अमेरिकेत सायक्लोस्पोरा नावाच्या सूक्ष्म परजीवीच्या (parasite) संसर्गामुळे एका महिलेला दिवसातून साधारण ३० वेळा बाथरूमला पळावे लागल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या परजीवी जंतुच्या संसर्गामुळे तीव्र जुलाब, शरीरातील पाणी कमी होणे आणि रुग्णालयात भरती होण्याची वेळ येते. अमेरिकेतील हा सायक्लोस्पोराचा ताजा उद्रेक आजवरच्या सर्वात मोठ्या उद्रेकांपैकी एक मानला जात आहे. अमेरिकेत सायक्लोस्पोरा रुग्णांची संख्या २०१९ मधील नोंदीपेक्षाही अधिक झाली आहे. हा परजीवी इतका धोकादायक का आहे आणि भारतात याची प्रकरणे किती प्रमाणात आढळतात, याबद्दल यकृततज्ज्ञ, क्लिनिकल शास्त्रज्ञ आणि सार्वजनिक आरोग्य संशोधक डॉ. सायरियाक एबी फिलिप्स यांनी सविस्तर माहिती दिली आहे.

सायक्लोस्पोराचा संसर्ग हा बऱ्याचदा अन्नातून होणारी विषबाधा किंवा व्हायरल गॅस्ट्रोएन्टेरिटिस (पोटाचा फ्लू) यांच्यासारखाच वाटतो. त्यामुळे रूग्ण संभ्रमात पडतो. याची मुख्य कारणे काय?

सायक्लोस्पोराचा संसर्ग झाल्याचे या आजाराच्या कालावधीवरून कळते. जिवाणूंमुळे होणारी अन्नाची विषबाधा साधारणपणे एक ते तीन दिवसांत बरी होते, तर व्हायरल गॅस्ट्रो (viral gastroenteritis) दोन ते तीन दिवसांत बरा होतो. याउलट, सायक्लोस्पोरियासिस (cyclosporiasis) हा आजार सलग काही आठवडे राहू शकतो. जर यावर उपचार केले नाहीत, तर हा आजार काही दिवसांपासून ते महिनाभर किंवा त्याहून अधिक काळ राहू शकतो आणि पुन्हा पुन्हा होऊ शकतो.

सायक्लोस्पोरियासिस आजारपणाचा हा चक्रावून टाकणारा पॅटर्न आहे. रुग्णाला बरे वाटू लागते, आजार संपला असे त्याला वाटते आणि पुन्हा अचानक तब्बेत बिघडते. हे या आजाराचे मुख्य लक्षण मानले जाऊ शकते. तसेच, या परजीवीचा शरीरात वाढण्याचा काळ देखील सामान्य फूड पॉयझनिंगपेक्षा वेगळा असतो. सायक्लोस्पोराचा जंतू शरीरात गेल्यानंतर लक्षणे दिसायला सरासरी एक आठवडा लागतो. (हा काळ साधारण दोन दिवसांपासून ते दोन आठवड्यांपर्यंत किंवा त्याहून अधिक असू शकतो). त्यामुळे, जर रुग्ण काल रात्री खाल्लेल्या बिर्याणीला दोष देत असेल, तर तो सायक्लोस्पोरा नक्कीच नाही.

येथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे, सायक्लोस्पोरा हा एक प्रोटोझोआ (protozoan) म्हणजेच एकपेशीय सूक्ष्मजीव आहे जो तुमच्या शरीरात गेल्यानंतर स्वतःची संख्या वाढवतो. याउलट, पोटातील जंत (worms) हे मोठे आणि बहुपेशीय जीव असतात, जे मानवी शरीरात थेट स्वतःची संख्या वाढवू शकत नाहीत (ते शरीरात फक्त अंडी घालतात). या दोन्ही आजारांच्या लक्षणांमध्येही बराच फरक असतो. सायक्लोस्पोराच्या संसर्गात पाण्यासारखे जुलाब होतात. कधीकधी ते तीव्र (explosive) असतात. वजन कमी होणे, पोट फुगणे आणि जास्त गॅस होणे या त्रासांचा प्रभाव जास्त असतो. रुग्णाला अत्यंत जास्त आणि दीर्घकाळ टिकणारा थकवा जाणवतो. या आजारात उलट्या होणे हे मुख्य लक्षण नसते. हा संसर्ग ‘नॉन-इन्फ्लेमेटरी’ (दाह किंवा सूज न आणणारा) असतो. त्यामुळे रुग्णाच्या विष्ठेमध्ये रक्त किंवा पूच्या पेशी आढळत नाहीत. सायक्लोस्पोराचा संसर्ग झाल्यास ही लक्षणे प्रामुख्याने दिसतात.

सायक्लोस्पोरा झाल्यास उपचार कसे केले जातात?

