Money Mule Bank Account Cyber Crime Alert Marathi: Avoid online banking fraud by understanding illegal money laundering traps: देशात डिजिटल व्यवहार वाढत असतानाच सायबर गुन्हेगारांनी फसवणूक करण्याचा एक नवा मार्ग शोधला आहे, त्याला ‘मनी म्यूल’ (Money Mule) म्हटले जाते. सर्वात चिंतेची बाब म्हणजे, अनेकदा सर्वसामान्य नागरिकांना आपण या गुन्ह्याचा भाग आहोत याची जाणीवच नसते. तुमचे बँक खाते वापरून गुन्हेगार कोट्यवधींचा काळा पैसा फिरवत असतात.
सातत्याने वाढतच असलेल्या डिजिटल व्यवहारांमुळे होणारी आर्थिक देवाण-घेवाण बँकिंग चॅनेलमधूनच होत असल्याने काळ्या पैशाच्या वाढीस मोठ्या प्रमाणावर आळा बसत आहे, ही खरोखरीच जमेची बाजू आहे. मात्र, अशा डिजिटल व्यवहारात होणाऱ्या घोटाळ्यांचे/ फसवणुकीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. व्यवहार बँक खात्यामार्फत झालेला असला, तरी फसवणूक झालेल्या व्यवहारातील प्रत्यक्ष लाभार्थ्याची ओळख पटवणे खूप अवघड होऊन जाते. तसेच, अशा गुन्ह्यातील दोषीपर्यंत पोहचणे तपास यंत्रणेला अवघड होऊन जाते, कारण अशा फसवणुकीच्या व्यवहारात मनी म्यूल्सचा सहभाग असतो. पण, मनी म्यूल म्हणजे नेमके काय… याचा हा आढावा.
मनी म्यूलची जाणीव सर्वसामान्यास नसते व आपल्यापैकी कोणीही कळत-नकळत मनी म्यूल होऊ शकतो. असे होऊ नये यासाठी आज आपण मनी म्यूल म्हणजे काय याची माहिती घेऊ.
१. मनी म्यूल म्हणजे काय?
मनी म्यूल (Money Mule) म्हणजे अशी व्यक्ती, जी सायबर गुन्हेगार किंवा फसवणूक करणाऱ्यांच्या सांगण्यावरून बेकायदेशीर पैसे बँक खात्यात स्वीकारते आणि ते दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर करते.
सोप्या भाषेत सांगायचे तर, गुन्हेगार त्यांचा काळा पैसा पांढरा करण्यासाठी (Money Laundering) तुमच्या बँक खात्याचा वापर ‘खेचरा’ (Mule) सारखा करत असतात.

२. मनी म्यूल्स कसे तयार केले/ नेमले जातात?
गुन्हेगारी टोळ्या मनी म्यूल नेमण्यासाठी प्रामुख्याने पुढील पद्धती वापरतात:
अ) फसव्या जाहिराती (Fake Advertisements)
· ई-मेल, एसएमएस, व्हॉट्सॲप, फेसबुक किंवा तत्सम सोशल मीडियाच्या माध्यमातून नोकरीचे प्रलोभन दाखवले जाते.
· वैशिष्ट्य: यासाठी कुठल्याही अनुभवाची/ शिक्षणाची अट नसते व काम घर बसल्या ऑनलाईन करावयाचे असते, असा उल्लेख केला जातो.
· परिणाम: शिक्षित परंतु व्यावसायिक कौशल्य नसणारी व्यक्ती सहज या जाळ्यात अडकते.
ब) रोमान्स स्कॅम (Romance Scam)
· प्रामुख्याने लग्न न झालेले, घटस्फोटित, किंवा विधवा-विधुर स्त्री/ पुरुष यांच्याशी सोशल मीडिया किंवा डेटिंग प्लॅटफॉर्मवर संपर्क साधला जातो.
· त्यांच्या वैवाहिक परिस्थितीचा गैरफायदा घेऊन प्रेम/ सहानुभूती दाखवून मनी म्यूल बनवले जाते.
क) बनावट खाती (Identity Theft)
· काही व्यक्तींना आपले बँक खाते गैरव्यवहारासाठी वापरले जात आहे, याची जाणीवच नसते.
· अशी खाती वैयक्तिक डेटा (आधार, पॅन) चोरी करून उघडली जातात.
३. मनी म्यूलचा वापर कसा केला जातो?
