‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये अचूकता आणि संहारकता प्रत्यक्ष रणभूमीवर सिद्ध करणारे ब्रह्मोस क्षेपणास्त्र ग्रीस आणि सायप्रस देश खरेदी करणार असल्याची चर्चा आहे. सायप्रसने ब्रह्मोस क्षेपणास्त्र खरेदी करण्याची इच्छा प्रदर्शित केली आहे. हे संरक्षण करार झाले काय, या विचाराने पाकिस्तानमित्र आणि भारतशत्रू तुर्कीची पाचावर धारण बसली आहे.
सायप्रसच्या अध्यक्षांच्या भारतभेटीत चर्चा
सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडौलाइड्स यांचा नुकताच भारतदौरा झाला. या दौऱ्यात त्यांनी ब्रह्मोस क्षेपणास्त्रासह मानवरहित हवाई वाहन (यूएव्ही) आणि अत्याधुनिक ड्रोन खरेदी करण्यास सायप्रस इच्छुक असल्याचे सांगितल्याचे वृत्त आहे. सायप्रसबरोबर हे संरक्षण करार झाले, तर तुर्कीचे अध्यक्ष रसीप एर्दोगन यांना धक्का बसणार आहे. सायप्रस आणि तुर्की यांच्यातील संबंध तणावाचे आहेत. उत्तर सायप्रस हा भाग तुर्कीने बळकावलेला आहे. ब्रह्मोससह अत्याधुनिक ड्रोनची खरेदी सायप्रसने केली, तर येथील भूराजकीय समीकरणे बदलणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि क्रिस्टोडौलाइड्स यांच्या भेटीत दोन्ही देशांमध्ये २०२६ ते ३१ या पाच वर्षांसाठी संरक्षण संबंधांचा आराखडा ठरविण्यात आला. या भेटीत भारताने सायप्रसबरोबरील संबंध सामरिक स्तरापर्यंत उंचावले आहेत. भारतातील या घडामोडींमुळे तुर्की सावध झाला आहे.
‘ब्रह्मोस’ला पसंती
भारताने फिलिपिन्सला ब्रह्मोस क्षेपणास्त्राची निर्यात केली आहे. व्हिएतनामबरोबरही नुकताच ब्रह्मोस क्षेपणास्त्रनिर्यातीचा करार केला आहे. याखेरीज, इंडोनेशियाबरोबर करार अंतिम टप्प्यात असल्याचे वृत्त आहे. ग्रीस, चिली, इजिप्त, अल्जीरिया, मलेशिया, थायलंड, व्हेनेझुएला आदी देशांबरोबरही या क्षेपणास्त्रांच्या निर्यातीचा करार होऊ शकतो. बदलत्या भूराजकीय संबंधांमध्ये ‘ब्रह्मोस’ची निर्यात हा कळीचा मुद्दा ठरू शकतो. या क्षेपणास्त्राचे उत्पादन आपण रशियाबरोबर घेत असल्याने त्यांचीही संमती या निर्यातीला असते.
‘ब्रह्मोस’ची अचूकता
ब्रह्मोस क्षेपणास्त्रांनी ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये आपल्या अचूक कामगिरीचे दर्शन घडविले आहे. लढाऊ विमानावरही या क्षेपणास्त्राला बसविण्यात आले आहे. त्यामुळे मारक क्षमता कमालीची वाढली आहे. रशियाबरोबर तयार करण्यात आलेले हे क्षेपणास्त्र भारताच्या भात्यातील मुख्य अस्त्रांपैकी एक आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान तुर्कीने पाकिस्तानला ड्रोन पुरविले होते. तसेच, भरीव मदतही केली होती. तुर्कीच्या भोवती सायप्रस आणि कदाचित ग्रीसबरोबरही ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा करार होऊ शकतो. अर्थात या दोन्ही बाबी अद्याप चर्चेच्या पातळीवर आहेत. मात्र, असा काही करार प्रत्यक्षात आलाच, तर या क्षेत्रातील भूराजकीय गणिते बदलू शकतात.
तुर्कीमधील माध्यमांमध्ये दखल
सायप्रसच्या अध्यक्षांच्या भारतभेटीची तुर्कीतील माध्यमांनीही दखल घेतली. भारताबरोबर ब्रह्मोस क्षेपणास्त्र, यूएव्ही याचबरोबर सागरी सुरक्षा, सायबर सुरक्षा आणि तंत्रज्ञान सहकार्यदेखील सायप्रस आणि भारतामध्ये वाढणार असल्याचे ‘तुर्कियेटुडे’ने म्हटले आहे. ग्रीसबरोबर भारताच्या वाढत्या संबंधांची दखल तुर्कीमधील अन्य एका पोर्टलवर घेण्यात आली आहे. याखेरीज भारतातील प्रसारमाध्यमांमध्ये विविध ठिकाणी प्रसिद्ध झालेली वृत्ते आणि तुर्कीसंदर्भात दिलेल्या इशाऱ्यांचीही दखल घेण्यात आली आहे.
भारतासमोरील आव्हान मोठे
सध्याच्या काळात सततच्या बदलत राहणाऱ्या भू-राजकीय स्थितीमुळे भारतासमोरील आव्हाने कमालीची वाढली आहेत. एकीकडे पाकिस्तान, चीनसारखे दोन अण्वस्त्रसज्ज शेजारी देश आणि पश्चिम आशियातील सध्याच्या गुंतागुंतीच्या घडामोडी, ऊर्जासुरक्षेचे संकट या काळात संरक्षण आघाडीवर भारत अधिकाधिक सज्ज होण्याचा प्रयत्न करीत आहे. लंडनमधील ‘आयआयएसएस’ ख्यातनाम थिंक-टँकने भारताच्या या प्रयत्नांची दखल घेतली आहे. भारताचे यूएई, इस्रायलबरोबरच ग्रीस आणि सायप्रसबरोबरही संबंध दृढ होत आहेत. याची प्रचिती सायप्रसच्या अध्यक्षांच्या भारतभेटीत आली. संरक्षण क्षेत्रात भारताने आता आत्मनिर्भरतेचे आणि निर्यातीचे धोरण स्वीकारले आहे. भारताच्या या ताकदीकडे जग दुर्लक्ष करू शकत नाही. असे असले, तरी भारताला आणखी खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. ग्रीस, सायप्रसबरोबरील संरक्षण संबंध आणि संभाव्य निर्यात अद्याप चर्चेच्याच पातळीवर आहे. अनेक बाबींना मूर्त रूप वेळेत देणे गरजेचे आहे. भारताची आंतरराष्ट्रीय पातळीवर घोडदौड वेगाने वाढून देशांतर्गत पातळीवर आत्मनिर्भरताही तितकीच मजबूत होणे गरजेचे आहे.