मेट्रोनिडाझोल, अझिथ्रोमायसिन किंवा फ्लूरोक्विनोलोन यांसारख्या अँटीबायोटिक्सचा वापर या आजारावर अपयशी ठरतो. परंतु, त्यानंतर जेव्हा को-ट्रायमॉक्साझोल (co-trimoxazole) दिले जाते, तेव्हा आजारात अत्यंत वेगाने आणि कमालीची सुधारणा होते. ही सुधारणा इतकी स्पष्ट असते की, नंतर विचार केला असता या औषधाला मिळालेला प्रतिसाद हा स्वतःच या आजाराच्या निदानाची खात्री देणारा पुरावा ठरतो.

सायक्लोस्पोरामुळे शरीरात पोषक तत्वांचे शोषण न होणे, पित्ताशयाला सूज येणे आणि सांधेदुखी यांसारख्या आजारांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. विष्ठेमध्ये रक्त न पडता जर पाण्याचा जुलाब दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ टिकून राहिला, तर जोपर्यंत इतर काही सिद्ध होत नाही तोपर्यंत तो सायक्लोस्पोराचाच संसर्ग आहे असे मानले पाहिजे. यातील महत्त्वाची बाब म्हणजे नेहमीची ‘स्टूल फॉर ओव्हा अँड पॅरासाईट’ (stool for ova and parasite) ही विष्ठेची तपासणी या परजीवीला शोधू शकत नाही. प्रयोगशाळेला (लॅब) या परजीवीसाठी (सायक्लोस्पोरा) विशेष चाचणी करण्याची स्पष्ट विनंती डॉक्टरांना करावी लागते, अन्यथा लॅबमध्ये त्याचा शोध घेतलाच जात नाही.

सायक्लोस्पोरा हा जुना परजीवी आहे का? आणि याचा संसर्ग इतका प्रदीर्घ काळ का टिकतो?

१९९० च्या दशकापर्यंत सायक्लोस्पोरा हा केवळ उंदीर आणि सरपटणाऱ्या प्राण्यांनाच संक्रमित करतो, असे मानले जात होते. मानवामधील याच्या संसर्गाची पहिली नोंद १९७९ मध्ये पापुआ न्यू गिनी येथे झाली. ‘सायक्लोस्पोरा कायेतानेन्सिस’ (Cyclospora cayetanensis) हे नाव या परजीवीला १९९४ मध्ये मिळाले. या नावाचा उगम लिमा येथील ‘कायेतानो हेरेडिया युनिव्हर्सिटी’मधून झाला आहे, कारण या परजीवीवर मुख्य संशोधन याच विद्यापीठात झाले होते.

२०२३ मध्ये, अमेरिकेच्या सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल (CDC) मधील शास्त्रज्ञांनी हे दाखवून दिले की, सायक्लोस्पोराच्या किमान तीन वेगवेगळ्या वंशावळी मानवी सायक्लोस्पोरियासिससाठी कारणीभूत आहेत. या परजीवीचा शोध लागून जवळपास पाऊण शतक उलटले असले, तरी हा जीव नेमका काय आहे, हे समजून घेण्याचे काम आपण अजूनही करतच आहोत.

जिवाणूंप्रमाणे सायक्लोस्पोरा लॅबोरेटरीच्या कल्चर डिशमध्ये वाढवता येत नाही, त्यामुळे शास्त्रज्ञांना याचा अभ्यास करण्यासाठी प्रगत जीनोमिक साधनांवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून राहावे लागते. हा आजार इतका दीर्घकाळ का टिकतो, याबद्दल सांगायचे तर—सायक्लोस्पोरा हा एक अत्यंत चिवट परजीवी आहे जो लहान आतड्याच्या आतील थरामध्ये लपून राहतो आणि स्वतःची संख्या वाढवतो. तो शेजारील पेशींवर एकामागून एक अशा लाटांच्या स्वरूपात हल्ला करतो; यामुळे डॉक्टर आणि रुग्ण दोघांनाही जेव्हा वाटते की आता बरे होत आहे, नेमकी तेव्हाच हा आजार पुन्हा उलटतो.

तो आतड्याची पोषक तत्वे शोषून घेण्याची क्षमता नष्ट करतो, ज्यामुळे जुलाब थांबल्यानंतरही प्रचंड थकवा आणि वजन कमी होण्याचा त्रास अनेक आठवडे रेंगाळत राहतो. शिवाय, आपल्या शरीरात याच्याविरुद्ध कायमस्वरूपी रोगप्रतिकारक शक्ती तयार होत नाही, याचा अर्थ एखाद्या व्यक्तीला हा संसर्ग पुन्हा होऊ शकतो. हा परजीवी विशेषतः जास्त धोकादायक आहे कारण याच्या अंड्यांवर एक अतिशय टणक आणि मजबूत कवच असते, जे माती आणि पाण्यात अनेक आठवडे जिवंत राहू शकते. या कवचावर क्लोरीनचाही काहीही परिणाम होत नाही, ज्यामुळे हा परजीवी पालेभाज्या आणि ताज्या फळांच्या माध्यमातून सहजपणे आपल्या शरीरात प्रवेश करतो.