- अ. संपर्क आणि प्रलोभन: स्कॅमर्स सोशल मीडिया, व्हॉट्सॲप किंवा ईमेलद्वारे ‘घरबसल्या काम करा’ किंवा ‘झटपट पैसे कमवा’ असे आमिष दाखवतात.
ब. खात्याचा वापर: ते तुमच्या बँक खात्याचे तपशील मागतात. सायबर फसवणुकीतून चोरलेले पैसे थेट तुमच्या खात्यात जमा केले जातात.
क. पैसे पुढे फिरवणे: तुम्हाला त्या रकमेतील काही टक्के (उदा. २% ते ५%) कमिशन ठेवून उरलेले पैसे दुसऱ्या अनोळखी खात्यात किंवा क्रिप्टोकरन्सी वॉलेटमध्ये ट्रान्सफर करायला सांगितले जाते. - ड. पुरावे नष्ट करणे: एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे फिरवून गुन्हेगार पोलिसांना फसवणुकीचा मुख्य स्रोत शोधू देत नाहीत.
४. मनी म्यूल होवू नये यासाठी काय दक्षता घ्यावी?
- · नोकरीचे प्रलोभन टाळा: जेव्हा एखादी चांगली पगाराची नोकरी ऑफर केली जाते, परंतु त्यासाठी कुठल्याही अनुभव/ शिक्षणाची अट नसते, तेव्हा अशा नोकरीचा मोह टाळावा.
- · बँक तपशील शेअर करू नका: डेटिंग प्लॅटफॉर्मवर ओळख झालेली व्यक्ती आपले बँक अकाउंट, आधार कार्ड व पॅन तपशील मागत असेल, तर त्या व्यक्तीस प्रत्यक्ष भेटून खात्री पटल्याशिवाय आर्थिक व्यवहार करू नका.
- · कंपनीची पूर्ण माहिती घ्या: ‘वर्क फ्रॉम होम’ किंवा ऑनलाईन काम असेल, तर काम देऊ करणारी व्यक्ती/ संस्था यांची पूर्ण माहिती घेऊनच काम स्वीकारावे.
- · अनोळखी ऑफर नाकारा: केवळ घरबसल्या कमी कष्टात पैसे मिळतील म्हणून अनोळखी व्यक्ती/कंपनीची नोकरी किंवा भागीदारी स्वीकारू नये.
- · परदेशी ऑफर सावधानतेने घ्या: परदेशी कंपनी किंवा व्यक्तीकडून ऑफर आली तर पूर्ण खात्री झाल्याशिवाय ती स्वीकारू नये.
५. मनी म्यूल झाल्यास त्याचे काय परिणाम होतात?
- अ. फौजदारी गुन्हा (Criminal Charges):
- · भारतीय दंड संहितेनुसार व PMLA अॅक्ट २००२ (Prevention of Money Laundering Act) नुसार हा गंभीर गुन्हा आहे.
- · कळत अथवा नकळत मनी म्यूल झालेल्या व्यक्तीवर फौजदारी गुन्हा दाखल होऊन तुरुंगवास तसेच दंड होऊ शकतो.
- ब. आर्थिक नुकसान:
- · बँक खाते मनी म्यूल असल्याचे निदर्शनास आल्यावर ताबडतोब संबंधित व इतर बँक खाती गोठवली जातात.
- · प्रसंगी खात्यातील संपूर्ण रक्कम जप्त केली जाऊ शकते, ज्यामुळे आर्थिक अडचण उद्भवते.
- क. सामाजिक व वैयक्तिक नुकसान:
- · संबंधित व्यक्तीची सामाजिक प्रतिष्ठा डागाळली जाते.
- · नवीन कर्ज मिळणे व नोकरी मिळणे कठीण होते.
- · गुन्हेगारांशी संबंध असल्याचे उघड झाल्याने मित्र, नातेवाईक व शेजारी दुरावतात.
६. आपले बँक खाते मनी म्यूल झाल्याची शंका आल्यास काय करावे?
- अ. बँकेशी संपर्क साधा: त्वरित तुमच्या बँकेशी संपर्क साधून खात्यातील व्यवहार थांबवा.
- ब. सायबर हेल्पलाइन: केंद्र सरकारच्या १९३० या सायबर हेल्पलाइन नंबरवर कॉल करा.
- क. ऑनलाइन तक्रार: cybercrime.gov.in या अधिकृत पोर्टलवर जाऊन आपली तक्रार करू शकता.
