यानंतर आम्ही त्याची तुलना २०२० मध्ये केलेल्या मगर गणनेच्या अहवालाशी करणार आहोत. विश्वामित्री नदीत राहणाऱ्या मगरी त्यांचे अन्न कसे मिळवतात, अधिवास कसा तयार करतात यांबाबत या अहवालातून माहिती मिळू शकणार आहे. तसेच मगरींच्या आकारानुसार त्यांचे वर्गीकरण केले जाणार आहे.”, असे देवकर म्हणाले.

मगरींच्या आजूबाजूला मोठेमोठे कासव आढळले

वडोदरा महानगरपालिकेने विश्वामित्री नदीतील गाळ काढल्यानंतर मगरींच्या वर्तनात काही बदल झाले आहेत का? याबाबत ठोस माहिती मिळू शकणार आहे. दरम्यान, मगरींच्या गणनेवेळी मुख्यत: मगरी पाण्याबाहेर ऊन्हात आढळून आल्या. तसेच त्यांच्या आजूबाजूला मोठे मोठे कासव देखील आढळून आले. देवकर म्हणाले, “नदीतील वनस्पती, झाडेझुडपे कमी झाली आहेत. गडद झाडेझुडपे असल्याने आधी मगरी दिसत नसतील. नदीत आता झाडेझुडपे नसल्याने मगरी पाण्याबाहेर आल्या की सहज दिसून येत आहेत. तसेच त्यांच्या आजूबाजूला मोठेमोठे कासव देखील पाण्याबाहेरच दिसून येत आहेत. मगरींचा स्वभाव हा बदलाला विरोध करण्याचा असतो. त्यात बदल झाला आहे का? याचा अभ्यास करता येईल.”

देवकर पुढे म्हणाले, “मगरींचा अधिवास नष्ट झाल्यानंतर त्या नवीन अधिवास तयार करतात का? किंवा जुन्याच अधिवासात वास्तव्य करणे त्यांना आवडते का? हा संशोधनाचा विषय आहे. जर मगरींचा अधिवास नष्ट झाल्यानंतर त्यांच्या वर्तनात बदल होत असतील तर मगरींचा अधिवास सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे. त्या भागात शांतता राहिल अशी व्यवस्था करणे आवश्यक ठरेल. याबाबत सविस्तर संशोधनानंतर पाऊल उचलता येईल.”

मगरींची गणना कशी करण्यात आली ?

वडोदरा शहरातून जाणाऱ्या १७.५ किमी लांब नदी पात्राला दहा भागांमध्ये विभागण्यात आले होते. प्रत्येक भागासाठी तीन किंवा पाच विद्यार्थी, एक वनरक्षक व एक एनजीओ सदस्य अशी टीम तयार करण्यात आली होती. महाराजा सयाजीराव विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना या गणनेत सहभागी करून घेण्यात आले होते. दिवसा दिसणाऱ्या मगरींची संख्या नोंद करण्यात आली. तसेच मगर हा निशाचर प्राणी आहे. निशाचर प्राणी हे रात्रीच्या वेळी सक्रिय असतात. दिवसा ते विश्रांती घेतात. त्यामुळे मगरींची गणना रात्रीदेखील करण्यात आली होती. रात्री मगरींचे डोळे लाल रंगाने चमकतात. त्यामुळे इतर प्राण्यांच्या तुलनेत मगर लगेच ओळखता येते. ‘कलर कोड’ टेक्निकचा वापर करून ही मगरींची गणना करण्यात आली.

मानवासाठी धोकादायक असलेल्या लांबलचक मगरींचे प्रमाण अधिक

दिवसा आढळून आलेल्या मगरींची माहिती त्यांच्या लांबीनुसार नोंद करण्यात आली. एक मीटरपेक्षा कमी लांबीची, एक-तीन मीटर लांबीची व तीन मीटरपेक्षा जास्त लांबीची अशा प्रकारे मगरींचे वर्गीकरण करण्यात आले. एक मीटरपेक्षा कमी लांबीच्या मगरींना अल्पवयीन, तर एक ते तीन मीटर लांबीच्या मगरींना प्रौढ श्रेणीत टाकण्यात आले. २.५ ते ३ मीटर लांबीच्या मगरी मोठ्या संख्येने आढळून आल्या. या मगरी मानवासाठी अत्यंत धोकादायक मानल्या जातात. त्यामुळे या मगरी ज्या भागात आढळल्या त्या भागांना धोकादायक घोषित करण्याचा प्रस्ताव दिला जाणार आहे. तसेच त्या भागात मानवांचा हस्तक्षेप अत्यंत कमी असेल, अशी सोय करण्याचा प्रस्ताव दिला जाणार असल्याचे देवकर म्हणाले. मगरींच्या गणनेत वडोदरा शहरातील २५ किमी लांब नदी पात्रात एकूण ४४२ मगरी आढळून आल्या. शहरातील वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या भागातील नदी पात्रातच सर्वाधिक मगरींची नोंद झाली आहे.