भारतातील याच्या प्रादुर्भावाचे प्रमाण काय आहे?

आपल्याला हे माहीत नाही, कारण याकडे कोणाचेच लक्ष नसते किंवा कोणी याची तपासणी करत नाही. या संदर्भातील सर्वात महत्त्वाची नोंद म्हणजे कोलकाता येथील ‘ICMR-नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कॉलरा अँड एन्टेरिक डिसीजेस’ने २०२५ मध्ये केलेला एक अभ्यास आहे. या अभ्यासानुसार, पूर्व भारतात जुलाब झालेल्या रुग्णांपैकी सुमारे २% रुग्णांमध्ये ‘सी. कायेतानेन्सिस’ (C. cayetanensis) आढळला. जुलै आणि ऑगस्ट महिन्यांत हे प्रमाण वाढून ७% पर्यंत पोहोचले, तर ५ ते १२ वर्षे वयोगटातील मुले या संसर्गामुळे सर्वाधिक प्रभावित झाली होती, ज्यांच्यामध्ये हे प्रमाण तब्बल १८% होते. घराभोवतालची अस्वच्छता आणि ग्रामीण भागातील वास्तव्य यांमुळे हा संसर्ग होण्याचा धोका अधिक वाढतो.

ताजी फळे आणि भाज्यांमुळे बऱ्याचदा या रोगाचा प्रादुर्भाव पसरतो. शेतापासून ताटापर्यंतच्या पुरवठा साखळीत अशा काही त्रुटी आहेत का, ज्यामुळे हा संसर्ग पसरण्यास वाव मिळतो?

सायक्लोस्पोरा अन्न सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यात कमालीचा पटाईत आहे, कारण तो पालेभाज्या आणि बेरीज् (berries) सारख्या कच्च्या खाल्ल्या जाणाऱ्या पदार्थांवर अधिक प्रमाणात आढळतो. तसेच या परजीवीला नष्ट करू शकेल अशी कोणतीही प्रभावी रासायनिक प्रक्रिया सध्या उपलब्ध नाही आणि वनस्पतींच्या गुंतागुंतीच्या भागांवर तो घट्ट चिकटून राहतो. केवळ मानवांमध्ये आढळणाऱ्या या परजीवीच्या प्रसाराचे मुख्य माध्यम पाणी हेच आहे. ज्यामध्ये दूषित सिंचन, भाज्या धुण्यासाठी वापरले जाणारे पाणी आणि कीटकनाशक फवारणीसाठी वापरले जाणारे पाणी यांचा समावेश होतो. याचाच अर्थ असा की, प्रत्येक संसर्गाचे मूळ हे अस्वच्छता आणि शौचालयांच्या अभावाशी जोडलेले आहे.

७० अंश सेल्सिअस तापमानावर अन्न पूर्णपणे शिजवणे हाच या परजीवीला नष्ट करण्याचा एकमेव निश्चित मार्ग असला, तरी शेतीच्या पातळीवर काही नियंत्रणे ठेवून हा धोका कमी केला जाऊ शकतो; जसे की ठिबक सिंचन, प्रक्रिया केलेले पाणी वापरणे, शेतमजुरांसाठी शौचालयांची सोय करणे आणि पुरवठ्याची अचूक साखळी तपासणे. याशिवाय, ग्राहक पूर्व-प्रक्रिया केलेल्या किंवा आधीच धुवून पॅक केलेल्या सॅलड किट्सऐवजी थेट अख्ख्या भाज्या खरेदी करू शकतात.

सायक्लोस्पोरियासिसच्या तपासणी दरम्यान सार्वजनिक आरोग्य यंत्रणांना कोणत्या सर्वात मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागतो, विशेषतः आंतरराष्ट्रीय पुरवठा साखळीतून दूषित अन्नपदार्थांचा शोध घेताना?

मॉलिक्युलर जेनोटायपिंग तंत्रज्ञान प्रगत होत असले, तरी पुरवठा साखळीच्या अपुऱ्या किंवा खराब कागदपत्रांमुळे बऱ्याचदा संसर्गाच्या मूळाचा शोध घेणे अशक्य होते. म्हणजेच येथे विज्ञानापेक्षा कागदपत्रांची कमतरता हाच मुख्य अडथळा ठरतो. याशिवाय, सायक्लोस्पोरा लॅबमध्ये वाढवण्याच्या पद्धती उपलब्ध नसल्यामुळे, सध्याच्या पीसीआर चाचण्यांद्वारे या परजीवीचे जाड कवच असलेले जंतू जिवंत आहेत की मृत, यातील फरक ओळखता येत नाही. सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञांच्या मते, २०२६ मधील उद्रेकाचा मोठा विस्तार आणि त्याचा मागोवा घेण्यास झालेला उशीर, हा अमेरिकेच्या सीडीसीद्वारे केल्या जाणाऱ्या देखरेखीमध्ये झालेल्या कपातीचाच परिणाम होता.