कृषी क्षेत्रातील पिकांचे हेक्टरी किंवा सरासरी प्रत्यक्ष उत्पादन मोजण्याची वैज्ञानिक पद्धतीने शासकीय व सांख्यिकी प्रक्रिया म्हणजे पीक कापणी प्रयोग. यंदा एल निनो परिणामामुळे खरीप हंगामात पावसाची प्रतिकूल परिस्थिती तयार झाली. पावसाचा मोठा खंड पडला असून दुष्काळामुळे विविध पिके करपली. या संकटाच्या स्थितीत पीक कापणी प्रयोगाचे महत्त्व अधिक वाढले. या पार्श्वभूमीवर मुदतपूर्व पीक कापणी प्रयोगाचा निर्णय कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी घेतला. या संदर्भात राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना कृषी आयुक्तांनी निर्देश दिले आहेत.
पीक कापणी प्रयोगाचा उपयोग काय?
प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत सन २०२६-२७मधील खरीप व रब्बी हंगामासाठी पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत विविध नैसर्गिक आपत्ती किंवा पीक उत्पादनावर विपरीत परिणाम करणाऱ्या इतर कारणांमुळे हंगामाच्या शेवटी पीक कापणी प्रयोग आधारे महसूल मंडळामध्ये पिकाच्या उंबरठा उत्पादनाच्या तुलनेत येणारी घट गृहीत धरुन नुकसान भरपाई देय आहे. त्यामुळे योजनेअंतर्गत पीक नुकसान भरपाई निश्चितीसाठी नियोजित पीक कापणी प्रयोगांचे अनन्य साधारण महत्त्व असून त्याची संवेदनशील व काटेकोरपणे मुदतीत अंमलबजावणी करण्याचे निर्देश कृषी आयुक्तालयाने दिले आहेत. पीक विमा योजनेअंतर्गत उंबरठा उत्पन्नापेक्षा प्रत्यक्ष उत्पादन कमी आल्यास शेतकऱ्यांना मिळणारी नुकसान भरपाई कापणी प्रयोगाच्या आकडेवारीवर निश्चित केली जाते. अन्न सुरक्षा, दुष्काळ, हमीभाव व पिकाचे उत्पादन आदीसंदर्भात शासकीय धोरण ठरवता प्रयोगातून समोर आलेल्या आकडेवारीचा उपयोग होतो. प्रत्यक्ष क्षेत्रातील वास्तव चित्र यातून समोर येते.
पीक कापणी प्रयोग कसा केला जातो?
पीक कापणी प्रयोग करण्याची एक विशिष्ट पद्धत असते. महसूल आणि कृषी विभागामार्फत यादृच्छिक पद्धतीने ठराविक शेत आणि लहान भूखंड निश्चित केला जातो. निवडलेल्या जमिनीचे सीमांकन करण्यात येते. या प्रक्रियेदरम्यान महसूल व कृषी विभागातील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत निश्चित केलेल्या जमिनीवरील पिके कापली जातात. त्याचे वजन केले जाते. त्यातून समोर आलेल्या उत्पादनाची अधिकृत नोंद घेण्यात येते. याच आकडेवारीवरून तालुका, जिल्हा किंवा राज्य पातळीवरील प्रति हेक्टरी उत्पादनाचा अंदाज लावला जातो. पीक विमा भरपाईसाठी हीच आकडेवारी ग्राह्य धरण्यात येत असल्याने दुष्काळामध्ये त्याचे विशेष महत्त्व अधोरेखित होते.
प्रयोगाचे उत्पादन नोंदवण्याचा कालावधी कोणता?
खरीप पिकांचे नियोजित पीक कापणी प्रयोगांची कार्यवाही पूर्णत्वास आलेली असून उडीद, मूग व सोयाबीन सारख्या कमी कालावधीच्या पिकाच्या धान्य उत्पादनाची नोंद घेण्यात येत आहे. काही ठिकाणी मुदतपूर्व पिकाची काढणीची वेळ उद्भवली. या परिस्थितीत पीक कापणी प्रयोगाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना कृषी विभागाने दिल्या आहेत. सर्वसाधारणपणे नियोजित पीक कापणी प्रयोगाचे उत्पादन हे पीक कापणीस तयार झाल्यानंतर नोंदवले जात असते.
मुदतपूर्व पीक कापणी प्रयोग करण्याचे कारण काय?
अतिवृष्टी, पूर, अवर्षण, रोग, किडींचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव, पीक उद्ध्वस्त किंवा नष्ट झाल्यास ते मोडून दुसऱ्या पिकासाठी शेतकरी जमीन तयार करण्याच्या स्थितीत असेल आदी अपवादात्मक परिस्थितीमध्ये मुदतपूर्व पीक कापणी प्रयोग घेणे आवश्यक ठरते. या परिस्थितीत पीक कापणी प्रयोग घेऊन वास्तविक उत्पादन नोंदवले जाते. यावर्षी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मुदतपूर्व पीक कापणी प्रयोगाचा निर्णय घेऊन काटेकोरपणे अंमलबजावणीचे आदेश दिले. उत्पादन शुन्य येत असेल तर ग्रामस्तरीय समिती सदस्यांच्या उपस्थितीत पंचनामा करुन पीक कापणी प्रयोग घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
आकडेवारी अचूक येण्यासाठी उपाययोजना काय?
पीक कापणी प्रयोगासाठी निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सर्वच जिल्ह्यांमध्ये सुकाणू समिती स्थापित करण्यात आली आहे. या समितीने पिकांच्या उत्पादनाची आकडेवारी अचूक व वेळेवर उपलब्ध होण्यासाठी पीक कापणी प्रयोगांचे नियोजन, अंमलबजावणी आणि पर्यवेक्षणासाठी सक्रिय राहणे आवश्यक असल्याचे सूचित केले. पीक अवस्थेमध्ये नैसर्गिक आपत्ती कोसळल्यामुळे नियोजित पीक कापणी प्रयोग वेळापत्रकानुसार होणार नसल्याने पीक कापणी प्रयोग मुदतपूर्व करण्याचे नियोजन करण्याचे आदेश दिले आहेत. त्यासाठी संबंधित विमा कंपनीला लेखी कळवण्यात आले. प्रतिकूल परिस्थितीचा आढावा घेऊन सर्व संबंधितांना तत्काळ सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार राज्यात सर्वत्र पीक कापणी प्रयोग सुरू झाले असून पीक विम्याच्या नुकसान भरपाईत तो उपयुक्त ठरण्याचा अंदाज आहे.
